शिस्त आणि स्वातंत्र्य

आपण स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही, समतेची मूल्ये मानणारे पालक आहोत. ती दैनंदिन जीवनात आचरणात आणताना सत्ता, सत्तास्थाने वा सत्ता वापरून कार्यभाग साधणे याकडे साशंक नजरेने, काहीशा नकारात्मक भूमिकेतून बघत असतो. त्याचवेळी मुलांचे पालक म्हणून निसर्गतःच असमान आणि म्हणून अधिकार वापरणे हे जिथे कर्तव्यच ठरते अशा विरोधी भूमिकेत पडलो आहोत.
ह्या वरवर पाहाता विसंगत अशा परिस्थितीमुळे अनेक पालक दोलायमान व गोंधळलेल्या मनस्थितीत असतात. (जमेल तोवर मुलांना हवे ते करू देणे आणि अति झाले की आक्रमक पवित्रा घेणे अशा अराजकवादी व हुकूमशाहीवादी टोकांमध्ये त्यांचे प्रतिसाद आंदोलत असतात). यावर ‘शिस्त तर हवीच पण अतिरेक नको’ अशी सुवर्णमध्य साधणारी भूमिका अनेकजण घेऊ बघतात. परंतु प्रत्यक्षात त्या त्या परिस्थितीत टोक कोणते आणि म्हणून मध्यममार्ग कोणता ह्याविषयी संभ्रम कायमच राहतो. पालकांपुढील खरा प्रश्न आहे स्वातंत्र्याच्याच जोपासनेत, निसर्गदत्त अधिकार बजावत असताना शिस्तीबाबत सकारात्मक भूमिका कोणती? ह्या प्रश्नाला हात घालण्यापूर्वी, एकूण मानवी जीवनातच शिस्तीचे स्थान काय आहे, हे थोडक्यात बघणे उपयुक्त ठरेल. नीतिनियमांचे पालन करणे म्हणजे शिस्त व शिस्तीचे पालन होत नसल्यास करण्यात आलेला नकारात्मक इलाज म्हणजे शिक्षा अशी ढोबळ व्याख्या करता येईल.
माणूस हा समाज करून राहणारा प्राणी आहे. माणसा-माणसांच्या नातेसंबंधातूनच, म्हणजेच समाजधारणेतून त्याच्या ‘स्व’ची घडण होत असते. समाजाची धारणा होण्यासाठी जशी सामाईक अर्थसंबोध असलेली भाषा लागते तशीच नीतीनियमांची चौकटही आवश्यक असते.
माणसाप्रमाणेच अन्य प्राणीही कळपात राहतात. मुंग्या, मधमाशा यांची तर बरीच गुंतागुंतीची समाजरचना असते. परंतु त्यांच्यात व माणूस नावाच्या प्राण्यात एक महत्त्वाचा फरक आहे. अन्य प्राण्यांमधील वर्तणुकीचे नियमन हे जैविक प्रक्रियेतून घडत असते. ते पूर्णतः निसर्गदत्त असते. माणसाचे जीवन मात्र केवळ निसर्ग नियमांनी नियत होत नाही, तर ते स्वरचित नियमांनी घडवावे लागते. माणसाचा एक पाय निसर्गात आहे पण दुसरा पाय सुटा आहे. तो त्याला सर्जनाकडे, निर्मितीकडे नेऊ शकतो वा विनाशाकडे. प्रकृतीतून संस्कृतीकडे किंवा विकृतीकडे ह्या शक्यता केवळ माणसाच्याच बाबतीत आहेत. उदाहरणादाखल अन्य प्राण्यांप्रमाणे माणसालाही भूक लागते. पण म्हणून तो निसर्गात जे काही अन्न मिळेल ते खाऊन जगणारा प्राणी राहिला नाही. शेतीचा शोध, अन्न शिजवणे, साठवणे त्यावर संस्करण करणे, काय खाणे योग्य, अयोग्य, असा पाककलेपासून आहारशास्त्रापर्यंत एक मानवरचित व्यूह केवळ ‘अन्न’ या नैसर्गिक गरजेभोवती माणसाने रचला आहे. त्यालाच संस्कृती असे आपण म्हणतो. ‘Survival of the fittest’ हा जंगलाचा कायदा असेल पण, ‘Survival of the weakest’ ही संस्कृतीची दिशा असेल. माणसाचा सुटा पाय संस्कृतीत रुजवणं, ‘स्व’ला आशयघनता देणं, ही संस्कारणाची प्रक्रिया माणसाच्या बाबतीत दीर्घकाळ चालणारी आहे. म्हणूनच माणसाचा एक पाय नियतीत आहे तर दुसरा संस्कृतीत.
