(विशीच्या वेशीतून – लेखांक -३) शिक्षण : स्वरमेळ

काही मूलभूत विचार करून सृजन-आनंद विद्यालयाची निर्मिती झाली. त्यांतील महत्त्वाचे विचार समजून घेऊ. शिक्षण व्यवस्थेच्या तटबंदीच्या भक्कम भिंतीमुळे बाह्य जगातील शिक्षणाला आवश्यक असणारा प्रकाश, हवा यांचा भिंतींच्या आत शिरकाव होत नाही. अनेक शाळा चालतात पण बिचारी विद्या प्रवेशासाठी शाळेबाहेर ताटकळत उभी असते! यासाठी काय करायला हवे? तटबंदीला झरोके पाडायला हवेत.

तटबंदी
१) अभ्यासक्रम
२) क्रमिक पुस्तके
३) शिक्षकांचे प्रशिक्षण
४) शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक -शिक्षक-पालक-मुले यांचे लोकशाहीवर आधारित आंतरसंबंध नसणे.
५) ठोकळेबाज परीक्षापद्धती

झरोके
१) अभ्यासक्रमातील विषयांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन मांडणी करणे.
२) विषयवार क्रमिक पुस्तकांतील माहितीचा इयत्तावार विचार करून त्यांची पुर्नमांडणी करणे.
३) क्रमिक पुस्तके ही शिक्षणाचे एकमेव साधन नसल्याने पूरक उपक्रमांचे आयोजन करणे.
४) आवश्यक तेथे क्रमिक पुस्तकांत वेगळ्या माहितीची भर घालणे किंवा पूर्णत: नवीन पाठ लिहिणे.
५) अध्यापनाचा आरसा म्हणजे परीक्षा व प्रश्नपत्रिका, हे लक्षात घेऊन आपल्या अध्यापनतंत्राचे प्रतिबिंब उमटेल अशा प्रश्नपत्रिकांचा वापर करणे.
६) परीक्षांची भयप्रदता कमी करण्यासाठी विविधांगी प्रयत्न करणे.
७) प्रशिक्षित व्यक्तीच शिक्षक म्हणून काम करू शकते याचा अस्वीकार करणे.
८) पालक हा शिक्षणप्रक्रियेतील सक्रिय साथीदार असतो याचे प्रत्यंतर दैनंदिन कामांत असणे.
९) लोकशाहीवर आधारित शालेय संचालनाचा अवलंब करणे.

थोडक्यात काय? पारतंत्र्याच्या काळात शिक्षणातून जणू सृजनशीलतेला हद्दपार केले होते. परंतु
सृजनाशिवाय शिक्षण = निव्वळ माहितीचे ओझे
आनंदाशिवाय शिक्षण = नुसती वेठबिगार
वरील दोन्ही शिवाय शिक्षण = दृष्टीहीन डोळे.

ही नवी समीकरणं रुजवण्याआधी. तटबंदींच्या भिंतीत झरोके पाडायला हवेत. अशा विचारांवर श्रद्धा ठेवून सृजन + आनंद + विद्या + आलय उभे राहिले. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात एवढ्याशा पणतीत थोडेसे तेल, चिमूटभर कापसाची वात पेटती करून ती प्रकाशमय पणती वाहत्या प्रवाहात सोडली जाते, तसेच आपल्याला गेल्या वीस वर्षांत जे समजले ते इतरांपर्यंत पोचवण्याच्या श्रद्धेने काम सुरू झाले. त्यातील थोडे काम इथे पाहू.

