फ्रीकॉनॉमिक्स/वात्रट अर्थशास्त्र

फ्रीकॉनॉमिक्स या नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. मुखपृष्ठावरच ‘एका वात्रट अर्थतज्ज्ञाने तपासून पाहिलेल्या (सामाजिक जीवनाच्या) लपलेल्या सर्व बाजू’ असं स्पष्टीकरण आहे.

अर्थशास्त्र हा काही सहज वाचण्याचा विषय नाही. त्यामुळे एरवी मी अर्थशास्त्रापासून दबकून लांब राहते. मात्र त्यामधे भरपूर आकडेवारीचा वापर करतात, त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढतात आणि ते सगळं कसं फसवंही असू शकतं इ.इ. ऐकण्यात होतं. विकास, प्रगती या आकड्यात न मावणार्यास संकल्पना मोजण्याचा प्रयास या शास्त्रात करतात. आर्थिक उलाढाली आणि पैशातूनच पैसा कसा उत्पन्न होईल, यांचे ते शास्त्र म्हणून तर त्याबद्दल अधिकच नावड. अशा या शास्त्रामधला वात्रटपणा मुद्दामहून बघावासा वाटला.

या पुस्तकाचे लेखक दोघेजण. त्यापैकी स्टिवन लेविट हे शिकागो विद्यापीठाचे, आघाडीचे तरुण अर्थतज्ज्ञ. हार्वर्डची पदवी, एम्आयटीमधून डॉक्टरेट आणि ढीगभर पुरस्कार मिळवलेले. पण त्यांचं स्वत:बद्दलचं म्हणणं असं – ‘‘मला अर्थशास्त्राची थिअरी फारशी येत नाही. स्टॉकमार्केट चढणार का कोसळणार? अर्थव्यवहार वाढते राहणार का नाही? महागाई चांगली की वाईट? या प्रश्नां बद्दल किंवा कर वगैंरेंबद्दल मी खरंतर काही बोलूच नये!’’ लेविट यांना खरा रस असतो रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांमधे, हे जग खरं चालतं कसं यामधे.

पुस्तकाचे दुसरे लेखक स्टीफन डुबनेर हे २००३ मधे लेविटना भेटले. डुबनेर तेव्हा ‘पैशाच्या मानसशास्त्रा’वर संशोधन करत होते. त्यांनी म्हटलं आहे – ‘‘लेविटच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र म्हणजे प्रश्नां ची उत्तरे शोधून काढण्याची अत्यंत उत्कृष्ट साधने पण त्याचबरोबर चांगल्या प्रश्नां चा गंभीर अभाव! लेविटना मात्र चांगले प्रश्नर दिसण्याची देणगी लाभलेली आहे. उदा.मादक द्रव्यांच्या व्यापारात भरपूर पैसे मिळतात, तर हा व्यापार करणारी मंडळी आईच्या बरोबर का राहतात? बंदुका जास्त धोकादायक का पोहण्याचे तलाव? ९० सालानंतर गुन्हेगारीत लक्षणीय घट कशामुळे झाली? (पोलीस यंत्रणा, उद्योगक्षेत्राची भरभराट का गर्भपात कायदेशीर झाल्यामुळे?) आदर्श पालक कशामुळे बनतात? फसवणूक, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी या संदर्भातली भरपूर आकडेवारी तपासून, इतर कुणालाही न सापडलेले धागेदोरे यांना सापडतात.’’

अशा प्रकारचे संशोधन केल्यामुळे या अर्थतज्ज्ञाला पुढे संसदपटू, उद्योजक, खेळाडू, पालक, तुरूंगातले कैदी अशा सर्व क्षेत्रातल्या लोकांनी त्यांचे प्रश्नळ, अडचणी यावर सल्ला विचारला. त्यात गुंतलेले असतानाच डुबनेर बरोबर त्यांनी हे पुस्तक लिहिलं.

लपलेली बाजू
प्रास्ताविकात ‘लपलेली बाजू’ या शीर्षकाखाली त्यांनी ही गोष्ट दिली आहे –
१९९० ते ९५ पर्यंत अमेरिकेमधे रोजच्या वर्तमानपत्रावर नजर टाकणं म्हणजे भयंकर गोष्ट होती. गुन्हेगारीच्या बातम्या प्रचंड प्रमाणात असत. बंदुका वापरून केलेले किंवा चुकून झालेले खून, चारचाक्या पळवणे, मादक पदार्थांची विक्री, चोर्यान, मारामार्यान, बलात्कार हे सगळं सतत वाढत होतं. मोठ्या शहरांमधून, स्वस्तातल्या बंदुका घेऊन हजारो टीनेजर्स मोकाट फिरत होते. मन-हृदय नसलेली एक पिढी हा गोंधळ घालत होती. १९९५ मधे जेम्स फॉक्स यांचा (गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञ) एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी चांगल्यात चांगले आणि वाईटात वाईट चित्र उभे केले होते – पुढच्या दहा वर्षात टीनेजर्सकडून होणारे गुन्हे पंधरा टक्क्यांनी तरी वाढतीलच. पण भीती अशी वाटते की ते दुपटीपर्यंत वाढतील आणि आजची परिस्थितीच आपल्याला ‘किती चांगले दिवस होते’ अशी वाटायला लागेल.

इतरही अनेक तज्ज्ञांनी आणि अध्यक्ष क्लिंटन यांनीही तसंच म्हटलं होतं – ‘‘आपल्याला येत्या सहा वर्षात जर ही बालगुन्हेगारी कमी करता आली नाही, तर देशात अराजक माजेल. माझ्यानंतरच्या अध्यक्षांना ‘जागतिकीकरणाच्या अमोल संधी’ बद्दल बोलण्याऐवजी आपल्या शहरातल्या लोकांचा देह आणि आत्मा एकाजागी राहावा यासाठीच आटापिटा करावा लागेल.’’

प्रत्यक्षात मात्र पुढच्या काळात गुन्हेगारी कमी होत राहिली. २०००मधे खुनांचं प्रमाण गेल्या ३५ वर्षांमधलं सर्वात कमी होतं. तज्ज्ञांनी अनेक कारणं दिली – वेगानं वाढणारे उद्योग व अर्थव्यवहार, शस्त्र प्रतिबंधक कायदे, पोलीस यंत्रणेचे धोरण ही सगळी कारणं प्रोत्साहक होती पण ती आधीही होतीच की! तरीसुद्धा तेव्हा गुन्हेगारी वाढली होती, म्हणजे हे काही खरं कारण नव्हे.

या सगळ्याचं कारण वीस वर्षांपूर्वीच्या एका घटनेत दडलं होतं. टेक्सास राज्यातली एक गरीब, अशिक्षित मुलगी – दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलेली एकवीस वर्षाची ही तरुणी तिसर्यां दा गरोदर होती. तेव्हा तिथे गर्भपात बेकायदा मानला जाई. तिला पुढे करून काहींनी त्या कायद्याविरुद्ध खटला दाखल केला ७०साली. ७३मधे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्याचा निकाल लागला आणि अमेरिकेत गर्भपात कायदेशीर झाला.

या सगळ्याचा गुन्हेगारीशी काय संबंध? अनेक अभ्यासांमधून असं पुढे आलं आहे की अत्यंत दुरवस्थेत जन्मलेली-वाढलेली मुलं गुन्हेगारीकडे ढकलली जाण्याचं प्रमाण फार मोठं असतं. गर्भपात बेकायदा असताना ज्या लाखो मुली (गरीब, अविवाहित, टीनेज) बाळांना जन्म देत होत्या, त्यांचं प्रमाण कमी झालं. याचा खूप मोठा दूरगामी परिणाम झाला. पण गुन्हेक्षेत्रातल्या एकाही तज्ज्ञाला हे कारण सापडलं नव्हतं.

