चाकोरीचा काच
सॅम वॉल्टर फॉस नावाच्या कवीने शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली एक गमतीदार कविता आहे. तिचा भावार्थ असा –
एका महानगरामधला एक हमरस्ता अगदी वेडावाकडा, वळणावळणांचा होता, सरळ रेषेतले मैलभर अंतर जाण्यासाठी तीन मैलांचा वळसा पडेल असा.
शहर तर तसे सपाटीवर वसलेले, मग हा रस्ताच असा का? या प्रश्नाचा शोध एक इतिहास – संशोधक घेऊ लागला. त्याला असे समजले की सुमारे शंभर – दीडशे वर्षांपूर्वी त्या महानगराच्या जागी एक खेडे होते. त्या खेड्यातली ही मुख्य सडक होती.
तिच्या दुतर्फा वसलेली वस्ती फारशी न उठवता त्या सडकेचाच नंतर हमरस्ता करण्यात आला होता. मग प्रश्न आला, की त्या खेड्यातली सडक तरी अशी वेडीवाकडी कशी?
तपासाअंती असे कळले की त्याही पूर्वी शंभर – दीडशे वर्षे तेथे एक गुराख्यांची वस्ती होती. त्या वस्तीतली ही गुरांची वाट होती. तिचीच पुढे खेड्यातली सडक बनली ! पण मग ती गुरे तरी अशा वेड्यावाकड्या वाटेने का जात होती?
तर, आजपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तिथे राहणार्या गुराख्याचे एक वासरू झाडाझुडुपांतून वाट काढत काढत गवत दिसेल तसतसे चरायला जात असे. ते होते एका पायाने लंगडे! त्यामुळे त्याला सरळ नाकासमोर चालताच यायचे नाही. ते जसजसे मोठे होत गेले तसतशी इतर धाकटी गुरे त्याच्या मागोमाग त्याच वेड्यावाकड्या वाटेने जाऊ लागली. त्यामुळे गुरांची वाट तयार झाली! आणि म्हणून कवी समारोप करतो –
A hundred thousand men were led
By one calf near three centuries dead.
They followed still his crooked way,
And lost one hundred years a day;
For thus such reverence is lent
To well-established precedent.
पायी जाण्यासाठी एखादी मळलेली वाट सवयीची झाली की तिचा ‘पायंडा’ पडतो, आणि बैलगाडी ठरावीक कच्च्या वाटेने जाऊ लागली की तिच्या चाकांमुळे वाटेवर पडणार्या खाचांची ‘चाकोरी’ बनते. दोन चाकांच्या मधल्या भागात गवत माजते, चाकांबाहेरचा भाग ओबडधोबडच राहतो, त्यामुळे त्या वाटेने जाणार्या दुसर्या कोणत्याही बैलागाडीला आधी पडलेल्या चाकोर्यांवरूनच जावे लागते. यालाच म्हणायचे, चाकोरीचा काच ! फॉसच्या कवितेतले वर्णन विनोदी वाटले तरी खरोखरच अतिशयोक्त आहे काय? मला तसे वाटत नाही. उलट आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रात असा पायंड्याचा प्रताप आणि चाकोरीचा काच अनुभवास येतो.
देशाच्या इतिहासात – आपल्या देशात तर याचे प्रमाण जास्तच. सुमारे इसवी सन एक हजार पर्यंतच्या दोन-अडीच हजार वर्षांच्या कालखंडात भाषा, साहित्य, व्याकरण, तत्त्वज्ञान, गणित, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, चित्रकला, ज्योतिर्विज्ञान, धातुशास्त्र, समुद्र पर्यटन अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये प्रतिमेचे उन्मेष दिसत होते. त्यांची साक्ष अजूनही अनेक ग्रंथालये आणि स्मारके देतात. पण गेल्या हजार वर्षांत मात्र ज्ञानाचा हा शुद्ध प्रवाह, रविंद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे, मृतवत् रूढींच्या वाळवंटामध्ये अवरुद्ध झाला ! नवीन रचना जवळजवळ थांबली. मग सुरू झाल्या मूळ ग्रंथावरच्या टीका आणि भाष्ये ! जो तो आपला लिहितो आहे – ‘भाष्यकाराते वाट पुसतु’ !