थोडे अभ्यासाबद्दल

इयत्ता पहिलीमध्ये एक ते दहा अंक मुलांनी शिकावेत अशी अपेक्षा असते. विविध वस्तू घेऊन एक ते दहा अंक शिकवले जातात. मुले ओळीत उभे राहून अंक म्हणतात. ओळीतला एखादा मुलगा बाजूला जाऊन ‘‘कुठला अंक बाहेर गेला?’’ असे विचारतो. कवितेतूनही एक ते दहा अंकांची ओळख करून देता येईल असा इरादा बाळगून निमाताईंनी कविता केली व त्या कविताबाळाचे पालनपोषणही केले. एक ते दहा अंकांसाठीची त्यांची रचना समजून घेऊ.
जर जर जर जर
भेटले एखादे घर घर घर
प्रश्न विचारीन भाराभर भरभर
शंभर शंभर शंभर.
विचारीन त्याला, ‘‘घरा, रे घरा
तुला काय? अन् तुझ्यात काय?
सांगशील काय झटक्यात?
घर हसते खोऽखोऽखोऽखोऽ
जसा पाऊस धोऽधोऽधोऽधो
छप्परऽ एक, दारं दोऽन,
पायर्याव तीऽन, भिंतीऽऽ चाऽर
समजलं ना याऽर?
खिडक्या पाच, उंबरे सहा
माणसे साऽत, झिपरे कुत्रे धरून आऽठ
माझ्या अंगणी – झाडेऽ नऊ
झाडावर फुले फुलली दहा
जरा फुलांचा वास पहाऽऽ
अहाहा! अहाहा!
क्रमिक पुस्तकातील जे शिकवायचे आहे ते का बरे शिकवायचे? केवळ क्रमिक पुस्तकात आहे म्हणून? अहं. आशयाच्या खोलात शिरल्यावर त्याचे स्वरूपच बदलून जाते आणि तो आशय आपल्याकडून इतर मागण्या करू लागतो. आजूबाजूच्या परिसरातील कोणत्या बाबींचा दुवा इथे जुळू शकेल? तो कोणत्याप्रकारे जुळवता येईल? वृत्तीविकासाच्या दृष्टीने क्रमिक पुस्तकाबाहेरील काही लेखनाचा उपयोग करावा? एखादा पूरक उपक्रम आखून क्रमिक पुस्तकाच्या आशयात आवश्यक वाटणारी भर घालता येईल? मुलांना सरावपाठासाठी वेगवेगळी कोणती कामे सांगता येतील?

साकव आणि गोविंदपूल


इयत्ता चौथीत ‘साकव’ शिकवताना शहर आणि गाव/खेडेगाव यांतील फरक आम्ही शोधले होते. दोन्ही ठिकाणच्या घरांबद्दलही बोललो होतो. ‘घर’ ही प्रत्येक सजीवाची गरज असते अशा अर्थाचे काहीतरी बोलल्यावर मुलांनी पुढील सजीवांची व निर्जीव वस्तूंचीही घरे सरावपाठ करताना शोधली होती.
माणूस – गुहा, झोपडी, मोठे घर, अपार्टमेंट, अंगण असलेले/नसलेले, कौलारू घर इ.
पक्षी – घरटी
मासा, खेकडा – तळे, नदी, समुद्र
घुबड – झाडाची ढोली
कबूतर – वळचण
मधमाशा – पोळे
माकड – झाड
गोगलगाय – तिच्याच अंगावरील शंख
डास – डबकी
उंदीर, साप, ससा – बीळ
मुंगी – वारूळ
उदबत्ती – उदबत्ती खोचता येते अशा वस्तू (मुलांनी वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या.)
ताट – ताटाळे
पुस्तके – कपाट, रॅक
दागिना – डबी
चित्र – फ्रेम.
ही शोधाशोध मुलांचे अनुभवविश्व समृद्ध व्हावे म्हणून होती! ही चर्चा केवळ तो ‘धडा’ ‘पाठ’ करण्यासाठी नव्हती!

चौथीच्या पुस्तकातच ‘गोविंदपूल’ हा उतारा आहे. साकव आणि गोविंदपूल या दोन उतार्यां त असणारे साधर्म्य लक्षात घेतले होते. एवढेच नव्हे तर कोल्हापुरात दिसणार्याव दोन-तीन पुलांच्या रचनेसंबंधी बोलत अलीकडील कामात पूल कसे उभारणार याविषयी एक इंजीनियर असलेले पालक मुलांशी बोलले होते.

