बापाचं संशोधन

जून महिन्यात आरती संस्थेच्या डॉ. आ. दि. कर्वे यांना ऍश्डेन पुरस्कार दुसर्यां दा मिळाला. त्याबद्दल जुलैच्या अंकात वाचलं असेल. त्यांची मुलगी प्रियदर्शिनी त्यांच्या संस्थेत – ऍप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्याबरोबर संशोधन करते. वडिलांबद्दल ती लिहिते…

मला अगदी लख्ख आठवतं, की लहान असताना माझ्या दोनच महत्त्वाकांक्षा होत्या. एक म्हणजे सज्ञान झाल्याबरोबर गाडी (चार चाकी) चालवायला शिकायचं आणि शिक्षणात पीएच्. डी. पर्यंत मजल मारून वैज्ञानिक व्हायचं. या दोन्ही महत्त्वाकांक्षांमागे कारण होतं – तेव्हा रोल मॉडेल असलेला माझा बाप, नंदू. प्रत्यक्षात चार चाकीचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर स्वत:हून आत्मविश्वासानं प्रत्यक्ष गाडी चालवायला लागेपर्यंत मध्ये जवळजवळ दहा-बारा वर्ष गेली (आणि अजूनही नंदूइतक्या सफाईनं नाहीच चालवता येत). आणि पीएच्. डी. करूनही रूढार्थानं ज्याला वैज्ञानिक संशोधन म्हणतात, तसं काम मी कधीच केलं नाही.

पालक म्हणून ज्या काही जबाबदार्या् समजल्या जातात त्यातल्या फार थोड्या जबाबदार्याह माझ्या बापानं पार पाडल्या, असंच म्हटलं पाहिजे. मला वाढवण्यातले जे काही खाचखळगे होते त्यातून आई बहुतेकदा एकटीच ठेचकाळली. पण तरीही आज माझं जे काही व्यक्तिमत्त्व आहे ते तसं होण्यात त्याचाही वाटा मोठाच आहे. मात्र त्यात आनुवंशिकता किती, आणि सहवासाचा-निरीक्षणाचा भाग किती, हे निदान मला तरी सांगता येणार नाही.

तसं पाहिलं तर माझ्या डोळ्यासमोरचं लहानपणीचं नंदूचं चित्र काय आहे? आपल्या कामाला तनमनधनाने वाहून घेतलेला, कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडू शकणारा, घरातल्या विविध प्रकारच्या दुरुस्त्या सहजपणे करू शकणारा, प्रचंड शारीरिक कष्टांनीही कधीच न थकणारा.. पण त्याचबरोबर कधी अत्यंत फालतू तर कधी अत्यंत कल्पक अशी गाण्यांची विडंबनं आणि शाब्दिक कोट्या करणारा, कोरून दाढी करणारा, येता जाता आरशापुढे थबकून आपली

छबी न्याहाळणारा, कामात काटेकोर असला तरी घरात आपल्या वस्तू आणि कागदपत्रांचे पसारे घालून आईला वैताग देणारा, कधीतरी घरी असणारा, सहा फूट उंचीचा देखणा आणि दणकट माणूस.

पण पैशापेक्षा आणि हुद्यापेक्षा कामाच्या स्वरूपाला जास्त महत्त्व देण्याची त्याची वृत्ती, एकदा एखादं काम अंगावर घेतलं की त्यात स्वत:ला झोकून देणं, सर्वांपासून काहीसं अंतर राखूनही सर्वांशी सौहार्दानं वागणं, विविध विषयांमध्ये रस घेणं, आपली मतं शांतपणे पण ठामपणे मांडणं, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी माझ्यावर परिणाम झाला आहेच. एक गोष्ट मात्र नक्की – नंदूबरोबर ठिकठिकाणी शेताशिवारांतून आणि प्रयोगशाळांतून फिरून, त्याच्या तेव्हा चालू असलेल्या नव्या वाटा निर्माण करणार्याळ संशोधनाच्या सुरस आणि उत्कंठावर्धक कथा त्याच्याच तोंडून ऐकूनही मला त्याच्या जिव्हाळ्याच्या अशा वनस्पतीशास्त्र किंवा शेतीशास्त्रात कधीच फार रस वाटला नाही.

