सेलिब्रेशन

शरयूचं, माझ्या पुतणीचं लग्न ठरलं. उत्तम स्थळ मिळालं. लग्नाची तारीख मे मधली ठरली आणि धडाक्यानं लग्नाची तयारी सुरू झाली. माझे दीर बांधकाम व्यावसायिक, श्रीमंत. त्यांच्या तोला-मोलानंच हे कार्य होणार यात शंका नव्हती. तरीही एकेक प्लॅन्स ऐकून माझे डोळे विस्फारत गेले. शरयूचे-जावयांचे दागदागिने, कपडे यांची मी कल्पना करू शकत होते पण आमच्या घरातल्यांच्या भेटींचा मुद्दा निघाला तेव्हा मी पहिल्यांदा आतून सावध झाले. हिर्यांदचे दागिने… पैठणी वगैरे शब्दांनी मी एकदम गडबडलेच.

आमच्या आणि त्यांच्या जीवनशैलीतला फरक एव्हाना दोन्ही बाजूंनी मान्य केलेला होता. माझ्या साधं राहाण्याच्या, उधळ-माधळ न करण्याच्या विचारांची सर्वांना जाणीव होती. पण ज्यानं त्यानं आपल्या पद्धतीनं जगावं अशी समजुतीची सीमारेषाही सुस्पष्ट होती.

पण इथे आम्ही सारे ‘कुलकर्णी कुटुंबीय’ म्हणून एक होतो आणि माझ्यासारख्या अल्पसंख्याची काही खैर नव्हती, हे जाणवलं. किंबहुना मला त्यांच्या पार्टीत सामील करून घ्यायची छानच व्यूहरचना होती.
‘‘वहिनी, यावेळेला काही चालून देणार नाही हां तुझं. लाडक्या पुतणीचं लग्न आहे, सारं व्यवस्थित व्हायलाच हवं’’ इति दीर. वहिनींनी मात्र घोळात घेऊन, ‘‘अगं यांचा स्वभाव कसा आहे माहीत आहे ना तुला? पण माया आहे गं तुझ्यावर, आजवर कधी काही करू दिलं नाहीस तुझ्याकरता, आता मात्र ऐकणार नाही हो आम्ही.’’ सासूबाईंनी धास्तावून, ‘‘निभाव गं बाई एवढं कार्य, तो एक आहे तापट, उगाच कार्यात वाद नकोत.’’ अशी सूचनावजा वॉर्निंग दिली.

मंडळींमधला एवढा तणाव पाहून सुरवातीला मी काहीशी सहकार्याची भूमिका घेतली खरी. पण नंतर मात्र ती चांगलीच महाग पडली. माझ्या मुलांना सोन्या-मोत्याचे दागिने, कपडेलत्ते, यांना सोन्याची चेन वगैरे वगैरे. साहजिकच त्या तोलामालाचा आहेर आम्ही करणं हे आपसूक आलंच.

‘आपण पत्रिकेवर ‘आहेर नको’, छापूयात का?’ ही माझी सूचना पालापाचोळ्यासारखी उडून गेली. अनेक मित्र, सहकारी, ग्राहक, अधिकार्यांयना या निमित्तानं भेटी देण्याची आयतीच संधी दीर कसे काय दवडतील? शिवाय नातेवाईकांसमोरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होताच. ‘हिला व्यवहारातलं फारसं कळत नाही, हिच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही….’ अशी थोडी दुर्लक्षानं, थोडं चुचकारून माझी बोळवण करण्यात आली.

सुमारे ६ महिने आधीपासून ज्याच्या त्याच्या ‘किंमतीप्रमाणे’ कुणाला काय द्यायचं याचं प्लॅनिंग, खरेद्या-भेटींचे पॅकिंग वगैरे कार्यक्रम चालला. मला त्यातून थोडं दूरच ठेवलं गेलं. मग केळवणांचे कार्यक्रम सुरू झाले. घरची म्हणून अनेकदा मलाही आमंत्रण! एकदा कामावरून तशाच अवतारात केळवणाला गेल्यावर, पुढच्या वेळेपासून जाऊबाईंनी माझ्या साडी-दागिन्यांची व्यवस्था करायला सुरवात केली. अखेर, ‘‘मी जरीची साडी, दागिने शक्यतोवर घालत नाही, ते माझ्या तत्त्वात बसत नाही,’’ असं मला निक्षून सांगावं लागलं. तेव्हापासून प्रत्यक्ष वाद टाळून एक अप्रत्यक्ष अबोला, टाळणं, दुर्लक्ष, ताणाच्या प्रतिक्रिया माझ्या वाट्याला सातत्यानं येऊ लागल्या. ‘‘कधी कधी तत्त्वांना मुरड घालावी लागते,’’ नवर्याानेही समजूत घातली. आपल्या आईमुळे परिस्थिती ताणाची होते यामुळे मुलांची तोंडं केविलवाणी होऊ लागली. तेव्हा किमान बरी साडी, दोन-तीनच का होईना दागिने, इथपर्यंत मला यावंच लागलं.
नंतर शाही हॉटेलातलं दरबारी थाटाचं व्याही भोजन, गृहयज्ञ, मेंदी सेरेमनी अशा विधींची रांग सुरू झाली. प्रत्येकवेळी अत्यंत योजनाबद्ध कार्य. तर्हेातर्हे्चे मेन्यू, पारंपरिकपासून पाश्चिरमात्य, चायनिज… सर्व व्हरायटीज, फुलांचं सुशोभन, पेयांची मुबलकता. मला टीव्ही सिरियल्समधेच भाग घेतोय असं वाटायला लागलं.