माणूस हा नियम करणारा प्राणी आहे. समाजधारणेसाठी त्याने प्रथा, रितीभाती, रूढी, कायदा इ. सामाईक संकेतांची, नीती-नियमांची चौकट विवेकाच्या आधारे निर्माण केली आहे. नियमाची गरज ही केवळ एकमेकांबरोबर नांदण्यासाठीच नाही तर स्वतःसाठीसुद्धा आहे. आपल्यातल्या स्व-घातक अशा प्रेरणांना रोखण्यासाठी जशी आहे तसेच कला, विज्ञान, तंत्र यांच्या रीती साधण्यासाठीही आहे. एकूणच जीवनात सत्यं-शिवम्-सुंदराचा आविष्कार होण्यासाठी सुबद्धतेची, नवीन शब्द वापरायचा तर सुयामिततेची (order) गरज आहे.
नीतिनियमांची चौकट जशी निसर्गदत्त नाही तशी ती ईश्वरदत्तही नाही. माणसाने विवेकाच्या आधारे ती निर्माण केली आहे. स्थळ – काळ यांच्या पलीकडे जाणार्या शाश्वत मूल्यांचा त्याला आधार असतो. तसाच त्या त्या समाजाच्या लौकिक श्रेय कल्पना, उद्दिष्टे ह्यांचाही असतो. म्हणून वेगवेगळ्या संस्कृती जन्माला येतात, व त्या बदलतही जातात. सातत्य आणि बदल हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. व्यक्ती व समष्टी यांच्यातील नातेही गुंतागुंतीचे आहे. नियम पाळणे हे सर्वांनाच करावे लागते परंतु नियम बनविण्यात वा बदलण्यात जाणीवपूर्वक सहभाग घेण्याची संधी थोड्यांनाच, थोड्यावेळी मिळत आलेली आहे. नियम करणे वा बदलणे ही खूपच पुढची गोष्ट झाली. परंतु नियम पाळणे हे सुद्धा व्यक्तीचा ‘सहभाग घेऊन’ किंवा ‘बिगर सहभागी’ पद्धतीचा असू शकतो. ज्या समाजात धर्माची, कायद्याची वा विशिष्ट विचारप्रणाली (ideology) ची चौकट बळकट राहिलेली आहे, त्या समाजांमध्ये व्यक्तीचे स्थान दुय्यम ठरते. भीतीपोटी, नाईलाजाने वा प्रलोभनांमुळेच नियम पाळण्यात व्यक्तीचे कर्तेपण नाकारले जाते म्हणून ते ‘बिगर सहभागी’ पालन. म्हणजेच ‘लादलेले’ असते. नियमांचे पालन सवयीने वा राजीखुशीने असले पण विचारपूर्वक समजून उमजून नसले तर ते वरकरणी लादलेले नसले तरी बिगर सहभागीच राहते.
नियमांमागचे मर्म जाणून, समजून, उमजून ते पाळणे हा सहभागी पालनाचा गाभा आहे. हेच तत्त्व नियम मोडणे वा त्यांचे उल्लंघन करण्याला लागू आहे. जिथे केवळ बंडखोरी आहे वा नियम मोडण्यात सोय आहे तिथे ते बिगर सहभागीच उल्लंघन ठरते. उलट नियमांमागचे मर्म जाणून त्यांना विचारपूर्वक आव्हान करणे हे जबाबदार सहभागी उल्लंघन असते. गुन्हा व सत्याग्रह यात हाच फरक आहे.