नंदूला रोल मॉडेल मानण्याच्या टप्प्यातून मी बाहेर पडले आणि लंबकानं एकदम दुसरंच टोक गाठलं. तसं पाहिलं तर शाळेत असताना एकंदरच अभ्यास करणं ही जरी माझ्या दृष्टीनं अपरिहार्य पण फारशी न आवडणारी गोष्ट असली, तरी शिकताना अमुक एक विषय आवडतो, किंवा अमुक एक आवडत नाही, असं नव्हतं. मला वाटतं, कोणताही विषय घेऊन मी पुढचं शिक्षण घेतलं असतं, तरी त्यात तितकंच शैक्षणिक यश मिळवलं असतं. पण साधारण बारावी होण्याच्या सुमाराला नंदूपेक्षा आणि आपल्या इतर नामवंत नातेवाईकांपेक्षाही पूर्णपणे वेगळं काहीतरी करायचं, अशी माझी मनोधारणा झाली होती. या सर्व नामवंतांनी मिळून माझी बर्याापैकी पंचाईतही करून ठेवली होती. मला आवाक्यातल्या वाटणार्या कोणत्याही क्षेत्राचा विचार करावा, तर त्यात कोणत्यातरी कर्वेकुलोत्पन्नानं कर्तृत्व गाजूवन ठेवलेलं आहेच! शेवटी बराच विचार केल्यावर असा एक विषय सापडला – पदार्थविज्ञानाकडे वळले, पण पुढे जाऊन हा माझा भाबडा आशावादच ठरला. कारण पदार्थविज्ञानाच्या वाटेनं जाऊनही मी शेवटी येऊन थांबले ते नंदूनं आपलं आयुष्य ज्या क्षेत्रात ओतलं, त्या लोकोपयोगी उपयोजित विज्ञानाशीच!

मात्र तोपर्यंत रोल मॉडेल ते सर्वस्वी वेगळ्या आयुष्याची आस या टोकांमधे डोललेला माझा लंबक मध्यावर येऊन स्थिरावला होता. म्हणूनच गेले काही वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत, आणि मला वाटतं, खर्याल अर्थानं एकमेकांना ओळखूही लागलो आहोत – बाप आणि मुलगी म्हणूनच नाही, तर दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही. अर्थात एकत्र काम करत असलो, तरी आमचं नेहमीच फार चांगलं जमतं, असं मात्र नाही!

नंदूच्या स्वभावाचा पाया आहे त्याची आत्ममग्न वृत्ती. एका दृष्टीनं हा गुण आहे, तर एका दृष्टीनं अवगुण. सतत त्याच्या डोक्यात नव्यानव्या कल्पना आकार घेत असतात, आणि तो सतत या कल्पनाविलासातच गुंगलेला असतो. संशोधन आणि त्याअनुषंगानं उद्भवणार्या् कामांपुढे त्याला दुसर्याच कशाचंच भान नसतं. त्यानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे नाविन्यपूर्ण काम आजपर्यंत केलं आहे, त्यात या आत्ममग्न वृत्तीचं श्रेय मोठं आहे. पण त्यामुळेच त्याच्याबरोबर संशोधनाचं काम करणं जितकं उत्साहवर्धक तितकंच तणावाचंही आहे. कारण सहकार्यांाना आपण काय आणि कशासाठी करतो आहोत, हे पचनी पडायच्या आतच त्याच्या बुद्धीची झेप कुठल्या कुठे पोचलेली असते. आणि घरगुती समारंभ आणि कार्यक्रमांतच नाही, तर घरातल्या दैनंदिन व्यवहारांतही बरेचदा त्याचा सहभाग केवळ नाईलाजास्तवच असतो.