अशा पद्धतीने समाजात चालू असणार्या व्यवहारांच्या मागची कारणं, जी मानवी स्वभावात – वागणुकीत – वास्तवात लपलेली असतात ती शोधून काढून या पुस्तकात मांडली आहेत. त्यातील काही किस्से –

उशीरा येणारे पालक
एक डेकेअर सेंटर होतं. तिथं ४ वाजेपर्यंत मुलं सांभाळली जात. रोज काही पालक उशीरा येत आणि त्यांची मुलं आणि एक तरी शिक्षक त्यांची वाट बघत थांबत. रोजच्या या वैतागावर दोघा अर्थतज्ज्ञांनी उपाय सांगितला-पालकांना दंड करा. का म्हणून फुकट मुलं सांभाळावीत सेंटर नी? पण उपाय लागू करण्यापूर्वी एक अभ्यास केला गेला. रोज किती पालक उशीर करतात यावर दहा सेंटरमधे चार आठवडे लक्ष ठेवलं. सरासरी आठ पालक दर आठवड्याला उशीर करत. मग पुढच्या आठवड्यापासून दहा मिनिटं उशीर झाला की त्या दिवशी १% दंड लावायला सुरवात केली.

ताबडतोब उशीरा येणार्याट पालकांमधे…वाढ झाली! दर आठवड्याला वीसजण उशीर करायला लागले.

सर्व क्षेत्रात असंख्य गोष्टी घडवून आणण्यासाठी बक्षीस आणि दंड वापरले जातात. मग इथे असं का झालं? दंड फारच कमी होता -हा अंदाज तुम्ही केलाच असेल. पण एवढंच नव्हतं. इथे मॉरल इन्सेन्टिव ऐवजी इकॉनॉमिक इन्सेन्टिव अशी सोयच झाली होती एका प्रकारे. उशीर झाल्याबद्दल अपराधी वाटण्याऐवजी थोडे पैसे जास्त दिले की झालं. कमी दंड आकारल्यानं आणखी एक सुचवलं गेलं-उशीरा आल्यामुळे सेंटरला होणारा त्रास किंवा येणार्याअ अडचणी फक्त १% एवढ्याच होत्या! त्याची भरपाई पैशानं केली की झालं. मग अपराधीही वाटायला नको आणि लवकर येण्यासाठी धडपडायला नको.

नंतर बारा आठवड्यांनी हा दंड रद्द केला, तेव्हा या उशीरा येणार्या पालकांच्या संख्येत काहीही बदल झाला नाही! आता उशीर झाला तरी दंडही नको आणि अपराधीही वाटायला नको.

फसवणूक
फसवणूक कोण करतं?
जवळजवळ प्रत्येक जण. जर ‘स्टेक्स’ (आमिषं / बक्षीसं) बरोबर असतील तर. फसवणं म्हणजे एक आद्य आर्थिक कृती आहे : कमी देण्याच्या बदल्यात जास्त मिळवणं. (…)
काही फसवणुकींचे पुरावे नसतात,
काहींचे सज्जड असतात.

डे केअर सेंटरच्या अनुभवानंतर फसवणुकीचे दोन नमुने या पुस्तकात दिले आहेत – शाळेतील शिक्षक आणि सुमो पहिलवान यांच्यात ‘कॉमन’ काय?-या शीर्षकासह. शिक्षकांप्रमाणेच सुमो पहिलवानही नैतिक आचरण करणारे समजले जातात.

शिकागो पब्लिक स्कूल्समधून चार लाख मुले दरवर्षी शिकत. ९६मधे तिथे सर्वांसाठी एक प्रमाण परीक्षा चालू केली. या परीक्षेत पास होण्याचं प्रमाण पाहून शाळांची मान्यता चालू ठेवली जाई. या परीक्षांचे शैक्षणिक फायदे तोटे यावर चर्चा झाल्या. मुलं नेहमीच परीक्षांमधे पाहून लिहिणं इ. प्रकार करत आली आहेत. पण आता मुलं पास होण्यात शिक्षकांसाठीही स्टेक्स निर्माण झाले. त्यामुळे विविध पद्धतींनी परीक्षेत पास होण्याचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न झाले. एका वर्गात उत्तरं फळ्यावरच लिहून देण्याचीही घटना घडली. या सगळ्या परीक्षांमधल्या (तिसरी ते सातवी) उत्तरांच्या नोंदी ९३ पासून २००० पर्यंत उपलब्ध होत्या. या प्रचंड माहितीचे विश्लेंषण करून, शिक्षकांची मनोभूमिका आणि परिस्थिती लक्षात घेऊन यातले फसवणूक करणारे निकाल/वर्ग कसे शोधून काढले हे अगदी वाचण्यासारखं आहे.