थोडक्यात असे म्हणता येईल की कोणताही नियम मग तो रहदारीचा वा पतीपत्नी एकनिष्ठतेचा असो – त्याचे पालन वा उल्लंघनही – त्यामागचे मर्म जाणून स्वयंस्फूर्ततेतून होते तेव्हाच ते नैतिक वर्तन ठरते.
ज्या समाजात जास्तीत जास्त व्यक्ती नियमांचे मर्म जाणून, विवेकाच्या आधारे तपासून स्वयंप्रज्ञेतून ते स्वीकारतील, आवश्यक तेथे नवीन नियम घडवतील वा बदलतील आणि हे करत असताना आत्मनिरीक्षणातून स्वतःला अधिक उन्नत पातळीवर नेतील तेव्हाच खर्या अर्थाने तो स्वतंत्र व प्रगत समाज आहे असे म्हणता येईल.
शिस्तीच्या संदर्भात ‘चांगल्या’ माणसाची/समाजाची व्याख्या जशी महत्त्वाची आहे तसेच ज्याला शिस्त लावायची त्या मुलाकडे आपण कसे बघतो हेही निर्णायक महत्त्वाचे आहे. नवजात बालक म्हणजे स्वतःच्या उर्मी नसलेला मांसाचा गोळा अशी चालत आलेली भूमिका आहे. त्यामुळे प्रौढांची भूमिका ही कुंभारासारखी, थापटून थोपटून मुलाला आकार देण्याची, रिकाम्या भांड्यात ज्ञान भरण्याची राहिलेली आहे.
गेल्या ४०-५० वर्षात जगभरच ह्या दृष्टिकोनात मोठा बदल झालेला आहे. जन्मानंतर काही दिवसातच मूल साद-प्रतिसाद देऊ लागते. सभोवतालच्या जगाची ओळख करून अर्थ लावण्यात ते अत्यंत क्रियाशील व जिज्ञासू असते. निरीक्षण, साम्यभेद टिपणे, विविध निकषांवर वर्गीकरण करणे यासारख्या ग्रहण, आकलन क्षमता अगदी लहानपणापासून प्रकट होतात. मूल अनुकरणातून शिकते पण ते केवळ टिपकागदासारखे नसते. त्यात ते स्वतःचे असे काही घालत शिकत असते. मोठ्यांच्या वागण्याबोलण्यातला फरक फार लहानपणापासून मुलं हेरतात, हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी बालसुलभ क्लृप्त्या लढवतात, हा आपला सर्वांचा अनुभव आहे. मोठ्यांची पसंती – नापसंती याचे भान तीन – चार वर्षाच्या मुलाला आलेले असते. सारांशाने, मूल म्हणजे अर्धवट समज असलेला मातीचा गोळा वगैरे तर नाहीच पण स्वतःच्या ऊर्मीने जगाचा अर्थ लावणारा, विवेक, विश्लेषण, सर्जनता ह्या आत्मभान असलेल्या माणूसपणाच्या सर्व क्षमता बीजरुपाने असलेला, अंतःप्रेरणेने शिकणारा छोटा पण पूर्ण माणूस आहे. जेव्हा मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा बदलतो तेव्हा शिकवण्याची व शिस्त लावण्याची रीत बदलते. शिकवणार्याची व शिस्त लावणार्याची भूमिका बदलते. प्रत्येक मुलात बीजरुपाने असलेल्या माणूसपणाच्या क्षमता अंकुरित करणे, त्याला खतपाणी घालून फुलण्यास वाव देणे, त्यासाठी अनुरुप वातावरण निर्माण करणे हे मोठ्यांचे काम ठरते. माणसाच्या मुलाच्या बाबतीत अशी ‘बागवानाची’ भूमिका घेणे आवश्यक आहे पण पुरेसे नाही. इथेच शिस्तीच्या संबंधीची मेख आहे. रोपट्यासारखे माणसाचे मूल केवळ निसर्गदत्त नियमांनी बाधित नाही हे