आज मागे वळून बघताना मला वाटतं, की आम्ही दोघांनीही काही अंशी एकमेकांना घडवलं आहे. नंदूच्याच सुचवण्यावरून मी बर्यानच लहान वयात मराठीतून विज्ञानविषयक लेखन करायला सुरूवात केली (पण लिहायचं कसं, याचे प्राथमिक धडे मात्र मी आईकडे घटवले होते). त्याच्याच सुचवण्यावरून मी बर्यालच लहान वयात माझा स्वत:चा असा स्वतंत्र संसार थाटला (आणि त्यातून मला माझ्या आईच्या व्यवस्थापन कौशल्याचीही महती कळली). आज फार कमी कुटुंबांत आढळणारं असं भावनिक जवळिकीचं नातं माझं आणि आई-नंदूचं आहे, त्यामागे मी त्यांच्याबरोबर एका घरात राहात नाही, आणि तरीही फक्त तेच दोघं माझे सर्वात जवळचे सुहृद आहेत, हे एक महत्त्वाचं कारण आहे.
त्याचबरोबर जैवऊर्जेच्या क्षेत्रात नंदूला रस निर्माण होण्यात माझा महत्त्वाचा वाटा आहे, असं निदान मला तरी वाटतं. बी. एस्सी.च्या तिसर्याा वर्षाला मी या क्षेत्रातला प्रकल्प केला, आणि चूल हा विज्ञानाच्या दृष्टीने किती आव्हानात्मक आणि लोकांच्या आयुष्याशी थेट जोडला गेलेला विषय आहे, याची मला जाणीव झाली. या प्रकल्पाच्या आखणीमध्ये, निरीक्षणांवरून निष्कर्ष काढण्यामध्ये, आणि अहवाल लिहिण्यामध्ये, संशोधन कसं करायचं आणि मांडायचं, याचे प्राथमिक धडे नंदूकडूनच मला मिळाले होते. एमेस्सीसाठीही प्रकल्प करताना अर्थातच मी याच क्षेत्रातला विषय निवडला. पुढे पीएच्.डी.साठीही याच क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा होती, पण ते काही कारणांनी शक्य झालं नाही. मात्र पीएच्.डी. संपवल्यानंतर मी पुन्हा एकदा याच क्षेत्राकडे वळले. उसाच्या पाचटापासून कोळसा तयार करण्याचा संशोधन प्रस्ताव तयार करण्यामागे माझी या विषयात काही काम करण्याची इच्छा होतीच, पण नव्यानेच स्थापन झालेल्या आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणार्या् ऍप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) या आमच्या संस्थेला मिळेल तितक्या आर्थिक मदतीची असलेली गरज हे जास्त मोठं कारण होतं. प्रकल्प संमत होऊन आला, त्याचवेळी मला एका महाविद्यालयात नोकरीही मिळाली. त्यामुळे मग माझ्या आखणीनुसार प्रकल्पाचं काम प्रत्यक्ष करून घेणं हे नंदूच्याच गळ्यात पडलं-माझा बाप म्हणूनच नाही, तर आरती संस्थेचा अध्यक्ष म्हणूनही.

