माझ्या मुलांचं काय होणार?

तो..त्याचं नाव फेलीक्स डेल व्हॅले-अमेरिकेतल्या एका रेस्तरॉंमध्ये तो काम करायचा. तिथं येणारे आसपासच्या ऑफिसं-दुकानं-कॉलेजातले सगळेजणं फेलीक्सला ओळखत. सदा हसरा. जगन्मित्र माणूस. त्याचं कष्टाचं जीवन त्यानं मोकळ्या हसण्यानं सजवलेलं होतं. तो स्वतः अनाथाश्रमात वाढलेला होता. असं असूनसुद्धा तो सदैव आनंदी हसरेपणानं कष्ट करत आला होता. कष्ट करणार्याधला काही ना काही वाटा दिसतच जातात. कॉलेजमध्ये असताना त्याला बास्केटबॉलचा चॅम्पियन म्हणून शिष्यवृत्तीही मिळालेली होती. तो खेळाडू म्हणून चांगला होताच, शिवाय जीवनही खिलाडूपणानं स्वीकारणारा होता.

त्याचं लग्न झालं, चार मुलं झाली आणि नंतर त्याची बायको, चारी मुलांना त्याच्यावर सोडून आणि त्यालाही सोडून निघून गेली. चारी मुलांचा तो आई आणि बाप बनला. त्यांच्यासाठी शक्य ते सगळं करू लागला. नोकरीत भागतच नसे. मग वेळप्रसंगी अगदी हमालीसुद्धा करावी लागे, तो करत असे. क्याया, जेनेट, फेलीक्स (ज्युनियर) आणि क्रिस्टल ह्या चारी मुलांना आनंदात ठेवण्यासाठी वाटेल ते करायची त्याची मनाची तयारी होती.

लॉरी बर्जेसशी फेलीक्सची तशी तोंडदेखलीच ओळख होती. पण समोर दिसल्यावर एरवी तोंडभरून हसायचा, तसा त्या दिवशी फेलीक्स हसला नाही. तिला थोडा प्रश्नच पडला. एरवी एखादीनं सोडून दिलं असतं, पण लॉरीनं त्याला गाठलं आणि विचारलं.

त्यानं सांगितलं, ते ऐकून लॉरी जागच्या जागी थिजून गेली.

कालच फेलीक्सला डॉक्टरांनी त्याचं भविष्य सांगितलं होतं. त्याला अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस होता. हा म्हणजे स्टीफन हॉकींग्जचा आजार. ह्याचा अर्थ आता त्याच्या हाता पायातली शक्ती कमी कमी होत जाणार होती. आणि अखेर संपणार होती. सामान्यपणे दोन ते पाच वर्षांवर तो जगण्याची शक्यता नव्हती. मुद्दा मरणाचा नव्हता. मृत्यूचं त्याच हसर्याय मुद्रेनं स्वागत करण्याची धमक फेलीक्सकडे होतीच होती. प्रश्न मुलांचा होता. त्यांचं काय होणार? घर मोडेल, मुलं वाट मिळेल तिकडे जातील, त्याच्यासारखंच अनाथाश्रमाचं जीवन त्यांच्या वाट्याला येईल, हे त्याला नको होतं.

लॉरी दिवसभर त्याच विचारात होती. रात्री ती नवर्यालशी हे सगळं बोलली. लॉरीचा नवरा संगीत शिकवायचा आणि फावल्या वेळात एक टूर बस चालवायचा.

ते काही श्रीमंत लोक नव्हते. पण काय करावं, काहीतरी करावं… असं त्यांना वाटलं. डेव्हीड म्हणाला, आपण सगळे आधी त्यांच्यासाठी देवाची प्रार्थना करू.

त्यांच्या तिघा मुलांनाही त्यांनी बोलावलं. त्यांनाही सांगितलं. ‘‘आपल्याला शक्य असतं तर आपण त्या मुलांना आपल्या घरी आणलं असतं नाही?’’ लॉरी म्हणाली. ह्यावरच्या धाकट्याच्या प्रतिप्रश्नानं ती थक्क झाली. धाकटा म्हणाला, ‘‘आपण श्रीमंत नाही, पण म्हणून काय झालं? आपले वडील असेच मरत असते, तर आपल्यासाठी कुणीतरी करावं असं आपल्याला नसतं का वाटलं?’’