चढता-उतरता क्रम ही जणू गणिताची मक्तेदारी ठरावी असे सर्वसाधारण वास्तव सांगते. पण चवी, रंगछटा, भावछटा ह्या सार्यांवचाही चढता उतरता क्रम असतो! तो क्रम सांगणारे शब्द भाषेत असतात. पण नुसतेच शब्द शिकले/शिकवले तर जणू शब्दांचे निर्जीव शरीर मुलांना दिसते. त्या शरीरातील जिवंत अनुभवाचा प्राण त्यात नसतो. म्हणूनच अनुभव आणि शब्द/वाक्य यांची जोड घालायलाच हवी. तिखटजाळ, तिखट, तिखटसर; आंबटढाण, आंबट, आंबटसर – असे शब्द मुलांनी समजून उमजून चपखलपणे वापरायचे असतील तर त्यासाठी ‘अनुभवावीण मान हालवू नको रे!’ हे साखरोबाचे वचन आपण मानायला हवे. जॉन होल्ट यांनी एके ठिकाणी हा विचार फार वेगळ्या प्रकारे मांडला आहे. ते म्हणतात, ‘‘आपण सारेजण एकाच वेळी अनेक जगांत राहात असतो. आपल्या शरीरात असणारे एक जग. शरीराबाहेर असणारे, पण आपल्याला दिसणारे/ जाणवणारे दुसरे जग. याशिवाय ज्याविषयी आपण वाचलेले/ऐकलेले असते, ज्या जगाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव नसतो असे तिसरे जग.’’ ज्या शिक्षकाला तीन जगांची ओळख आहे, त्यांचे महत्त्व समजलेले आहे, ते शिक्षक ‘एकाच वर्गखोलीत बसणार्या मुलांची जगे वेगवेगळी असू शकतात व कोणताही विषय शिकवताना त्या तीनही जगांशी त्याचा संबंध असतो’ असे मानतात. त्यांचे अध्यापन- अभ्यासक्रम, क्रमिक पुस्तके, परीक्षा, शाळाशाळांत लटकणारी गुणवत्तादर्शक यादी, यांच्या भिंती आणि उंबरठे ओलांडून मुलांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना साद घालते. आजूबाजूच्या योग्य अशा विविध संदर्भांनी आपले अध्यापन सृजनशील, आनंददायी, बालककेंद्रित व अर्थपूर्णही करण्याच्या प्रयत्नात ते असतात. काही पालकही असे प्रयत्न करताना दिसतात. असे शिकणार्याि मुलांना तीनही जगांतील अनुभव थोडे थोडे मिळाल्याने ती अधिक समृद्ध होतात.

क्रमिक पुस्तकातील उतार्यां साठी काही प्रश्नमालिका आम्ही वापरल्या होत्या. त्यांचा थोडाफार अभ्यास तुम्ही केलात तर तटबंदीत झरोके पाडायचे झाल्यास अध्यापनाचे व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असायला हवे हे तुमच्या लक्षात येईल. बघू या काही प्रश्नमालिका.

गोविंदपूल – अभ्यास

.
प्रिय मुलांनो, आज मी आजारी असल्याने माझी रजा आहे. तरीपण आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास करण्यासाठी मी काही प्रश्न पाठवीत आहे. मीनलताई ते फळ्यावर लिहितील. तुम्ही ३० मिनीटात त्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहाल?

