नारिंगाची साल – समद बहरंगी
कदाचित हा माझा अपराध असेल की, मी त्या शुक्रवारी रात्री शहरात राहिलो. किंवा असं म्हणता येईल की, तो दोष त्या टपरीवाल्याच्या पत्नीचा असेल. कारण, नेमकी त्याच रात्री तिच्या पोटदुखीनं उचल खाल्ली. चूक माझी असेल किंवा तिची असेल; नक्की अपराध कोणाचा हे सिद्ध करणं काही सोपं नाही. तेव्हा जे काही घडलं ते जसंच्या तसं तुमच्या समोर मांडणं हाच योग्य उपाय मला सुचतोय. त्यावर तुम्हीच निर्णय करा की, चूक माझी होती कां तिची? कदाचित असंही असू शकेल की, आम्ही दोघेही निरपराध ठरू आणि चूक कोणा तिसर्यानचीच निघेल!
ती बुधवारची दुपार होती. मी चहाच्या टपरीसमोर झाडाखाली जेवायला बसलो होतो. मला शहरात जायचं होतं. म्हणून मी शाळा जरा लवकरच सोडली होती. ताहिरही पटकन आपल्या घरी जाऊन दप्तर टाकून, टांगा घेऊन आला. तो घोड्याला पाणी पाजत तलावाच्या काठावर उभा होता. आपल्या फुगलेल्या खिशातून तो भाकरीचे तुकडे काढून आपल्या तोंडात कोंबत होता. तोंडात मोठे-मोठे तुकडे कोंबून तो भराभर चावत होता. त्याचा जबडा मजेशीर हलत होता. मी जेवण आटपलं. चहावाल्यानं आपल्या मुलाला हाक मारली आणि माझं जेवणाचं ताट उचलून न्यायला फर्मावलं. आणि माझ्यासाठी हुक्का आणि चहा आणायला त्याला पिटाळलं. मग तो चहावाला माझ्याजवळ येऊन बसला. म्हणाला, ‘‘मास्टरजी एक छोटीशी विनंती आहे’’
‘‘काय हुकूम आहे नखूशमियॉं’’, मी म्हटलं. तेवढ्यात अली चहा घेऊन आला. आणि परत हुक्का पेटवायला पळाला. नखूश म्हणाला ‘‘साहबअलीच्या आईच्या पोटात फार दुखतंय. कशानं काही समजत नाही. पण पोटदुखी काही केल्या कमी होत नाही. औषधं, काढे, मंत्रोपचार सगळं करून झालं. जे जे लोकांनी सांगितलं ते सर्व करून झालं. पण काही केल्या पोटदुखी काही थांबत नाही. मंजूकदादींचं म्हणणं आहे की, या पोटदुखीवर एकच उपाय आहे. तो म्हणजे ‘नारिंगाची साल’. तेवढी मिळाली तर बरं होईल. तुम्हाला सांगतो मास्टरजी, माझ्याजवळ होती. पण कुणाला दिली काही आठवत नाही. तुम्ही शहराकडे चाललात म्हणून म्हणतो, तेवढी नारिंगाची साल आणलीत तर फार बरं होईल. मोठे उपकार होतील साहेब.’’ अली हुक्का घेऊन आला होता. तो लक्षपूर्वक आमचं बोलणं ऐकत होता. ‘‘तुझा हुकुम शिरसावंद्य नखूशमियॉं.’’ माझं उत्तर ऐकून साहबअलीच्या चेहर्याॉवर समाधान पसरलं. जणू त्यानं आपली आई एकदम ठीकठाक झालेलीच बघितली.
मी शुक्रवार ऐवजी शनिवारी सकाळी घरी परतलो. माझ्या हातात नारिंगाची पिशवी होती. नारिंगाच्या सालीचा काढा म्हणजे सर्वप्रकारच्या पोटदुखीवर उत्तम इलाज असतो असा जुन्या लोकांचा पक्का विश्वास आहे. पण कोणती पोटदुखी? मी विचार करत होतो. बसस्टॉपपासून गावापर्यंत भरभर आलं तरी पाऊणतास लागतो. मला कसलीच घाई नव्हती. मी आरामशीर रमतगमत येत होतो. गावात येऊन मी सरळ घरात शिरलो. वर्गात न्यायला दोन-तीन पुस्तकं मला घ्यायची होती. तेवढी घेतली. नारिंगाचा पुडा घेतला आणि बाहेर पडलो. मी घराच्या कंपाऊंडच्या बाहेर पडतच होतो, तेवढ्यात आमच्या घरमालकांचा आवाज कानावर पडला. ‘‘सलाम, मास्टरजी’’ मग हळू आवाजात म्हणाले ‘‘खुदाची दया आहे, सगळ्यांनाच एक दिवस जायचंय या जगातून.’’