या सगळ्या गतानुगतिक परंपरेत अपवाद फक्त गौतम बुद्धाचा. त्याने स्वतः प्रयोग करून, अनुभव घेऊन स्वतःची नवीन वाट तर शोधलीच, पण तिची चाकोरी बनू नये म्हणून शेवटी आपल्या शिष्यांना सांगितले की कोणावरही आंधळा विश्वास टाकू नका, अगदी माझ्यावरसुद्धा. स्वतः पारखून घ्या. ‘अत्तदीपो भव’ – स्वतःच स्वतःचा दिवा व्हा ! अर्थात् गौतम बुद्धाचा हा शेवटचा उपदेश त्याच्या शिष्यांच्या कितपत पचनी पडला ते खुद्द बुद्धाच्या देवळांच्या आणि मूर्तींच्या अफाट संख्येवरूनच समजते !
आपल्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनातला हा सिलसिला आजही चालू असलेला दिसतो. ज्यांना नवनिर्मिती करणारे म्हणायचे अशा कलावंतांवर आणि साहित्यिकांवर युरोप – अमेरिकेतल्या प्रचलित ‘फॅशन्स’ची दाट सावली पडलेली असते. तिकडे दुसर्या महायुद्धानंतरचे वैफल्य व्यक्त होत असले की इकडेसुद्धा स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाऐवजी वैफल्यच! तिकडे सुव्यवस्थितपणाच्या अतिरेकाची प्रतिक्रिया म्हणून विस्कळीतपणाची लाट आली की इकडेही, अजून सामाजिक जीवनाला किमान शिस्त आलेली नसली तरी ‘सिस्टीम’ विरुद्धच्या बंडाचे ‘अबसर्ड’ झेंडे! तिकडे अतिसंपन्नतेच्या अनुभवानंतर पोकळी जाणवली आणि अस्तित्वाविषयीचे मूलभूत प्रश्न सतावू लागले की इकडे, कोटीकोटी अभावग्रस्त असले तरी, पोकळी आणि अस्तित्ववाद! समजा त्या अभावग्रस्तांची जाणीव असलीच, तरीही क्रांती ‘आयात’ करण्याची घाई. अगदी निरक्षरतेचा प्रश्न सोडवायचा असला तरी पावलो फ्रेरे आणि इव्हान इलिच! विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर घोषणाच मुळी पश्चिमेला गाठण्याची – ‘कॅचिंग अप विथ द वेस्ट’ ची!
व्यक्तीच्या जीवनात
आपल्या समाजाच्या आणि देशाच्या जीवनात हे घडताना दिसते त्याचे कारण मुळात ते व्यक्तीच्या जीवनात घडत असते. यशस्वी ठरलेला प्रतिभावंत आपले यश टिकवून ठेवण्यासाठी ‘फॉर्म्युला’ला घट्ट धरून ठेवतो आणि त्याच्याच आवृत्त्या काढत राहतो. अगदी साहित्य – संमेलनातसुद्धा तेच ते प्रसिद्ध कवी आपल्या त्याच त्या विख्यात कविता ऐकवून हुकमी टाळ्या वसूल करीत राहतात – फक्त टाळ्या वाजवणारे श्रोते बदलतात! पण हे प्रतिभावंतसुद्धा तुमच्या माझ्यासारख्यांमधूनच निर्माण झालेले असतात. अशा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात तर रूढी, परंपरा, चाकोरी यांचा प्रभाव जास्तच दिसतो.