तुमचे माझ्यावर, शाळेवर व अभ्यास करण्यावर प्रेम असेल तर खूप शांत राहून, अजिबात न बोलता काम कराल. प्रत्येकाने ही ३० मिनिटे स्वतः कसे वागलो हे मला कळवावे.
१) शब्दांचा अर्थ शोधा.
बजावणे, तंतोतंत, मनावर घेणे, धसका घेणे, प्रश्न काढणे, ठणठणीत कोरडा, ठणठणीत तब्येत, अभ्यास मागे राहणे, आईच्या मागे लागणे, मार्ग काढणे, मार्गी लागणे.
२) उत्तरे लिहा.
अ) तुम्हाला पावसाचा धसका वाटतो? कधी? का?
आ) आईची सूचना पाळण्यासाठी गोविंदा काय करीत असे?
इ) पूल बांधण्याची चर्चा ज्या प्रसंगामुळे सुरू झाली तो प्रसंग लिहा.
ई) गावातील लोकांची चर्चा थांबवण्याची दोन प्रमुख कारणे कोणती असतील?
उ) गोविंदाचे म्हणणे वडीलधार्यांीनी मनावर न घेण्याची कारणे कोणकोणती असतील? विचार करून त्या कारणांचा अंदाज करा व लिहा.
ऊ) वडीलधार्यांीच्या वागण्याने गोविंदाच्या काय काय लक्षात आले? लिहा.
ए) पृ.८३ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करा. चित्राचे निरीक्षण करून जे जे समजते ते लिहा.
ऐ) चित्राबद्दल खूप विचार करुन उत्तरे द्यावी लागतील असे तीन प्रश्न लिहा.
३) असे का म्हटले आहे ते लिहा.
अ) छोटासा का होईना.
आ) एक अडचण दूर झाली.
इ) हा प्रश्न गौण आहे.
ई) गुरूजी मुद्दाम पूल पाहायला आले.
४) पुढील वाक्यात काही शब्दांपुढे ‘च’ हे अक्षर लावले आहे. ते कशासाठी हे स्पष्ट करा.
आई, तूच नेहेमी म्हणायचीस ना, की इतरांनाही मदत करावी. त्यातूनच मला ही कल्पना सुचली.
आपला प्रश्न आपणच सोडवायचा.
५) वाक्याचा अर्थ न बदलता ज्या शब्दाखाली रेघ मारली आहे. तो बदलून त्याऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द घालून वाक्य पूर्ण करा.
अ) दोन-चार गावकरी ओढ्याकडेधावले.
आ) जो तो हातचे काम टाकून पूल बघायलायेऊ लागला.
६) पुढील विशेषणे आपल्या वर्गातील कोणत्या विद्यार्थ्याबद्दल वापरणे योग्य ठरेल ते विशेषण त्या मुलाच्या नावापुढे लिहा. समजूतदार, मनमिळावू, आज्ञाधारक, कामसू, कल्पक, धाडसी/साहसी, लोकप्रिय

मला माझ्या आईचा अभिमान वाटतो


१) प्रथम प्रथम मेईला आईच्या नोकरीबद्दल विचारलेले का आवडत नसे?
२) आईच्या नोकरीबद्दल मैत्रिणीने विचारल्यावर मेई का सावध झाली?
३) उत्तर देताना ‘‘जाऊ दे ते’’ असे मेई का म्हणाली?
४) तुम्हाला आई-वडिलांच्या नोकरीबद्दल विचारले तर तुम्ही ‘‘जाऊ दे ते’’ असे म्हणाल? का म्हणणार नाही? का?
५) वेच्यातील पहिल्या परिच्छेदातील प्रसंग/घटना तुमच्या शब्दात लिहा.
६) दुसर्‍यासाी ट्ट्ट्परिच्छेदात मेईच्या आईचे वर्णन आहे. पुस्तकात पाहून ते वर्णन अचूक लिहा.
७) तिसर्याक परिच्छेदात मेईने आईला कोणते प्रश्न विचारले?
८) मेईचे प्रश्न ऐकल्यावर तिच्या आईचे डोळे विस्फारले. भुवया उंचावल्या. मेईकडे तिने नाराजीने पाहिले. असे का झाले?
९) फळवाल्यांनी केलेली गॅओबाईची स्तुती तुमच्या शब्दात लिहा.
१०) चांगल्या विद्यार्थ्याची स्तुती करताना तुम्ही काय म्हणाल ते लिहा.

