मुलांसाठी आणि माझ्यासाठीही

‘‘अय्या! तू घरीच असतेस? अमकीतमकीला चांगली ५५,००० डॉलर्सची नोकरी आहे! काय तुमच्या एवढ्या शिक्षणाचा उपयोग? घरी बसून कंटाळा नाही येत?’’ इत्यादी इत्यादी वाक्यं आपल्याला नक्की ऐकायला मिळणार अशी मनाची तयारी करूनच मी भारतात सुट्टीसाठी येते.

याउलट माझ्या अमेरिकन मैत्रिणींना जेव्हा कळतं की मी उच्चशिक्षित असूनही मुलं घरी वाढवण्यासाठी मी नोकरी करत नाही, त्यावेळी माझं तोंड भरून कौतुक ऐकायला मिळतं.
आजकाल एकंदरीतच उच्च मध्यमवर्गीय भारतीय दांपत्यांमधे (मग ती अमेरिकन-भारतीय असोत वा भारतवासी असोत!) स्वतःचे मूल स्वतः वाढवणे म्हणजे काहीतरी ‘वेस्ट ऑफ टाइम’ असावा अशा थाटाची विचारसरणी मला दिसते आहे.

आम्हाला दोन मुलं आहेत. माझी व नवर्‍याची दोघांचीही आई आमच्या पूर्ण आयुष्यभर घरीच असल्या कारणाने आम्हाला दोघांनाही ‘डे केअर’ सिस्टिमचा अनुभव शून्य! शिवाय आमच्या मते आमचं बालपण अप्रतिम गेलं, त्यात आमच्या आईचा सहभाग ११०% होता. त्यामुळे आता सकाळी सात वाजता बाळाला झोपेतून उठवून ‘डे केअर’ला नेऊन सोडण्यासाठी जे धैर्य, व इच्छा लागते. ते दोघांपाशीही नाही.

शिवाय आताच्या काळात आपल्याला काही सात-आठ मुलं होणार नाहीयेत. मग सुरुवातीची चार-पाच वर्ष मी माझ्या मुलांसाठी खर्च करायला काय हरकत आहे.

मी अमेरिकेत राहाते. तिथे सुर्दैवाने वय हा मुद्दा गौण आहे. माणसं चाळिशीलासुद्धा अचानक कॉलेजमध्ये जाऊन आख्खं करियर बदलतात. मग आम्ही तर फक्त तिशीतच आहोत!

मध्यंतरी अमेरिकेतील माझ्या (भारतीयच!) सख्ख्या शेजारणीनी मला ‘गंमत’(?) सांगितली. सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा तिची दोन वर्षांची मुलगी ‘डे केअर’ला जाते. तिला कधी बरं नसलं, किंवा काही लागलं, पडली तर म्हणे ती आईजवळ जाण्याऐवजी ‘डे केअर’च्या जेसिकाचं नाव घेऊन रडत बसते. हे माझी मैत्रीण मला कौतुकानं सांगत होती. मी थक्कच झाले. माझ्या बाळानं असं केलं तर बहुतेक मी रात्रभर रडतच काढली असती. आई ऐवजी मुलाला भलत्याच परक्या बाईचं प्रेम अधिक वाटत असलं तर माझ्या दृष्टीने ही ‘आई’ म्हणून खेदाची बाब आहे.

अर्थात नोकर्‍या करून घर सांभाळणार्‍या मुलींना आणखी कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जायला लागत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या काही मैत्रिणींना पर्यायच नाही म्हणून मनावर दगड ठेवून मुलांना
‘डे केअर’मधे ठेवावंच लागतं. पण आत्ता ज्या मुली सत्तावीस-अठ्ठावीसच्या आहेत, त्या वयोगटात मला फारच वेगळी परिस्थिती दिसते आहे.

लग्नानंतर तीन-चार वर्षात मूल होणं कुटुंब व समाजाकडून अपेक्षित असतं म्हणूनच फक्त मूल झाल्याच्या थाटात या मुलींचं वागणं आहे.
‘ई, घरी राहून बाळाचे लंगोट कोण बदलणार! शी! वैताग!’
‘दिवसभर त्या बाळाशी बोलायचं तरी काय? शी, किती कंटाळवाणा प्रकार आहे?’
‘बाळंतपण म्हणून दोन महिने घरी आहे. कधी एकदा काम सुरू करते आणि ते दुपटं, त्या बाटल्या ह्या सगळ्यातून सुटते असं झालं आहे.’
इत्यादी मुक्ताफळं मुक्तपणे ऐकू येत असतात. मग मला प्रश्न पडतो, की ‘बये, इतकी तुला मुलांची हौस नाही, तर जन्म कशाला दिलास?’’

कित्येक आया अक्षरशः आठवड्यातून फक्त शनिवार-रविवार आई म्हणून जगतात तेही बरेचदा त्यांच्या जिवावर आलेलं असतं.

कारखान्यातील असेंब्ली लाईन मधून जसा स्टॅण्डर्डाइज्ड माल बाहेर पडतो, तसंच ‘डे केअर’मध्ये मोठं होण्यार्याप ‘एक छाप’ मुलांचे भावनाविश्व मोठेपणी कसं होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. कदाचित ही पुढची पिढी अत्यंत समंजस, शहाणीसुद्धा असेल. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, की लहानपणापासून जर मुलांना हे आपलं घर, आपलं कुटुंब आहे, ही माझी हक्काची माणसं आहेत, माझ्यासाठी कष्ट घेताहेत हे दिसलं नाही तर मोठेपणी ‘फक्त स्वतःसाठी’ जगणार्याठ अमेरिकेत ही अलिप्त मुलं आणखीच एकटेपणानं जगतील.

‘मी माझ्या मुलांचं संगोपन खूप छान करीन म्हणजे मोठेपणी ते माझी काळजी घेतील.’ अशा भ्रामक-अपेक्षा माझ्या अजिबात नाहीत. पण मी त्यांना कुटुंबाच्या आपुलकीची आणि आपण कुटुंबाचा भाग म्हणून काही करायचं असतं, याची सवय लावली तर मोठेपणी जेव्हा त्यांचे संसार सुरू होतील तेव्हा ते सुखसमाधानाने जगतील अशी खात्री मला वाटते.

मुलांसाठी ४-५ वर्ष आपली करिअर बाजूला ठेवून त्यांचं बालपण आनंदानं अनुभवणं ही अभिनंदन करण्याचीच गोष्ट. या पत्राच्या निमित्तानं आणखीही काही प्रश्न विचारावेसे वाटतात –
– डे केअर मधली ताई ही तुम्हाला सुद्धा भलतीच कोणी किंवा परकी वाटते का?
– मूल आपल्या घरीच आनंदात वाढावं यासाठी किती ‘बाबां’चा सहभाग तुम्ही पाहिला आहे? कशा प्रकारचा?