खाणेपिणे, कपडेलत्ते, सणसमारंभ, शिक्षण, खेळ, करमणूक, प्रवास अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण सर्वसामान्य माणसे इतर चारचौघांसारखे वागायचा प्रयत्न करीत राहतो. मग आपणा सगळ्यांनाच गावाबाहेरच्या ढाब्यावर जाऊन जेवावेसे वाटते. जीनची पँट घालावीशी वाटते. जातीतल्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न करावेसे वाटते. मेणबत्त्या फुंकून मुलाचा वाढदिवस साजरा करावासा वाटतो. एकतीस डिसेंबरला गाडी सुसाट पळवावीशी वाटते. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावेसे वाटते. आठवीपर्यंत वेगवेगळ्या शिबिरांना पाठवून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करावासा वाटतो. परिस्थिती जरा बरी असली तर मुलाने कराटे आणि मुलीने भरतनाट्यम् शिकावे आणि शाळा संपता-संपता ब्लॅकबेल्ट आणि अरंगेत्रम्पर्यंत पोचून थांबावे असे वाटते. शरीर चपळ असेल तोपर्यंत ‘ट्रेकिंग’ करावे आणि नंतर एल.टी.ए. टाकून कंन्डक्टेड टूरमधून जमेल तेवढा इंडिया गाईडच्या नजरेतून बघून घ्यावासा वाटतो. पुढे मुलांनी सायन्सला जावे आणि मेडिकलला प्रवेश नाहीच मिळाला तर इंजिनियर व्हावे, संधी मिळताच अमेरिकेत जावे, मुलीने एखाद्या एन.आर.आय.शी. लग्न करावे, असे वाटते.
आता यावर कोणी म्हणेल, की ‘‘आम्ही आपली सामान्य माणसे, आमच्यासारख्या सगळ्या सॉलोमन सँन्डींचे आयुष्य हे असेच असणार. कालखंडानुसार त्यातला तपशील काय तो बदलणार.’’ पण हे म्हणणे सुद्धा तपासून बघायला हवे.
वरच्या परिच्छेदात लिहिलेल्या इच्छा – आकांक्षा या शहरी मध्यमवर्गीयांच्या आहेत. ग्रामीण भागात यातल्या काही गोष्टी बदलतील. जिराईत शेतीची बागाईत करणे, एका मुलाला शहरात शिकायला पाठवणे आणि मग सरकारी नोकरीत चिकटवणे, धंद्यासाठी जीप घेणे, म्हशी पाळणे, कोंबड्या पाळणे, जमेल तसतसा राजकारणात भाग घेणे, मुलीचे लग्न झोकात लावून देणे, वडिलांच्या दहाव्याला, कर्ज काढून का होईना, गावजेवण देणे अशा त्या आकांक्षा असतील. आदिवासी भागात किंवा मच्छीमारी वस्तीत अशा आकांक्षांचे स्वरूप आणखी मर्यादित झालेले असेल. त्यामुळे ‘आम्ही सामान्य माणसे’ असे म्हणत असताना आपल्या देशात ‘सामान्य’ या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा हा एक प्रश्नच असतो. ज्याला गरिबी आणि अज्ञान यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचे फारसे पर्यायच उपलब्ध नाहीत त्याला मी ‘सामान्य’ म्हणतो. ज्याला वाडवडिलांकडून विद्येचा, संपत्तीचा किंवा सुविधांचा काही वारसा लाभलेला आहे, तो ‘सामान्य’ नव्हे. या व्याख्येप्रमाणे सामान्य असलेल्यांच्या आयुष्यावर धर्म, रूढी, परंपरा अशा वेगवेगळ्या चाकोर्यांची हुकमत चालत असली तर त्यात नवल नाही. कारण त्यांना जो ओळखीचा आहे तोच आयुष्यक्रम सुरक्षित वाटणार. आपल्या मुलाला अाश्रमशाळेत ठेवणार्या आदिवासीला, आपल्या मुलाला पाचगणीच्या ‘रेसिडेन्शिअल स्कूल’ मध्ये ठेवणार्या उच्च मध्यमवर्गीयांपेक्षा खूपच मोठी मानसिक उडी मारायची असते. भुईमुगाऐवजी सूर्यफूल लावणारा जिराईत शेतकरी, आपल्या मुलाला सायन्सऐवजी कॉमर्सला जाऊ देणार्या शहरी नोकरदारापेक्षा जास्त जोखीम पत्करत असतो. मी आत्ता विचार करतो आहे तो ‘पालकनीती’चा, हा अंक ज्यांच्या हाती पडू शकेल अशा सुशिक्षित वर्गाचा आणि त्यांच्यातल्या चाकोरीबद्ध जीवनाच्या हव्यासाच!
