बंदुकीनी काय करायचं असतं ग आई?

यावर्षी आम्ही पहिल्यांदा कोलंबोला आलो तेव्हा फुटपाथवर सशस्त्र सैनिकांची सतत वर्दळ दिसायची. सुरुवातीला हे माझ्या तीन वर्षाच्या लहानग्याच्या लक्षात आलेलं दिसलं नाही. पण एके दिवशी बालवाडीकडे जात असताना त्यानं विचारलं, ‘‘त्या माणसाच्या हातात काय आहे?’’ एक क्षणभर काही तरी सांगून वेळ मारून नेण्याचा विचार मनात चमकला. पण अनावश्यक तपशिलांच्या फंदात न पडता त्याला पटेलसं सांगून टाकायचं ठरवलं. ‘‘आई, बंदुकीनी काय करायचं असतं?’’, त्याचं पालुपद चालूच होतं. सत्यापासून फारकत घ्यायची वेळ आली होती. ‘‘तो माणूस घराची राखण करतोय.’’ मी ठोकून दिलं. ‘‘पण त्या बंदुकीनी काय करायचं?’’ तो सोडायला तयार नव्हता. मग मात्र त्याचं लक्ष वेगळीकडे वेधण्याच्या पद्धतशीरपणे कमावलेल्या माझ्या तंत्राचा वापर केला.

याआधी काही महिन्यांपूर्वीच सिडनीच्या बाजारात, माझ्या मुलानं एका छोट्याला खेळातल्या बंदुकीच्या गोळ्या हाताळताना टिपलं होतं आणि त्याच्याबद्दलच्या आदरानं भारावून तो म्हणाला, ‘‘ते बघ, त्या मुलाकडे जादूच्या बिया आहेत.’’ त्याचा निरागसपणा अवाक् करणारा आणि विलोभनीय होता आणि मला तो तसाच कायम राहावासा वाटत होता.

‘बंदुकी’बद्दलच्या आमच्या त्या अर्धवट संभाषणानंतर माझ्या मुलानं पुन्हा काही ते सैनिक प्रकरण काढलं नव्हतं. पण मी मात्र वेळ पडली तर काय सांगायचं याचाच अद्याप विचार करत होते. इथल्या त्या यादवी युद्धाच्या हिडीसपणापासून, तो हिंसाचार, तो द्वेष, युद्धाच्या अविचारातून निर्माण होणार्यास यातना यापासून मला त्याला सांभाळायचं होतं. पण तरीही जगरहाटीचा अर्थ समजावून घेण्यासाठी त्याला बरोबरीच्या इतर मुलांवर, प्रौढांवर किंवा टेलिव्हिजनवर सोपवून द्यायचं नव्हतं. मलाच त्याला मदत करायची होती.

बंदुका आणि युद्धांचा अर्थ मुलांना कसा समजावून द्यावा, कधी द्यावा असले विचार करायला नशिबानं मला वेळ तरी होता. युद्ध व्याप्त प्रदेशातल्या पालकांना ही चैन कशी परवडणार?
श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागातील मुलांसाठी बंदुका, मृत्यू आणि युद्ध ह्या समानार्थी गोष्टी आहेत. भीती आणि हिंसाचार हे तर त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे एक घटक बनले आहेत. संपूर्ण आयुष्यभरासाठी! निरागसपणाचं सुख आता त्यांना दुष्प्राप्य आहे.

उदाहणार्थ बट्टिकलोआमध्ये एखादं मूल पोरकं झालं असेल, बेघर झालं असेल, दूरवर गल्फमधे काम करणार्याप आई-बापांना दुरावलेलं असेल आणि शिवाय दारिद्य्राला तोंडही देत असेल. त्या लेकराला कित्येक पाशवी हिंसाचार उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले असतील. ती अगदी जवळची माणसंही असतील कदाचित! आत्महत्या आणि अतिरेकी टोळ्यांमध्ये सामील होण्याच्या सर्वाधिक प्रमाणासाठी बट्टिकलोआ जिल्हा आता कुख्यात झाला आहे.

यादवी युद्धांमुळे ज्या घटना बालकांना बघाव्या लागतात, सहन कराव्या लागतात त्यामुळे त्यांच्यामधे अतीव मानसिक त्रास-ताण आणि नैराश्याचे आजार सर्वाधिक प्रमाणात याच जिल्ह्यात आढळले आहेत (१९९४ मधील एक अभ्यास).
१९९६ मध्ये ‘बटरफ्लाय गार्डन’च्या निर्मितीस हाच अभ्यास कारणीभूत झाला. स्थानिक आरोग्य कर्मचारी, स्थानिक मानसोपचार समुपदेशक आणि कॅनडातील एक कलाकार यांच्या सहभागाने ही ‘फुलपाखरू बाग’ चालते. श्रीलंकेतील भयाण यादवी युद्धाचा स्वतः खुद्द अनुभव घेतला आहे अशा लहानग्यांना स्वतःच्या विचार – भावनांना वाट करून देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यासाठी खेळ, कला, छंद, संगीत, नाटक, प्राणी पाळणं आणि बागकामाच्या उद्योगात रमणं यांची खूपच मदत होते. मुलांच्या जीवनाला ग्रासून टाकणार्याा विपरीत आणि अगतिक परिस्थितीतून सुटका करणारा त्यांचा ‘निवारा’ म्हणजे ही ‘गार्डन’ आहे. एक सुरक्षित ‘माहौल’, जिथे सृजनशीलता, कल्पकता, विश्वास आणि मेळ यांना खतपाणी घातलं जातं. मनाच्या जखमा भरून येणं आणि एकसंध समाज निर्माण होणं याची प्रक्रिया त्यातून सुरू होऊ शकते.

