गोष्ट सांगणं कशासाठी?
प्राथमिक शाळेत गोष्टी सांगितल्या जाणं किती महत्त्वाचं आहे हे अतिशय आग्रहानं, उदाहरणांच्या मदतीनं सांगितलेला डॉ. कृष्णकुमार यांचा लेख आपल्याला आठवत असेल. जानेवारी २००१ च्या पालकनीतीमधे तो छापला होता. या गोष्टी कशा सांगाव्यात, कोणत्या सांगाव्यात, त्यामुळे काय होईल याचं सविस्तर विवेचन या लेखात केलं होतं.
‘What is worth teaching’ ह्या कृष्णकुमारांच्या पुस्तकात, या लेखाचा पुढील भाग – Beyond use वाचायला मिळाला. शाळेत नियमित गोष्टी सांगण्यातून होणार्या फायद्यांच्या पलीकडच्या काही गोष्टी या लेखातून मिळतात.
मुलांना गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे पण आपल्या कथाकथनाच्या परंपरेला एवढ्यानंच पुरेसा न्याय मिळत नाही. प्राथमिक शाळेमधे कथाकथनाचा उपयोग करुन घेणे यापलीकडे या परंपरेमधे दाद देण्यासारखं बरंच काही उरतं.
वैविध्यपूर्ण परंपरांचा वारसा या कथांमधून आपल्यापर्यंत पोचतो हे त्याचं खरं मोल आहे. आधुनिक शिक्षण आणि माध्यमांमधून जी एकच एक जगण्याची पद्धत सतत दाखवली जाते, त्याची वेगळी बाजू दाखवण्यासाठी या कथा आपल्या मदतीला येतील. विविध संस्कृती, त्यातले विविध दृष्टिकोन आणि जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यामधून दिसतात.
कथाकथन ही एक महत्त्वाची मौखिक परंपरा आहे. गोष्टी लक्षात ठेवणं, त्या तोंडाने सांगणं, सांगताना श्रोत्यांना आपल्याबरोबर नेणं यातून एक सौंदर्य आणि आकर्षण निर्माण होतं. अशा व्यापक संदर्भातून कथाकथनाचं महत्त्व ओळखलं पाहिजे. गोष्टी सांगण्याचं कौशल्य आणि तंत्र याबरोबरच त्यामधे मानवी संस्कृतीचा वारसाही असतो. त्या त्या जमातीत जगण्याच्या ओघात मिळालेलं ज्ञान/शहाणपण, त्यांच्या आकांक्षा या लोककथांमधे उतरलेल्या असतात. विविध प्रदेशांमधे, संस्कृतींमधे पूर्वापार ज्या कथा सांगितल्या जातात, त्यावर त्या त्या संस्कृतीचा ठसा असतो. हजारो वर्षानंतरही तो आपण ओळखू शकतो.
कथानक, रचना आणि कथेचा ओघ यावरून भारतीय, युरोपीय किंवा अमेरिकी कथा ओळखता येतात. कथेतल्या व्यक्ती, त्यांचे नातेसंबंध एवढंच नाही तर त्यांचं विश्व, त्यातील आव्हानंही इथे येतात. जगभरातल्या लोककथांमधून एखादी
कथा आपण निवडतो तेव्हा आपणही त्यांच्या मनोविश्वात सहभागी होतो.
अशा पद्धतीने त्या कथेला जन्म देणारी ती संस्कृती आपण आपल्या आयुष्यात आणतो. त्या संस्कृतीत आपण जगू लागतो. फक्त गोष्ट ऐकतो तेवढ्यापुरतं नव्हे. कारण चांगली आणि पुन्हा पुन्हा सांगितलेली गोष्ट बराच काळ स्मरणात राहते.
त्याच समाजाच्या वेगवेगळ्या काळातल्या लोककथांमधील रूपकांचे अर्थ काळानुरूप वेगवेगळे असतात. ज्या काळात न्यायअन्यायाची फारशी चाड नव्हती, बळी तो कान पिळी हीच पद्धत होती, त्या काळामधल्या जिजीविषेचं प्रतिबिंब पंचतंत्रातल्या कथांमधे दिसतं. याउलट आशादायी सामाजिक संबंधांचं चित्रण जातक कथांमधे दिसतं.
