संवादकीय – मार्च २००६
दिवाळी अंक वाचून एक परिचित म्हणाले, ‘‘वाचून फार बरं वाटलं.’’ हे ऐकून मलाही बरं वाटलं, तरीही मी विचारलं, ‘‘कशाचं बरं वाटलं?’’ ते म्हणाले, ‘‘भगभगीत साजरीकरणाचा ऊत सगळीकडे आलेला असतो. मला ते नकोसं वाटत असतं. पण म्हणायची सोय नसते. म्हटलं तर ऐकणारांची मनं दुखावतात. आपल्यासारखा विचार करणारे लोक आसपास आहेत असं कळलं की बरं वाटतं, सोबत वाटते.’’
त्यांचं म्हणणं मला शंभर हिश्शांनी पटलं, आणि तरीही मी विचार करत राहिले. ह्या सोबतीची गरज आजकाल आपल्यापैकी अनेकांना जाणवते आहे का? आपलं मत अनेक इतरांहून वेगळं असलं, तर आपण स्वतःपुरतं ते पुन्हा एकवार तपासून पाहावंही, पण त्यासाठी सोबत का हवीशी वाटावी?
कारण आज आपलं ते मत इतरांहून वेगळं असेल तेव्हा मांडण्याची आपल्याला भीती वाटते. वेगळ्या मताचा माणूस स्वीकारला जाणार नाही असं वाटतं.
‘रंग दे बसंती’ बद्दल ‘हा तद्दन भिकार चित्रपट आहे’ असं मांडणारा लेख एका महत्त्वाच्या वर्तमानपत्रात वाचल्यावर एक महाविद्यालयीन युवती म्हणाली, ‘‘हुश्श! आपण एकटे नाही, ह्याचंच बरं वाटलं मला तो लेख वाचून. मित्रमैत्रिणींच्या गप्पात मी माझ्या असल्या मतांनी सतत एकटी पडत राहते.’’
मी तिला म्हटलं, ‘‘तुझं मत इतरांपेक्षा समजा वेगळं असलं, तर त्यात काय बिघडलं?’’
ती म्हणाली, ‘‘बिघडतं ना, वेगळं मत मांडणं हा जवळजवळ अपराधच ठरतो, माझं तसं मत का झालंय, हे कोणी ऐकूनही घेत नाही. काहीजण अंगावरच येतात किंवा मी इतरांपेक्षा वेगळं म्हणतेय म्हणजे फार आगाऊपणा करतेय असं मानून तो त्यांचा वैयक्तिक अपमान असंसुद्धा लावून घेतात.’’
मलाही तिचं म्हणणं पटलं. उदाहरणच द्यायचं तर आताच्या बारावीच्या परीक्षेतल्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेतल्या ‘त्या’ उतार्याणचे देते.
तो उतारा वाईट तर नाहीच, उलट उत्तम आहे. मुख्य अडचण अशीय की तो सरळपणे समजायला सोपा नाही. चांगलाच अवघड आहे. बारावीपर्यंत आपल्या शाळांमधून ज्या प्रकारे भाषा शिकवली जाते, त्या पार्श्वभूमीवर तर तो भयंकर कठीण ठरतो. ज्या प्रकारचे प्रश्न अशा उतार्यां वर विचारले जातात आणि त्यातून जेवढ्या उत्तरांची अपेक्षा केली जाते, ती दर्जा-पातळी गृहीत धरता, परीक्षेत इतका कठीण उतारा टाकला नसता तर बरं झालं असतं. पण त्याबद्दल जी तक्रार झाली, ती मात्र फारच विचित्र होती.
तुकारामांना ‘अरेजारे’ म्हणण्यावरून त्यावर आक्षेप घेण्यात आला. तुकारामांची त्यात निंदा आहे, असं मानण्यात आलं. (तेही ‘तुका’ झालासे कळस रोज म्हणणार्यांदकडूनच.) तसं मात्र मुळीच नव्हतं. पण हे म्हणायचं का? असं म्हटलं तर आपण उद्धट ठरणार. माफी मागावी लागणार. शेवटच्या दोन वाक्यांमध्ये हाणामारी, गोंगाट, घेराव अशा अनेक गोष्टी घडणार. म्हणून मग लोक गप्प बसतात. गप्पांमध्येही आदमास घेतात. कुणी निधड्या दिलाचा निघाला तर आपल्या मतांची दुर्री-तिर्री हळूच खाली सरकवतात.
चौकाचौकात लागणारे कुणाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे दोनचार पुरुष उंचीचे फलक अनेकांना मनातून आवडत नाहीत. बटबटीत, ओंगळ, तर ते असतातच, पण वैयक्तिक प्रसिद्धीची ही बेंगरुळ पद्धत नकोशी वाटते. पण हा शुद्ध वेडेपणा आहे असं आपण म्हणायचं मात्र नाही. भीती वाटते.
दररोज नव्या नावाचे गुरु आणि माता समोर उभे ठाकत असतात. कुंडलिनी जागृत करून देण्याचे रतीब घालायला तयार असतात आणि मागचा पुढचा विचार न करता लोक तिकडे पळत असतात. पण आपल्याला त्यातलं काय कळतं? कदाचित असेलही त्यांना दैवी शक्ती. असं म्हणून आपण घाबरून घाबरून मत द्यायचं. असं आपण का करतो? एकीकडे सारखं इतकं घाबरायचं, नाहीतर दुसरं टोक – कायदा हाती घेऊन खून – मारामार्यािच करायच्या किंवा ते दाखवणार्या् चित्रपटांना देशप्रेमी समजायचं! हे जरा विचित्रच घडतंय.
ह्याचा परिणाम आपल्या मनांवर होतो आहे, तसाच आपल्या मुलामुलींवरही होतो.
असं मला वाटतं, तुम्हाला?