गेली सहा वर्षे ही शाळा सुटल्यानंतर आणि रविवारच्या सुट्टीत, बट्टीकलोआ आणि आसपासच्या तामीळ आणि मुस्लीम समाजाच्या जवळ जवळ बाराशेपेक्षा अधिक शाळांमधील मुलांसाठी बटरफ्लाय गार्डन सृजनात्मक खेळांची सुविधा देत आहे. शाळांमध्ये सादर होणार्याट कार्यक्रमांमधून तिथले शिक्षक बटरफ्लाय गार्डनशी परिचित होतात. तसंच पूर्ण बट्टीकलोआमधून अशी दुःखपीडित मुले आठवड्यातून एक दिवस या प्रमाणे नऊ महिने नियमितपणे हजर राहतात.
निरनिराळ्या तामीळ आणि मुस्लीम खेड्यांमधून रोज पन्नास मुले हजेरी लावतात. हे खेळाचे कार्यक्रम तिथले एक डझनभर कर्मचारी, वेगवेगळ्या समाजातील स्थानिक पुरुष आणि स्त्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात – कित्येकदा हे स्त्री-पुरुष स्वतःच या युद्धाचे अल्पवयीन असताना बळी ठरलेले असतात.

मुलांना नव्या अनुभवांची वाट उघडून देणं, आनंद निर्माण करायला धडपडणार्याा कार्यकर्त्यांबद्दल विश्वासाचं नातं निर्माण करणं, इतर खेड्यातून आलेल्या मुलांशी मैत्री करणे आणि सृजनशील आणि कल्पनारम्य असं एक बालविश्व मुलांना गवसणे, हे बटरफ्लायचं ध्येय आहे. हे कार्यकर्ते म्हणजे शांतीपूर्ण अहिंसक वर्तणुकीचे जणू आदर्श आहेत. संघर्ष टाळण्याचे पर्यायी मार्ग ते शोधतील आणि भावनिक विषयांनी बेचैन करणारे प्रसंगही ते हाताळतील!
काही विशिष्ठ मुलं, जी वैयक्तिक दुःखांची, यातनांची बळी झालेली उघडपणे दिसतात, त्यांना काही उपक्रमात भाग घेण्यासाठी बोलावलं जातं. यात मनातले विचार व्यक्त केले जातात. त्याचं नाव आहे ‘अम्मा-अप्पा प्रवास’. त्यांच्या सांस्कृतिक पद्धतींना अनुरूप असणारे हे कार्यक्रम मुलांना त्यांच्या कुटुंबाबद्दल आठवून बोलायची संधी देतात. त्यातूनच नवीन कल्पनाविश्व बोलण्यातून उभं करण्याची ताकद येते.

कोलंबोमध्ये बटरफ्लाय गार्डनमधील मुलांच्या चित्रांचं एक प्रदर्शन (एप्रिल २००२ मधील बेअरफुट गॅलरी येथील) पाहात असता माझा तीन वर्षाचा मुलगा क्षणभरातच इतका काही भारावून गेला की कला दिग्दर्शक पॉल होगनच्या मागे मागे मंतरल्यासारखा फिरत राहिला. त्या सर्व चित्रांबद्दल त्यानं पॉलवर प्रश्नांची नुसती सरबत्ती केली.

वीस वर्षांपूर्वी पॉल होगननं टोरोंटोमध्ये स्पायरल गार्डनची स्थापना केली. या ठिकाणी अपंग आणि दुर्धर आजाराने ग्रासलेली मुलं बरी होतात आणि सुधारतात. ‘सेंटर फॉर पीस स्टडीज अँड हेल्थ रिसर्च’, मॅक मास्टर युनिव्हर्सिटीने तत्कालीन युगोस्लाव्हियातील मुलांवर झालेले युद्धाचे परिणाम अभ्यासायला सुरुवात केल्यानंतर आणि स्पायरल गार्डनच्या यशानंतरच बटरफ्लाय गार्डन निर्माण झाली. १९९४ मध्ये श्रीलंकेतील काही अभ्यासकांनी पॉलला पाचारण केलं, पॉल हा मृदुभाषी, लहानात मूल होऊन वावरण्याची प्रौढांमध्ये अभावाने दिसणारी दुर्लभ देणगी मिळालेला आणि मुलांची प्रतिभा, कल्पकता जागवणारा आहे.

सात वर्षातच बटरफ्लाय गार्डनमधील मुलांची चित्रं गॅलरीतील भिंतीवर आपली जादू पसरवू लागली. पॉलच्या बरोबर तयार झालेल्या या मुलांच्या चित्रात ऑस्ट्रेलियन आदिवासींच्या चित्रातून मिळालेली प्रेरणा दिसून येते. ही चित्रं प्रतिकात्मक शैलीच्या श्रीमंतीनं नटलेली आहेत आणि त्याचवेळी त्यांचं मातीशी नातं मात्र तुटलेलं नाही.

या प्रेरणादायी प्रदर्शनाच्या मध्यभागी एक ‘कोलाज’ आहे – यात छोट्यांनी काढलेली सैनिकांची चित्रं, रायफल्स, मशिन गन्स्, मिलिटरी विमानं आणि हेलिकॉप्टर्स, चकमकी, गोळीबार आणि मरून पडलेली माणसंही. यांची चित्रं भरारी घेणार्या, शेकडो कबुतरांच्या थब्यांंनी व्यापून टाकलेली होती. जणू मुलं वेदना विसरून शांततेकडे झेपावताहेत. या चित्रांजवळून जाताना मी माझ्या तीन वर्षाच्या लहानग्याचा हात घट्ट धरते. त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खरंच जादूच्या बिया झाल्या तर !