घर सर्वांचं
मुलं लहानाची मोठी होत असतात त्या सुरुवातीच्या काळात मुलं आणि पालक यांच्यातले संबंध खूपसे एकेरी स्वरूपाचे असतात. पालकांनी सूचना द्यायच्या, त्या मुलांनी ऐकायच्या; पालकांनी नियम करायचे ते मुलांनी पाळायचे. हा सगळा प्रवास एका बाजूचाच असतो. मुलांनी आईवडिलांचं ऐकलं नाही, नियमांचं पालन केलं नाही तर वेगवेगळ्या प्रमाणात शिक्षा दिल्या जातात. चांगलं वागल्याबद्दल, काही विशेष करून दाखवल्याबद्दल कौतुक होतं. बक्षिसं दिली जातात. पण या सर्वामध्ये परस्परसंबंध अशी काही स्थिती अस्तित्वात नसते.
मुलं १३-१४ वर्षाची झाली की मात्र थोड्याफार प्रमाणावर संघर्षाची चुणूक दिसायला लागते. खूपशा नियमांच्या बाबतीत का, कशाला असे प्रश्न उपस्थित होऊ लागतात. यातून निर्माण होणार्या संघर्षाचे स्वरूप घरोघरी वेगळं असू शकतं. आईवडिलांचा मूळ स्वभाव रागीट, हट्टी असा असेल तर या संघर्षाचं स्वरूप अधिक तीव्र होतं. मुलांच्यावर नवे निर्बंध लादले जातात; नियमांचं पालन केले नाही म्हणून आरडाओरडी, कधी मारझोडही होते. सौम्य स्वभावाचे आईवडील या संघर्षामुळे बावचळून जातात आणि आजकाल मुलं आपलं ऐकत नाहीत म्हणून हताश होऊन बसतात.
बरेच वेळा अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आईवडील माझ्याकडे येतात. सूर रागीट असला किंवा हताश असला तरी तक्रार जवळपास सारखीच असते. मुलं मोठी व्हायला लागलेली असतात. आणि आईवडिलांचं ऐकत नसतात. अशा संघर्षाचं वेळीच निराकरण केलं नाही तर आईवडील आणि मुलं यांच्यातले संबंध दुरावण्याची दाट शक्यताच नव्हे तर निश्चिती असते.
इथे एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करायला हवा. कौटुंबिक संबंधांमध्ये पती-पत्नी यांच्यांतले परस्पर संबंध आणि वडील-मुले आणि आई-मुले असे स्वतंत्रपणे असणारे संबंध हेही निर्णायकपणे पालक-पाल्य संबंधांवर परिणाम करत असतात. आईवडील एकमेकांशी वागताना परंपरागत चौकटीत राहून पुरुषप्रधान संस्कृती जपत राहतात की खर्या अर्थानं समानता जोपासत एकमेकांशी संवाद साधून असतात यातून मुलांच्या मानसिकतेवर वेगवेगळे परिणाम होत असतात. त्याचबरोबर परंपरागत चौकटीतही एक संयत समजुतदारपणा आणि त्यातून निर्माण होणारा शांत लयकारी सुखसंवाद दिसू शकतो किंवा समानतेच्या आग्रहातून सतत संघर्षाचं वातावरण दिसू शकतं. अर्थात पती-पत्नी परस्पर संबंध या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे आणि केव्हाही अनेक पातळ्यांवर स्वतंत्रपणे विचार करण्याचा तो विषय असल्यामुळे त्याचं महत्त्व फक्त अधोरेखित करूनच पालक-पाल्य संबंधांकडे वळतो.