आपण पाहिले. त्याच्या ‘स्व’च्या फुलण्यासाठी तो आशयघन बनून संस्कृतीत रुजण्यासाठी नीतीनियमांचे कोंदण पाहिजे हे आपण पाहिले. मुलांना फुलू देण्यासाठी कमीत कमी हस्तक्षेप करणे, त्याच्या कलाने घेणे म्हणजे कमीत कमी शिस्त लावणे. ती लावत असताना कमीत कमी शिक्षेचा वापर करणे. मारण्यासारखी शिक्षा म्हणजे तर पापच असे जागरूक, स्वातंत्र्यप्रेमी पालकांना वाटते. स्वातंत्र्य व शिस्त ह्या भिन्न गोष्टी आहेत किंबहुना एकमेकांच्या विरोधात आहेत, असे मानल्याने त्यांची संभ्रमित अवस्था होते.
स्वातंत्र्य ह्या संकल्पनेत शिस्त किंवा ‘सुयामितता’ (order) अभिप्रेत आहे. (शिस्त या शब्दाशी अंधानुपालन, रूढी प्रियता, आज्ञापालन ह्या कर्तेपण/स्वयंप्रज्ञा नाकारणार्या संकल्पना निगडित आहेत त्यामुळे ‘सुयामितता’ हा अधिक चपखल शब्द आहे. पण ‘शिस्त’ हा सवयीचा शब्द असल्याने तोच शब्द नव्याने अर्थ वापरलेला आहे.) स्वातंत्र्य व शिस्त ह्या वेगळ्या प्रक्रिया नसून एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. परत विनोबांची उपमा द्यायची तर मातीच्या भांड्यातील माती वेगळी काढा म्हटलं तर भांडं, भांडं राहत नाही किंवा भांडे वेगळे काढले तर माती मिळत नाही. तसेच स्वातंत्र्य व शिस्तीचे आहे. मराठीतला ‘स्व-तंत्र’ हा शब्द फार समर्पक आहे.
ए. एस. नीलनी १९२१ साली मुलांना संपूर्ण मोकळीक देणारी समरहिल नावाची शाळा काढली. मुलांना हवे ते करू दिले तर मुलं वायाच जातील असे भाकित त्यावेळच्या उदारमतवाद्यांनी केले होते. नीलने ५०-६० वर्षे शाळा चालवून जगाला दाखवून दिले की मुलांना जर खरे स्वातंत्र्य दिले तर मोठेपणी ती आत्मविश्वास असणारी, कामात रस घेणारी, जबाबदार आनंदी माणसं होतात. नीलची स्वातंत्र्याविषयीची भूमिका विचार करायला लावणारी आहे. मला हवे तसे मी वागेन किंवा मला जे हवं ते मला मिळालंच पाहिजे यात तंत्रच नाही. तो स्वैर-आचार ठरतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वयं नियमन, म्हणजेच दुसर्याची कदर करणे, दुसर्यांच्या व स्वतःच्या स्वातंत्र्याची बूज राखणे. जिथे दुसर्याच्या स्वातंत्र्यावर घाला येतो, तिथे स्वैरतेकडे वर्तन झुकायला लागते. म्हणूनच नीलच्या शाळेत लॅटिन शिकायचे की नाही, वर्गात जायचे की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक मुलाला होते पण हवे तेव्हा ट्रम्पेट वाजविण्याची मुभा मात्र नव्हती. मोठ्यांना व मुलांना समान हक्क आहेत असे त्याचे म्हणणे होते. स्वातंत्र्य ही देवाणघेवाण आहे. दोघांनी एकमेकांच्या स्वातंत्र्यावर घाला येत नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे. स्वातंत्र्याची ही व्याख्या केंद्रस्थानी ठेवली तर काय चित्र आढळते?