‘‘काय…..साहबअलीची आई गेली? बिचारा साहबअली !’’ आता त्याला शाळेचा डबा कोण करून देणार? एकाएकी माझ्या हातातली ती नारिंगांची पिशवी मला दगडासारखी जड वाटायला लागली. ती पिशवी हातात सांभाळणंही मला अवघड वाटायला लागलं. मी विचारलं ‘‘कधी?’’
घरमालक म्हणाले, ‘‘बुधवारी रात्रीच. मध्यरात्रीच्या सुमारास. काल दफनविधीपण झाला.’’
मी परत घरी आलो. हातातली नारिंगांची पिशवी माझ्या पुस्तकांच्या आड लपवली. पण मनाचं समाधान झालं नाही. ती पिशवी तिथून उचलून गादीखाली सरकवली. साहबअली किंवा नखूशमियॉं माझ्या घरी आले तर चुकूनही त्यांच्या नजरेला ही पिशवी पडायला नको.
चहाची टपरी एक-दोन दिवस बंद होती. मग परत सगळं नेहमीसारखं सुरू झालं. पण साहबअली मात्र परत पूर्वीसारखा वागत नव्हता. वीस पंचवीस दिवस उलटले. तरी साहबअली आपल्याच विचारात, उदास बसून राहायचा. हसणं-बोलणं तर तो विसरून गेला होता. माझ्याकडे तर तो लक्षच देत नसे. जणू आमची काही ओळखच नव्हती किंवा आमचा अबोला गेली कित्येकवर्षे चालू असावा. त्याचं वागणं इतकं तुटक होतं की, त्याच्या टपरीवर मी गेलो तरी तो माझ्या सलामाला प्रतिसाद देत नसे. कधी मुश्किलीनं आदाब करायचा.
आपल्या मुलाचं हे वागणं नखूशमियॉंला डाचत राहायचं. तो आणखी उदास होत होता. मग सावरत म्हणायचा, ‘‘खरंतर तो आता सगळ्यांशी नीट बोलतोय. पण तुमच्याशीच त्याला नीट वागता येत नाही. असा कसा त्याचा स्वभाव बदललाय काही कळत नाही.’’
मी म्हणायचो ‘‘अरे, लहान आहे अजून. काही दिवस जाऊ देत. एक दोन महिन्यात सगळं ठीक होईल. हळूहळू आई गेल्याचं दुःख कमी होईल. बिच्चारा.’’
पत्नीच्या मृत्यूनंतर चहावाल्यानं आपलं बिर्हातड त्या टपरीतचं आणलं. आता ती टपरी म्हणजे त्यांचं घर आणि दुकान दोन्ही होतं. बाप-मुलगा दोघे तिथंच राहात. मी कधी कधी त्यांच्या टपरीत बराच वेळ बसायचो.
बरेच दिवस उलटले पण साहबअलीच्या स्वभावात फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस त्याचं माझ्याशी वागणं आणखीनच विचित्र होत गेलं. आता तो माझ्या शिकवण्याकडेही लक्ष द्यायचा नाही. वर्गात त्याला बरेचवेळा प्रश्न विचारले तर लक्षात यायचं की, त्याला शिकवल्यापैकी काहीच आठवत नाही. पण त्याच्या इतर मुलांबरोबरच्या वागण्याचं मात्र मला आश्चर्य वाटायचं. आता तो त्यांच्यात छान रुळला होता. पण माझ्याशी मात्र तो त्याच थंडपणे वागत असे. अगदी अपरिचित असल्यासारखा. मी त्यावर खूप विचार करत होतो. पण मला काही त्याचं मूळ लक्षात येत नव्हतं. मी आणखीनच गोंधळून गेलो होतो. आईच्या मृत्यूनंतर तो माझ्याशीच एवढं तुटक-तुटक का वागत होता? कधी वाटायचं, तो त्याच्या आईच्या मृत्यूला मलाच जबाबदार धरत होता का? पण हा प्रश्न इतका मूर्खपणाचा होता, की त्यावर विचार काय करणार? साहबअलीच्या आईचं पोट ऍपेन्डिक्समुळे दुखत होतं. तिचं वेळीच ऑपरेशन झालं असतं तर ती नक्की वाचली असती. पण अज्ञानामुळे ती मृत्यूच्या दाढेत ढकलली गेली.