पालक-पाल्य संबंधातला आणखी एक सर्वसामान्यपणे दिसणारा प्रकार म्हणजे आईवडील आणि मुलं यांच्यामध्ये आई-मुलं, वडील-मुलं असे संबंध प्रस्थापित होतात. बहुतेकवेळा हे संबंध पूरक असत नाहीत तर विरुद्ध दिशांनी जाणारे असल्यामुळे एकंदर ताणतणावाची परिस्थिती निर्माण करत असतात. खरं तर असे स्वतंत्र पातळ्यांवर संबंध प्रस्थापित होतात याचा अर्थ पती-पत्नी संबंध तितकेसे नीट नसतात असाच असतो. पण तो विषय बाजूला ठेवून या संबंधांकडे पाहाणे आवश्यक आहे.
आधी आपण पाहिलंच की आपण आपल्या मुलांशी संबंध ठेवतो ते एकेरी मार्गाचे असतात. हुकुमशाही पद्धतीचे असतात. आणि सर्वात वाईट म्हणजे मुलांना काही कळत नाही अशा गृहीतावर आधारलेले असतात आणि त्यातूनच संघर्षाच्या ठिणग्या निर्माण होतात. यावर मार्ग काढायचा असेल, पालक-पाल्य संबंध संघर्षविरहित करायचे असतील, तर दोन पातळ्यांवर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत.
पहिली गोष्ट म्हणजे मुलं वाढत असताना ‘‘असं कर’’, ‘‘असं करू नकोस’ असा फक्त सूचनांचा सुकाळ असतो, त्याशिवाय इतरही संवाद त्यांच्याशी झाला पाहिजे. याच्यावरचा साधा उपाय म्हणजे पालकांनी एक महिना स्वतःचं निरिक्षण करावं. आपण दिवसभरात सूचनावजा वाक्य किती बोलतो याचा हिशेब काढावा. त्याच्या किमान पाचपट तरी वाक्य आपण मुलांशी संभाषण, माहिती देणे-घेणे यासाठी वापरायची असा नियम केला पाहिजे. यातून एक गोष्ट साधते ती म्हणजे आईवडिल आपल्याला सारखे ओरडतच असतात ही मुलांच्या मनातली भावना हळूहळू कमी व्हायला लागते.
याशिवाय जे नियम आपण मुलांना लावतो त्यांचं आपण स्वतः किती पालन करतो याचं एकदा निरीक्षण केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं तर खूप घरात मुलांनी आपली ताट वाटी उचलून ठेवावी असा नियम केलेला असतो. पण बरेच वेळा तो फक्त मुलांसाठीच असतो. वडील मात्र ‘कर्तापुरुष’ या अधिकाराच्या छत्रसावलीत अशा जाचक नियमांपासून मुक्त असतात. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मुलांना सुरुवातीला अशा भेदाभेदाचा संताप येतो. पण काही काळानंतर हा मुलं-वडील असा भेदाभेद नसून स्त्री-पुरुष भेदाभेदाचा आविष्कार आहे हे त्यांना समजतं आणि तेच त्यांच्या मनावर ठसतं.
पण आपणही नियमांचं पालन करणं आवश्यक असलं तरी ते पुरेसं नसतं. मुलांना लागू असणारे नियम हे आपण सांगतो यासाठी नाही तर त्यांच्या हितासाठी आहेत हे त्यांना पटावं लागतं – आपण पटवावं लागतं. आपण समजतो त्यापेक्षा मुलांची अक्कल खूपच असते. शिवाय मुलांची अक्कल ही फार मजेदार गोष्ट आहे. त्यांना अक्कल नाही असं आपण गृहीत धरलं की अक्कल नाही अशाच स्थितीला ती जाऊन पोहोचतात. याउलट त्यांना अक्कल आहे असं गृहीत धरून त्यांच्याशी वागत राहिलो तर मुलं त्या गृहीताचा मान ठेवतात आणि खरंच शहाणपणानं वागतात. आपल्याला मिळणार्या सूचना आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीत तर आपल्या भल्यासाठीच आहेत अशी मुलांची पक्की खात्री झाली की मुलं त्याबाबत बंडखोरी करत नाहीत. मग शिक्षांचा प्रसंग येत नाही आणि कडवटपणाही निर्माण होत नाही. सूचना केवळ हितासाठीच आहेत असं पटवण्याचं बंधन स्वतःवर घालून घेतलं की त्यातून बर्याच चांगल्या गोष्टी साधतात. कुठलाही प्रश्न हडेलहप्पीनं, आरडाओरडीनं, धाकदपटशानं सोडवायचा नसून चर्चेनं सोडवायचा अशी चांगली सवय मुलांना लागते. आपल्या अनेक सूचना आपल्या मोठेपणाच्या कल्पनेतून, दुराग्रही स्वभावातून आलेल्या असल्या आणि केवळ पाल्याचं हित या निकषावर आपल्याला सिद्ध करता येत नसल्या तर हळू हळू आपल्यातच एक चांगला बदल व्हायला लागतो. दुसर्यांचे विचार समजून घ्यायची, मान्य करण्याची आपल्याला सवय लागते आणि हीच सवय मग मुलांमध्ये रुजते.