काही घरात सर्वच हक्क मोठ्यांना असतात. ह्याच्या दुसर्या टोकाला सर्व हक्क मुलांनाच बहाल केलेली घरं असतात. एकीकडे अतिशिस्त तर दुसरीकडे स्वैरता. दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्य नाही. ना मुलांच्या ठायी ना पालकांच्या. कोणीच पालक १०० टक्के टोकाची भूमिका घेणारे नसतात. बहुसंख्य स्वातंत्र्यवादी पालक शिस्त व स्वैरता यांची आपापली टोकं ठरवत, सामान्यतः स्वैरतेकडे झुकणार्या मध्यम पट्टीत वागत असतात. अनेकदा आईची पट्टी वेगळी वडिलांची वेगळी. दोन-तीन पिढ्या जर एकत्र असल्या तर एकमेकांना छेद दिल्या जाणाच्या शक्यता वाढतात. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मुलांना वाढविताना, त्यांच्या अंतःप्रेरणांना खतपाणी घालत, त्यांना स्वातंत्र्याकडे नेत असताना, नेमके कसे वागावे ह्याचे ‘बायबल’ जरी नसले तरी काही पथ्ये, काही ठोकताळे जरूर सांगता येतील.
 मुलांमधील स्वयंप्रज्ञा – स्वातंत्र्य फुलण्यासाठी नियमांची चौकट आवश्यक आहे. नियम ठरविण्यात मुलांचा सहभाग हा बराच पुढचा टप्पा झाला. अगदी सुरुवातीला नियमांच्या पालनातही, त्याचे मर्म समजून सहभागी पालनही मर्यादित असते. आजूबाजूच्या परिसराचा, त्यातील व्यक्तींचा अर्थ लावत लावत मूल शिकत असते. तिथे नियम मोठ्यांनीच ठरवलेले असतात, त्या नियमांची शिस्त लागतीय की नाही हे बघणे मोठ्यांचे काम असते. फार तर असे म्हणता येईल की नियम ठरविण्यात व अंमलबजावणीत मुलाच्या गरजा, वयानुरूप क्षमता, कल याचा जरूर विचार व्हावा. पण अशी वागण्याची मर्यादा सांगणारी चौकट असणे ही मुलाची गरज असते. काय केलेले चालते व काय नाही हे मूल वेळोवेळी आजमावत असते. तशा सीमा आखून देणे, वर्तणुकीचा परीघ आखणे हे पालकांचे कर्तव्य ठरते.
 प्रत्येक मूल हे स्व-केंद्री असते. ‘मी’ हा त्याचा संदर्भबिंदू असतो. ह्या टप्प्यातून सर्वच मुले जातात. ते मोठ्यांनी समजून घेतले पाहिजे पण त्याचबरोबर ‘त्यांच्या कलाने’ म्हणून हवं ते करण्याची मुभा नाकारली पाहिजे.
 मोठ्यांना व मुलांना जेथे समान हक्क आहेत तिथे दोघांनाही नियमांचे एकच तत्त्व लागू आहे. ज्या गोष्टी मुलांनी करणं अपेक्षित आहे त्या मोठ्यांनी पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, बाबा बुटासकट पाय सोफ्यावर घेऊन झोपलेले मुलाने निदर्शनास आणून दिलेले खपत नाही. इथे मूल नियम पालनात सहभागी होऊ बघतेय ह्याची दखल घेतली जात नाही. उलट ते उद्धटपणाचे लक्षण मानले जाते. मोठी माणसं बोलत असताना मुलांनी मध्ये बोलू नये असे वाटते तेव्हा तसे त्यांना निक्षून सांगणे, तसेच मुलांचे आपापसात काही चालले असताना मध्ये नाक न खुपसणे ही दोघांच्या हक्कांचा आदर करण्याची रीत राहील.
