‘खेळघर’ – माझा अनुभव
दोन वर्षांपाठीमागे पालकनीतीचा एक उपक्रम म्हणून खेळघर सुरू झालं. खेळघराची मुख्य जबाबदारी जरी मी घेतली, तरी संस्थेच्या पाठबळानंच ते शक्य झालं होतं. आनंददायी शिक्षणाचं, ताणविरहित वातावरणात प्रसन्नपणे फुलणार्या बाल्याचं स्वप्न कुठंतरी आम्ही सगळेच पाहात होतो.
मी गटात नवीन होते. पालकत्वाच्या नव्यानं आकळत जाणार्या अर्थवलयांनी चकित होत होते. सामाजिक पालकत्वाच्या संकल्पनेला केंद्रस्थानी मानून कार्यरत झालेल्या ह्या गटात सर्व जण आप-आपल्या परीनं, पद्धतीनं शिक्षणाच्या, आरोग्याच्या, समानतेच्या संदर्भात काम करीत होते. मी समजावून घेत होते, थोडं थांबून, इतरांना बरोबर घेऊन जायला शिकत होते. नव-नवीन गोष्टी उत्स्फूर्तपणे करायला घ्यायच्या धडका प्रखर होत होत्या.
एका बाजूने शिक्षणाच्या-पालकत्वाच्या क्षेत्रातला मानवीय दृष्टिकोन समोर येत होता. वैचारिक दृष्ट्या संपन्न करणारा अनुभव घेत होते. तसंच दुसर्या बाजूने सभोवताली दिसणार्या परिस्थितीनं, दारिद्य्र, अज्ञान आणि परंपरांच्या चौकटीत बंदिस्त झालेलं बाल्य पाहून खिन्न होत होते. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके लोक सुजाण पालकत्वाच्या वाटेवर दिसत होते बाकी सारं जग ह्या संकल्पनांपासून हजारो कोस दूर होतं.
माझ्या मुलाचे मित्र म्हणून शेजारच्या वस्तीतली काही मुलं आमच्या घरी यायला लागली. आमच्या घरातली खेळणी, वृत्तपत्रं, पुस्तकं, रंग, कागद पाहून त्यांचे डोळे चमकायचे. ह्या मुलांच्या निमित्तानं एक वेगळंच जग माझ्यासमोर उलगडू लागलं. आमच्या घरातलं त्याचं दबकलेपण मला खटकायचं. मग मी आणखी त्यांना समजावून घ्यायला बघायची. त्यांची शाळा, घर पाहून आले. ७०-७० मुलांचे वर्ग असलेल्या अत्यंत अस्वच्छ महानगरपालिकेच्या शाळा. शिक्षणाच्या अव्याहत पाट्या टाकणारे गुरूजन, तिथल्या शिक्षा, मार, अनास्था.
खेळायला तर सोडाच पण चालायला-घरापर्यंत पोचायलाही जागा नसलेली पत्र्याच्या खोपटांची वस्ती. किमान सुविधाही चोरून मारून मिळवलेल्या. पहिल्यांदा जेव्हा मी ह्या वस्तीत गेले, तेव्हा रस्ता कम गटारात पाय घालताना माझ्या पोटात आलेला गोळा मला स्पष्ट आठवतोय. शारीरिक कष्टांच्या अतिरेकानं रोजच्या जगण्याच्या पलीकडच्या विचारांची ताकदच हरवलेले पालक !
ह्या मुलांना शिक्षणाची गोडी का वाटावी? शिकलं की नोकरी मिळेल हा एकच अस्पष्ट आशेचा धागा किती काळ यांना शाळेकडे नेऊ शकणार? भल्या-बुर्याचा तोल राखणारा विचार ह्यांच्यात कसा रुजणार? खर्या अर्थाने ह्यांचे पालक कोण?
आपल्याला हे जमेल का? झेपेल का? नक्की काय करायचं? अशा संभ्रमात असताना पालकनीतीच्या मित्रवर्गाचा, ‘आपण एकटे नाही’, ह्या भावनेचा आधार मिळाला. मर्यादांच्या जाणीवेसकट खेळघराची सुरुवात झाली.
औपचारिक विषयांच्या चाकोरीतून बाहेर पडून, जाणून घेण्याच्या कुठल्याही गोष्टीचं वावडं नसलेलं, खुलं असं खेळघराचं स्वरूप नजरेसमोर उभं राहू लागलं. इथे माहिती करून घेण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी शक्य तेवढी साधनं असतील, जागा असेल नि गरज पडली तर मार्गदर्शनाची सोय असेल असं ठरलं.
सुरुवातीला मुलं खेळतील, रमतील, त्यांच्या मनात येईल ते करत राहतील, मी फक्त कडेकडेनं तिथं असेन… अशी कल्पना होती. पण प्रत्यक्षातला अनुभव वेगळा होता. मुलं बोलणं तर सोडाच, नजर वर करून बघायचीही नाहीत. त्यांना माझ्या घरी अवघडल्यासारखं व्हायचं, मोकळेपणा वाटायचा नाही. दुसरं माझ्या बाजूनं, त्यांचे धुळीनं भरलेले पाय, खरजेच्या चिघळलेल्या जखमा, डोक्यातल्या उवा, यामुळे मीही अस्वस्थ व्हायची. माझ्या मध्यमवर्गीय चौकटीत हे बसायचं नाही. त्यांनाही माझ्या नजरेतून जाणवत असणार. दरी तर खूप मोठी होती. दोन्ही बाजूंनी अंतर चालून जायची गरज होती आणि समजेची अपेक्षा साहजिकच माझ्याकडून जास्त होती. मुलांच्या मनांपर्यंत पोचण्यासाठी, एकमेकांच्या स्वच्छ ताणरहित स्वीकारासाठी प्रयत्नांची गरज होती. मला परिघावर राहून चालणार नव्हतं.
मुलं इथं रमतील ह्यासाठी नवनवीन कल्पना शोधून काढू लागले. गोष्टी, गाणी, खेळ हे तर होतेच, पण आवर्जून गप्पांसाठी वेळ ठेवायचो. त्यांच्या विषयांमध्ये, भावनांमध्ये मी मनापासून रस घ्यायची. माझ्यासाठी एक नियम करून घेतला होता. खेळघराच्या वेळात मुलांना अगदी मज्जा, धमालच यायला हवी. अजिबात चिडा-रागवायचं नाही. आरोग्याच्या, स्वच्छतेच्या प्रश्नांवरही आम्ही बोलू लागलो. आल्या आल्या हात-पाय स्वच्छ धुणे, प्रसंगी गुंड्या कपडे शिवणे, याचबरोबर डॉ. विनयने सांगितलेली औषधंही वापरू, पुरवू लागलो. मुलांकडून घरात येणार्या संसर्गावर प्रसंगी उपाय आणि काही वेळातर दुर्लक्षही करायला शिकले. ह्या सगळ्यातून त्यांच्या-माझ्यात माया, एक प्रकारचा अकृत्रिम संवाद निर्माण व्हायला मदत झाली. मुलांची कोवळीक, उत्स्फूर्तता, आशावाद, मला उभारी देत होता. तर कुणीतरी आपल्याशी मायेनं बोलतं, आपलं म्हणणं ऐकून समजावून घेतं, हाक मारल्यास नक्की ओ मिळेल अशी एक जागा मुलांच्याही मनात निर्माण होत होती. खेळघराच्या उपक्रमातून नक्की काय शक्य आहे हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं. घडलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवर विचार करणं, शब्दांमधून, कलांमधून ते व्यक्त करणं नि त्या विचारांनुसार प्रत्यक्ष वागायला सुरुवात करणं ही वाट स्पष्ट होऊ लागली.
माहिती हा ज्ञानसंपादनाचा एक छोटा भाग. खरं तर ज्ञानाची, नवनवीन गोष्टी जाणून घेणं, त्या करून पाहाण्याची आच निर्माण होणं, ती मानसिकता घडणं हा खरा शिक्षणाचा हेतू ! हे घडण्यासाठी मोकळेपणा, वातावरण व संधी मिळवून देणं हे खेळघराचं काम !
शनिवारच्या खेळघरासाठी आठवडाभर मनात आखणी चालू असते. एखादी बातमी, वाचनात आलेला लेख, गोष्ट, मी आवर्जून बाजूला काढून ठेवते. वर्तमानाशी धागा जोडणार्या त्या गोष्टीनं खेळघराची सुरुवात होते. त्यातला विचार पुढे नेणारी चर्चा होते. मुलं त्यात रमली तर पुढे जाऊन त्या संदर्भात लिहितात, चित्र काढतात, डॉ. मोहन देशपांड्यांच्या ‘आरोग्याच्या गावा जावे’ मधले उपक्रम, फर्गसन कॉलेज रस्त्यावरच्या वृक्षतोडीची पालिकेची मोहीम व त्याला होणारा पर्यावरणीय संघटनांचा विरोध, मेळघाटमधील कुपोषण असे वेगवेगळे विषय चर्चेसाठी घेतले जातात.
पक्षीमित्र मिलींद गुप्त्यांच्या सकाळमधील लेखांनी खेळघरात चैतन्य आणले होते. दोनेक महिने आम्ही त्यांचं सदर वाचायचो, मग मुलं त्यांना दिसलेल्या पक्ष्यांबद्दल बोलायची, ‘आपली सृष्टी-आपले धन’ मधून आणखी माहिती शोधून काढायची. पक्ष्यांची चित्रं काढायची, त्यावर गोष्टी रचायची. धमाल यायची. मग त्यांची घरटी, वीणीचा हंगाम, पंखांची रचना ह्याबद्दलही आम्ही माहिती मिळवायचो.