आणखीही काही वेगळे प्रश्न –

१) मेई आईच्या नोकरीबद्दल तिला काय म्हणाली? ते म्हणताना तिचा स्वर नाराजीचा का असेल?
२) का ते तुमच्या शब्दात लिहा.
अ) मैत्रिणीला उत्तर देताना मेई पुटपुटली.
आ) मैत्रिणीला उत्तर देताना मेई गोंधळली.
इ) खेळाच्या तासाला मेई वर्गातच बसून राहिली.
ई) आईच्या नोकरीसंबंधी उत्तर देण्याची मेईला हिंमतच होत नाही.
उ) तू झाडूवाली का झालीस? हा मेईचा प्रश्न ऐकून आईचे डोळे विस्फारले. भुवया किंचित उंचावल्या. का?
ऊ) स्वत:च्या नोकरीबद्दल आईने मेईला जे सांगितले ते तुमच्या शब्दात सविस्तर लिहा.
४) आईच्या नोकरीसंबंधी मेईचे मत बदलण्यास कोणते तीन प्रसंग कारणीभूत झाले? तीनही प्रसंग सांगून त्यांपैकी एक सविस्तर लिहा.
५) आदर्श झाडूवाली कशी असावी हे तुम्हाला समजले असेल तर लिहा.
६) ‘बे’ अक्षर शब्दामागे येते त्यावेळी त्याचा अर्थ नाही असा होतो – उदाहरणार्थ बेसावध. अशा दहा शब्दांची यादी करा. ‘अ’ अक्षर मागे लागल्यावर नाही असा अर्थ होतो. उदा. – अस्वच्छ. अशा दहा शब्दांची यादी करा.
७) उलट अर्थी शब्द लिहा. रागाने, गेले, जागरूक, भान, चटकन, उदास.
८) खालील वाक्यातील क्रियापदाचे शब्द लिहा व क्रियापदांचे काळ लिहा.
मी इकडंतिकडं पाहिलं. मैत्रिणीनं विचारलं.
आई दिसली. बसून राहिले.
घटना घडली.
हाच काळ असलेली याच वेच्यातली आणखी तीन वाक्ये शोधा व लिहा.
९) पुढील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन तुम्हाला समजलेला फरक तुमच्या भाषेत लिहा.
उद्योजक-नोकर, समाजसेवक-धंदेवाईक.
१०) काय घडले तर तुम्हाला अपमान वाटेल?
११) तुम्हाला ज्याबद्दल अभिमान वाटतो अशा तीन बाबी लिहा.

पोपटपंची


१) ह्या वेच्यात जे प्रसंग आहेत त्यांतून साधू काय शिकला असेल? पोपट काय शिकला असेल?
२) अभय देताना साधू पोपटाशी जे बोलला असेल ते तुमच्या भाषेत लिहा.
३) साधूने पोपटाला शिकवलेल्या बाबी लिहा.
४) तुम्ही कच्ची भाजी खावी म्हणून आम्ही काय प्रयत्न केले?
५) पोपट कसाबसा सुटून आला. त्याला काही अडचणी पार कराव्या लागल्या असतील, अशा अडचणी लिहा.
६) घाबरल्यानंतर आपल्यात कोणते बदल होतात?
७) पोपटाची परीक्षा पाहण्यासाठी साधूंनी कोणती युक्ती केली?
८) जे शिकतो ते केवळ पाठ न करता त्याचा विचार करून उपयोग करावा यासाठी साधूने काय करायला हवे होते?
९) पुस्तकात पाहून वाक्य पूर्ण करा.
साधूंचा….
साधूमहाराजांनी…
साधूंनी…
साधू….
साधूंची…
१०) साधू पोपटाला जंगलात सोडून आले. ह्या वाक्याचा तुला समजलेला अर्थ तुझ्या भाषेत लिही.
११) साधूंना हे ऐकून आनंद झाला.
साधूंना हे पाहून वाईट वाटले.
अशी दोन परस्परविरोधी वाक्ये वेच्यात का आली आहेत?
१२) ‘‘अरे वेड्या’’ असे साधू पोपटाला का म्हणाले?
१३) पुढील शब्दाचा अर्थ लिहा. अर्थ स्पष्ट करण्यासाठी तोच वापरून वाक्य लिहा.
अचानक, सावध, कमाई, उपदेश, चिंता, बचाव, निराश, वचन.
१४) पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा व लिहा.
शिकार्या)च्या तावडीतून सुटून तो साधूंपर्यंत पोचला.
ते त्याची फार काळजी घेऊ लागले.
दिवसभर तो एकच धडा घोकू लागला.
१५)पोपटपंची ह्या वेच्यातील गोष्ट तुमच्या भाषेत कमीतकमी वाक्यात लिहा.
१६) साधूंनी पाच रुपये दिले.
पोपटांच्या दिशेने शिकारी गेला.
पोपट मांडीवर येऊन बसला.
अनुस्वाराचा कसा उपयोग आहे ते लिहा.
१७)पृष्ठ १८ वरील का ते सांगा व शब्दसमूहांचा वापर करणे हे स्वाध्याय सोडवा.