 मोठ्या भावंडांना एकसारखं ‘तू मोठा आहेस ना’ असं सांगितल्याने ‘मी मोठा आहे हा काय माझा दोष आहे का?’ असे वाटून धाकट्याबद्दल अढी निर्माण होते. ‘तुझी समज जास्त म्हणून तू समजून उमजून वाग’ हे जर मोठ्या मुलापर्यंत पोहचायचं असेल तर त्याच्या संदर्भात आपले वागणे तसेच पाहिजे. अन्यथा मी मोठा म्हणून मी अधिकार वापरणार तू मोठा म्हणून तू मात्र समजूतदारपणाने वाग ह्यातील अंतर मुलं हेरतात, व त्याचा लावायचा तो अर्थ लावतात.
 नियम ठरविताना ते स्वार्थापोटी, मोठ्यांना वाटतात म्हणून ठरविलेले नसावेत. समूहाची शिस्त व योग्यायोग्यतेचा विचार करून ठरविलेले असावेत. हेच तत्त्व शिक्षा करतानाही लावले पाहिजे. ती रागापोटी, आकसापोटी नसावी. त्यात धडा शिकविण्याचा हेतू नसावा. ती मुलाच्या भल्यासाठीच आहे ह्याची आपल्या मनात स्पष्टता असायला हवी.
मोठ्यांच्या नैसर्गिक उद्रेकांना जागाच नाही का? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. बर्याच वेळा ही मोकळीक घेतलीच जाते. प्रश्न असा आहे की खरोखरीच चुकीपेक्षा शिक्षा जास्त झाली असली तर? जागरूक संवदेनाशील माणसाच्या मनात आत्म निरीक्षणाची प्रक्रिया चालू असायला हवी. तशी प्रांजळपणे कबुली देणे ह्यात कमीपणा नाही.
 शिक्षेमागची उत्स्फूर्तता आवश्यकही असते. दरवेळेस मूल असे वागते. काय बरं शिक्षा करणं योग्य आहे असा विचार करत बसले तर योग्य तात्कालिक उद्देश साध्यच होणार नाही. उत्स्फूर्त कृती सारासार विचारातून तयार होणे हा सततच्या प्रक्रियेचा भाग आहे.
 शिक्षा ही चुकीच्या वर्तनासाठी आहे, मूलच वाईट आहे असे त्यातून निघत नाही ना? ह्याबद्दल विशेष काळजी घ्यायला पाहिजे. Punish the deed not the doer. अन्यथा, शहाण्यासारखा वागतो तो शहाणा, वेड्यासारखे वागतो तो वेडा. तू अमुक केलेस हे मला आवडले नाही हे सांगितले पाहिजे पण तू अमुक केलेस म्हणून तूच मला आवडत नाहीस हे ध्वनित होणे धोक्याचे आहे. प्रेमात अटी असल्या, सौदा असला तर ते प्रेमच नाही.
मुलांना अनेक गोष्टींबाबत ‘नाही’ ‘नको’ असे म्हणावे लागते. हे करू नये, तिथे चढू नको, अशी नकारांची सरबत्ती नसावी. शक्यतोवर त्याची मांडणी अमुक एक करू नको पेक्षा, तमुक एक कर अशी सकारात्मक असावी. परंतु विचारपूर्वक नकार दिला असला तर त्यात तात्कालिक हिरमोड झाला तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगलेच होतात. मुलं कणखर बनतात, प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला शिकतात. आणखी एक गोष्ट म्हणजे योग्य कारणासाठी नकार दिलेला असला तर नकार नकारच राहिला पाहिजे. हट्ट केला, भोकाड पसरले की नकाराचा होकार होत असेल तर आकांडतांडव करणे हे त्यांना एक हत्यारच मिळते. अशी मुलं मोठेपणी घरी वा दारी अधिकार प्राप्त झाल्यानंतर क्षुल्लक कारणांसाठीसुद्धा जेवणाचे ताट भिरकावण्यासारख्या कृती करून स्वतःच्या अधिकाराचे प्रदर्शन करत असतात. अशी व्यक्ती स्वतंत्र तर नाहीच पण ती स्वतःच्या विकारांची गुलाम आहे. आतल्या न्यूनतेच्या भावनेपोटी किंवा अहंकारापोटी येणार्या असुरक्षिततेमुळे आपल्या अधिकाराची इतरांना व स्वतःलाही खूण पटविण्याची गरज निर्माण होते.