पंगतींमधून आग्रहानं वाढणं, सर्रास वाया जाणं, भरली पानं अर्धवट उष्टावून मुलांनी-मोठ्यांनी उठून जाणं, मला दिसत नव्हतं असं मी कसं म्हणू? पातेलीच्या पातेली उरणारं-वाया जाणारं अन्न पाहून माझ्या शाळेतल्या अर्धपोटी मुलांच्या आठवणीनं माझ्या मनात कालवायचं. त्या उत्सवात रमणं मला अशक्य व्हायचं. खोटं हसू चेहर्यायवर आणताना करावी लागणारी कसरत असह्य व्हायची.

या निमित्तानं खूप लोक-नातेवाईक भेटले. अनेक वर्षांनी गाठीभेटी झाल्या. चौकश्या झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. माझ्या कामाबद्दल अनेकांनी आस्थेनं चौकशी केली. ‘एकदा बोलायचंय सविस्तर तुझ्याशी, समजावून घ्यायचंय.’ असं दोन तीनदा ऐकल्यावर, मी एक गुगली टाकून बघितला, ‘‘खरंच का? मग चला बोलूयात आत्ताच. आयताच वेळ हातात आहे’’ विचारणारे गडबडलेच, ‘‘नाही नाही, आत्ता घाई आहे ना, हे….’’ वगैरे बोलून सटकलेच. एकूणच ‘तू करतेस, कर. आम्हाला आदर आहे. पण…. पण आम्हाला दूरच राहायचंय….’’ हा सूर स्पष्ट-अस्पष्ट ऐकू येत राहिला. आपण होऊन आपल्याबद्दल बोलत राहण्याचा मला मनापासून कंटाळा. त्यात ह्या ‘पटलं-बिटलं तर काय घ्या’ अशा जागरूक प्रतिक्रिया मला सार्यां.पासून वेगळं काढत होत्या. एकटं एकटं करून टाकत होत्या.

प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीचा दिमाख तर काही औरच होता. फुलं, संगीत, सुगंध, नखशिखांत नटलेले स्त्री-पुरुष-मुलं या सार्या ला भारदस्त धार्मिक मंत्रोच्चारांचा भक्कम पाठिंबा, कार्याची लगबग. सारं कसं छान-सुंदर-प्रसन्न-संपूर्ण चित्र. सर्वांनी एकमेकांची तोंडावर स्तुतीच करायची असा अलिखित नियम, पाठ फिरली रे फिरली की निंदेची, टिंगलीची कास पकडत होता.

वाकून पाया पडणं, ओट्या भरणं, नावं घेणं, जेवण सुरू व्हायच्या आधी श्लोक वगैरे इ. इ. जुने संस्कार होते ना. पण-आपण बॅन्डच्या, संगीताच्या आवाजानं सभोवतालचं वातावरण दणाणून सोडतोय. फटाक्यांच्या आवाजानं, धुरानं आधीच्याच प्रदूषणात भर घालतोय, वरातीमुळे ट्रॅफिक जॅम घडवतोय, नको एवढं खातोय, वाया घालवतोय, या संस्कारांचा मात्र कुठेही पत्ता नव्हता. फक्त मी… माझी प्रतिष्ठा… माझा उपभोग या नशेमधे सर्वच मश्गुल होते. समारंभाच्या शेवटी शेवटी असाहाय्यतेनं माझे डोळे भरून यायला लागले. मला ते सारं सहन होईनासं झालं. स्वतःचा, कान असून बहिरं होण्याचा, डोळे असून डोळ्याआड करण्याचा, वाटत असून भावना दाबून टाकण्याचा असह्य राग यायला लागला. कानातून वाफा बाहेर पडायला लागल्या. वर जाऊन मी शांतपणे विचार केला आणि शहाण्यासारखं वहिनींना तब्येतीचं कारण सांगून घरी निघाले.

माझी परिस्थिती फार विचित्र आहे. ना मला जोडता येत ना तोडता येत. ना मला स्वतःशी प्रामाणिक राहता येत ना स्वतःला बाजूला ठेवता येत. मला आतून, पोटातून जे म्हणायचंय ते कुणा कुणालाही ऐकायचं नाहीये. मी काय करायचं? कसं वागायचं?

मे महिना, लग्न सराईचा धूमधडाक्याचा. या आनंद सोहळ्याकडे आणि त्यानिमित्ताने स्वतःकडे एका जागेपणानं पाहणार्याा आमच्या मैत्रिणीचं हे मनोगत छापत आहोत. अनिता एकटी नाही, तिच्यासारखा विचार करणारे, त्यातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात आणणारे वाचकांमधे अनेक जण असतील. अनिताचा अनुभव वाचून आपल्याला काय वाटलं? आपल्या मनात असाच एखादा अनुभव जागा झाला का? आपण आपल्या परीनं या प्रश्नांतून काही मार्ग काढू शकलात का?

पालकनीतीकडे आपलं मनोगत जरूर पाठवा.