लॉरीनं दुसर्या च दिवशी फेलीक्सला गाठलं. त्याला आधी तर ती काय म्हणतेय हेच समजेना. ती त्याच्या मुलांना – सगळ्यांना संभाळायला तयार होती ! तिनं तर त्यांना पाहिलेलं सुद्धा नव्हतं. हे सगळं अशक्य, विलक्षण होतं.
पण, पण, तिनं हे का म्हणून करावं? त्यानं तिलाच विचारलं. मुलं एकत्रच राहायला हवीत म्हणून, त्यांना घर हवंय म्हणून !!

लॉरीच्या ह्या निर्णयाची गोष्ट फेलीक्सच्या हॉटेलमध्ये आणि तिथून अनेकांना समजली.

कसे कोण जाणे, पण लोकही पेटले. अनेक मदतीचे हात पुढं झाले. फेलीक्सच्या मुलांसाठी आणि लॉरीला मोठं घर घेऊन देण्यासाठी पैसे लागणार म्हणून दोन गटांनी पैसे जमा करायला सुरवात केली. फेलीक्स अजून तसा बरा होता. तेवढ्यात कुणाएकानं ह्या सर्वांना आठवडाभर डिस्नेलॅन्डच्या ट्रीपला पाठवलं.

फेलीक्स आणि बर्जेसच्या मुलांची एकमेकांशी गाठ घालून देण्यासाठी एक मेजवानी ठरली. दोन्ही घरातल्या लेकी क्याया आणि जेलीसा एकमेकींच्यात इतक्या गुंगून गेल्या होत्या, जशा जन्मोजन्मीच्या बहिणी ! एकमेकींच्या वेण्या घालूण देणं, नखं रंगवणं आणि सगळ्यांबरोबर खुसूखुसू गप्पा मारणं ! त्यांची दोघींची खोली कशी सजवायची ह्याच्या योजना त्यांनी सुरू केल्या.

छोट्या डेव्हीडनी छोट्या फेलीक्सला फुटबॉल शिकवायला सुरवातच केली. दर आठवड्यात पोरं एकमेकांना भेटायला लागली. मृत्यूसमीप निघालेल्या वडलांच्या बरोबर राहताना थकून जाणार्या त्या कोवळ्या पोरांना बर्जेसचं घर म्हणजे एक दिलासा होता.

२००२च्या एप्रिल – मे मधे, फेलीक्सला चालता येईना, त्याला व्हीलचेअरवर ठेवावं लागलं. आईनं लहान बाळाचं करावं तसं सगळं क्याया त्याचं करायची. त्याला फिरवायची. दाढीसुद्धा करायची. त्याला अजून अन्न गिळता येत होतं. क्याया त्याला भरवायची आणि तो खात नसला तर रागं भरायची. तो निराश असला, तर उलटसुलट कोलांट्या उड्या मारून त्याला हसवायची. त्याच्यानं सही होईना, तेव्हा तिनं त्याची सही स्वतः करून चेकसुद्धा वटवला. छोटा फेलीक्स शांत मुलगा होता. येताजाता बाबाचे पापे घ्यायचे, त्याला मिठ्या मारायच्या आणि हसवायचा.

क्रिस्टलला हे काही अजून कळतही नसे. ती खूपच लहान होती. तिच्यामुळे वडलांच्या मनात आनंद भरून येई. मुद्दा होता तो जेनेटचाच. बंडखोर जेनेट. तिच्या मनात भीती आणि गोंधळाचं काहूर उठत असे. नऊ वर्षांची ती मुलगी स्वतःवर ताबा ठेवू शकत नसे. तिचा सुंदर चेहरा काळवंडून जाई, वेड्यावाकड्या सुरात ती ओरडे, ‘त्यापेक्षा तुम्ही आताच का मरत नाही?’

भविष्याचा ताण असह्य होऊन ती असं करायची, हे फेलीक्सला कळत होतं. तो म्हणायचाच, ‘‘तशी सर्वांचीच काळजी वाटते, पण जेनेटची सर्वात जास्त.’’

