संवादकीय – सप्टेंबर २००६
१९९६ साली पालकनीतीचं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्याच्यातल्या पहिल्या वाक्याची आठवण देते. वाक्य असं होतं, ‘‘आपल्या मुलांमध्ये समजूतदार संवेदनशीलता विकसित व्हावी, स्वतःचं आणि परिसराचं जीवन सुंदर करण्याचा प्रसन्न आत्मविश्वास यावा, ह्यासाठी आपण त्यांना मदत करायची आहे.’’ पालकत्वाचं सरळ साधं, पण तरीही बहुपेडी गुंतागुंतीचं ध्येय. ते आवश्यकही आहे आणि अवघडही. हे ध्येय नेमकं कुणाचं? हा पहिला प्रश्नही ह्यातली गुंतागुंतच दाखवतो. पालक म्हणतात, ‘‘ही इच्छा चांगलीच आहे पण फक्त आम्ही ते कसं करणार? त्याला शिक्षकांचा शिक्षणव्यवस्थेचा, समाजाचा हातभार हवा. आम्ही एकटे काय करणार?’’
शिक्षकांच्या जवळ तर अशाच प्रकारची बरीच कारणं असतात. ‘मुलं पाच-सहा तास शाळेत तर इतर वेळ घरीच असतात. आम्हाला पालकांसारखी एक-दोन मुलांची देखभाल करून पुरत नाही. शाळाभरच्या शेकडो मुलांची जबाबदारी आमच्यावर असते.’ इ.इ.
मुलं वाढवणं हा समाजाचा हेतूच नसतो, तेव्हा ते ह्या जबाबदारीचा विचार टाळण्यासाठीसुद्धा करत नाहीत. आता समाज म्हणजे काही वेगळा नाही. हेच पालक शिक्षक वगैरे मिळून घडलेला आहे पण स्वतःच्या मुलांसाठी, फारतर भावा-बहिणीच्या मुलांपर्यंत पालक असणारे, इतरांसाठी समाजच असतात.
तर, पालकत्वाच्या ह्या आवश्यक ध्येयाचं नेमकं उत्तरदायित्व कुणाचं? हा प्रश्न अनेकवार चर्चेत येतो, आणि कुणीही त्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार नसतं. साहजिकच स्वतः मूल ज्या ठिकाणी परिस्थिती, पालक, शिक्षणव्यवस्था यांना मागं टाकून स्वतः खंबीर होतं, त्या ठिकाणीच हे घडतं. त्यात पालकांची वा इतरांची क्वचित थोडी मदत मिळते किंवा मिळत नाही. मुलानंच ही जबाबदारी मानावी हे सर्वोत्तम आणि टिकाऊ मानलं, तरी अनेक मुलांना हे पूर्णांशानं झेपत नाही. आणि ते वाढीच्या टप्प्यावर स्वाभाविकही मानायला हवं. पण मग पुन्हा प्रश्न उरतोच, की जबाबदारी कुणाची?
ह्याचं निःशंक उत्तर ‘पालकांची’ असंच आहे. शिक्षक आणि समाजानं सहकार्य करावं, पण जबाबदारी घेण्याला त्यांच्याकडे तांत्रिक आणि दृष्टिकोणात्मकही मर्यादा असतात हे मान्य करावं लागतं. पण पालकांना पर्यायही नाही आणि त्यांनी तो मागूही नाही. ह्या पार्श्वभूमीवर पुढं जाऊया.
मुळांत ही जबाबदारी घेणं शक्य असतं का? घ्यायची तर कशी?
मुलाचा विचार प्रथम बाजूला ठेवूया. आपण स्वतः स्वतःसाठी ह्या ध्येयापर्यंत पोचत आहोत का? ह्यासाठी जेव्हा केव्हा आपल्या मनात हा विचार पोचेल त्या वयात प्रथम प्रयत्न करूया आणि ह्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आपल्या आणि इतरही लहानांकडे बघूया.
मुलामुलींचा आणि आपला संवाद असणं, एकमेकांना आपण स्वीकारणं ही त्यांची आणि आपली, प्रत्येकाची शंभर टक्के जबाबदारी आहे. तेव्हा ती पेलण्यासाठी प्रथम आपण तयार व्हायचंय. शिक्षक किंवा समाजातल्या कुणी मुलाला-मुलीला ‘पालकांचं ऐकायला’ सांगण्याची गरज ही पालकांच्या दृष्टीनं घातक अगतिक स्थिती आहे.
शिक्षण व्यवस्थेचे बरेवाईट परिणाम तर मुलावर सरळच होत असतात. त्याकडे आपलं लक्ष हवं. नेमकं काय घडतंय, ते बरं-वाईट कसं आहे? गैर गोष्टी टाळता, थांबवता येतील का? नेहमीच थांबवता येणार नाहीत. समजा जमलं तरी कधी कधी खूप वेळ लागेल हे गृहीतच धरायला हवं. पण त्यात मुला-मुलींना एकटं वाटू देऊ नका. त्यांना बरोबर घ्या. त्यांच्या साथीला रहा.
समजूतदार संवेदनशीलता आणि प्रसन्न आत्मविश्वास मिळणं – मिळवणं ही मोठी प्रक्रिया असते. वास्तविक सामाजिक आणि शिक्षणव्यवस्थेच्या चौकटीत ही काही एका फटक्यात जमणारी गोष्ट नाहीच. त्यात वर-खाली जाण्याची शक्यता असतेच. तेव्हा मुलांचं न ऐकणं, तासंतास बाहेर राहणं, टी.व्ही.-कॉम्प्युटरला चिकटून राहणं, लपवा छपवी करणं, खोटं बोलणं, इ.इ. गोष्टी घडल्या तरीही आता सगळं संपलं, आता आपलं पालकत्व फसलं, असं अजिबात मानायचं नाही. जर आपण आजवर जे वागलो ते मनापासून आणि स्पष्ट स्वच्छ असेल, तर काही काळ आपण हरत आहोत असं वाटलं तरी तसं होणार नाही हा विश्वास बाळगावा.
कोणतीही गोष्ट सर्वांना सारख्याच वेळात शिकता येत नाही. प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागतो.
ही झाली पालकांची बाजू. शिक्षकांच्या बाजूचा विचार ह्या अंकात अनेक तर्हांषनी आलेला आहे. शिक्षकांची ‘भूमिका’ शिक्षणव्यवस्थेचे प्रतिनिधी अशी आहे. पण ध्येय जर पालकत्वाच्या ध्येयाशी मिळतंजुळतं असेल… तर त्यांना ह्या आवश्यक आणि अवघड ध्येयापर्यंत पोचणं पालकांच्या साथीनं साधता येईल.
अर्थात, इच्छा असायला हवी…