समानतेचा गोंधळ
दुसरी मुलगी झाल्याबरोबर त्यांनी ऑफिसमध्ये मोठ्ठाले पेढे वाटले. पेढे छानच होते. पण ते देतानाची त्यांची पुस्ती मला खटकली. कमालीच्या औदार्याच्या आवेशात ते वरचेवर सांगत राहिले, ‘‘आम्ही मुलगामुलगी असा फरक करीत नाही ना, म्हणून हे पेढे.’’
एवढ्या उच्च वैचारिक भूमिकेची सांगड त्या मुलीला जन्मापासून लाभली असल्याने पुढे तिच्या अंगावर शर्टपॅण्ट दिसणं, तिला कटाक्षाने इंग्रजी माध्यमात शिकवणं हे प्रकार घडलेच. टिळक टँकवर एकदा मी मुलांना पोहायला सोडायला गेले असताना ते आईबाप आणि त्यांच्या त्या दोन मुली दिसल्या. दोघी शर्टपॅण्ट, बॉयकट वगैरे पेहरावात होत्या. धाकटीचे डोळे जरा रडल्यासारखे दिसले तेव्हा त्यासंबंधी बोलणं निघालं. आई चिडून म्हणाली, ‘‘बाहुली घेऊन टँकवर येऊ का म्हणत होती बया! आधी कुंकू बांगड्यांसाठी हट्ट चालला होता. मुलीसाठी बाहुली आणि मुलासाठी विमान, तोफा – बंदुका असलीच खेळणी हवीत का? छे! आम्हाला नाही मान्य.’’ ह्यांना नसेल पण ह्यांच्या मुलीचं काय? तिला खरंच बाहुली बोळकी काही काळ आवडली तर काय बिघडलं? मला कळेना. जरा विचारणार तोच समोरून युक्तिवाद कानी आला, ‘‘आपण भलेही मुलामुलीत फरक करत नसू हो. पण लोक करतात ना? त्याचाच हा परिणाम. मुली आपल्या सवयीनं कुंकू – बांगड्या – बाहुल्या मागतात.’’ असला कुठला सामाजिक दबाव येण्याचंही त्या छोट्या मुलीचं वय नव्हतं असं मला वाटलं. ती बरोबरीच्या चार मुलींकडे जे बघत होती ते मागत होती. तेच तेवढं कटाक्षानं न देणं तरी कितपत बरोबर होतं?
या मुलीच्या मावशीला दोन्ही मुलगेच होते. म्हणजे हिला दोन्ही मावसभाऊच होते. हिची आई आणि मावशी दोघीही त्या उन्हाळ्यात रोज पोहण्याच्या तलावावर मुलांना सोडण्या आणण्याच्या निमित्ताने भेटायच्या. दोघीही उच्चशिक्षित, पुरोगामी, सुजाण पालक इत्यादी होत्या. मुलांच्या वाढीसाठी खरोखरच कष्ट घेणार्या होत्या. तरीही पाण्यामध्ये उंचावरून उडी मारायला मुलगा घाबरला की आई सुनवायची ‘‘त्या नेहाकडे बघ. मुलगी असून किती धीट आहे. नाहीतर तू. एवढा मुलगा असून घाबरतोयस किती?’’ याउलट मुलगी एखाद दिवशी जराही दमली, कुरकुरली तर तिला सुनावलं जायचं, ‘‘एवढ्यात दमून कसं चालेल बेटा? तुला त्या सगळ्या मुलांना हरवायचंय ना?’’
ही हारजीत, चढाओढ, स्पर्धा अशी सारखी फुलवत का ठेवायची? मुळात, नुसत्या मुलीच झाल्याने आपण कुठेतरी पराभूत आहोत असा छुपा गंड असतो म्हणून? त्या पराभवाचं उट्टं मुलींनी काढावं म्हणून?
स्त्रीपुरुष समानता गाठण्यापूर्वी किमानपक्षी ही तुलना, स्पर्धा कुठेतरी विसरायला हवी असं मला नेहेमीच वाटतं. पोहण्याच्या त्या दिवसांमध्ये ते जरा जास्तच जाणवायचं. तरी बरं, अजून शरीरव्यवहारांमधले फरक जाणवण्याची त्या मुलांची वयं नव्हती. नैसर्गिक असमानता जाणवू लागल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होतील?
राहणीसाहणी, आचारविचार, भाषाउच्चार याबाबतीतल्या आवडीनिवडी व्यक्तिगत असतात. त्यांच्यावर सामाजिक दबावही असतात, अगदीच नाही असे नाही. पण हेतुत: काही व्यक्तिगत कल दडपणे हा अधिक मोठा सामाजिक दबाव झाला आणि दबाव हा कुठलाही असला तरी वाईटच. प्रत्येक व्यक्ती अखेरीस स्वयंपूर्ण बनावी. माणसाला गरजेला शिजवून खाता यावं, स्वत:च्या पायांवर उभं राहाता यावं, निर्णयक्षमता – आत्मबल पुरेसं असावं ही आदर्श स्थिती. ती काही मुलींना, काही मुलांना गाठता येईल. ती गाठता येण्यात किंवा न येण्यात बाईपणाचा किंवा पुरुषपणाचा काही वाटा नसतो, नसावा हे मात्र अनेक सुजाण पालक विसरतात. व्यक्तिगत उणिवांचं खापर लिंगसापेक्ष जाणिवांवर फोडतात. त्यादिवशी नाही का, तलावावर आलेल्या मांजराच्या पिल्लाला त्या मुलाने कचकचीत दगड मारला आणि आईने उद्धार केला, ‘‘मारलास ना दगड? काय करणार बाबा. तू शेवटी जातीवरच जाणार. ती नेहा बघ त्याच पिलाला कशी आंजारत्येय… गोंजारत्येय… नाही तर तू…’’
तेही दिवस सरले. आता आमची सार्यांची मुलं दहावी-बारावीच्या चक्रात आली आहेत. त्यावरून बोलणी निघाली असताना पुन्हा गाडी मूळपदावर आली. ‘‘तुमचं ठीक आहे. आमच्या मुलींना डॉक्टर, इंजिनिअर व्हायलाच पाहिजे. आणि त्या होतीलही. शेवटी तेच आमचे मुलगे ना? आम्ही मुली मुलगे फरक न करता त्यांना वाढवलंय ते काय उगाच?’’
‘‘शेवटी तेच आमचे मुलगे’’ असं म्हणणं म्हणजे तर सर्वात मोठा फरक करण्यासारखं झालं. मेल्यानंतर मोक्ष देण्यासाठी, वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असं ते मानत नसतीलही एकवेळ. पण ही प्रगतीची वाट इथवरच खुंटली. मुलीनं मुलासारख्या कर्तबगारीनं म्हातारपणी आधार द्यावा हा छुपा भाव काही मनातून गेला नाही. याउलट मुलगी नसल्याने म्हातारपणी आतड्याची ओढ वाटणारं आपल्याला कोणीच नसेल ही यांच्या बहिणीची खात्री. म्हणजे मुलामुलीतली समानता तर दूरच. पण फार लहान वयापासून यांनी पालक म्हणून मुलामुलींकडे पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच पाहिलं. कृत्रिमपणे त्यांच्यामध्ये साधर्म्य आणायला गेले.
यापेक्षा पारंपरिक लिंगनिष्ठ दृष्टी पत्करली की काय – असा कधीकधी प्रश्न पडतो. तिथे निदान मुलामुलींना आपल्याकडून निश्चित कोणत्या अपेक्षा आहेत हे तरी कळत होतं. बहुसंख्य त्या मान्य करत होते. जे करत नव्हते त्यांना बंड नक्की कशाविरुद्ध करायचं हे तरी स्पष्ट होत होतं. आज बर्याच बाबतीत गोंधळ दिसतो. काय बायकी, काय पुरूषी, काय समाजमान्य, काय समाजविरोधी, काय स्त्री-पुरुष-सुलभ किंवा दुर्लभ हे मुलांना समजत नाही. कारण मुळात आईबापांनाही ते तितकंसं नीट कळलेलं नसतं. यामुळे ती आपल्या अंतप्रेरणेलाही ठोकरतात आणि त्यांच्यासमोर ठेवलेल्या उद्दिष्टांनाही ठोकरतात. मुलगामुलगी समानतेविषयी विचार करताना असं खूप काही जाणवतं. पण बोलण्याची हिम्मत होत नाही. कारण स्वानुभव! मलाही एक मुलगा, एक मुलगी आहे. मीही हेतुत: त्यांच्यामध्ये कधीही भेदभाव केलेला नाही. आपापल्या गतीनं त्यांना विनाव्यत्यय जाऊ दिलंय.
तरीही अलीकडे मुलगी जाणती झाल्यापासून तिच्या – वेळे अवेळेविषयी मी जागरूक असते हे सत्य आहे. तिच्या भावाच्या घराबाहेर राहाण्याविषयी तुलनेनं बेदरकार असते हेही सत्य आहे. तिच्याविषयी अविश्वास नाही; बाह्य जगाविषयी खात्रीही नाही त्याला काय करू? तिच्या भल्यासाठी का होईना पण हा एक भेदभाव मनात येऊ लागलाय त्यामागची खरी कारणमीमांसा तिला कळत नाही. तर एखाद्या दिवशी थोडं लाडानं, थोडं तक्रारीनं ती म्हणते, ‘‘तुला वाटत असेल नाही आईऽ दादाला बोलून उपयोगी नाही. शेवटी तोच तुझ्याजवळ राहणार. मी कुठेतरी लांब असेन. मला बोललं तर कुठे बिघडलं?…’’ मी कर्माला हात लावते. मुलगामुलगी समानतेच्या या गोंधळावर बोलणार काय कपाळ?