उसाच्या पाचटापासून कांडी कोळसा बनवता येऊ शकतो, हे माझ्या संशोधन प्रकल्पातून दिसलं असलं, तरी त्यावर आधारित असं व्यवहार्य तंत्र बनवण्याचं काम आमच्या सहकार्यांलनी नंदूच्या मार्गदर्शनाखालीच केलं. या कांडी कोळशाचा वापर कार्यक्षमतेने करून स्वयंपाक करण्याचे साधन तयार करण्याची मूळ कल्पना मी मांडली, पण त्यावर आधारित असं सराई स्वयंपाक प्रणाली हे उपकरण आजच्या आकर्षक स्वरूपात येण्यामागे नंदूचीच कल्पकता आहे. पूर्णत: टाकाऊ समजल्या गेलेल्या पाचटापासून कांडी कोळसा, आणि या कांडी कोळशाचा वापर करण्याचं स्वयंपाक साधन या तंत्रांची साखळी विकसित करणे, आणि लोकांपर्यंत ही तंत्रं पोचवणे, या आरतीच्या कामगिरीला २००२ साली आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचं ऍश्डेन पारितोषिक मिळालं. यातल्या तंत्रांचे फायदे आणि संशोधनामागच्या नाविन्यापेक्षा बाप आणि मुलगी यांचा संशोधनात एकत्र सहभाग असणंच प्रसारमाध्यमांतून, मुलाखतींमधून वगैरे सगळीकडे ठळकपणे मांडलं गेलं. तोपर्यंत खरं तर आपण काही वेगळं विशेष करतो आहोत, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कितीतरी मुलं आपल्या वाडवडिलांच्या व्यवसायात सहभागी होतात, तसंच आपलं आहे, असं मी समजून चालले होते. केवळ औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातच नाही तर संशोधनाच्या आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही अशी अनेक उदाहरणं आहेत. पण तरीही लोकांनी त्यावेळी हाच मुद्दा इतक्या प्रकर्षानं का उचलून धरला, याचं आम्हाला दोघांनाही नवल वाटतं.

पण त्यावेळी मला स्वतःला जास्त आश्चर्य वाटलं ते नंदूनं वेळोवेळी या संशोधनात असलेल्या माझ्या सहभागाचा जो साभिमान उल्लेख केला त्याचं ! खरंतर प्रत्यक्ष काम चालू असताना आमचे नेमकं काय करायचं यावरून खटकेच जास्त उडाले होते. नंदूच्या प्रतिभेच्या भरारीपुढे कित्येक इतर संभाव्य पर्याय आम्ही पूर्ण पडताळून न पाहता अर्धवटच सोडून दिले, असा माझा अजूनही आक्षेप आहे ! अर्थात, तसं असेल तर मी स्वतः उभं राहून सर्व काम करून घ्यायला हवं होतं, या नंदूच्या प्रति-आक्षेपावर मात्र माझ्याकडे काही उत्तर नाही !

पुढे २००० साली माझ्या पुढाकारातून आरतीनं सुधारित जैव इंधनं आणि स्वयंपाक साधनं या विषयावर पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषद भरवली, आणि या विषयात देशविदेशात चाललेल्या कामाबद्दल बघून आणि ऐकून आम्ही सारेच प्रभावित झालो. या परिषदेत सहभागी झालेल्या जगभरातल्या संशोधकांचा एक इंटरनेट डिस्कशन ग्रुप आहे. ही परिषद होईपर्यंत या गटातल्या चर्चेत माझा बराच सक्रीय सहभाग होता, पण नंतर नंदूचा सहभाग वाढला. या निमित्तानं त्यानं इंटरनेटचा वापरही आत्मसात केला.

अशा प्रकारे जवळजवळ दहा वर्ष या ना त्या कारणानं माझ्या माध्यमातून जैव ऊर्जेच्या घरगुती वापरातल्या संशोधनाच्या या क्षेत्राशी नंदूचा परिचय होत राहिला, आणि गेल्या काही वर्षापासून त्यानं स्वतःच यात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना लढवायला आणि पडताळून पाहायला सुरुवात केली.

ज्या संशोधनाद्वारे त्यानं आरतीला दुसर्यां दा ऍश्डेन पुरस्काराचा मान मिळवून दिला, आणि जगाचं लक्ष खेचून घेतलं, त्या संशोधनामागची पार्श्वभूमी ही अशी आहे. बायोगॅसवरचं नंदूचं काम म्हणजे जैविक इंधनांपासून ऊर्जा या भौतिक,
रासायनिक वैज्ञानिकांच्या मानल्या जाणार्यास क्षेत्राकडे जीवशास्त्राच्या चष्म्यातून पाहताना चाकोरीबाहेर जाऊन वेगळा विचार करण्याच्या त्याच्या सहजप्रवृत्तीचा परिपाक आहे.