एक दिवस वर्गात भूगोलाच्या तासाला ‘नारिंग’ हा शब्द आला. मी मुलांना प्रश्न विचारला, ‘‘तुमच्यापैकी कुणी नारिंग पाहिलं आहे का?’’
माझ्या प्रश्नानं संपूर्ण वर्गात एक विचित्र शांतता पसरली, जणू माझा प्रश्न कुणालाच कळला नसावा. पण मंजूकदादीचा नातू, हैदरअलीच्या चेहर्या्वरचे भाव भराभर बदलत गेले. त्याला काहीतरी बोलायचं होतं पण तो काही कारणानं अडखळत होता. मी परत तो प्रश्न विचारला ‘‘नारिंगाबद्दल कोणाला काय माहितेय?’’ यावेळेसही वर्गात परत तशीच अवघड शांतता आणि हैदरअलीच्या चेहर्याेवर तीच बेचैनी. तो बोलण्यासाठी तोंड उघडत होता पण त्याच्या तोंडातून शब्द काही बाहेर पडत नव्हते. शेवटी, मीच त्याला विचारलं ‘‘हैदरअली तुला काहीतरी बोलायचंय ना? जे सांगायचंय ते सांग. शाब्बास!’’
आता सगळ्यांचे डोळे हैदरअलीकडे वळले. पण साहबअली मात्र एकटक फळ्याकडे बघत होता. ‘नारिंग’ शब्दाचा उल्लेख वर्गात झाल्यापासून जणू साहबअलीनं आपलं शरीर आक्रसून घेतलं होतं. माझं बोलणं जणू त्याच्या कानावर पडत नव्हतं. हैदरअलीनं घाबरत घाबरत उत्तर दिलं की, ‘‘मास्टरजी माझ्याकडे नारिंग आहे.’’ हैदरअलीकडून या उत्तराची कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे सारा वर्ग जोरात हसायला लागला. साहबअली शांत होता. पण त्याच्या डोळ्यात एक चमक आली. तो एकदम मान वळवून हैदरअलीकडे बघायला लागला. सगळ्यांच्या मनात खळबळ उडाली. नारिंग बघण्याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्यांवर दिसत होती. जो-तो इकडे तिकडे पाहू लागला. वर्गातला सर्वात खोडसाळ मुलगा शब्बीरअली उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘मास्टरजी तो खोटं बोलतोय. त्याच्याकडे असेल तर त्यानं दाखवावं नारिंग’’! मी शब्बीरअलीला त्याच्या जागेवर बसायला सांगितलं. मी म्हटलं, ‘‘त्याची इच्छा असेल तर तो जरूर नारिंग दाखवेल आपल्याला.’’
आता हैदरअलीनं खरोखर आपलं दप्तर शोधायला सुरवात केली. आपल्या सायन्सच्या पुस्तकाची पानं तो भराभर उलटत होता. तो काहीतरी शोधत होता आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत होता.
‘‘मी तर या पुस्तकातच ठेवलं होतं. हृदय आणि नीला-रोहिणीचं चित्र असलेल्या धड्यातच ठेवलं होतं. मला चांगलं आठवतंय.’’
मी हैदरअलीकडून ते पुस्तक घेतलं. आता सगळ्यांच्या नजरा माझ्या हातांवर रोखल्या होत्या. साहबअलीचीही नजर आता माझ्याकडेच लागली होती. सगळ्यांना उत्सुकता होती ती एकच, नारिंग म्हणजे अशी काय अजब चीज आहे? मला मनात एक गोष्ट सुखावत होती. ती म्हणजे या निमित्ताने का होईना साहबअलीचं लक्ष माझ्याकडे आकर्षित झालं होतं. पण एक गोष्ट मला बुचकळ्यात टाकत होती की, साहबअलीच्या या आकर्षित होण्यामागे नेमकं कारण काय? त्याला नारिंग कसं दिसतं, त्याचा रंग कसा असतो याबद्दल इतकं आकर्षण का वाटतंय?
