इच्छा आहे म्हणून मार्ग आहे!

मागील अंकांतील लावला इवलासा वेलू या अनघा लवळेकर यांच्या लेखाचा पुढील भाग –

‘संवादिनी’च्या रचनेविषयी, कल्पनेविषयी आपण मागच्या लेखात जाणून घेतलं. या सर्व रचनेतून जे विशेष उपक्रम सुरू झाले त्यातील एका उपक्रमाविषयी या लेखात थोडं अधिक सविस्तरपणे मांडायचा प्रयत्न केला आहे.
आज अनेक शैक्षणिक संस्थांना संवादिनीची ओळख ज्या उपक्रमामुळे होत आहे. त्या ‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ कार्यशाळेची चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दलची बैठक सुरू होती. सर्व मैत्रिणी आपापल्या आठवणींचे पदर उलगडत होत्या. ‘संवादिनी’च्या इतर उपक्रमांबरोबर ह्या विषयाकडे आपण कसे वळलो ह्या गप्पा सुरू झाल्या.

अगदी सुरवातीला ‘संवादिनी’ गटाच्या सदस्या एकत्र जमायच्या. जरा जरी फावला वेळ मिळाला की मुला-मुलींच्या तक्रारी सुरू व्हायच्या.

सातवी-आठवीतल्या मुला-मुलींच्या आया मुलां बरोबरचा सततचा वाद, त्यांचा उद्धटपणा, अभ्यासातील दुर्लक्ष ह्याबद्दल वारंवार बोलत.

काहीजणी कौतुकाने त्यांचं आरशासमोर उभं राहणं, आंघोळीला लागणारा वेळ, मित्रांबरोबर फोनवरच्या गप्पा याबद्दल सांगत.
ह्यामुळे कुटुंबात होणार्यार कुरबुरी, आयांची चिडचिड प्रत्येकीलाच जाणवत होती.

तिथे आलेल्या एका डॉक्टर मैत्रिणीने एक घटना सांगितली.
‘एक १७-१८ वर्षाचा तरूण दवाखान्यात आला. सर्व पेशंट संपल्यावर आत आला. त्याला माझ्याशी खाजगीत बोलायचं असावं. माझ्याकडे न बघता तोंडाने नखं कुरतडत कसं बसं बोलला, ‘‘मला जगावंसं वाटत नाही.’’ मला एक मिनिट काही कळेना. मी म्हटलं ‘का?’ ‘‘अहो डॉ. माझ्या चेहेर्या वर हे घाणेरडे मुरुम आहेत. मुले मला चिडवतात साबुदाणा वडा म्हणून. आणि माझं नाक तर केवढं मोठ्ठं आहे. त्यामुळे मी कोणालाच आवडत नाही.’’ थोडा वेळ शांततेत गेला. मी म्हटलं, ‘‘काय करतोस सध्या?’’ ‘‘दहावीची परीक्षा देणार होतो पण नाहीच दिली.’’ तेव्हा लक्षात आलं की हा गेली ४/५ वर्ष फक्त परीक्षेला बसायचं म्हणतोय पण बसत नाही. केवळ दिसण्यापायी हा सर्व आत्मविश्वा्स घालवून बसलाय.’’

आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं, की वयात येणार्याव ह्या सर्व मुला-मुलींना समुपदेशनाची गरज आहे.

ह्या वयात होणार्‍या शारीरिक, मानसिक बदलाची माहिती देताना कदाचित पालकांना संकोच वाटेल, म्हणून एखाद्या प्रशिक्षित, त्रयस्थ व्यक्तीने मुला-मुलींना ही माहिती द्यावी.

एकट्या मुलाला/मुलीला सांगण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीच्या काही जणांना एकत्र करून माहिती द्यावी.

मग दुसरी अनोळखी प्रशिक्षित व्यक्ती कशाला? आपल्याच गटाने प्रशिक्षण घेऊन समुपदेशन सुरू करूया, असे अनघाताईंनी सुचवले.

डॉ. विनय व डॉ. संजीवनी कुलकर्णी यांना बोलावून आम्ही १५-१६ जणींनी दोन दिवस प्रशिक्षण घेतले. विषयाचा सखोल अभ्यास केला.

शारीरिक बदलाबरोबर होणारी भावनिक वादळं, ताण-तणाव ह्या सर्वांचा साकल्याने विचार करून कार्यशाळेत घेण्यात येणार्या विषयांची आखणी केली.
आमची कार्यशाळा दोन दिवसांमध्ये आठ सत्रात विभागलेली आहे.

