संवादकीय – एप्रिल २००६
‘‘आई, तुला पुस्तकातला किडा बघायचाय?’’ माझ्या सहा वर्षाच्या धाकट्यानं विचारलं. माझं फारसं लक्ष नव्हतं. त्याचं वाक्य ऐकून मला वाटलं, तो मला ‘थोरली’ दाखवणार. थोरली सदोदित पुस्तकांत रमलेली असायची. तिचे लाड करायचे, म्हणजे पुस्तकं आणायची. हे लाड करणं मला अनेक प्रकारे मानवायचं. पुस्तक हे तिच्यासाठीचं मला पिशवीतून नेता येणारं पाळणाघरच असायचं. कुठे बैठकीला, सभेला गेलं तरी शेजारी बसवून समोर चार पुस्तकं टाकली, की ‘बैठे बैठे जीने का सहारा’ व्हायचा. ती जे हातात मिळेल ते वाचायची. वर्तमानपत्रातल्या तिला संदर्भ न कळणार्याज राजकीय बातम्याही तिनं वाचलेल्या असायच्या. घरात त्याबद्दल चर्चा झाली तर ही एखादा विसरलेला संदर्भ अचूक सांगायची. पुस्तकांच्या मलपृष्ठावरची त्या प्रकाशनसंस्थेच्या इतर प्रकाशनांची यादीही तिची तोंडपाठ असे.
टिपकागदासारखं जीवन समजावून शोषून घेण्याच्या ह्या वयात, ती हवं ते सारं, – बरंचसं पुस्तकांमधून वाचनामधून मिळवायला जाई. कल्पनेच्या प्रांतात नेणार्या पुस्तकांमध्ये शिरून तिचं मन वास्तवातही त्याच कल्पनांचं आरोपण करीत असे. अगदी वर्तमानपत्रातल्या अपघाताच्या बातम्यांनी तिला आमचीच सारखी काळजी वाटत राही. बाबाला ट्रकनी उडवलं नसेल ना? आजीच्या विमानाला अतिरेक्यांनी पळवलं असेल का? असे प्रश्न इतरांना विचित्र – अशुभ वाटले तरी तिचा नाईलाज असे. वाचनातून – वास्तवाकडे बघण्याची तिची सवय होती. मला त्या काळात काहीवेळा आपण हिला इतकं वाचनाच्या नादी ‘लावलं’ हे चुकलं तर नाही ना, असंही वाटायचं. तिच्या स्वतःच्या जगात तिच्या वाचनातून आलेली पात्रं असायची. तिच्या बर्या वाईटाच्या कल्पना ह्या पुस्तकातल्या पात्रांच्या अनुभवांमधून तयार व्हायच्या. पुस्तकं – तिचे सवंगडी होते, शिक्षक होते, कल्पनेचे पंख होते, मनोरंजनाचं हमखास साधन होते. प्रेमळ पाळणाघरही होतं. पुढे पुढे पुस्तकं तिच्याशी प्रसंगी भांडत, कधी समंजसपणे समुपदेशन करत. हे सगळं मी पाहतच होते. पालकत्वाच्या माझ्या प्रक्रियेत ही पुस्तकं माझी आतून साथीदार होती. तर धाकटा मला माझीच ही ‘कृती’ दाखवायला बोलावत होता की काय? मी उठलेही नाही, त्याच्या बोलावण्यानं हललेही नाही. कारण माझं हे थोरलीनं साधलेलं यश धाकट्यानं पार उडवून लावलं होतं. घरात थोरलीच्या निमित्तानं आलेलं भरपूर बालसाहित्य होतं. हा पठ्ठा एकाला डोळे काय, हातसुद्धा लावत नसे. मी वाचून दाखवली तर माझ्या मनाला किंमत दिल्यासारखी तेवढी गोष्ट ऐकून घेई आणि खेळायला पळून जाई. पिशवीत मावणारं पाळणाघर त्याला पुरत नसे. तो काहीतरी करामती, उद्योग करून ठेवणार ह्या भीतीनं बैठक सभांमध्ये माझं लक्ष लागत नसे. ‘घरात पुस्तकं असतील, पुस्तकं वाचणारे पालक असतील तर मुलांना वाचनाची आवड लागते’ असं वाक्य पालकनीतीत लिहिताना मला आतून कचरल्यागत वाटे.
पालकांचे दोन प्रकार असतात. अर्थात सामान्यपणे सुजाण पालकांमधले. एका प्रकारातले पालक फार प्रभावी असतात. मुलांवर त्यांचा उत्तम प्रभाव पडतो. त्यांची मुलं त्यांच्या आशा-अपेक्षांना आपलंसं करतात. मग, ‘मी मुळीच माझं म्हणणं तिच्या/त्याच्यावर लादत नाही.’ असं म्हणत राहूनही त्यांची मुलं त्यांच्या अपेक्षांनुसार बहुतांशी वागतात. ही मुलं शाळा, परीक्षा, स्पर्धा, आव्हानं स्वीकारतात. त्यात यश मिळवतात. त्यासाठी बर्यारपैकी कष्टही करतात.
दुसर्याध प्रकारचे पालक स्वतःचा प्रभाव पडूच नये, ह्यासाठी कळत किंवा नकळत सतर्क असतात. त्यांची मुलं स्वतःच्याच पद्धतीनं वागतात. एखाद्या गोष्टीत रस वाटला तर करतात, मग त्यात त्यांना यशही मिळतं. पण प्रत्यक्ष कृतीवर तर सोडाच, मनावर किंचितही दडपण स्वीकारत नाहीत. ह्या पालकांनाही आपल्या मुलामुलींनी ‘यशं’ संपादून आणावीत, असं मनातून बरेचदा वाटतही असतं. पण त्या अपेक्षा बहुतांशी फसतात.
मी स्वतः दुसर्यात गटातली पालक आहे. मुलांना वाचनाची आवड असावी, असं वाटलं तेव्हा मला मोठीनं साथ दिली, तरी धाकट्यानं गुंगाराच दिलेला होता. मला धाकट्याचा जरा रागच येई. आणि आता थोरलीलाच ‘पुस्तकातला किडा’ म्हणून चिडवतोय.
‘‘चल ना ग बघायला.’’ तो मला ओढत म्हणाला. ‘‘काय?’’ ‘‘किडे’’ ‘‘कुठायत?’’
‘‘गॅलरीत खूप ढालकिडे आलेत आई. ‘आपली सृष्टी आपले धन’ पुस्तकातल्यासारखे’’
मी थक्क होऊन उठले. ‘‘तू ‘आपली सृष्टी…’ वाचतोस?’’ ‘‘रोजच’’ ‘‘तुला येतं कुठं वाचता?’’
‘‘ते पुस्तक येतं, त्यात चित्रं असतात. ती मी ओळखतो.’’ गॅलरीत त्यानं मला माहीत नसलेली ढालकिड्यांबद्दलची बरीच माहिती ऐकवली. आणि मी, त्याच्या पुस्तकं न वाचण्याबद्दल तक्रार करणार्याी माझ्या मनाला दटावून गप्प बसवलं.
थोरली पुस्तकांतून कल्पनेचे पंख घेऊन वास्तवात शिरत असे. धाकटा वास्तवाचा हात धरून पुस्तकात शिरतो. बिघडलं काय? मी माझ्या दोघांबद्दल सांगितलं, तरी ह्याच्या अनेक तर्हाप घराघरात असणार. आपण फार प्रभावी न होता, त्यांनाच त्यांच्या तर्हेानं वाढायला मोकळीक ठेवली, तर बरं… असं आपलं मला वाटतं.