मुले आणि आपण

मुलांना दिलेला वेळ चांगला कसा याचा एक निकष विचार करताना सापडला की, जे काही होईल ते मुलांच्या आणि आपल्या दोन्ही पक्षी आनंदाचं ठरावं. शक्यतोवर.

मुलं झाली म्हणजे आपल्या जगण्यात काय फरक पडतो?

कॉलेज-शाळेपासूनचे, आणि आजही हवेसे वाटणारे जे मित्रमैत्रिणी होते, त्यांच्याशी होणार्या बोलण्यात-गप्पात-भेटीत अगदी लग्नानंतरही फारसा फरक नव्हता पडलेला! पण जसजशी एकेकाला मुलं झाली तसतशी भेटींची संख्या कमी होत गेली, आणि होणार्या भेटींमधल्या गप्पा, बोलणं हे देखील बदललं. खर्या अर्थानं त्यातला संवाद कमी झाला. मुलं लहान आहेत, तेव्हा हिंडण्या-फिरण्यावर येणार्या साहजिक बंधनांचा हा परिणाम होता, हे सर्वांना मान्य झालं, तरी त्यामुळे होणारी संवादामधली कमतरता दूर करण्याची इच्छा कुणाच्याही बोलण्यातून येत नव्हती. हे असं होणारच हे गृहीत धरायला, स्वतःला शिकवायला सर्वजण तयार होतो. मुलांचा थोडा फार विचार करणारे पालक, म्हणून मुलांना वेळ देणं हे आम्हाला गरजेचं वाटतं. ह्या एकमेव प्रभावी इच्छेचाच तो परिणाम होता.

ही इच्छा योग्य आहेच. ह्याला मदत करणारं आणखी एक वाक्य अनेक ठिकाणाहून अगदी पालकनीतीतसुद्धा उपलब्ध झालं होतं – ‘आपल्या मुलांना आपण किती वेळ देतो, त्याहून कसा देता हे जास्त महत्त्वाचं आहे.’

मुळात आर्थिक गरजा भागवायला दोघांनी नोकरीधंदे करायचे, त्यातून उरून कितीसा वेळ मिळणार मुलांना? कसेबसे सहा-सात तास, त्यातले खाणे, अभ्यास, आजारपणं या अपरिहार्य विषयांवरचा वेळ सोडून, आमच्या व्यक्तिगत आवश्यक गोष्टींवरचा वेळ वजा करून उरलेला वेळ हा मुलांसाठीचा मानायचा. तेव्हा तो कसा द्यायचा हेच महत्त्वाचं.

इथे पहिला प्रश्न आला, कसा म्हणजे नक्की काय? त्यासाठी काही ठरवता येईल का? काही निकष असतील का? आणखी दुसरा प्रश्न दिवसाच्या कामाच्या शेवटी हातात उरलेला सगळा वेळ मुलांना दिला तर, स्वतःच्या गरजांचं काय करायचं?

स्वतःचं काही काम असतं, वाचन असतं, बोलणं असतं, खूप काही असतं. या सगळ्या महत्त्वाच्या, म्हटलं तर टाळता येण्या-जोग्या गोष्टी माझ्यासारखे अनेक पालक अनेक काळ पुढे-पुढे ढकलत असतात, कधीकधी त्या गरजा आहेत, हेच विसरूनही जातात. कधी मग त्याचीही गुंतागुंत बनून जाते. त्यातल्या त्यात मिळणारा वेळ म्हणजे सुट्टीच्या दिवसाचा, ह्याही वेळाचा थोडा प्रश्न असतो. कारण तो कसा घालवावा असाच प्रश्न उभा राहातो. कामाच्या दिवसामध्ये मुलांशी बोलायची, गप्पा मारायची, त्यांना धरून जगायची सवयच सुटल्यासारखी होते, आणि मग, आख्खी दुपार मुलं छळणार याच कल्पनेची भीती वाटायला लागते, हा कितीही नाकारला तरी सार्वत्रिक अनुभवाला येणारा प्रकार आहे.

मुलांना दिलेला वेळ चांगला कसा याचा एक निकष विचार करताना सापडला की, जे काही होईल ते मुलांच्या आणि आपल्या दोन्ही पक्षी आनंदाचं ठरावं. शक्यतोवर.

अर्थात हा पूर्ण निकष नव्हे, त्यासाठी घडणारे प्रसंग निरनिराळ्या पद्धतींनी तपासून, स्वतःच्या घराला योग्य असंही काही ठरवावं लागेल. दुसर्या प्रश्नाचं उत्तर मात्र अवघड आहे, आणि त्याचा पहिल्या प्रश्नाशी फार जवळचा संबंध आहे. या प्रश्नांचे विचार उत्तरं तयार न करता, नुसतंच ‘किती पेक्षा कसा’ म्हणता नाही यायचं आपल्याला.

मिळणार्‍या वेळात मुलांसाठी सगळा भाग देऊन तो दिलेला असतानाच स्वतःच्यासाठी वेळ शिल्लक न ठेवल्याची खंत मनात जर राहाणार असेल तर, तो वेळही दोन्ही पक्षी आनंदाचा म्हणता यायचा नाही, किंवा मुलांना चांगल्या सवयी, सुसंस्कृतता वगैरे कल्पनांमुळे मिळणार्या वेळात आपण त्यांना वेठीला धरलं तर मुलांचं भलं केल्याचं आत्मिक समाधान आपल्याला मिळेल खरं, पण बिचार्या मुलांसाठी काही तो वेळ आनंदाचा जाणार नाही, आणि हे आपल्या निकषांमध्ये बसणार नाही, म्हणून ‘कसा’ या प्रश्नाचं उत्तर अधिक विचारपूर्वक शोधावं लागेल.

इथंही दोन पर्याय असतीलच. पहिला, हे असले प्रश्न-बिश्न मनातसुद्धा न उमटू देणं. असतील तर डोळेझाक करून एक संपूर्ण निर्विवाद मान्यता देऊन आपलं काम संपवणं. दुसरा – हे प्रश्न मनावर घेऊन सतत सलग, त्यांच्याशी लढत राहाणं. मी दुसरा पर्याय स्वीकारला आहे. म्हणूनच माझ्या स्वतःच्या आणि संपर्कात येणार्या मुलांशी वागताना हा विचार मी मनात सदैव जागा ठेवला आहे. याचं कारण मी मुलांचं पालकत्व जाणीवपूर्वक स्वीकारलं आहे, ते मला मान्य आहे. आणि मुलांचं भावनिक-मानसिक कुपोषण टाळण्याच्या प्रयत्नात माझी स्वतःची भूक मारून टाकणंही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे माझ्या सुसह्य जगण्याचाही विचार मुलांच्या निकोप वाढीसोबत व्हावा लागेल.

पालकांवर असा आरोप केला जातो की पालक मुलांना वस्तू पातळीवर वागवतात. उदा. स्वतःच्या अपुर्या आकांक्षा पुरी करायची साधनं, यंत्र इत्यादी. हा आरोप खराच आहे, म्हणून याची जाणीव असणारे पालक तो टाळण्याच्या प्रयत्नात, स्वतःलाच वस्तुस्वरूप मानताना दिसतात. मला हा अविवेकच वाटत आला आहे. एकतर फार काळ असं स्वतःशी वैरत्वानं वागणं झेपणारं नसतंच, कारण मग त्याचा परिणाम म्हणून स्वतःशी कष्टी होऊन, त्याचाही त्रास मुलांना आणि घराच्या शांततेला होण्याचा धोका असतोच.
दुसरं स्वतःच्या ताणतणावांचे परिणाम मुलांपासून लपवून ठेवण्यापेक्षा, त्यांना मूळ कारणच त्या वयांमध्ये त्याच्या प्रमाणात समजलं तर त्याचा तोटा होण्यापेक्षा जगाचा आवाका यायला मदत होईल, आपल्याशीही मुलं अधिक समजुतीनं वागतील नाहीतर, आईवडिलांचे वरिष्ठ असल्याच्या भरात वागणारी मुलंही आजकाल कमी राहिली नाहीत.

या सगळ्या मुद्यांवर विचार करताना त्यांची उत्तरं तयार तर कुठं सापडली नाहीत. एक खरं की ती मी माझी शोधावी, पुन्हा पुन्हा विचार करावा असा उत्साह, थोड्याफार सूचना, नव्या कल्पना पालकनीतीनं दिल्या. तरीही अपुरेपण संपलं नव्हतं. तसं ते आजही पूर्णपणे गेलेलं नव्हे, पण एक वस्तुपाठ मिळाला, तो तुमच्यापर्यंत पोचवते आहे. कदाचित एकाच वाटेवर असू तर मदतीचं वाटेल म्हणून.

गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही मुलांसह एका परिचितांच्या घरी गेलो होतो. परिचित असं आता म्हणतेय, पण थोडासा परिचय घरातल्या पुरुषाशी आम्हा दोघांचा होता.

सुमारे चार तास आम्ही तिथं होतो. यावेळात मुलांशी मोठ्यांशी कसं वागावं याचा धडाच मिळाला. नुसता गिरवायला नव्हे, तर आम्हीही त्याचे भाग बनलो होतो. आम्ही सर्वांनी – मोठे व लहान – गप्पा मारल्या, खेळलो, एकमेकांशी खूप बोललो. मुलं कधी आम्हासोबत, कधी आपली आपण. मुलं म्हणजे सगळी. पण त्या वेळात एकदाही ती आमची – तुमची नव्हती. आम्ही मोठे चौघंही त्यांना एकाच मायेनं वागवत होतो. (मुलांशी गोड बोलणं एवढ्यापुरतं माझं म्हणणं मर्यादित नाही हे वाचकांना कळावं)

आम्ही चौघं खूप बोललो. कधी एकत्र कधी दोघं दोघं. बोलणं इतकं सुंदर झालं की, व्यक्ती, वेळ, विषय आणि समाधान याचं एकमेकांशी प्रमाण सम होतं. तिथून परतताना आम्ही सर्वजण प्रथम आणि नंतर स्वतःशी बोलताना, माझ्या मनात काही गोष्टी आल्या. दिवस अत्यंत आनंदात गेला. पण नुसताच रिकामा आनंद नव्हे तर काम करायची ताकद देणारा तो आनंद होता.
आम्ही खूप मोठ्ठ्या चर्चा केल्या असं नाही. नुसत्या बाष्कळ गप्पा मारल्या असं तर नाहीच. ओळख तशी नवीच होती, त्यामुळे नवेपणाच्या ओळखीच्या गप्पांतून सुरवात झाली. मग मुलं, मुलांची वाढ, मुलांसाठीचं साहित्य, आजूबाजूच्या वातावरणातले ताण, त्यांचे परिणाम, मुलांपुरतं नव्हे, तर त्यांच्या मुळाशी असलेल्या आर्थिक राजकीय धागेदोर्यांचीही जाण त्या बोलण्याला होती.
काय करता येईल, येतं, हे सर्वांत महत्त्वाचं, बोललो. त्यातून मुलांना शिकवताना, मुलांशी बोलताना, मुलांना मोठं करताना, मुलांसाठी मूल होताना त्यात रमून जावं हे शिकलो. ह्या बोलण्याचा एक विशेष होता. आम्ही सर्व चौघं (आणि मुलंही, पण मुलं नेहमीच खरं बोलतात, अगदी बंडला मारतानासुद्धा) खरं बोललो. खरं म्हणजे काय? तर जे बोललो किंवा न बोलता बोललो (Verbal or nonverbal communication) ते जे म्हणायचं होतं तेच. आणि समोरच्यानं तेच ऐकलं हे विशेष.

भावभावना आम्ही दूर सारल्या नव्हत्या पण त्यांचं अवडंबरही नव्हतं, स्वतःची स्तुती किंवा दुःख सांगणं ही तर त्या बोलण्याची रीतच नव्हती.

त्यांच्याकडे मुलांसाठी कौतुकानं आणलेली देशी-विदेशी विविध खेळणी होती. मात्र प्रत्येक खेळणं विचारपूर्वक आणलेलं होतं. मुलांना स्वतः करायला भाग पाडणारी खेळणी, त्यांच्या कल्पकतेला, माहिती-ज्ञान मिळण्याला मदत करणारी. निम्मी खेळणी, त्यांनी स्वतः घरात बनवलेली देखील.

मला वाटलं आजच्या दिवसभरात या पाहुण्याघरी येऊनही मुलांचं ओझं वाटलं नाही किंवा विचित्र वागून मुलांनी खाली माना घालायची वेळही अजिबात आली नाही. माणसं खरं बोलली, सहज बोलली, न लपवता बोलली, न भिता बोलली पण त्यांना वेगळा अभिनिवेश नव्हता. भिणं, लपवणं, खोटेपणा आत नसल्याइतकी चांगली बोलली आणि मुलंही. मुलांशी खेळताना आम्ही रमलेलो होतो. मुलं आमच्यात-एकमेकांच्यात रमली होती.

मला कल्पना नाही, मला हे इतकं सांगावसं वाटतं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचतं किंवा नाही पण, हे इतरत्र, इतर मित्रांशी, नातेवाईकांशी इ.इ. बोलताना जाणवतं की तसं घडत नाही.

इथं मुलांविषयीचा विषय सोडून मोठ्यांच्या संबंधांबद्दल मी खूप बोलतेय हे मला जाणवतं, पण मुलांशी वागताना येणार्या प्रश्नाचं कारण आपली मोठ्यांशी असणारी नाती अनेकदा खोटारडी असतात हे ध्यानी घ्यावं लागेल.

माणसा माणसातलं नातं अगदी घनघोर मैत्री, वगैरे वगैरे असलं नाही, तरीही साधंसुधं, चांगलं असणं दुर्मिळ झालं आहे. अशावेळी मुलं म्हणजे मुळातच, नको नको म्हणावं अशीच पीडा पण मला आता आशा वाटते आहे. खरं बोलणारी थोडी तरी मोठी माणसं आहेत की अजून पृथ्वीतलावर. शिवाय मुलं!

मुलांबद्दलची समज अधिक व्यापक होते आहे, हे माझं मला जाणवलं आहे. प्रश्न सुटले नसले, तरी त्यांची उत्तरं डोळ्यासमोर दिसताहेत, मुलांना वाढवण्यासंदर्भातलं हे एक सुचिन्हच मला वाटतं आहे.