क्रीडादिन


प्रथमपासूनच विद्यालयात काही उपक्रम जवळजवळ दरवर्षी व्हावेत असा विचार होता. उपक्रमाच्या आशयाची नवी अंगे उपांगे शोधणे व त्यांची मांडणी करण्यासाठी विविध साधनांचा अवलंब करणे आवश्यक वाटे. त्यासाठी क्रीडादिनाचा सर्वंकष विचार करून त्याची मांडणी शिक्षक साप्ताहिक सभेत करतात. काही वेळा उलट सुलट बरीच चर्चा होते. मात्र एकदा का क्रीडादिनाचे तपशील मान्य झाले की प्रत्येकजण स्वत:ची जबाबदारी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उचलण्याच्या नादात राहतात.

रूपालीताई, सदादादा खेळाच्या तासाला इयत्तावार प्रॅक्टीस घेऊ लागतात. उदयदादा कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त प्रभावी बोधचिन्ह कसे करता येईल ह्या विचाराने पछाडून जातात. मान्य झालेल्या बोधचिन्हावर आधारित गाणे तयार करण्यात निमाताई गढून जातात. वेगवेगळ्या खेळांचे नियम सहभागी पालकांना समजावून सांगण्यासाठी नियमावली लिहून काढून झेरॉक्स करून घेतली जाते. विद्यालयाचा क्रीडादिन जास्तीत जास्त चांगला करण्याची जबाबदारी विद्यालयातील ताई-दादांवर सामूहिकरित्या असली तरी ज्या त्या व्यक्तीवर असलेली जबाबदारी त्या त्या माणसाने स्वत:च्या विविध क्षमता व साधन संपत्ती उपयोजून पेलायची असते. गाणे तयार करणे = निमाताई, बोधचिन्ह व स्नेहसंमेलनासाठी बॅकड्रॉप = उदयदादा अशी जणू आता समीकरणेच झाली आहेत!

२००१ च्या क्रीडास्पर्धेचे बोधचिन्ह जिराफ ठरले. मधुदादा, नागेशदादा यांनी वर्गावर्गात मुलांना जिराफ रेखाटायला शिकवले. हस्तकलेच्या तासाला कोलाजचा वापर करून जिराफ झाला. कुणी जिराफाची चित्रे,
फोटो वापरून त्या प्राण्याची माहिती मिळवून सुशोभने मांडली उदयदादांनी केलेला भलामोठा जिराफ विद्यालयाच्या व्हरांड्यात क्रीडादिनानंतरही उभा होता. मुलांनी काढलेली जिराफाची चित्रे फुग्याला बांधून क्रीडादिनाच्या दिवशी हवेत सोडली गेली. निमाताईंनी केलेले क्रीडादिनाचे गाणे लक्षात ठेवणे, त्यांनीच लावलेल्या सोप्या पण ठसकेबाज चालीमुळे सहज घडले. तुम्हालासुद्धा आवडेल ते गीत. चला तर वाचू या.
सांगा, सांगा पाहुणेराव.ऽऽ
आलात कुठून? कशासाठी?
काय तुमचे नाव?
सांगा सांगा पाहुणेराव॥

स्नेहसंमेलन

क्रीडादिनाप्रमाणेच स्नेहसंमेलन हाही एक आनंदोत्सव असतो. याबाबतही विद्यालयाचे काही मूलभूत विचार आहेत. त्यांपैकी काही समजून घेऊ. वर्षभराच्या अध्ययन – अध्यापनाचे प्रतिबिंब म्हणजे स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रम. स्वाभाविकच विविध विषयांतर्गत वर्षभरात जे काम झाले त्यांपैकी काही गाण्यांच्या, नाटुकल्यांच्या अगर प्रात्यक्षिकांच्या रूपात रंगमंचावर पेश होतात. आजवर कोणत्याही प्रसिद्ध – अप्रसिद्ध लेखकाचे नाटुकले सादर केले गेले नसले तरी भैरवी या आमच्या विद्यार्थिनीने ग्रहांबद्दलचे लिहिलेले नाटक रंगमंचावर चढले होते. इंग्रजी, विज्ञान, गणित असे विषय शिकवताना ज्या शंका कुशंका विचारल्या जातात, त्यांचे निराकरण ज्या रितीने होते आणि हे सारे होत असताना ज्या गंमती-जमती घडतात त्याबद्दल संवाद लिहिणे, बातमी तयार करणे, कोडी रचणे असे विविध काम झालेले असते. त्यापैकी त्या इयत्तेचे ताई-दादा व मुले त्यांना जे योग्य वाटते ते कधी प्रदर्शनातील तक्ते म्हणून तर कधी रंगमंचावरील कार्यक्रमाचा भाग म्हणून सर्वांसमोर येते. हस्तकलेत मुले जे शिकतात ते इतरांना शिकवावे कसे, ह्याचे प्रात्यक्षिक म्हणून काही वेळा मुलांनी काही पालकांना रंगमंचावर बोलवून त्यांना वेगवेगळ्या सूचना सांगत ते त्यांच्याकडून करवून घेतले होते.