 अनेक मुलांची प्रश्नवपत्रिकेतली शेवटची (अवघड प्रश्नांची) उत्तरे सारखीच, ओळीने बरोबर असणे (त्याआधीची चुकलेली असूनही).
कमी गुण मिळवणार्यांणचे गुण एकदम वाढणे.
 पुढच्या परीक्षेत ते पुन्हा एकदम कमी होणे.
 आधीचे सोपे प्रश्नर सोडवले नसून पुढचे अवघड बरोब्बर सोडवणे.
या सगळ्या उद्योगानंतर नमुना म्हणून काही शंकास्पद वर्गांची आणि काही चांगल्या वर्गांची पुन्हा परीक्षा घेतली. त्याचं कारण सांगितलं नाही आणि शिक्षकांच्या हाती उत्तरपत्रिका जाऊ दिल्या नाहीत.
या परीक्षेच्या निकालात चांगल्या वर्गांचे निकाल पूर्वीप्रमाणेच राहिले तर फसवणूक केलेल्या वर्गांचे पार उतरले. या सगळ्या अभ्यासावरून लक्षात आले की जवळजवळ ५% वर्गांमधे ही फसवणूक होत असावी.
या विश्लेषणामधून चांगल्या शिक्षकांचे वर्गही लक्षात आले. त्यांच्या वर्गातील मुलांची उत्तरे आधीच्या परीक्षांपेक्षा बरीच चांगली होती.
 सुरवातीच्या प्रश्नां मधील गुण वाढले होते.
 ही वाढ पुढच्याही परीक्षांमधे झालेली दिसली.

आता गोष्ट सुमो लढतींची. सुमो पहिलवान आणि त्यांच्या लढती यांना जपानमधे फार महत्त्वाचं स्थान आहे. त्यांना जे रँकिंग मिळतं ते या लढतींवर अवलंबून असतं. रंँकिंगच्या पिरॅमिडमधल्या पहिल्या ६६ जणांना खूप प्रतिष्ठा असते. शिवाय त्यांना मिळणारा पैसा, सुखसोयी, मानमरातब सगळं काही यातल्या क्रमांकावर अवलंबून असतं. पहिल्या चाळिसातला एखादा पहिलवान वर्षाला १ लाख ७० हजार डॉलर वर्षभरात मिळवतोच. आणि सत्तरावा वर्षाला १५ हजार. या खालच्यांचं आयुष्य खडतर असतं. वरच्या खेळाडूंची सेवा त्यांना करत राहावी लागते. यामुळे रँकिंगला फारच महत्त्व येतं.

अशा परिस्थितीत जिंकण्यासाठी फसवणूक करणं याचं आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. पण गंमत अशी की फसवणूक (किंवा लढतींची निकाल निश्चिती) हरण्यासाठी होत असे. इथेसुद्धा प्रचंड माहिती उपलब्ध होती – १९८९ ते २००० मधल्या ३२,००० लढतींची. २८१ पहिलवान यात खेळत. प्रतिष्ठेच्या लढती वर्षातून सहा वेळा असत. त्यात प्रत्येकजण पंधरा दिवसात पंधरा कुस्त्या खेळे. त्यातल्या आठ जर जिंकल्या तर त्याचं रंँकिंग आधीच्यापेक्षा वाढतं. त्यामुळे आठवा विजय हा फार महत्त्वाचा! ज्याचे गुण सात आहेत त्याला तर जीवन-मरणाचा प्रश्नध!
त्याच्या विरूद्ध लढणारा एखादा आठ गुणवाला मिळाला तर? तो हरायला तयार होत असेल?