२००२मध्ये पितृदिनाला ह्या घरात वेगळंच महत्त्व होतं. तिघी मुलींनी नवे फ्रॉक्स घातले होते आणि त्यांच्या भावानं सूट. मुलांनी वडलांना चाकाच्या खुर्चीनं चर्चमध्ये नेलं. आज मुलांचं दत्तकविधान होणार होतं. मुलांच्या भल्यासाठी जे काही जमेल ते करायचं फेलीक्सनं ठरवलेलंच होतं.

उन्हाळ्याचे दिवस आले, आता फेलीक्स खूपच दमून जाऊ लागला. पाय तर जागचे हलवेनात. हात नकळत हालत तेवढेच हालत. श्वास घ्यायलाही कष्ट व्हायला लागले. फेलीक्सच्या मनात प्रथमच भीतीचे ढग दाटून आले.
जुलैच्या मध्यात, जेनेट पुन्हा अस्वस्थ होऊ लागली. तिचा स्वतःवर ताबा राहीना. आरडा ओरडा, रडारड, फेकाफेकी-असह्य व्हायला लागलं, तेव्हा रडू आवरत फेलीक्सनं क्यायाला समाजकार्यकर्तीला फोन करायला सांगितलं. ‘‘हिला याहून पुढे संभाळणं मला झेपण्यासारखं नाही.’’ तो हुंदके देत म्हणाला, ‘‘तुम्ही तिला घेऊन जा.’’

काही वेळातच गाडी दारात उभी राहिली. जेनेटला बालमनोरुग्णालयात घेऊन गेली.

सप्टेंबर २००२ पर्यंत फेलीक्सला थोडंतरी बोलता येत होतं. डॉक्टरांनी त्याला नाकातून नळी घालून त्यातून अन्न द्यायला सांगितलं. आजार आता छाती-फुफ्फुसापर्यंत पसरला होता.

वीस सप्टेंबरला मुलं शाळेत गेली होती. त्यांना शाळेतून घ्यायला एक सोशलवर्कर गेली. तिच्याबरोबर घरी गेल्यावर तिनं आता त्यांना घराचा, वडलांचा निरोप घ्यायला सांगितलं. मग मुलांना कायमचं बर्जेस घरात आणून सोडलं.
ह्या नव्या घराशी जुळवून घेण्यात पहिले काही आठवडे गेले. सगळंच काही सहज नव्हतं. काहीवेळ स्वतःचं स्थान शोधण्यासाठी कष्ट करावे लागले. बर्जेस – मुलांसाठीही आपलं घर, आपले आईबाप ह्या नव्याच पोरांबरोबर वाटून घ्यायला शिकावं लागलं.

‘‘ही माझी आई आहे – तुझी नाही, समजलं?’’ बर्जेस गटातलं छोटं पिल्लू – क्रिस्टलला म्हणालं. ती लॉरीच्या मांडीवर चढू बघत होती. मोठी मुलं असं काही म्हणत नसत, पण वाटत तर असेलच ना !
क्याया ! तिचं सगळं आयुष्य वडलांच्या आजाराभोवती गुंतलेलं होतं, ते एका क्षणात बदललं. आता चांगला अभ्यास करणं, परीक्षेत मार्क मिळवणं आणि घरकामात थोडी मदत, एवढ्याच अपेक्षा तिच्याकडून उरल्या. सगळ्यात तिला वैताग यायचा, तो बर्जेसच्या घरातल्या ‘न्यायदानाचा’. कुणी मूल चुकलं की सगळ्या घराचं ‘कोर्ट’ बसे, आणि न्यायदान करे.

ह्या सगळ्याच परिस्थितीशी जुळवून घेणं क्यायालाही अवघडच जात होतं. एक दिवस ती कुणाला न सांगता खालच्या मजल्यावर डेव्हीड बर्जेसच्या ऑफिसमध्ये शिरली, आणि डोळ्यांतून आसवं गाळत तिनं तिच्या मनात साठलेले सगळे प्रश्न त्याच्यासमोर ओतले.
‘बाबा गेल्यावर काय होईल?’
‘‘शवपेटी’ असते तरी कशी?’
‘मग शवपेटीत, बाबाचं काय होईल? त्याच्या शरीराचं? जिवाचं?’
डेव्हीड बर्जेसनी सगळा धीर एकवटून तिला मिठीत घेतलं. ‘‘तुझ्या बाबाचा जीव, त्यांचा आत्मा कधीच मरणार नाही. तो नेहमीच तुझ्याअवतीभोवती असेल.’’
जेनेटच्या आजाराचं स्वरूप लक्षात घेऊन तिला मनोरुग्णालयातच ठेवायचं ठरवावं लागलं. तिला तिच्या बहिणभावांसह राहता येणार नाही म्हणून फेलीक्स फार निराश झाला.