हैदरअलीच्या पुस्तकातील ते हृदय आणि आसपासच्या धमन्या दाखवलेलं चित्राचं पान मी काढलं. ती दोन्ही पानं सार्यात वर्गाला पुस्तक उघडून दाखवली. पण त्यात काही नारिंग नव्हतं. उलट त्या पानांवर दोन पिवळे मोठे डाग पडले होते. पुस्तकाची ती पानं उघडल्यावर सर्वात प्रथम उभा राहिला साहबअली. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तो पुस्तकात वाकून, वाकून पाहात होता. मी काय म्हणतोय याविषयी त्याला प्रचंड उत्सुकता वाटत होती. त्याच्या डोळ्यात ती स्पष्ट दिसत होती. त्या पुस्तकांच्या पानांना नारिंगाचा सुगंध होता. त्याक्षणी मला इतके दिवस माझ्या लक्षात न आलेली एक साधी गोष्ट पटकन आठवली. साहबअलीच्या आईच्या निधनानंतर काही दिवसांनी मीच हैदरअलीच्या आजीला नारिंग नेऊन दिलं होतं. परत गावात कोणाला नारिंगाची गरज लागली तर ते मंजूकदादीकडून नेऊ शकतील या हेतूनं. मऊ पांढर्याआ केसांची मंजूकदादी गावातली सर्वात म्हातारी आजीबाई होती. मंजूकदादीला सर्व रोगांवरचे उपचार माहीत आहेत, असा सार्याष गावकर्यांलचा ठाम विश्वास होता. ती सुईणीचंही काम करत असे.
मंजूकदादी आपला नातू हैदरअलीबरोबर गावात राहात असे. या नातवाशिवाय जगात तिचा दुसरा कोणीच नातेवाईक नव्हता. त्यामुळे अर्थातच हैदरअली तिचा जीव की प्राण होता. हैदरअलीही आपल्या दादीवर जिवापाड प्रेम करत असे. त्यालाही या जगात आपल्या दादीशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. गावातले सारे लोक त्याला मंजूकदादीचा नातू म्हणूनच ओळखत असत. त्याच नावानं हाक मारत. कुणीच त्याला हैदरअली या नावानं बोलवत नसत. मी नारिंग मंजूकदादीला दिल्याचं मला आठवल्यावर माझ्या एकदम लक्षात आलं की, या पुस्तकाच्या पानावर पडलेले पिवळे डाग कसले आहेत आणि कसे उमटलेत. मंजूकदादीनंच त्या नारिंगाच्या सालीचा तुकडा आपल्या नातवाला दिला असणार. त्याने तो पुस्तकात ठेवला होता.
मला आठवतंय आम्ही लहान असतानाही नारिंगाच्या मोसमात नारिंगांची सालं पुस्तकात ठेवत असू. त्यामुळे पुस्तकांच्या पानांना सुगंध यायचा. पुस्तकात नारिंगाची साल नाही हे जेव्हा हैदरअलीच्या लक्षात आलं तेव्हा त्याला रडूच कोसळलं. आपली अतिमौल्यवान वस्तू हरवल्यासारखा तो हमसून हमसून रडू लागला. रडत, रडत मला म्हणाला, ‘‘मास्टरजी, माझं नारिंग कोणीतरी काढून घेतलं.’’
मी वर्गावरून नजर फिरवली. प्रत्येक मुलाचा चेहरा निरखून बघत होतो. कोणी खोडी काढली असेल हैदरअलीची? अली? ताहिर? साहबअली? कोण असेल? ‘‘आता रडणं बंद कर.’’ असं म्हणत मी हैदरअलीला गप्प बसवलं, ‘‘मी बघतो काय झालंय ते! पण तूच नाही नं हरवून टाकलंस. बघ. नाहीतर तुझ्याच दप्तरातून पडलं असेल.’’ हैदरअली म्हणाला, ‘‘नाही मास्टरजी. मी आज सकाळीच बघितलं होतं. याच पुस्तकात होतं, मी मधल्या सुटीत घरीही गेलो नव्हतो.’’