मुलांच्या वैयक्तिक किंवा वस्तीतल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा होेते. त्यातून आपण काय करू शकतो अशा पर्यायांचा विचार होतो. त्यानुसार प्रत्यक्ष वस्तीत जाऊन संबंधित व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न होतो.
अर्थात मधूनच मूडनुसार गंभीर विषयांना फाटा देऊन चक्क गाण्याच्या भेंड्या, स्मरणशक्तीचे शब्दांचे खेळ, कॅरम, टीव्ही ह्यांचंही वावडं नाही. मुलांना बाहेरचं जग पाहायला मिळावं, निरनिराळी प्रदर्शनं, उपक्रम, भाषणं त्यांच्यापर्यंत पोचावेत असाही प्रयत्न असतो.
भाषा, भूगोल, इतिहास ह्या विषयांसंदर्भातल्या मुद्याबद्दल बोलायला मला आवडतं. पालकनीतीच्या गटातील मंडळीही त्यांच्या त्यांच्या विषयांवर मुलांशी बोलायला येतात. नीलिमा विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करून सोपेपणानं समजावून देते. ओरिगामीत काही अडलं की मुलांना नीलिमामावशीची आठवण येते. संजीवनीचा काहीतरी नवीन, वेगळा अनुभव मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असतो. रमेशबरोबर मुलं चित्र-रंगामध्ये रमतात. एकटीच्या कामातला एकसुरीपणा ह्यातून कमी होतो.
सुरुवातीला मुलांच्या चित्र, गोष्टी, गप्पा यापेक्षा दंगा, गच्चीवरचा झोका, टीव्ही ह्याकडचा असलेला ओढा स्पष्ट जाणवायचा. पण हळूहळू चित्र काढण्यात, पानांपासून चित्र तयार करण्यात, मातीकामात तासंतास रमू लागली आहेत. वेळ असला की त्यांचे हात सहजपणे पुस्तकांकडे जाऊ लागलेत. त्यातही त्यांची निवड चांदोबा, चाचा-चौधरीच्या बाहेर जायला सुरुवात झाली आहे. दुसरीत शिकणारी बारा वर्षांची रेश्मा अक्षराला अक्षर लावून ‘आशा’ हे जनवाचन संघटनेचं पुस्तक पूर्ण वाचून काढते. त्यावर भरभरून बोलायला बघते. त्यातल्या काही गोष्टी तिला पटतही नाहीत. मुलांना हव्या असणार्या गोष्टीसाठी मुलं माझ्याकडे हट्ट धरतात. क्वचित टीव्हीसारख्या गोष्टींना मी नाही म्हटल्यावर वादही घालतात. नजर उचलून वर बघायलाही तयार नसणारी ही मुलं… थेट डोळ्यात पाहून वाद घालताहेत हे पाहू मी मनातून खूष होते.
एकमेकांना समजावून घेत, सुरुवातीच्या अस्वस्थतेतून मुलं आणि मीही काही अंशी बाहेर आलो, असं जरी म्हटलं तरी पुढ्यात प्रश्न आहेतच. मूळचे ग्रामीण भागातले, अशिक्षित-अर्धशिक्षित असे ह्या मुलांचं पालक शहरी उपनगरांमध्ये मिळेल त्या जागेत, मिळेल त्या मिळकतीत संसार उभे करतात. त्यांना हरघडी नवीन प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्याचे पडसाद-परिणाम मुलांवरही घडतात. कधी एखाद्या हुषार कष्टाळू मुलीचं आठवीत असतानाच अचानक लग्न ठरतं. कधी एखादा मुलगा अचानक खेळघरातून गायब होतो. नंतर कळतं की भागत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी आई व मुलांना गावी पाठवून दिलं. कधी एखादं १०-१२ वर्षांचं, शाळेचं तोंडही न पाहिलेलं मूल खेळघरात यायला लागतं. अशा प्रसंगातून मी अस्वस्थ होऊन जाते. ह्या मुलांची जीवनशैली, प्रश्न आपल्या ताकदीबाहेरचे आहेत हे ही जाणवतं. त्यांची परिस्थिती, हलाखी अंगावर येते. आपण किती पुरे पडणार? त्यात नक्की किती गुंतायचं? असे अनेक प्रश्न पडतात.
