विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत.

राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, एकाच वर्गात शिकतोय. घरी अभ्यास एकत्र करतो. आदल्या दिवशी शिकवलेल्या नि वाचलेल्या धड्यावरील प्रश्नोत्तरात तो माझ्यापेक्षा सरस ठरतो. असं कां व्हावं?’
सर म्हणाले, ‘राजू तुझ्या जिज्ञासेबद्दल तुझे कौतुक करावेसे वाटते.’ ते पुढे म्हणाले, तुम्ही दोघांनी वाचलेल्या धड्यावर संजू पटापट उत्तर देतो नि तू मागे पडतोस बरोबर? अभ्यासातून बुद्धीचा विकास होतो. अभ्यासासाठी आपण वाचन, मनन-चिंतन, स्मरण, लेखन यांसारखी कौशल्ये वापरतो. ठीक ना? मला काय सांगायचंय की संजू अभ्यासात या कौशल्यांचा उपयोग तुझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे करीत असावा.
राजू : ‘सर तुम्ही म्हणालात ती कौशल्ये कुणी शिकवल्याचं आठवत नाही.’
सर : ‘खरं तर बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी उपयुक्त कौशल्ये व साधने विद्यार्थ्यांनी कशी वापरावीत हा शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. पण ती शिक्षणक्रमात उल्लेखिलेली नाहीत. त्यादृष्टीने जाणीवपूर्वक काही प्रयत्न होत असल्याचेही दिसून येत नाही.
संजू अडखळत म्हणाला, ‘सर हे समजायला थोडं अवघड जातंय…’
सर : बरं त्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. एका जंगल कंत्राटदाराकडे काही आदिवासी काम करीत. त्यात मंगल्या पाच वर्षे काम करीत होता. त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नव्हती. पण तीन वर्षांपूर्वी कामावर लागलेल्या जन्या-लाकूडतोड्यास दोनदा पगार वाढ मिळाली होती. हे पाहून मंगल्याला खूप वाईट वाटले. त्याने मालकाकडे विषय काढला. मालक म्हणाला, ‘अरे मंगल्या, पाच वर्षांपूर्वी तू जेवढी झाडे तोडायचास, तेवढीच आज तोडतोस. तू जास्त झाडे तोडू लागल्यास मी तुझाही पगार वाढवेन. मंगल्याने खूप प्रयत्न केला. खूप वेळ काम करूनही पाहिलं. पण त्याला अधिक झाडे तोडता येईनात. बिचारा मंगल्या निराश झाला. तो पुन्हा मालकाला भेटला. मालकाने त्याला जन्याचा सल्ला घ्यावयास सांगितले. मालक म्हणाला, ‘कदाचित आपल्या दोघांना ठाऊक नसलेली महत्त्वाची गोष्ट जन्याला माहीत असेल.’ मंगल्याने धीर करून जन्याला विचारले. त्यावर जन्याने मंगल्यास सांगितले की, एक झाड तोडलं की मी काही क्षण थांबतो व कुर्हाेडीला धार लावतो. त्याने मंगल्याला विचारले, की तुझ्या कुर्हागडीला शेवटी तू कधी धार लावली होतीस? या प्रश्नाने मंगल्याचे डोळे उघडले. त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले.
तात्पर्य हेच की, ‘आपल्या कामासाठी साधने कशी वापरावीत याचे ज्ञान आपणांस हवे.’ साधारणपणे माणसास काय करावे हे माहीत असते. पण ते कसे करावे हे अनुभवातून माहीत होते.
साशंकतेने शेखरने विचारले, या लाकूडतोड्याचे काम व आमचे शिकणे याचा काय संबंध?
सर : वर्गात शिक्षक धडा शिकवताना विद्यार्थ्यांना समजावून सांगतात, विद्यार्थी ते ऐकतात. काही ठिकाणी शब्दार्थ व धड्याचा आशय सांगतात. काय बरोबर ना? पाठ संपवताना तो धडा घरी लक्षपूर्वक वाचावयास व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहावयास सांगतात. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून ऐकणे, वाचणे व लिहिणे या कृति घडतात. एखादा शिक्षक विषयानुकूल अभ्यासपद्धतीचा उल्लेखही करतो. पण ‘ऐकावे कसे?’, ‘वाचावे कसे?’ व ‘लिहावे कसे?’ या क्षमतांचा उपयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा हे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी अर्धवट माहिती या कौशल्यांच्या ढोबळ वापरातून मिळते, ती परीक्षेपुरती टिकते. या कौशल्यांचा आयुष्यातील इतर कामांसाठी कसा आणि किती उपयोग होऊ शकतो याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ राहतो. मंगल्याची कुर्हायड व तुमची अभ्यास कौशल्ये, एक प्रकारची साधनेच ना?
राजू : सर, कौशल्यांच्या उपयोगाचे रोजच्या जीवनातील एखादे उदाहरण सांगाल?
सर : समजा चालताना तुमच्या चपला नादुरुस्त झाल्या तर दुरुस्तीकरिता तुम्ही चांभाराकडे जाल. चपला दुरुस्त करताना तो ज्या हालचाली करतो, त्या तो अगदी सहजपणे करताना तुम्ही पाहता. तुम्हाला वाटू लागतं यात काही अवघड नाही. पण ते तितकंसं खरं नसतं नाहीतर तुम्ही चपला दुरुस्तीकरता चांभाराकडे गेलाच नसता. काय खरं ना? कारण त्या कामाबद्दल तुमच्यात आत्मविश्वास नसतो. सरावाने त्या चांभाराला त्यातले कसब प्राप्त होते. तो कामात असताना तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केल्यास तुम्हाला त्याच्या कामाच्या हालचालीतून अनावश्यक हालचालींचा अभाव, आवश्यक कृतींचा नेमकेपणा, सफाई व गती अशी त्याची कुशलता – सहजपणा दिसून येईल. चांगली सवय जोपासणं हे शेतीसारखंच असतं. त्यात एकामागून दुसरी नि तिसरी कृती करीत रहावे लागते. त्यासाठी आवश्यक ते श्रम व वेळ द्यावा लागतो. पुढे मनातून प्रेरणा मिळाली की ती गोष्ट तुम्ही सहजगत्या करू शकता. सवयीमुळे ती कृति