पण हे ओळखायचं कसं? शेवटच्या दिवशीच्या कुस्त्या पाहू-ज्यांचे सात गुण झालेले आहेत¬ अशांच्या (आणि आठ गुणवाल्यां-बरोबरच्या! अर्ध्या कुस्तीगीरांना सात-आठ किंवा नऊ गुण असतात त्या दिवशी.) सात-सात वाल्यांमधे फिक्सिंग होणार नाही कारण दोघांना जिंकायलाच हवं. दहावाल्यांनाही वेगळ्या प्रचंड बक्षीसांची आशा खुणावत असते. आता सात वाला जिंकण्याची शक्यता जवळजवळ ५०% असणार – हे तर्कानं बरोबर.

पण प्रत्यक्षात सातवाले ८०% लढती जिंकतात (आठवाल्यांविरूद्ध) आणि नऊ गुणवाल्यांविरूद्ध ते ७४% लढती जिंकतात असं नोंदीत दिसून आलं. आता एवढ्यावरूनच संशय घ्यायला नको. आणखी जरा माहिती पाहू – या सुमोंची घराणी असतात. ते दुसर्याी घराण्यातल्या सुमोंबरोबरच लढतात. दर दोन महिन्यांनी ते १५ जणांशी लढतात. त्यांचेही एकमेकांशी जवळचे संबंध असतात. आता हे सात आणि आठवाले जेव्हा पुढच्या वेळी लढतात (जेव्हा शेवटच्या दिवसाचा ताण नसतो) तेव्हाचे निकाल पाहू – इथे सातवाले ४०% लढती जिंकले होते. एकदा ८०% आणि पुढच्याच वेळी ४०%?

आणखी पुढची गंमत म्हणजे तिसर्याक लढतीच्या वेळी हे प्रमाण ५०% झालं. म्हणजे ठराव फक्त दोन लढतींपुरता होता. एकदा मी जिंकतो – पुढच्या वेळी तू! दोन्ही घराण्याचे सुमो ‘सात’ वाल्यांविरूद्ध विशेष वाईट खेळतात!

पण याबद्दल चर्चा कधीच होत नाही. तो राष्ट्रीय खेळ ना!

तरीही कधीतरी मिडियामधे प्रश्नव विचारले जातातच. ही वेळसुद्धा ‘विशेष’ असते. सगळ्यांचे कॅमेरे रोखलेले असताना काय होतं? सातवाल्यांचे विजय आता ५०% असतात!

आता जर पालक-शिक्षक-सुमो सगळे प्रतिष्ठित लोकही इतरांना फसवत असतील तर मानवजातीचं काय होणार? सगळी मानवजात अंतर्बाह्य अंगभूत भ्रष्टाचारी आहे काय? पुढच्या प्रसंगामधे कदाचित याचं उत्तर सापडेल.

एक सत्यकथा
पॉल फेल्डमन यांची ही खरी गोष्ट. ८४ मधे त्यांनी नोकरी सोडून बागेल (नावाचा पाव) विकण्याचे ठरवले. बर्यागचशा ऑफिस कँटिन्समधे नाश्त्याच्या वेळी ते बागेल नेऊन ठेवत. शेजारी कॅशबॉक्स आणि बागेलच्या किंमतीची पाटी असे. थोड्या वेळाने येऊन ते उरलेले बागेल आणि पैसे गोळा करत. १४० कंपन्यांमधून आठवड्याला ८,४०० बागेल ते विकत. त्यांनी या सगळ्याच्या काटेकोर नोंदी ठेवल्या. त्यामधून पांढरपेशा गुन्ह्यांबद्दल बरीच माहिती पुढे आली. पावाचे पैसे बुडवणं हा छोटासा झाला तरी गुन्हाच! अशा पांढरपेशा गुन्ह्यांची कारणं कधीच कळत नाहीत. कारण त्यातले बरेचसे गुन्हे पकडलेच जात नाहीत. उदा.कंपनीची सामुग्री पळवणारे सहसा पकडले जात नाहीत. ही मंडळी शांतपणे सुखासमाधानाचे आयुष्य जगतात. तसं रस्त्यावरच्या चोर्याेमार्यांमचं नसतं. तिथला बळी ओरडा करतो, गुन्हे नोंदवले जातात. पांढरपेशा गुन्ह्यांचा, करबुडव्या कंपन्यांचा, बळी अमूर्त असतो.