शेण किंवा त्यासारख्या टाकाऊ पदार्थापासून बायोगॅस निर्मिती करणं, ही मुळातच अत्यंत अकार्यक्षम अशी प्रक्रिया आहे. बायोगॅस संयंत्रात चाळीस किलो शेण चाळीस दिवस कुजल्यानंतर एक किलो बायोगॅस तयार होतो. या यंत्रातून जी स्लरी निघते, तिचा खत म्हणून उपयोग होऊ शकतो. नंदूनं बायोगॅसच्या तंत्राकडे शेणाची विल्हेवाट लावण्याचं तंत्र म्हणून न पाहता, एक ऊर्जा निर्मितीचं तंत्र म्हणून पाहिलं. जीवाणूंकडून काम करवून घेऊन काहीतरी उत्पादन मिळवणारे अनेक जैवरासायनिक उद्योग आहेत. त्यांमध्ये जीवाणूंना साखर किंवा पिष्टमय पदार्थ यासारखा पौष्टिक आहार दिला जातो. मग बायोगॅस संयत्रातही असेच पदार्थ घातले तर काय होईल, असा विचार त्यानं केला. इतरांनीही पूर्वी हा विचार केला होता, पण तो झापडबंद बुद्धीनं केला गेल्याने चाळीस किलो शेणाच्या जागी चाळीस किलो उच्च पोषणमूल्य असलेले पदार्थ घालून पाहणे, या पद्धतीनं प्रयोग केले गेले होते. मुळात शेणात पोषणमूल्य कमी म्हणून ते एवढ्या मोठ्या मात्रेत घालावं लागतं. शेणाच्या जागी असे पदार्थ तेवढ्याच प्रचंड मात्रेत घातल्यावर जीवाणूंना अजीर्ण होऊन गॅसची निर्मिती बंद पडत होती. शेणाच्या जोडीला काही उच्च पोषणमूल्य असलेले पदार्थही थोड्या प्रमाणात घातले तर संयंत्राची कार्यक्षमता वाढते, असंही काही संशोधकांनी दाखवलं होतं, पण शेण अजिबात न घालण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली नव्हती. जीवाणूंच्या अन्न पचवून मिथेन निर्मिती करण्याच्या प्रक्रियेची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना योग्य त्या प्रमाणात पोषणमूल्ये मिळतील एवढीच केवळ उच्च पोषणमूल्य असलेल्या पदार्थाची मात्रा संयत्रात घालायला हवी, हे नंदूच्या लक्षात आलं. या दृष्टीनं त्यानं काही प्राथमिक प्रयोग केले, तेव्हा असं दिसलं, की बायोगॅस संयत्रात जर दोन किलो पीठ घातलं, तर एक किलो बायोगॅस केवळ एका दिवसात मिळतो. यातूनच आकाराने लहान आणि वापरायला सोप्या अशा आरती बायोगॅस संयंत्राची निर्मिती झाली.

ग्रामीण भागात जे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यात मिथेनोजेनिक जीवाणूंना पचवता येतील असे अनेक पदार्थ आहेत. उदा. किडकी सडकी फळं, सडक्या भाज्या, अखाद्य तेलाची पेंड, अखाद्य बिया व कंद, खरकटं व शिळं अन्न, इ. आरती बायोगॅस संयंत्रामुळे या पदार्थांनाही आर्थिक मूल्य प्राप्त झाले आहे. घरगुती बायोगॅस संयंत्रासाठी फीडस्टॉक बनवून त्याचा रतीब घालणे असा उत्पन्नाचा एक नवा पर्याय ग्रामीण भागात उभा राहण्याची यातून शक्यता निर्माण झाली आहे. शहरी भागात कचर्यागची विल्हेवाट लावण्याचा आणि एल्पीजीची बचत करण्याचा एक चांगला मार्ग या तंत्रानं दिला आहे.

आणि हे सारं क्रांतीकारी संशोधन माझ्या बापानं केलं आहे.