सुहास नावाच्या एका विद्यार्थ्याला घोडा चित्ररूपाने काढण्याचे खूप वेड होते. तो अतिशय कमी वेळात ऐटदार घोडा काढत असे. पहिली दुसरीत असताना घोड्याचे चित्र काढूनच तो त्यावर मराठीचे लेखन किंवा गणिताची मांडणी करीत असे ! सुहास तिसरीत असताना शाहू स्मारक भवनाच्या रंगमंचावर स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम झाले होते. त्या मंचावर इझेल ठेवले हेते. चित्रकार श्री. शि. द. फडणीस हे त्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. रंगमंचावर येऊन सुहासने घोड्याचे चित्र काढणे हा कार्यक्रमाचाच एक भाग होता. ज्या आत्मविश्वासाने आणि सफाईने सुहासने घोडा ‘फेकला’ ते पाहून पाहुणे अचंबित झाले ! कार्यक्रमाचा असाही एक भाग असू शकतो हेही लक्षात घेणे पाहुण्यांना आवडले होते.
घाटातली वाट ही कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. निमाताईंनी कवितेला लावलेल्या बहारदार चालीचे स्वर, रंगमंचावर घाट सूचित करणार्या विविध वस्तू आणि घाटातली वाट सूचित करणारी वेडीवाकडी वळणे घेत पांढर्याधशुभ्र पोषाखात स्केटिंग करत कविता म्हणणारी मुले ह्यांचा जो सुमेळ साधला त्या कल्पकतेचे टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत झाले होते.

व्याकरणासारखा रुक्ष वाटणारा विषयही नाटुकल्याच्या रूपात सादर होतो. ते नाटुकले मराठीच्या शिक्षक म्हणून काम करणार्यास निमाताई लिहितात आणि मुले ते झक्कास सादर करतात. हे सारे पाहणे कार्यक्रमासाठी आलेल्या मंडळींना खूप काही शिकवून जाते. निमाताईंनी लिहिलेले भाषेचे झाड पाहायचे आहे? बघा तर.
(एक मूल बुंध्यासारखे चॉकलेटी रंगाचे कपडे घालून नाचत रंगमंचावर येते. गाणे गाते.)
झाड – मी झाड आहे.
हा हा हा… मी झाड आहे.
मजेमजेचे… झाड आहे…
हो हो हो… मी झाड आहे…
(३/४ मुले येतात. झाडाकडे पाहतात. त्याला चिडवतात)
म्हॅणे मी झाड आहे. – हे हे हे
म्हॅणे मी झाड आहे. – हू हू हू
म्हॅणे मी झाड आहे. – हा हा हा
मुलगा – हलते, बोलते, चालते…
असे झाड कधी असते?
म्हॅणे झाड आहे… हा हा हा ऽ ऽ ऽ
दुसरी मुलगी – ना शेंडा ना बुडखा
ना फुले ना फळे
ना दिसत याला पाने
म्हॅणे झाड आहे… हा हा हा ऽ ऽ ऽ
झाड – ऐका मुलांनो ऐका
मी झाड गमतीचे
मी झाड नवलाचे
मनामनात फुलणारे
झाड जाईचे
मी झाड भाषेचे (२ वेळा)
मी झाड… तू झाड… तुम्ही झाडे… आपण झाडे
(मुले स्वतःकडे आश्चर्याने पाहतात.)
मुलगा – हॅ ! आम्ही नाही झाड बीड
पण तू तरी झाड कसलं?
मुले – कधीही ना ऐकिले, कधीही ना देखिले ऽऽऽ
ऐसे झाड गमतीचे, ऐसे झाड गमतीचे.
झाडोबा झाडोबा
लवकर सांग बाबा
एकेक मूल – तुझी मुळं कुठायत?
खोड कुठाय?
पानं फुलं कुठायत?
(हातात अक्षरे घेऊन काही मुले येतील. स्वर + व्यंजने)
झाड – अरे, थांबा, थांबा, बघा तरी मुळे कशाला फुटतात.
सांगा बरं?
मुले – बियांना.. बियांना
(अक्षरे एका ओळीत उभे राहून पुढील ओळी गातात.)
बिया (अक्षरे) – आम्ही बिया, आम्ही बिया (४ वेळा)
या ग या सयांनो या या या (२ वेळा)
(आत डोकावून पाहतात)
मुले – सया? या कोण बया?
खुणा – आम्ही आहोत खुणा. स्वरांच्या खुणा.
बी – आम्हाला अंकुर फुटले बरं ऽऽ का. पहा, पहा, पहा…
तरी काय झालं तयार?
(डेरेदार झाड छान झुळझुळते. हे लिहिलेल्या वेगवेगळ्या शब्दपट्ट्या हातात धरून मुले येतात.)
बुंधा – झाडाची मुळं क्षार, पाणी घेतात. शोधून पानाकडे पाठवतात. त्याशिवाय पाने अन्न कसे तयार करतील? अक्षरांना खुणांचे अंकुर फुटले आणि शब्द तयार झाले. आता मी ते वाहून नेणार.
मुलं – तू कोण? तू कोण?
बुंधा – मी आहे बुंधा.
शब्दपंढरीचा मी वारकरी
शब्दांना अलगद नेतो फांदीवरी
(शब्दाला म्हणतो…)
बुंधा – अरे ! अरे ! थांब जरा. किती घाई करशील? अजून लहान आहेस तू ! मी कुणाला तरी मदतीला पाठवतो हं ऽऽ
(अक्षरे हळूहळू ताठ उभी राहतील)
बुंधा – कुणी तरी यावे
याचे हात हाती घ्यावे (टिचकी मारून जावे ह्या चालीवर)
बुंधा – तू कोण?
शब्द – मी झाड. म्हणजे भाषेच्या झाडावरचं मी नाम. एखादी वस्तू, पदार्थ, व्यक्ती इत्यादीइत्यादींचे नाव म्हणजेच नाम. नाव म्हणजे बोट नाही बरं. पाण्यातली बोट नव्हे किंवा आपल्या हाताचे बोटही नव्हे.
ह्या नाटुकल्यात सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण असे अनेक प्रकारचे शब्द, वाक्ये तसेच कविता, गद्य पाठ, कोडे, नाटक इत्यादी मुलांनी अनुभवलेले साहित्य प्रकारही भाषेच्या झाडाचे भाग म्हणून येतात. स्वतःची ओळख करून देतात. उदाहरणार्थ
१) अळीमिळी गुपचिळी
मी आहे कोड्याची कळी !
२) संवाद चुरचुरीत
अभिनय खुसखुशीत
ऐका जरा मंडळी
मी आहे नाटकाची कळी !

आपण जे व्याकरण शिकलो तेच पण वेगळ्या रूपात शिकताना, समजून घेताना आणि वर्गातली सगळी मुले मिळून ते सादर करताना सृजनाचा आणि नवे काहीतरी शिकण्याचा आनंद असतो. कुणीतरी लिहिलेल्या व स्वतःला न समजलेल्या ओळींचे पाठांतर करत कार्यक्रम सादर करताना मुलांची ‘शाळा’ होते ! पण असे भाषेचे झाड फुलताना आणि फुलवताना ‘विद्येच्या आलयात’ मुले असतात.

आतापर्यंत ज्या विविध बाबींचा उल्लेख केला त्यांत शिक्षक, पालक, समाजातील निवडक मंडळी व मुले यांचा एकत्रित मेळ असतो. विद्यालयात सेविका म्हणून काम करणार्याए विजयाताईंनी एका स्नेहसंमेलनात विद्यालयाचा वार्षिक अहवाल सफाईदारपणे सादर केला होता. रंग रंग मिसळुनी एक रंग हा जुळे – ह्या उक्तीप्रमाणे विद्यालयाशी संबंधित असणार्या प्रत्येकातील विशेष क्षमतेचा वापर करीत, दैनंदिन अध्यापन व इतर उपक्रमांचा स्वरमेळ जमतो !