या कथांच्या निर्मितीच्या काळात भारतात अंतर्बाह्य सामाजिक राजकीय बदल होत होते असं सकृतदर्शनी दिसतं. या कथांमधे मांडणी केलेलं – सुचवलेलं विश्व अगदी शुद्ध, सरळ, परिवर्तनशील, गतिमान असतं.
दुसरा ठळक फरक म्हणजे पंचतंत्रामधे मानवी भावना आणि दृष्टी हे प्राण्यांचे मुखवटे धारण करतात, तर जातककथांमधे मानव, प्राणी आणि वस्तुमात्र सगळेच सरमिसळ होऊन जातात.
जातकामधे प्रायश्चित/पापाचे फळ या ऐवजी जाणिवेकडे, अनुभूतीकडे निर्देश असतो. कथेमधे चातुर्याला महत्त्व नसते तर त्यातल्या प्रश्नाच्या उत्तराचा मार्ग हा दृष्टिकोनातला बदल किंवा परिवर्तनाची इच्छा यामधून येतो. पंचतंत्रातल्यापेक्षा जातककथांचं नैतिक विश्वच वेगळं आहे. भारतीय परंपरेत दोन्ही प्रकारच्या कथांचा समावेश होतो. जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे पाहण्याचे अगदी वेगवेगळे दृष्टिकोन या लोककथांमधून स्पष्ट दिसतात. भारतीय संस्कृतीमधल्या विविधतेचा हाही एक पुरावा आहे.
कथापरंपरेमधून त्या प्रदेशाचा भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवांचा प्रभाव किंवा परिणाम दृष्टीस पडतो. त्यामुळे कथा ऐकूनच ती कुठली आहे हे कळतं.
हे सगळं बाजूला ठेवलं तरी.. या कथाकथन परंपरेमधून परस्पर संवादाची एक मौखिक पंरपरा दिसते. संवादमाध्यमे म्हणून साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेरलेलं असल्यामुळे आज नैतिकतेचा संस्कृतीशी संबंध उरला नाही याचं आपल्याला आश्चर्यही वाटत नाही. जे लोक आजही मौखिक संवादावरच अवलंबून असतात त्यांची आपण अशिक्षित म्हणून बिनदिक्कत अवहेलना करतो. ते सगळे कमनशिबी, एक प्रकारे अपंग, राष्ट्राच्या विकासातला अडथळा… असंच त्यांच्याकडे पाहिलं जातं. मौखिक संवादपद्धतीचं कौतुक म्हणजे स्वप्नाळूपणा म्हटलं जातं. पण अजूनही जीवनातले असंख्य प्रश्न हे फक्त मौखिक संवादामधूनच सोडवता येतात. गोष्टी ऐकताना आपण मुलाला अशा एका मौखिक संस्कृतीमधे सहभागी करतो. लिखित अक्षरांचा प्रचंड प्रभाव असलेल्या या काळात कथाकथनामधून मौखिक संस्कृतीची ओळख होऊन शैक्षणिक विकासाचा तोल तरी नक्कीच साधला जाईल. मौखिक परंपरेत माणसांमधे थेट, सरळ, तत्क्षणी निर्माण होणारे संबंध/नाती असतात. लोकशाही पद्धतीमधेही हे महत्त्वाचे घटक आहेत.
सार्वत्रिक साक्षरता ही आज समानता आणि लोकशाही याकडे नेणारी गोष्ट वाटते. लिखित साहित्याच्या प्रचंड प्रभावामुळे मौखिक परंपरा खंडित झाली आहे. अपवाद तोंडी गोष्टी सांगितलेल्या गोष्टीचा. सर्व तपशीलासकट गोष्ट जेव्हा आवडीनं परत परत ऐकली जाते तेव्हा त्यातूनच ही संस्कृती पुनरुज्जीवीत होत असते आणि ती आधुनिक लोकशाहीशी विसंगतही नसते. समान पातळीवरचे नातेसंबंध ज्या वातावरणात फुलतील, ते सुद्धा मौखिक परंपरेमधूनच निर्माण होणार आहेत हे लक्षात घ्यावं.