अगदी सुरवातीला स्वत:च्याच ऑफिसमधे त्यांनी असे पाव ठेवले होते तेव्हा त्यांना ९५% पावांचे पैसे मिळत. पण जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा ९०% मिळाले म्हणजे ती कंपनी प्रामाणिक म्हणावी लागे. ८०% पर्यंत ते चालवून घेत. त्याखाली प्रमाण गेलं तर तिथे पाटी लावत – ‘तुम्ही घेतलेल्या बागेलचे पैसे टाकायला विसरू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना उचलेगिरी शिकवत नसणार. मग तुमचं स्वत:चं काय?’

फेल्डमन जेव्हा उघड्या खोक्याची कॅशबॉक्स वापरत तेव्हा पैसेही उचलले जात. त्याऐवजी टिनडबे वापरूनही फरक पडला नाही. पण जेव्हा प्लायवुडचं खोकं केलं त्यानंतर मात्र पैसे मिळायला लागले. वर्षभरात एखादीच बॉक्स चोरली गेली.
त्यांच्या नोंदी काय सांगतात? ९२ पासून पैसे मिळण्याचा दर अगदी सावकाशपणे कमी होत होता. २००१ मधे तो ८७% होता. ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर तो एकदम २% वाढला आणि २००५ पर्यंत स्थिर राहिलाय. छोट्या कंपनीत लोक जास्त प्रामाणिक होते. डझनभर माणसांपेक्षा शेकडो माणसांच्या कंपनीमधे ३ ते ५% कमी पैसे मिळतात. जास्त साक्षीदार असूनही पळवण्याची प्रवृत्ती वाढते कशी? छोट्या गावात आणि मोठ्या शहरात पडणाराही हाच फरक आहे. जिथं तुम्हाला सगळे ओळखतात तिथं उचलेगिरी कशी करणार? मोठ्या गर्दीत लाज वाटण्याचा प्रश्नथ येत नाही.

माणसाच्या मूडचाही प्रामाणिकपणावर प्रभाव असतो. चांगली हवा असली की चांगले पैसे मिळत. सणासुदीला उचलेगिरी २% वाढत असे-तेवढेच पोराबाळांच्या खरेदीसाठी! फेल्डमन यांनी आकडेवारीपेक्षा अनुभवातून काही आडाखे मांडलेत – त्यांचं म्हणणं morale हा महत्त्वाचा भाग आहे. कंपनीत जिथे अधिकारी चांगला आहे आणि लोकांना स्वत:चं काम करायला आवडतं, तिथे लोक प्रामाणिक असतात. अधिकाराच्या शिडीवर वरच्या पातळीवरचे लोक जास्त फसवतात. (त्यांना तो त्यांचा हक्क वाटतो? की फसवता आल्यामुळेच ते वर चढलेले असतात?)

नीतीमत्ता म्हणजे ‘आपल्याला जग जसं हवं आहे’ ते आणि अर्थशास्त्र म्हणजे ‘जे प्रत्यक्षात आहे ते’ असं मानलं तर वरच्या गोष्टींमधे हे दोन्ही एकत्र दिसतं.

अनेकदा आपल्याला असं दिसतं की लोक प्रामाणिकपणे वागतात त्याचं कारण त्यांना फसवण्याची संधी नसते. संधी मिळताच ती घेणारे तर बहुसंख्य असतात. म्हणजे माणूस या प्राण्याची व्याख्याच फसवणारा प्राणी अशी करायची की काय? पॉल फेल्डमन यांच्या गोष्टीवरून तसं दिसत नाही. माणसाच्या अंतरंगात इतरांच्या भल्याचाही विचार असतो. त्याला स्वत:ला दमडी मिळणार नसेल तरीही दुसर्यााच्या आनंदात त्याला रस असतो, त्याच्याबद्दल आस्था असते – निदान ८०% लोकांना तरी!