अशातच बाळूचा प्रसंग घडला आणि मी आतून हादरले. मागच्या वर्षाची गोष्ट. खेळघरातल्या ७ वीतल्या बाळूला पोलिसांनी पकडून नेलं. खिडकीच्या गजातून आज शिरून चोर्या करणार्या मुलांच्या टोळीमध्ये तो आहे असा पोलिसांना संशय होता. मुलांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या. परीक्षा बुडून चालणार नव्हतं. मी त्याच्या आईवडिलांबरोबर चौकीत गेले. अत्यंत मग्रूर आणि उग्र अशा त्या पोलिसी साम्राज्यात बाळू केविलवाणा दिसत होता. मला पाहाताच त्याचा चेहरा उजळला. परीक्षेपुरतं म्हणून पोलिसांनी त्याला सोडलं. सतत धास्तावलेल्या, असुरक्षित वातावरणात, त्याच्या घरी त्याचा अभ्यास होणार नाही म्हणून मी त्याला माझ्या घरी घेऊन आले. तशा ताणात त्यानं परीक्षा दिली. बाळू परत पोलीस स्टेशनवर हजर झाला. वस्तीतली
५-५० माणसं ‘बाळू तसा नाही’ म्हणून निर्वाळा देत होती. बाळूच्या सुटकेबाबत मी वारंवार इन्स्पेक्टरांकडे चौकशी करत होते. पण ‘असं करून आमच्या तपासाच्या मध्ये तुम्ही पडू नका’, असं त्यांनी स्पष्टपणे बजावलं. मात्र त्याला रात्री ठेवून घ्यायचं नाही, दिवसा ११ ते ५ आम्ही आणून घालू ही अट मान्य केली. पुढे ७-८ दिवस बाळूचे वडील त्याला चौकीत पोचवत होते. मीही माझ्या कामात बुडाले. पुढं बाळू पूर्ववत खेळघरात यायला लागला. खूप उशिरा मला कळलं की ह्या प्रकारात त्याच्या वडिलांना दोन हजार रुपये खर्च आला.
मी खूप अस्वस्थ झाले. माझं नक्की कुठं चुकलं? अशा प्रसंगातून काय करायला हवं? ह्या प्रश्नांबरोबरच ह्या मुलांना जगावं लागणार्या असुरक्षित, अनिश्चित आयुष्याच्या दर्शनानं मी हबकले देखील. गुन्हेगारीचं जग ह्यांच्या दारातच उभं आहे. थोडासा घसरणारा पायही कधी गर्तेत घेऊन जाईल, समजणारही नाही. छोट्या छोट्या गरजेच्या गोष्टीही हाती लागत नसलेल्या ह्या मुलांना त्या जगापासून दूर ठेवणं किती अवघड आहे !
ह्या प्रसंगानंतर खेळघराचं शनिवारचा ३ ते ५ वेळातला अनौपचारिक वर्ग एवढंच माझ्या मनातलं स्वरूप पुसलं गेलं. आपल्या कामाची मर्यादा म्हणून ह्या प्रश्नांना दूर ठेवणं, दिवसेंदिवस कठीण जाऊ लागलं. अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग एखाद्या मुलाला आयुष्यातून उठवायला पुरेसा ठरू शकतो. अशा प्रसंगात त्यांना भक्कम आधार मिळायला हवा. आपल्याच्यानं होईल तेवढं करायचं. स्वतःची ताकद वाढवायचा प्रयत्न करायचा, सभोवतालच्या लोकांनाही कामात सहभागी करून घ्यायचं ह्या दिशेनं प्रयत्नांना सुरुवात झाली. पालकनीतीची मित्रसंस्था ‘प्रयास’ने आर्थिक मदत देऊ केली. शिक्षणापासून वंचित मुलांना शाळा प्रवेशाला मदत, औपचारिक अभ्यासाला मार्गदर्शन मिळवून देणं, संकटप्रसंगी उपयोगी पडेल असा निधी जमा करणं, वस्तीत पालकांशी संवाद होण्यासाठी पालकसभा घेणं, अशा अनेक वाटा दिसू लागल्या.
‘आपल्या वस्तीसाठी आपणच काही केलं पाहिजे’, ही जाण तयार होऊन आमचा बालचमू पुढे जाऊन काही काम उभं करेल अशी स्वप्नं आम्ही पाहू लागलो. त्याची सुुरुवात म्हणून खेळघरातल्या चर्चांना जोडून प्रत्यक्ष काही कृती कार्यक्रम घेता येतील का? ह्याचा विचार सुरू झाला.
अधिकाधिक करण्यातून, पुढे जाण्यातूनच ही अस्वस्थता निमणार आहे, ह्याची प्रखर जाणीव होत आहे. मागे वळून पाहाताना, सगळंच काही शब्दात बसत नाही, विशेषतः चुका सांगायच्या राहून जातात, हे मला समजतंय. ह्या मर्यादांसकट आज पालकनीतीच्या वाचकांसमोर हे सगळं मांडावं असं वाटलं.