चाकोरीचे मानसशास्त्र
चाकोरीमागची मानसिकता समजू शकते. अनोळखी गोष्टींची आपल्याला भीती वाटते. ओळखीच्या आणि सवयीच्या झालेल्या गोष्टी डोळे झाकूनसुद्धा करता येतात. मळलेल्या वाटेने जाणारे आपल्यासारखेच इतर अनेकजण असल्यामुळे त्यांचा आपल्याला आधार वाटतो. त्यामुळे त्यांची संगत ही आपली गरज बनते. त्यांच्यापेक्षा आपण वेगळे वागलो तर त्यांना ते आवडणार नाही, मग ते आपली चेष्टा करतील किंवा आपल्याला त्रास देतील किंवा त्यानेही भागले नाही तर आपल्याला त्यांच्या गटातून काढून टाकतील अशी आपल्याला भीती वाटते. त्यामुळे सगळ्यांनाच चाकोरीबद्ध आयुष्य सुरक्षित वाटते. सगळेच एकमेकांच्या या प्रवृत्तीला खतपाणी घालतात. नाही म्हणायला कधी कधी काही जणांना असा चाकोरीचा कंटाळा येतो. ‘सारीकडे तेच ते’ असे वाटून ते त्या चाकोरीत काही बदल करू इच्छितात, पण मुळात सुरक्षित जगण्याची ओढ असल्याने हा बदल माफक प्रमाणातच केला जातो. तो वरवरचा असतो आणि बहुधा तो आपल्या गटाबाहेरच्या पण दुसर्या कुठल्या तरी गटातल्याच लोकांनी आधी वापरून पाहिलेला असतो किंवा निदान तो तसा आहे हे आपल्याला तो बदल विकणार्यांनी जाहिरातीद्वारे पटवून दिलेले असते. त्यामुळे बदल नेहमीच फॅशनच्या लाटांच्या स्वरूपात असतात. म्हणजे त्या पुन्हा नव्या चाकोर्याच असतात.
जागरूक पालकांची चाकोरी
सध्याचे सुशिक्षित पालक मुलांच्या विकासाबद्दल नक्कीच जागरूक झालेले आहेत. मुलांच्या भवितव्याबद्दल ते महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांच्यापैकी काहीजण मुलांमध्येसुद्धा ही महत्त्वाकांक्षा उत्पन्न करू शकतात असे दिसते. उरलेले मात्र ती मुलांवर लादताना आणि नंतर येणार्या अपयशामुळे हळहळताना दिसतात. पण बहुसंख्य पालकांच्या या महत्त्वाकांक्षा चाकोरीतल्याच असतात अशी माझी तक्रार आहे. याला मानसशास्त्रात ‘अचीव्हमेंट थ्रू कन्फॉर्मिटी’ म्हणजे ‘कर्तबगारीच्या कल्पनेबाबतची समूहशरणता’, समाजाला मान्य होईल असेच कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा असे म्हणतात. अर्थात मुळात स्वतःमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये विकास घडवून आणण्याची इच्छाच नसण्यापेक्षा हे बरे. पण हे पुरेसे आहे काय?
नेहमीपेक्षा काही वेगळे
जे शिकलेले आहेत, ज्यांना माहितीची भांडारे उपलब्ध आहेत, सुविधांचे पत्ते ठाऊक आहेत, आर्थिक स्थिरता आहे अशांनी तरी चाकोरीबाहेरचे वेगळे प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? त्यांची सुरुवात प्रथम स्वतःच्या प्रौढवयातील आयुष्यापासूनच करावी लागेल. त्यातूनच आपल्या मुलांना असे प्रयोग करायला उत्तेजन देण्याचे बळ मिळेल. विचार करणार्या मध्यमवयीन स्त्रीला किंवा पुरुषाला आयुष्यातल्या चाकोरीचा कंटाळा वाटू लागतो. नोकरीमध्ये तोचतोचपणा आलेला असतो. शक्य असलेल्या बढतीचा टप्पा आधीच गाठलेला असतो. स्त्री नोकरी न करणारी असली तर मुले मोठी होऊन आपापल्या शिक्षणात मग्न झाल्यामुळे तिला एकदम मोकळा वेळ उपलब्ध झालेला असतो. वार्धक्य अजून पुष्कळ दूर असते. असा हा वय वर्षे चाळीस ते पंचावन्नपर्यंतचा कंटाळवाण्या पठाराचा कालखंड असतो. इथेच काही चाकोरीबाहेरचे प्रयोग करून बघायला वाव असतो. नवीन विद्या किंवा कला शिकणे, मुदतपूर्व निवृत्ती घेऊन एरव्ही जोखमीचा वाटला असता असा व्यवसाय सुरू करणे, एखाद्या सामाजिक उपक्रमात किंवा चळवळीत भाग घेणे अशा अनेक प्रकारचे हे प्रयोग असू शकतात. त्यांचा समाजाला काय फायदा होईल तो होवो, पण सगळ्यात मोठा वैयक्तिक फायदा म्हणजे अशा चाकोरी-बाहेरच्या प्रयोगांमुळे आयुष्याची गेलेली चव परत येते. आपल्यामधल्याच सुप्त क्षमतांचा शोध लागतो. अशा प्रयोगकर्त्यांचे छोटे छोटे गट तुमच्या गावातसुद्धा जमत असतील आणि काही कामे करीत असतील. पालकनीतीचा गट हासुद्धा त्यापैकीच एक असू शकेल.
एकदा आपल्याला चाकोरी मोडण्याचे धैर्य आले आणि त्यातली गोडी कळली की आपल्या मनाचा लवचीकपणा वाढतो. ज्या चाकोरीचा आपल्याला कंटाळा आला ती चाकोरी आपल्या मुलांवर कशाकरता लादायची? जी गोडी आपल्याला आयुष्यात इतक्या उशिरा अनुभवायाला मिळाली ती आपल्या मुलांना त्यांच्या विशी-पंचविशीतच मिळवता येईल का? असे आपल्याला वाटू लागेल. मुलांचे शिक्षणक्रम, त्यांना घेता येणारे ऐच्छिक विषय, त्यांचे फावल्या वेळेतले उद्योग, त्यांच्या मित्र – मैत्रिणी, त्यांच्या नोकर्या किंवा व्यवसाय, त्यांच्या जीवनसाथीची निवड अशा जेवढ्या म्हणून गोष्टींवर आपण पालक म्हणून हुकमत गाजवत असू किंवा प्रभाव टाकीत असू किंवा निदान सूचना आणि उपदेश करत असू, अशा सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना चाकोरीबाहेरचे प्रयोग करायला उत्तेजन देणे शक्य आहे.
या सगळ्या चर्चेत चाकोरीबाहेरचा प्रयोग हा अगदी मौलिक (ओरिजिनल), अगदी अपूर्व, फक्त मलाच पहिल्यांदा सुचलेला असा असला पाहिजे, असा दावा नाही. कारण अशी अपूर्वता क्वचितच आढळते. आपण सगळेजणच आपल्या आधीच्यांच्या खांद्यावर उभे असतो. शास्त्रज्ञाने नवीन शोध लावण्यापूर्वी त्या क्षेत्रात इतरांनी लावलेल्या शोधांचा अभ्यास केलेला असतो. अगदी स्वच्छंदी कलावंतालासुद्धा बंड करण्यासाठी देखील जिच्या विरुद्ध ते बंड करायचे ती परंपरा असावी लागते. हे सगळे पूर्वज्ञान आपण पारखून ह्यातले पटेल तेवढेच घेतो की त्या परंपरांचे आंधळे अनुकरण करतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्ते केलेले असणे या गोष्टीचे महत्त्व निर्विवादच आहे; पण त्यामुळे नवीन वाटा शोधण्याची ऊर्मीच मारली जात असेल तर नवीन प्रदेशांचा शोध तरी कसा लावणार?
(अनुलेखन : माधुरी दीक्षित)