शिकवणं कशासाठी?

‘केस’ या सिनेमाबद्दल तुम्ही वाचलंत. आधुनिक इमारत, मोठमोठी मैदाने यांनी या फिल्ममधली शाळा सुसज्ज आहे. वर्गात गर्दी नाही, शिक्षक प्रशिक्षित आहेत. सुविधांच्या बाबतीत कुठेही उणे नाही. तरीही मुख्याध्यापकांना असं जाणवतंय की मुले शाळेचा काहीच उपयोग, फायदा करून घेत नाहीयेत.

मुख्याध्यापकांना प्रकर्षाने वाटतं की लोकशाहीला हातभार लावणारे सुजाण नागरिक शाळेनं तयार करायला हवेत. पण अशी उच्च मूल्य शाळेकडून घेण्याइतकी मुलांची पात्रताच नाही. आत्ताचा काळ, मुलं, त्यांची परिस्थिती सगळ्याचाच हा परिणाम! बरेचसे शिक्षक भावनाशून्य, विक्षिप्त आणि स्वतःला शहाणे समजणारे, त्यामुळे मुलं त्यांचा आत्मविश्वास गमावत आहेत.

आपल्या वास्तवापेक्षा सिनेमातल्या स्थळकाळाचा संदर्भ खूप वेगळा असला तरी मुलं, त्यांच्या गरजा, त्यांचं विश्व आणि शाळेतल्या शिक्षकांचं साध्य (अजेंडा) हे एकमेकांपासून किती फटकून असतं ते यातून दिसतंच. मुलाची भाषा, संस्कृती, आर्थिक परिस्थिती सगळ्यात जमीन अस्मानाचं अंतर आणि शाळेमुळे हे अंतर वाढेल याचीच खात्री!

आता अशा परिस्थितीत शाळेत जाण्यासाठी, शाळेला हवं ते शिकण्यासाठी बक्षीसं, शिक्षांचा वापर करण्याचा उपाय किती विसंगत ठरेल !

शाळेत शिकवून शिकवून शिक्षकाची दृष्टी कशी साचेबद्ध होते ते विनोबांनी सांगितलं आहे. (Thoughts of Education, page 177-178) एक तरुण कार्यकर्ता होण्याच्या इच्छेनं आला त्याला विचारलं, ‘‘तुला काय काम करता येतं?’ तो म्हणाला, ‘‘मला फक्त शिकवता येतं.’’ नंतर त्याला विचारलं, ‘‘सूतकताई, बागकाम, स्वयंपाक असं काही शिकवता येतं का?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘मला काही काम करायला शिकवता येत नाही. फक्त साहित्य शिकवता येतं.’’ तेही साहित्यनिर्मिती नाही तर असलेलं साहित्य शिकणं. इतकंच नाही तर ‘‘आपल्याला कोणतंही काम/कला कौशल्य कधी येणारच नाही,’’ असंही त्याने फुशारकीने संगितलं.
यावर विनोबा म्हणतात, फक्त शिक्षक असणं म्हणजे

१) आयुष्यात उपयुक्त असणार्या, कोणत्याही ज्ञान, कौशल्य, कला यासंबंधी संपूर्ण अज्ञान.
२) नवं काही शिकण्याची क्षमताच नसणं. त्यामुळे हातांनी करण्याच्या सर्व गोष्टींकडे, कारागिरीकडे पाठ फिरवणे.
३) स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणं.
४) पुस्तकातला किडा असणं.
५) आळशी असणं.

एकामागून एक परीक्षा पास होत राहणं हा काही मुलांचा शिकण्यामागचा हेतू नसतो. नवनवीन गोष्टी आपल्या आपण शिकणं, त्यातून एक स्वातंत्र्य मिळवणं, कौशल्यांमधून आत्मनिर्भर होणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं. असं शिकवणं हे शिक्षकांच्या दृष्टीनं फार धाडसाचं आहे. कारण परिचित आणि सुरक्षित अशाच गोष्टींचं प्रशिक्षण ‘शिक्षक’ म्हणून मिळालेलं असतं. मुलांना शिक्षण देणं म्हणजे काही त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवणं किंवा अन्यायाला शरण जायला शिकवणं नव्हे.

मुलांनी शिकलेल्या विविधांगी गोष्टी त्यांना पुढच्या आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी वापरता याव्यात, यासाठी दिलेला तो आधार असायला हवा.

