संवादकीय – जानेवारी २००६

कुठेही तारीख लिहायला लागलं की आठवण होते, नवं वर्ष सुरू झाल्याची. नव्या रोजनिशा, नव्या दिनदर्शिका, नव्या वर्षांसाठीचे नवे उपक्रम, नवे बेत, नवे संकल्प अशा अनेक नव्या नव्या गोष्टी मनात आणि घराघरात लक्ष वेधू लागतात. ह्यातल्या काही गोष्टी तर तशा जुन्याच, पडून राहिलेल्या आणि पुन्हा नव्यानं समोर मांडलेल्या अशादेखील असतात.

असाच एक तसा सनातन म्हणावा असा प्रश्न- ‘काय चांगलं, काय वाईट?’ आणि त्याच्याशी जोडून येणारे आणखी दोन प्रश्न – ‘काय आवडतं, काय नाही आवडत? आणि काय करावं, काय करू नये?’ प्रश्न तसे जुनेच, पण त्यांचं आजचं नवं रूप मांडणारा एक प्रसंग उदाहरणादाखल देते-

महाविद्यालयीन शिक्षण घेणार्यां एका मुलीचा मित्रमैत्रिणींबरोबर डिस्को-थेकला जाण्याचा बेत होता. मध्यमवर्गीय सुजाण आईवडलांचा जीव त्यामुळे घाबरा झाला. बरं पालक सुजाण, ‘त्यामुळे स्वतःचे निर्णय मुलांवर लादायचे नाहीत, काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार विशेषतः आता महाविद्यालयात शिकणार्या मुलीचा, स्वतःचाच असला पाहीजे.’ असं सगळं पक्कं मनात ठसलेले.

पण, मुलगी डिस्को-थेकमध्ये जाणार. ह्या कल्पनेनंच त्यांना काहीतरी बोचू लागलं. मुलगी तशी तयारीचीच होती. तिनं-जाऊ का, असं विचारलेलं नव्हतं. जातेय, घरी यायला उशीर होईल, असं सांगितलं होतं.

तेव्हा मुलीच्या आईनं, जरा वेळ बघून म्हणजे मुलीची मित्रमंडळी आसपास नसताना किंवा ती त्यांच्याशी ‘मोबाईल’वरून किंवा ‘नेट-साईट’वरून बोलत नाही आहे, असं पाहून विषय काढला.
‘‘ती गर्दी, ते भडक दिवे, कर्ण-कर्कश गाणी ह्यात काय ग, आवडण्यासारखं असतं तुम्हाला?’’ ‘‘काय आवडावं, नावडावं हा वैयक्तिक प्रश्न नाही का, आई? तुझ्या ‘सवाई गंधर्व’ ला मी वाईट म्हणते का?’’ मुलीनं उत्तरादाखल प्रतिप्रश्न केला.
‘‘हे असलं धडधडधाम संगीत आणि भान विसरून नाचणं, जोडीला दारू, सिगारेट ही आवड-निवड नाही बाळा, ही नशा आहे. असली नशा कुठे नेऊ शकेल, ह्याची कल्पनाय, का तुम्हाला?’’
‘‘आई, मी रोज रोज काही अशी जात नाही. दुसरं, म्हणजे नशा किती प्रमाणात करायची ते कळावं, इतकी मोठी आणि शहाणीही आहे आता मी!’’ मुलीनं म्हटलं.

ह्या वयातल्या मुलामुलींशी वाद घालणं मुळीच सोपं नसतं. आपल्याला तर्काचा आधार सोडून चालत नाही. आवाज चढवून बोलणं किंवा अबोला धरून नाराजी दाखवणं, हे पूर्वीचे बिनतोड उपाय आता उपयोगी पडत नाहीत. शिवाय परिस्थिती फार चिघळायच्या आतच काय ते बोलणं संपवायला लागतं. आईनं तात्पुरती माघार घेतली. ‘‘रोज जात नाहीस हे खरंच! आज जा ही. पण नशा प्रमाणात कशी ठेवायची हे तुलाच काय, कुणालाच कधी कळत नाही, असं विज्ञान सांगतं. त्यावर हवं तर उद्या बोलू.’’

आता चेंडू मुलीच्या भागात आल्यानं ते बोलणं घडलंही. नशा प्रथम करताना, ती अगदी सहज, काय होतं तो अनुभव घ्यायला, पण अगदी प्रमाणातच, व्यसन लागू द्यायचंच नाही अशा ठाम विश्वासानंच सर्वजण करतात. पण त्यातल्या सुमारे पंधरा टक्के जणांना नंतर नशेच्या आधीन व्हावं लागतं. हे पंधरा टक्के नेमके कोण असतील ते आधी माहीत नसतंच.
हे कळल्यावर लेक म्हणाली, ‘‘नशेचं एक ठीकय पण डिस्कोथेकमध्ये मला आनंद मिळाला तर काय हरकत आहे तुमची?’’ आई मनातल्या मनात खुष झाली. मुद्दा आता आनंद कशातून मिळतो ह्यावर आला. आणि त्यातून कुुठला आनंद खरा, भद्र असावा, इथपर्यंत गाडी आणता आली.

मग, इतर कुणाला, कशालाही त्रास न देता आनंद मिळवायला हवा, हे त्या शहाण्या मुलीनं मान्यही केलं. आई सरसावून पुढे म्हणाली, ‘‘आणि आनंद म्हणजे तरी काय ग, जेव्हा आपण स्वतःला विसरतो, आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात, आपली जगण्याची ताकद वाढते. त्यालाच आनंद म्हणशील ना? ज्या आनंदानंतर, मरगळून-गळाठून जायला होतं, नंतर कुठला आनंद घ्यायलासुद्धा ताकद उरत नाही, तो कसला आनंद?’’
ह्यावर लेक विचारात पडली.

‘‘बघ बाई, मला डिस्को-थेक की सवाई गंधर्व, की मोकळ्या हवेत भटकायला जाणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं, चित्रशिल्प प्रदर्शनं पहाणं, असं काहीच चांगलं वाईट ठरवायचं नाही. पण जे काही करू, त्यातनं नितळ खराखुरा आनंद मिळावा म्हणजे झालं.’’

ह्यावर लेक विचारात आणखीन गढली, आणि आई, आनंदानं गप्प झाली. विरोधासाठी वाटावा असा विरोध न करता ती स्वतःशी ताडून पाहतेय एवढं यश सुजाण आईला भरपूर होतं.

नव्या वर्षाकडे आता अधिक उमेदीनं बघता येईल असं तिला वाटलं.

ह्या आईला जसा नव्या वर्षाचा आनंद आपल्या लेकीच्या मनात भद्र-अभद्राचा, आनंद-क्लेशांचा अर्थ शोधण्याची इच्छा जागी करण्यात मिळाला, तसा तुम्हाआम्हा सर्वांना मिळावा, ह्यासाठी मनापासून शुभेच्छा!