(१) पंचकोश – ‘प्रभावी व्यक्तिमत्त्व’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची संकल्पना म्हणजे ‘पंचकोश’
(२) प्रसार माध्यमे – रोज सकाळी हातात पडणारे वर्तमानपत्र, घरोघरी सतत बघितला जाणारा टीव्ही, केबल, त्यातील कौटुंबिक संघर्ष, स्त्री-पुरुष नातेसंबंध, आलिशान घरे, झटपट मिळणारा पैसा, इंटरनेटवरील अश्लिखल साइटस, व प्रत्यक्षात वास्तवातली स्थिती यातली तफावत मुलांच्या मनाचा गोंधळ उडवते. ह्याकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न कार्यशाळेत होतो.
(३) स्त्री-पुरुष प्रजनन संस्था – रचना व कार्य आकृत्यांद्वारा हा विषय आम्ही मुलांपर्यंत पोचवतो. शरीर स्वच्छता, काळजी, धोके – गुप्तरोग व एड्सची विस्तृत माहिती दिली जाते. मुला-मुलींच्या सर्व शंकांना शास्त्रीय भाषेत उत्तरे दिली जातात.
(४) बाल/किशोर लैंगिक शोषण – प्रसंग नाट्याद्वारे विषयाची सुरवात करून नंतर चर्चा केली जाते. विरोध करण्याचे मार्ग सुचतात व विरोधासाठी लागणारी मानसिक तयारीही होते.
राही, सोफोश, मासूम ह्या सारख्या संस्थांची माहिती दिली जाते. ह्या संस्था शोषित व्यक्तीला आपुलकीने मदत करतात.
(५) सौंदर्य – प्रसारमाध्यमातून तयार झालेले सौंदर्याचे मापदंड, तिथपर्यंत पोचण्यासाठी मुला-मुलींची रस्सीखेच, त्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वारेमाप वापर आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे, बाह्य सौंदर्याबद्दल बोलताना व्यक्तिमत्त्व संपन्न करणार्यास आंतरिक सौंदर्यावर भर दिला जातो.
(६) मैत्री – समलिंगी मैत्री, भिन्नलिंगी मैत्री, व्यक्तिगत मैत्री, गटातली मैत्री, गट मैत्रीचा दबाव, लादलेली मैत्री किंवा एकतर्फी प्रेम. ह्यातून मिळणारा आनंद किंवा मानसिक तणाव प्रसंग नाट्य सादर केले जाते. मुलांना जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. मैत्रीची सुरवातीची निवड चुकली तरी चालेल, पण मैत्री कुठे थांबवायची ते कळले पाहिजे.
(७) व्यसने – व्यसनांची सुरुवात बर्यािच वेळा मैत्री, उत्सुकता, हातात आलेला पैसा आणि आलेले नैराश्य ह्यामुळे होते.
व्यसने करू नका असे भावनिक आवाहन करण्याबरोबरच, व्यसनांमुळे शरीरातील वेगवेगळ्या संस्थांवर होणारे दुष्परिणाम शास्त्रीय भाषेत समजावले जातात.
(८) अ) जन्मसिद्ध, अनुभवसिद्ध गुण – व्यक्तीचा रंग, उंची, बांधा, दिसणे ह्या जन्माने मिळालेल्या गोष्टींसाठी न्यूनगंड किंवा अहंगंड बाळगू नये. अनुभवाने कित्येक गुण अंगीकारून व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो हा विचार मुलांपर्यंत पोचवला जातो.
ब) परस्परपूरकता – मुलगा-मुलगी म्हणून एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा परस्परातील चांगल्या गुणांचा आदर करून काही गुण आपणही घ्यावेत आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाला योग्य तो मान द्यावा.
विविध गुणांची सूची देऊन, त्या गुणांची परस्पर पूरकता मुलांना समजावली जाते.
मोठ्या वयोगटासाठी जोडीदाराची निवड हा विषय चर्चिला जातो.
‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ ह्या कार्यशाळा धडाक्यात सुरू झाल्या. शहरी, ग्रामीण भागातल्या शाळांमधे कार्यशाळा घेऊन सगळ्यांनी बराच अनुभव गोळा केला.
गटात एकत्र वावरताना काहीजणींची चांगलीच मैत्री झाली, काहीजणी मात्र थोड्या अंतरावर राहिल्या. ह्याने गटाच्या कामात अडथळा येईल असे वाटत होते.
शिरीष जोशी ह्या उत्साही समुपदेशकाची गट बांधणीसाठी आम्ही मदत घेतली.

गटामध्ये भिन्न स्वभावाच्या, भिन्न आर्थिक/सामाजिक थरातल्या व्यक्ती एकत्र काम करत असतात. गटातले सर्वजण एकमेकांना आवडले, त्यांची छान मैत्री झाली. (Relationship आहे.) तरीही त्या सर्वांकडे एक ध्येय, प्रेरणा, विचार नसेल तर गट म्हणून प्रगती होत नाही.

पण गटातले सर्वजण एका उद्दिष्टाने, एकत्र आले असतील तर त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री नसली तरी एकत्रित काम करून तो गट ध्येय गाठू शकतो (Relatedness). गटबांधणीसाठी Relationship चांगलीच हवी ह्या अट्टाहासापायी खूप मानसिक ताण येतो.

म्हणूनच कुठलेही सामाजिक काम करताना काही गोष्टी स्वीकारल्या व काही बाजूला टाकल्या तरच सामाजिक कामाबरोबरच स्वविकासही करता येतो. हे आम्हाला उमजलंय.

आता हळूहळू हा विषय रुजतोय. विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांनाच याचं महत्त्व लक्षात यायला लागलंय. ‘संवादिनी’ला येणारी निमंत्रणंही वाढत आहेत. आता हव्या आहेत त्या अशा कार्यशाळेत स्वेच्छेनं, स्वयंसेवी वृत्तीनं वेळ आणि ज्ञान वापरू इच्छिणार्याग अधिकाधिक संवादिनी. त्यासाठी ‘अमुकच शिक्षण हवं’ अशी पूर्व अट नाही. अट आहे ती ‘घेतला वसा न सोडण्याच्या’ निश्चायाची. आपल्या पुढच्या पिढ्यांना सुयोग्य मार्गावर स्वतंत्रपणे चालण्याचं बळ देण्याची! मग नुसता लेख वाचून भागायचं नाही. प्रत्यक्ष ‘कृतिशील’च व्हायला हवं. वाट पाहतोय ‘उमलत्या वयाशी…’ साठीच्या पुढच्या प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत तुमच्या सहभागाची!

(खास टीप : ‘संवादिनी’ हा जरी महिलांचा गट असला तरी या कार्यशाळेत ‘दादा’ ‘काका’ मंडळीही प्रशिक्षक म्हणून येऊ शकतात. विशेषतः मुलांशी संवाद करायला त्यांची खूप गरज भासते.)