चाकोरीबाहेरच्या शाळेत काम करण्याच्या स्वतःच्या अनुभवावरून माझ्या असं लक्षात आलं की शिक्षक म्हणून आपल्याकडे मुलांच्या गरजांना पुरे पडू अशी साधनं, मार्ग आणि धैर्यही नसतं. (जणू एखाद्या वयोवृद्ध ऍलोपॅथिक डॉक्टरला समोरच्या रोग्याला आता कसं बरं करावं हे समजतं, पण त्यासाठी आवश्यक असणार्याय साधनांचा / उपायांचा विचार करायलाही त्याला उशीर झालेला असतो.) जेव्हा मुलं व्यवस्थेला विरोध करायला लागतात, तेव्हा हे सगळं अपुरेपण शिक्षकाला जाणवायला लागतं. विरोध करणारी मुलं बहुधा प्रत्यक्षात स्वातंत्र्य बहुमोल मानणारी असतात. शाळेबद्दलच्या मध्यमवर्गीय, पुस्तकी कल्पनांच्या मर्यादेबाहेर पडणं खरोखरच कठीण आहे. शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता आणि पाठांतर या पूर्वग्रहामुळे शिक्षकांची मुलांकडे पाहण्याची दृष्टी दूषित असते. (मुलांना काय शिकायचंय/ती काय शिकली आहेत ते त्यांना दिसत नाही.)

शाळा मुलांना स्वयंपूर्ण करण्याऐवजी परावलंबी करतात. किंवा त्यांचा विरोध सिद्ध करण्यासाठी त्यांना आज्ञा मोडायला भाग पाडतात. ८६% मुलं कोणत्या तरी टप्प्यावर अपयश पदरात घेऊन शाळा सोडतात. पास झालेल्या अनेकांना त्यांचं मर्यादित भाषाज्ञान, आणि केलेली घोकंपट्टी याचा उपयोग करण्याचे मार्ग सापडत नाहीत.

‘सर्व मुलांसाठी शिक्षण’ या मोहिमा राबवताना शिक्षणाचा हेतू कोणता, आणि शाळेतून बाहेर पडताना मुलं मिळवतात काय यांकडे सध्या पूर्ण दुर्लक्ष होताना दिसतं. मोठी माणसं जी कौशल्यं वापरताना दिसतात, ती शिकण्यासाठी मुलं नेहमीच उत्सुक असतात. अगदी लहान मुलांचं खेळणं आणि शिकणं तर एकत्र गुंफलेलंच असतं. बागकाम, स्वयंपाक, साफसफाई, पुस्तक वाचणं यांची नक्कल करता करताच (संधी मिळाली तर) मुलं प्रत्यक्ष कामही करायला लागतात. ‘मोठ्या माणसांबरोबर प्रत्यक्ष जगताना शाळेत शिकवल्या जाणार्या गोष्टी वापरायला लागत नाहीत मग त्यांचा काय उपयोग?’ असा विचार मुलं करत असावीत हेच त्यांच्या अभ्यासाच्या कंटाळ्याचं कारण आहे.

मुलाचं जगणं आणि शाळेचे उद्देश यांचा चांगला मिलाफ कसा बरं घडवून आणता येईल? असे मोठे प्रश्न काही एकेकट्या शिक्षकाला सोडवता येणार नाहीत. कारण शाळा आणि घर, मिळवलेली कौशल्यं आणि उपलब्ध काम, मुलाच्या गरजा आणि लाभणार्याक संधी यांमधील तफावत आपल्या शिक्षणसंस्कृतीतील एकसुरीपणा दाखवते. ही एकमार्गी पद्धत शिक्षकांनी यशस्वीपणे राबवावी यासाठीच अभ्यासक्रमाचं केंद्रीकरण, शिक्षकांवर देखरेख, मुलांच्या यशाच्या नोंदी हे सगळं आहे. तरीही, जी व्यवस्था सांस्कृतिक आणि भाषिक वेगळेपणा मुलाच्या क्षमता, आवडी निवडी, लक्षात घेतानाही, बहुसंख्य मुलांना इतक्या कमी संधी देते की मुलं शर्यत सुरू होण्यापूर्वीच हरून बसतात, त्या व्यवस्थेचे अपयश शिक्षकच इतरांपेक्षा अधिक जाणतात.

धोरणं अभ्यासक्रम आणि मूल्यमापनपद्धती बहुधा प्रशासन ठरवते. खरं तर इथे मुलांच्या गरजांची जाणीव असलेल्या संवेदनशील शिक्षकांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे. शिक्षक स्वतः स्वतंत्र विचार करू शकत नसेल तर तो इतरांना स्वावलंबी शिक्षणाकडे कसा नेणार? मुलांच्या विविध गरजा, आवडी, क्षमता आणि शिकण्याच्या पद्धती यांना तो प्रतिसाद कसा देणार?

मुलांना शिकण्याची आस अगदी हृदयातून लागली पाहिजे. शिकण्याला भोवतालच्या जीवनाचा संदर्भ, त्याच्याशी नातं असायला हवं. पहिली ते सातवी नुसतंच पास करून टाकणं, बक्षीसं, प्रमाणपत्र देणं, पैशाचं आमिष दाखवणं या कृत्रिम उपायांनी ती निर्माण करता येत नाही. तसंच शिक्षकांची प्रेरणाही फक्त बढत्या, पगारवाढ यातून ठरत नाही. आपलं शिकवणं मुलांना समजतंय, ते जे शिकताहेत त्याचा त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोग होतो आहे हे त्यांच्यासाठी जास्त प्रेरक आहे.