तो नक्कीच खरं बोलत होता. काल रात्रीपासून मंजूकदादी ताहिरच्या घरीच होती. ताहिरच्या आईच्या पोटात दुखायला लागलं होतं. ती बाळंत होईपर्यंत मंजूकदादी तिथून हलणार नाही. म्हणूनच हैदरअली घरी न जाता सुटीतही शाळेतच थांबला होता. मी म्हटलं, ‘‘हे पहा मुलांनो, तुमच्यापैकी ज्यांनी कुणी हैदरअलीची नारिंगाची साल घेतली असेल त्यानं स्वतःहून सांगून टाकावं. आपण आपल्यातच खोटं बोलणं बरं नाही. आपण सगळे दोस्त आहोत. खोटं फक्त शत्रूशी बोलायचं असतं. आपण शत्रूवर विश्वासही ठेवत नाही. बरोबर ना?
मी परत म्हणालो. ‘‘मला अजूनपर्यंत कळलेलं नाही की नारिंगाची साल कुणी घेतलीय.’’
क्षणभरासाठी परत वर्गात शांतता पसरली. काही क्षणानंतर अलीचा हात वर झाला. तो म्हणाला ‘‘मास्टरजी, मी घेतली होती. पण आता माझ्याजवळ नाही.’’
मी विचारलं ‘‘मग त्याचं शेवटी झालं काय?’’ अली म्हणाला ‘‘मी कहरमानला दिली. त्याला ती पुस्तकात ठेवायची होती. पुस्तकाला चांगला वास यावा म्हणून त्याला हवी होती. पण आता तो म्हणतोय, त्याच्याजवळ नाही. त्यानं परत दिली.’’
आता, कहरमान आपल्या जाग्यावर उभा राहिला. तो म्हणाला ‘‘मास्टरजी, मी खरं सांगतो माझ्याकडे फक्त अर्धा तुकडा आहे.’’
मी विचारलं ‘‘पण, अर्धा कसा झाला तो तुकडा?’’ कहरमान म्हणाला ‘‘मी अर्धा ताहिरला दिला होता.’’ असं म्हणत कहरमाननं एक लहानसा नारिंगाच्या सालीचा तुकडा आपल्या गणिताच्या वहीतून काढून माझ्या टेबलावर आणून ठेवला. सालीचा तो तुकडा वाळून कडकडीत झाला होता. आता अख्ख्या वर्गाची नजर ताहिरवरून माझ्या टेबलावरच्या त्या तुकड्याकडे लागली होती. तो तुकडा उचलून बघावा. त्याचा वास घ्यावा अशी उत्सुकता सर्वांच्या चेहर्याधवर दिसत होती.
मी रजिस्टर उचलून त्या तुकड्याजवळ ठेवलं आणि ताहिरकडे वळलो. ताहिरला उभं राहावं लागलं. तो म्हणाला, ‘‘मास्टरजी, माझ्याकडे त्यातला अर्धा तुकडा आहे. मी बाकीचा तुकडा दलाल आणि ओगलीला दिलाय.’’
असं म्हणत ताहिरनंही त्याच्याजवळचा तो सालीचा अर्धा तुकडा माझ्या टेबलावर आणून ठेवला. अशा रितीनं नारिंगाच्या सालीचा मूळ तुकडा पाच सहा वेळा अर्धा अर्धा होत आता छोट्या तुकड्यात रूपांतरित झाला होता.