१० ऑक्टोबरला फेलीक्स बर्जेस मंडळींच्या नव्या घरी भेट द्यायला गेला. मुलं त्याला मिठी मारायला धडपडली. क्रिस्टलनं तिच्या नव्या स्लिपर्स झळकवल्या. क्याया खुळ्यासारखी नाचायला लागली. फेलीक्सला ते घर स्वप्नातल्यासारखं वाटत होतं. फिकट निळ्या भिंती, उबदार शेकोटी, स्वयंपाकघरातून येणारे खमंग वास…

या उबदार, भरल्या घरात, त्याच्या प्रेमाच्या माणसांमधे फेलीक्स हरवून गेला. ‘माझी मुलं चांगल्या घरात पडली आहेत.’ तो परतीच्या वाटेवर मित्राला म्हणाला. पण जेनेटचं काय? मार्चमधे फेलीक्सला अनाथाश्रमात हलवावं लागलं. फेलीक्सच्या मनात अजूनही जेनेटबद्दलची आशा तेवती होती, ‘ती थोड्याच दिवसांनी परत तिच्या भावंडांबरोबर राहायला येईल.’ पण तिच्यासाठी काम करणार्याह नर्सेसना माहीत होतं की अशा गडबडीच्या घरात तिला राहणं अशक्य आहे. ती हट्ट करायची, नखरे – आरडाओरडा – पळून जाणं हेच चालू राहायचं.

नंतर दुसरं एक आश्चर्य घडलं. आन्द्रे गे या बेचाळीस वर्षांच्या आईनं जेनेटला दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली. फेलीक्स आणि त्याच्या मुलांबद्दल कळल्यावर ती भेटून गेली होती. ती जेनेटच्या प्रेमात पडली. ‘‘जेनेट माझ्यासारखीच आहे. वरून अगदी कणखर पण आतून प्रेमळ, भावनाशील आणि हळवी.’’ आन्द्रेचं घर या बर्जेस मंडळींच्या जवळच होतं. तिनं जेनेटला भावंडांच्या संपर्कात ठेवण्याचं वचन दिलं.
फेलीक्सला वाटत होतं – देवालाच जास्त काळजी असते.

क्रिस्टलच्या सातव्या वाढदिवशी ते सगळे भेटले. २ जून २००३. फेलीक्स अगदी सुकून गेला होता. हातापायाच्या काड्या, गाल आत गेलेले, बोलणंही अशक्य झालं होतं. तरी त्याचा खोडकर स्वभाव अजून दिसत होता. त्याला केक भरवणार्याा हातांना चावण्याचा अभिनय तो करत होता.

आठवड्याभरातच त्यानं मृत्यूला कवटाळलं. अंतिम संस्काराच्या वेळी लोक भावनावश झाले होते. एका सामान्य माणसानं त्याच्या जवळचं सर्वस्व पणाला लावून त्याच्या कुटुंबासाठी जे केलं ते एखाद्या वीराला साजेसं होतं. मुलं धीरानं उभी होती. क्यायानं डेव्हीडचा हात धरला होता. क्रिस्टल लोरीला चिकटलेली आणि लहानगा फेलीक्स ज्युनियर त्याच्या भावाचा हात धरून. जेनेट तिच्या नव्या आईबरोबर येऊन भावंडांमधेच उभी होती.
क्याया, जेनेटनं शवपेटिकेवर फुलं वाहिली. फेलीक्सनं एक बेसबॉल कॅप, क्रिस्टलनं तिचा लाडका टेडीबेअर. सर्वांनी फेलीक्सचा निरोप घेतला आणि त्यानं शोधलेल्या त्यांच्या नव्या कुटुंबात ते राहायला गेले.