हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून …
हरवलेली कौशल्ये परत मिळावी म्हणून …
कोरोनाचे संकट सरले, जनजीवन पूर्ववत झाले… आता परिस्थिती रूळावर येईल अशी आशा मनात जागी झाली आहे. अर्थात या दोन अडीच वर्षांच्या कोविड काळामुळे मुलांच्या शिक्षणाचे जे अमर्याद नुकसान झाले आहे ते भरून येण्यासाठी बरेच काम करावे लागणार आहे, ही जाणीव आहे.
मार्च २०२२ मध्ये मुलांचे मूल्यमापन झाले आणि एप्रिल २०२२ मध्ये खेळघर प्रकल्पाचे वार्षिक मूल्यमापन झाले. या प्रक्रियेतून आव्हाने अधिक स्पष्टपणे समोर आली.
६-१० वयोगटातील मुलांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. लेखन-वाचन आणि गणिताचा पाया पक्का होण्याच्या आतच त्यांच्या शिक्षणात संपूर्ण २ वर्षांचा खंड पडला. दुसरी ते पाचवीच्या वर्गामधली जवळपास निम्मी मुले लेखन वाचन आणि गणिताच्या किमान क्षमतांपर्यंत देखील पोचू शकली नाहीत. पुढच्या इयत्तांमधली देखील निम्मी मुले या कौशल्यांमध्ये पुष्कळ मागे आली आहेत. इतर विषय तर जणू विस्मरणातच गेले आहेत.
आता अधिक तयारीनिशी कामाला लागण्याची गरज आहे.
आम्ही जवळचा आणि दूरचा असे दोन्ही प्लॅन बनवले.
मागे पडलेल्या मुलांसाठी मे महिन्यामध्ये ३ आठवड्यांचे लेखन वाचनाचे वर्कशॉप आखले. अभ्यासक्रम आखला, साधने तयार केली, शिक्षक, स्वयंसेवी कार्यकर्ते, पालक, युवक गटाची मुले अशा १०-१२ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेतले. २-३ मुलांमागे एक शिक्षक असे हे वर्कशॉप मोठ्या उत्साहाने पूर्ण झाले. मुले पुन्हा शिक्षणाच्या दाय-यात आली. त्यांना शिकावेसे वाटू लागले, आपल्याला जमेल हा विश्वास वाटू लागला.
पुढे देखील वर्षभर आठवड्यातून तीन वेळा लेखन वाचनात मागे पडणाऱ्या मुलांचे स्वतंत्र वर्ग घेण्याचे ठरले आहे. यासाठी पालकगट आणि युवक गटातील मुले रोजच्या वर्गांमध्ये शिक्षकांसमवेत काम करतील.
हरवलेली ही कौशल्ये मुलांना परत मिळावी म्हणून खेळघराला आपल्या मदतीची गरज आहे. प्रत्येक मुला / मुलीबरोबर वैयक्तिक काम करण्याची गरज आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा, एक तास याप्रमाणे आपण या मुलांसाठी वेळ देऊ शकलात तर फार मदतीचे होईल.