प्रत्येक तुकडा माझ्या टेबलावर जमा होत होता. ते पाहून लहानग्या हैदरअलीला धीर येत होता. पण साहबअली काही बोलत नव्हता, काही विचारत नव्हता. तो त्या नारिंगाच्या तुकड्यांकडे एकटक पहात होता. याचा शेवट काय होणार, याच्या प्रतीक्षेत तो होता. सर्व तुकडे माझ्या टेबलवर जमा झाल्यावर मी ते माझ्या ओंजळीत घेतले. मी विचार करत होतो, आता याचं काय करावं? मला वाटत होतं की, प्रथम या मुलांना हे सांगितलं पाहिजे की, हे नारिंग नाही, तर हे सारे नारिंगाच्या सालीचे तुकडे आहेत. ती साल आता सुकली आहे. म्हणून अशी दिसते. पण मला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. एकाएकी साहबअली संतापाने आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तिरिमिरीत पुढे येऊन माझ्या ओंजळीला जोरात उडवून लावलं. सारे तुकडे त्यानं सार्यार वर्गात उडवून दिले. पुन्हा ते तुकडे ताब्यात घेण्यासाठी मुलांची झुंबड उडाली. पण मी रागावल्यामुळे ती पुन्हा आपापल्या जागांवर जाऊन बसली. मी एखाद्याला मारीनही, अशी त्यांना भीती वाटली. साहबअली आपल्या जागेवर जाऊन बसला होता. डेस्कवर आपलं डोकं ठेवून तो हमसून हमसून रडत होता. ते पाहून अनेक मुलांच्या डोळ्यात पाणी आलं.
त्या दिवशी रात्री उशीरापर्यंत मी नखूश मियॉंच्या टपरीत बसलो. सर्व गिर्हााइकं एकेक करून निघून गेली. शेवटी मी, साहबअली आणि नखूशमियॉं तिघेच उरलो.
साहबअलीच्या मनातील प्रश्नाचं मूळ सापडलंय याची मला खात्री पटली होती. आणखी थोडे प्रयत्न करायला हवे होते. म्हणजे सगळं नीट समजलं असतं. साहबअलीचा माझ्यावरचा राग आणि कडवटपणा त्या नारिंगामुळेच होता, असं मला वाटत होतं. पण कसं काय कोण जाणे त्याच्या काही ते लक्षात येत नव्हतं.
साहबअली टपरीतल्या त्या बाकावर बसला होता. हातातल्या पुस्तकात त्यानं डोकं घातलं होतं. आपण वाचनात गढलो आहोत असं तो भासवत होता. मी काहीतरी बोलावं अशी त्याची इच्छा दिसत होती. टपरीत शांतता पसरली. मग मी विचारलं, ‘‘काय म्हणतोस साहबअली?’’
साहबअलीनं काहीच उत्तर दिलं नाही. नखूशमियॉं म्हणाला, ‘‘बेटे, मास्टरजी तुला काहीतरी विचारताहेत.’
‘‘ठीक आहे!’’ साहबअलीनं थोडी मान वर करून उत्तर दिलं.
मी पुढे म्हटलं, ‘‘साहबअली, मी यावेळेस जेव्हा शहरात जाईन तेव्हा तुझ्यासाठी नारिंग घेऊन येणार आहे. चालेल?’’
खरं तर मी हे एवढ्यासाठी म्हटलं की त्यावरून साहबअलीशी काहीतरी बोलणं सुरू व्हावं. पण मध्येच नखूशमियॉं काहीतरी बोलायला लागला. तेव्हा मी त्याला म्हटलं, ‘‘तू आमच्यामध्ये काही बोलू नकोस. थांब.’’ मी परत साहबअलीला म्हटलं की, ‘‘साहबअली, तुला नारिंगं नकोत?’’ माझ्या या प्रश्नावर स्फोट झाल्यासारखा साहबअली उसळून म्हणाला, ‘‘खरंच बोलत असाल तर मग माझी मॉं गेली तेव्हा का नाही आणलीत नारिंग? तुम्ही त्यावेळी नारिंग आणली असतीत तर माझी मॉं मेली नसती.’’
साहबअलीच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. त्याचं दुःख, कमी होत होतं. मग आपले दोन्ही हात तोंडावर घेऊन तो स्फुंदत स्फुंदत रडत राहिला. हळूहळू हमसून, हमसून रडायला लागला. नखूशमियॉंला काय करावं समजत नव्हतं. मुलाला जवळ घ्यावं, का माझी क्षमा मागावी, का त्याच्या स्वतःच्या डोळ्यातील आसवं पुसावी?
नारिंगाच्या सालीमुळे त्याच्या आईचं मरण टळणार नव्हतं, हे साहबअलीला समजावणं मला आता अत्यावश्यक वाटत होतं. पण हे काम अवघड होतं. फार कठीण होतं.