पण हे असं सगळं साधायचं असेल तर आईवडिलांनी प्रथम एक महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे. आपापसातल्या अनेक मतभेदांमुळे म्हणा किंवा ‘अहं’ मधल्या संघर्षामुळे म्हणा आईवडील स्वतंत्रपणे मुलांशी संबंध प्रस्थापित करू पाहत असतील किंवा आधीच तसे संबंध प्रस्थापित केले असतील तर ते ताबडतोब बंद केलं पाहिजे. आपण वर पाहिल्याप्रमाणे असे संबंध परस्परविरुद्ध दिशांना जाणारे असतात. आईनं एक सूचना केली की वडील त्या विरुद्ध सूचना देतात किंवा तात्पुरती सूट देतात. दुसर्या कुठल्या प्रसंगी वडिलांनी ताकीद दिली की आई पोटाशी घेते. याचा परिणाम बंडखोरीपेक्षाही भयंकर होतो. ‘जाचक नियम शिस्त आपल्यालाच का?’ म्हणून बंड करणार्या, चिडचिडणार्या मुलांचा संताप सात्विक असतो. त्यांच्या चिडीतून न्याय, समता यासारख्या मूल्यांचा आग्रह स्पष्ट जाणवत असतो आणि ही स्थिती केव्हाही चांगलीच असते. आईवडिल मुलांशी वेगवेगळे वागायला लागतात तेव्हा मुलं बंडखोर होत नाहीत ती लबाड होतात. आपल्या फायद्यासाठी कुणाचा कसा वापर करायचा हे शिकतात. सख्ख्या आईवडिलांना एकमेकांशी झुंझायला लावतात आणि विलक्षण बेरकी असा स्वार्थीपणा त्यांच्यात चांगलाच मुरतो. आपली मुलं अशी स्वार्थी, लबाड आिण मूल्यहीन होणं हे काही आपण समजून उमजून स्वीकारणार नाही. म्हणून थोडीशी काळजी घेतली तर ही परिस्थिती टाळता येते. आपण मोठे झालेले असतो. आपल्याला अनुभवांचं शहाणपण आलेलं असतं. अशा वेळी आपण धोरणात्मक निर्णय म्हणून असं ठरवलं पाहिजे की जे काही मुलांशी वागायचं ते एकसंघ पालक म्हणून! आईवडिल एकमुखानंच बोलतील अशी मुलांची नक्की खात्री झाली पाहिजे. असं ठरवून वागणं हे थोड्याश्या प्रयत्नांनी सहज शक्य होतं.
मुलं मोठी होऊन आईवडिलांच्या बरोबरीला येतील तेव्हा केवळ एका छपराखाली राहणारे जीव म्हणून जगण्यापेक्षा कुटुंब म्हणून एकत्रपणे जगायचं असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची आधीपासूनच काळजी घ्यायला हवी.