संवादकीय – ऑगस्ट २००६

मध्यंतरी एका मैत्रिणीशी थोडंसं भांडणच झालं. एरवी ही इथं मांडण्याची गोष्ट नाही पण विषय सर्वांना माहीत असलेला असा आहे, म्हणून संवादासाठी समोर ठेवत आहे.

विंदा करंदीकरांच्या लेखनाच्या आम्ही चाहत्या आहोत. रविंद्रनाथ टागोर म्हणतात की शिक्षण म्हणजे मनात तरंग उठणं. विंदांच्या लेखनानं असं अनेकदा झालंय, आणि आम्ही दोघींनी ते एकमेकींना सांगितलंय. विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर माझ्या मैत्रिणीला अक्षरशः ‘गगनात न मावणारा’ आनंद झाला. तशी काही माझी प्रतिक्रिया नव्हती. म्हणून तर आमचं भांडण झालं. ‘इतक्या सुंदर घटनेचा तुला आनंद कसा होत नाही, आपली मान ह्यानं उंचावते असं कसं वाटत नाही?’ असा तिचा कळकळीचा प्रश्न होता.

मला वाटलं, ज्ञानपीठ मिळाल्यानं काही विंदा करंदीकरांचं लेखन उत्तम ठरत नाही. किंवा आजवर ते मिळालेलं नसतानाही मला ते उच्च दर्जाचंच वाटलं होतं, ह्या माझ्या वाटण्यात आता ज्ञानपीठाचाही आवाज मिसळला गेल्यानं तसा काही फरक पडत नाही.

कदाचित ‘अरे, खरंच आपली अभिरुची उत्तम आहे हं, ज्ञानपीठ निवडसमितीलाही आपल्यागतच वाटलंय,’ असा आधार वाटू शकेल, पण तो मुळीच घेऊ नये, कारण माझ्या अभिरुचीचं मोल ठरवण्याचं कामच ‘ज्ञानपीठ’ देणार्यांयचं नाही.
उद्या आमचं दुमत झालं तर मी माझ्या आवडीनिवडी, अभिरुचीला गैर किंवा योग्य ठरवून घेण्याचंही काही कारण नाही.
मग ह्या पुरस्कारांचा किंवा पुस्तक परीक्षण, चर्चा, महोत्सवांचा उपयोग तरी काय असतो?

खरं म्हणजे अशा कार्यक्रम अथवा लिखाणांमधून त्या साहित्य अथवा कलाकृतीबद्दलचे विचार-मतं मांडली जातात. त्याचा उपयोग फक्त श्रोत्यांना, वाचकांना, त्या गोष्टीची माहिती नसेल तर करून देण्यासाठी, आस्वादाला प्रवृत्त करण्यासाठी होऊ शकतो. थोडं विस्तारानं मांडते.

मानवी जीवनाचा अर्थ समजावून घेताना ज्या अनंत गोष्टींची आपल्याला मदत होते, त्यात एक विशेष स्थान साहित्य आणि सर्वच कलाकृतींचं असतं. ह्या दृष्टीनं मला एखादी गोष्ट का आवडली, किंवा नावडली हे इतरांना सांगणं आणि त्यांचंही मत ऐकणं ह्यामधून हे आपलं ‘शिक्षण’ अधिक समृद्ध होण्याची शक्यता असते. अशा पुरस्काराच्या निमित्त्यानं हा संवाद अगदी ‘मित्रमैत्रिणी’ गटांमध्येच न राहता भरपूर वाढतो, ही मला वाटतं, ह्या सर्वच गोष्टींची किंवा अशा प्रयत्नांची जमेची बाजू आहे.

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी ‘तेंडुलकर महोत्सव’ झाला. त्या निमित्तानं तेंडुलकरांचं साहित्य आधी वाचलेलंही पुन्हा वाचलं गेलं, त्याबद्दल ऐकलं गेलं. त्यातून माझा माझ्याकडे बघण्याचा, आसमंत समजावून घेण्याचा, सजग राहण्याचा प्रयत्न इतरांच्या सहभागानं अधिक विस्तारला हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यानंतर साप्ताहिक सकाळमध्ये आलेली ‘विजय तेंडुलकरां’ची मुलाखत वाचताना मला ‘तेंडुलकरांच्या साहित्याबद्दल अधिक माहिती मिळाली की नाही,’ हा मुद्दा महत्त्वाचाच नाही. मला जीवनाचा अर्थ कळायला आणखी थोडी मदत झाली, त्याबद्दल मुलाखतकाराचं ऋण वाटलं. हे आभार मानणंच, मी किंवा कुणी, ‘ही मुलाखत मला फार आवडली’ ह्या वाक्यानं व्यक्त करत असतो.
साहित्य, चित्र, शिल्प आदि सर्व कलाकृतीं प्रमाणेच अनेक शोध, सामाजिक कार्य, अगदी साधेसुधे संवाद ह्यांचंही आपल्या ‘शिक्षणात’ साहाय्य असतं. अर्थात हे सर्वच आपण कसं स्वीकारतो ह्यावरच जास्त अवलंबून आहे.

माझ्या परिचितांपैकी काहींना ह्यावेळी ‘पद्मश्री’ मिळाली. मी त्यांचं अभिनंदन केलं तेव्हा, माझ्या लक्षात आलं की हे सर्वचजण म्हणत आहेत, ‘‘बरं! मग?’’ ह्या उत्तरानं आधी दचकायला झालं, मग हसूच आलं. मला आठवण झाली की जेव्हा डॉ. अशोक केळकर सरांना पद्मश्री मिळाली, आणि त्याबद्दल काय वाटलं असं कुणी मुलाखतकारानं विचारलं होतं, तेव्हा तेही म्हणाले होते, ‘‘ह्या निमित्तानं माझ्या म्हणण्याकडे अधिक लक्ष दिलं जाईल.’’
ही माणसं आपला ठेवा आहेत. आपले खरेखुरे गुरू आहेत. ह्या कुणालाच स्वतःला पुरस्कार मिळाल्याचं असं काही विशेष वाटलेलं नाही, कारण त्यांच्या कामांचं महत्त्व त्यांना माहीत आहे. ते पुरस्कार मिळण्यानं वाढत किंवा कमी होतच नाही.

ते ‘बरं’ म्हणतात ते आपल्या अभिनंदनाच्या स्वीकारासाठी आणि मग आपल्यालाच प्रश्न विचारतात. ‘मग?’

हा प्रश्न आपल्याला स्वतःला कसा लावून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं.