भय इथले संपत नाही… (संवादकीय) – जानेवारी २००७

अनुष्का-सहा वर्षांची चिमुरडी एका लग्नासाठी परगावी येते आणि लग्नाच्या कोलाहलात तिनं मारलेली आर्त किंकाळी कुणाला ऐकूही येत नाही. लग्नघरातल्याच एका खोलीत तिच्यावर बलात्कार होतो. चिमुकली योनी वेडीवाकडी फाटते. नंतर दोनतासांनी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेली लेक उचलून वडील धावत सुटतात, अर्ध्या रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. जवळच्या नात्यातल्याच माणसानं हे केल्याचं एव्हाना कळतं. पण तो माणूस सामाजिक नातेसंबंधांच्या वजनकाट्यावर भारी आहे, त्यामुळे कुणी काही बोलायचं नाही. अनुष्काचे वडील अगतिक हरलेल्या चेहर्यानं डॉक्टरांचे पाय धरत ‘‘कुणाला सांगू नका’’ अशी विनवणी करतात. ‘‘अनू वाचलीय, आम्हाला दुसरं काही नको’’ असं म्हणत गप्प राहतात.
नुकताच घडलेला, ओळखीतला आणि निदान, म्हणून तरी अनेक रात्रींची झोप उडवणारा प्रसंग, न राहवून मी सांगते आहे. पण असे प्रसंग एक का असतात? ह्यापैकी अनेक कायद्याच्या नजरेला पडणार नसतात. बर्याचदा तर ‘असं का केलं?’ असा तळतळीचा प्रश्नही कुणी त्या माणसाला विचारणार नसतं.
अशा गप्प बसण्यामुळेच मग ह्या माणसांचं फावतं. ती निर्ढावतात आणि अपकृत्यांची वाट निर्वेधपणे चालू राहते. तिला खीळ बसतच नाही.
गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटनांचं इतकं झाकोळ तुमच्यामाझ्या मनावर आलेलं आहे. बाहेर आलेल्या ह्या घटना हिमनगाचं पाण्याबाहेर दिसणारं टोक आहेत. त्यामुळेच आपलं मन बधीरही होऊन जातं आणि म्हणूनच एखादा मंत्री सहजपणे म्हणून जातो, ‘ऐसी चीजे तो होतीही रहती हैं | त्यांचं म्हणणं असंवेदनाशील आहे पण खोटं नाही. त्यांना विरोध मात्र झाला तो ते वाक्य केवळ राजकीयदृष्ट्या योग्य नव्हतं इतकाच.
जगात माणसं असतात आणि जिथे माणसं असतात, तिथे संस्कृती उभी राहते. जसजशी संस्कृती वाढते तसतशी कुठेतरी, कधीतरी वैयक्तिक विकृतीही दिसू लागते आणि म्हणून एखाद्या विकृत माणसाचा आजार, ती काही समाजाला लागलेली कीड नाही, ह्या दृष्टीनं अशा अत्याचारांकडे बघावं असं मला वाटत आलेलं होतं. पण आता इथे नोएडा, निठारीत ज्या प्रकारे ओळीवार अत्याचार, खून घडलेत ते पाहता, एकाची विकृती, काहींची हतबलता इतकी कारणमीमांसा इथे पुरेशी दिसतच नाही. ह्यात अनेकजण सामील असणार.
स्टॅम्पस् तयार करायचं सरकारी यंत्र काम करणं सोडल्यावरही संबंधित कंपनीकडे राहून जातं. कुणी मागत नाही, नंतर हरवतं, हे सगळं घरगुती, बालसुलभ इ. प्रकारे चुकून हरवलंच, अशा कारणांनी घडलेलं साधंसुधं असतं का?
मध्यंतरी कॉलेजमध्ये शिकवणारी एक बाई नाहीशी झाल्याची बातमी वाचली. तिला का नष्ट करण्यात आलं, ह्याचं कारण म्हणे हिश्शांबद्दल त्यांच्यात मतभेद झाले. हे पाहताना आपल्याला ह्या घटनांच्या मागे नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचाही विचार करायला हवा असं अपरिहार्यपणे वाटू लागतं.
गेल्या काही वर्षांमध्ये मध्यमवर्गीय माणूस अतिशय वेगानं श्रीमंत होत चाललेला आहे. त्याचे परिणाम गरीब गटांवर आहेतच, पण ते बाजूला ठेवू. मग ह्या पैशांचं काय करायचं? असा फार मोठा प्रश्न उभा राहतो. आपण मिळवतो ना, तर आपल्या मौजमजेसाठी उडवायचे असं साहजिक उत्तर येतं. ह्या उत्तरात आक्षेपार्हही फारसं नाही. पण मजा म्हणजे नेमकं काय? कशानं आनंद मिळतो? आजचे सर्वात आवडीचे विषय आहेत, ओल्याचिंब पार्ट्या आणि अर्धनग्न बायांच्या नाचाचे.
तुम्हाला आठवतं, पार्ट्या, बाया, त्यांचे वर्तमानपत्रातले नग्न-अर्धनग्न फोटो वगैरेंबद्दल झालेल्या एका न्यायालयीन वादंगात, वर्तमानपत्रांनी, ‘‘लहानमुलांवर वाईट परिणाम होण्याचा मुद्दा नाकारताना, प्रौढांनाही स्वतःच्या मनोरंजनाचा हक्क आहे.’’ असं मांडलं होतं. वर्तमानपत्र जे खपतं ते देतात, तेव्हा त्यांचं मत हे समाजाचंच मत मानायचं का?
प्रौढांना स्वतःच्या मनोरंजनाचा हक्क असायलाच पाहिजे ह्यात काही गैर नाही पण मग प्रश्न येतो की, प्रौढांचं मनोरंजन म्हणजे काय? दारू, सेक्स, आणि जुगार इतकंच? ह्यापलिकडे जगात प्रौढांना आकर्षक काहीच वाटत नाही की काय?
एकदा हे ह्याच वाटेनं घरंगळत जायचंय हे ठरलं की, तर्हातर्हांच्या वाढत्या नशा, तर्हातर्हांचे जुगार आणि लैंगिकता ह्या नावाखाली बरबट चिखल, अन्याय, अगदी टोक म्हणजे बालकांवर अत्याचार होणं ही थोडी लांबची असली तरी त्याच रस्त्यावरची ठिकाणं असल्याचं साहजिकच वाटू लागतं.
स्टीफन हॉकिंग्जनी म्हटल्याप्रमाणे पर्यावरणीय विनाशाचं, वैश्विक उष्णतावाढीचं चक्र आता नियंत्रणाबाहेर फिरू लागलेलं आहे. हीच रेघ इकडे पुढे ओढून सामाजिक सुरक्षिततेचं चक्रही तसंच आपल्या हाताबाहेर जात नाहीये ना, ह्याकडे लक्ष द्यायची वेळ आता आलीय.
पालकनीतीच्या गेल्या वीस वर्षांचा आढावा घेताना आपल्याला जाणवलं असेल की, पालकनीतीची सुरवात करताना, ‘सामाजिक असुरक्षिततेशी हतबल समजूतदारीनं जुळवून घेणारी बालकं मनात न संपणारी अस्वस्थता उत्पन्न करतात. त्याला उत्तर शोधण्यासाठी ही आपल्या सर्वांच्या संवादाची वाट आपण तयार केली. पण आजही तीच हतबलता, नैराश्य, अगतिकता, अनुष्काच्या आणि तिच्या आईवडलांच्या डोळ्यात जेव्हा लख्ख दिसते, तेव्हा आपण या संवादात कमी पडतोय असंच वाटतं.
ह्या निराशेला शरण जायचं असं आपण कुणीच कधीच म्हणणार नाही, पण प्रत्यक्षात इतक्या बधिरपणे स्वीकारताना दिसतो आहोत की त्याचीच फार भीती वाटते.