 स्व-तंत्राने वागणारी व्यक्ती आतून शांत असते. आपल्या अधिकाराचे प्रदर्शन करण्याची तिला गरज वाटत नाही. ह्याचा अर्थ ती अन्याय खपवून घेते असा होत नाही. आपल्या स्वातंत्र्यावरील अतिक्रमण रोखणे, त्याचा प्रतिकार करणे हे स्वतंत्र असण्यात अंतर्भूत आहे. पण त्यात आकस नसतो, धडा शिकवण्याची भूमिका नसते. हिंसा ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा मनातल्या भावनेत आहे. त्यामुळेच कधी कधी एक चापटी ही तासन् तासच्या अबोल्यापेक्षा इष्ट कृती ठरते.
 पालकांना/शिक्षकांना मुलांना वळण लावण्याचा अधिकार मिळालेला असतो. त्यांनी मुलांबरोबर आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे प्रेमाचे नाते प्रस्थापित केले तर विशिष्ट अधिकाराचे रूपांतर कमावलेल्या अधिकारात होते. अशा मोकळ्या आदान प्रदानाच्या वातावरणात शिस्त ही लादलेली न राहता मनापासून स्वीकारली जाण्याची प्रक्रिया सुरू हाते. स्वयं नियंत्रणाचे बीज इथे अंकुरित होते.
 प्रेमाचा स्रोत आखडता घेणे हीच शिक्षा नसावी. किंबहुना, शिक्षा केली तरी त्यापलीकडे मुलाबद्दल वाटणारी आत्मीयता मुलापर्यंत पोहोचत राहिली तर शिक्षेचे बाह्य स्वरूप जरी रूढ शिक्षेचे राहिले तरी त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होत नाहीत.
स्व, इतकाच इतरांचा आदर राखणे, त्यांची कदर करणे, ही संवदेनशीलता हा स्वातंत्र्याचा गाभा आहे.
त्याचा आधार तात्कालिक, संकुचित व एकांगी हितसंकल्पात असू शकत नाही. अन्यथा ‘तू माझी सोय बघ, मी तुझी बघतो.’ अशा स्वकेंद्री उपयुक्ततावादालाच स्वातंत्र्याचा दर्जा दिला जातो. खर्या अर्थाने स्वातंत्र्य बहरण्यासाठी दूरगामी व्यापक व सर्वांगीण हितसंकल्पनांचे अधिष्ठान त्याला असावे लागते व ते स्वयंप्रज्ञेतून अंगीकारलेले असणे आवश्यक ठरते. ही समज केवळ वैचारिक बौद्धिक पातळीवर येणं पुरेसं नाही त्याची अनुभूती येणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याची अशी उमज झालेला पालक अधिकार जरूर वापरतो. पण शिक्षा व प्रलोभने दाखवून मुलांना शिस्त लावण्यातला, त्यांना आज्ञाधारक बनवण्यातला फोलपणा त्याच्या लक्षात येतो. प्रसंगाने शिक्षेचा व प्रलोभनाचा वापर केला तरी तो प्रत्येक प्रसंग हा स्वयंप्रज्ञा जोपासण्याची संधी म्हणून पाहात असतो. अधिकार बजावत असतानाच तो अशा तर्हेने बजावतो की जेणे करून अधिकाराची जागा उत्तरोत्तर स्वयंप्रज्ञा घेत जाईल.