प्रज्ञांचे सप्तक
शिक्षणाचा एक हेतू क्षमता-विकसन हा असावा हे अनेकांनी मांडलेले आहे. क्षमता असते आणि ती विकसित होते, होऊ शकते यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड नाही. अजूनही काहींची ‘मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा संगणक’ आणि ‘आकार देऊ तसे किंवा डाटा भरू त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व तयार होते’ अशी कल्पना आहे. तर काहींचा संपूर्ण विश्वास ‘मूल आपल्यासोबत खास काही घेऊन येते, तेच व्यक्त होते’ असा आहे.
बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त बाब असून त्यात जीवनभरात फरक पडत नाही असे म्हटले जात होते. मूळ क्षमतेत फरक पडतो की नाही ही गोष्ट वेगळी पण बुद्धिमापनासाठी जी चाचणी वापरली जाते त्या पद्धतीची परीक्षा एकदा देऊन, पुन्हा दिली तर त्या ओळख झालेल्या परीक्षेत माणूस अधिक गुण मिळवू शकतो हे मात्र सिद्ध झालेले आहे.
बुद्धिमत्तेचे अनेक पैलू आता मांडले गेले आहेत आणि एकाच व्यक्तीत वेगवेगळ्या पैलूंमध्ये कमीअधिक वेगवेगळ्या क्षमता दिसत असल्याचे म्हटले आहे. वैज्ञानिक आधाराची बाब बाजूला ठेवली तरी आपल्यालाही विशिष्ट माणसांमध्ये काही खास क्षमता इतरांहून जास्त असल्याचे जाणवते, आणि तेच माणूस दुसर्या एखाद्या गोष्टीत अगदी सामान्य दर्जाचे असल्याचेही जाणवते.
याचे कारण त्या त्या विषयात मिळालेल्या वा न मिळालेल्या संधी निगराणीतही असू शकते. त्याचबरोबर मुळात काही असावे आणि संधी निगराणीच्या मदतीने ‘ते’ वाढवताही येते, असे अवतीभोवतीच्या माणसांकडे बघताना वाटत राहते.
हॉवर्ड गार्डनर यांनी हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑव्ह एज्युकेशन येथे या विषयावर एक संशोधन प्रकल्प केला. प्रज्ञेच्या वैविध्यपूर्ण अस्तित्वाचा अभ्यास करताना त्यांना सात प्रकारच्या
प्रज्ञा दिसल्या. प्रज्ञांचे हे सप्तक त्यांनी पुढीलप्रमाणे विशद केले आहे.
हे सप्तक पाहाताना प्रत्येक प्रज्ञाप्रकाराबद्दल एका व्यक्तीच्या विशेष क्षमतांची आठवण करून घेऊ. त्या त्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीचे उदाहरण घेतले आहे. ही व्यक्ती त्या विशिष्ट प्रज्ञेच्या बाबतीत असामान्य पातळीवर असेल अशी निवडली आहे. अर्थात प्रौढ वयापर्यंत त्या प्रज्ञेचा विकास केवळ नैसर्गिकच मानता येणार नाही. बौद्धिक-मानसिक दृष्ट्या सामान्यपणे निरोगी व्यक्तीत सर्व प्रज्ञा एकत्रितपणे विकास साधतात. परिणामी जीवनातील चढउतार सांभाळणार्या सुसंस्कृत माणसात लहानपणी दिसणारे प्रज्ञांचे मिश्रण कायम राहत नाही, ते बदलते. प्रयत्न केल्यास कोणतीही प्रज्ञा असामान्य पातळीपर्यंत वर नेता येते. त्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध हवे. ही जबाबदारी शाळांचीही आहे.
१. सांगीतिक (Musical) : यहुदी मेनुहिन वयाच्या तिसर्या वर्षापासून संगीताच्या कार्यक्रमात वाद्ये वाजवत. वयाच्या दहाव्या वर्षी ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिनवादक झालेले होते. (आपल्या लता, आशा, कुमार गंधर्व अशीही अनेक उदाहरणे आठवतील.)
प्रत्यक्ष संगीत-शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यापूर्वीही काहींच्याजवळ संगीताबद्दलची खास समज असल्याचे दिसते. लहानपणापासून बरेवाईट संगीत आपल्या आसपास असते, त्याकडे लक्ष जाणे आणि त्याची भाषेप्रमाणे समजूत येणे हे काही मुले अधिक क्षमतेने करतात. अर्थात त्यासाठी शिक्षक मिळण्याची, उत्तेजन असण्याची गरज असते. ही शक्यता संगीताचे वातावरण असणार्या घरात जास्त साधते पण काही वेळ सुरांत माखलेल्या घरातल्या मुलालाही संगीतात गती नसते.
२. शारीरिक कौशल्य (Bodily, Kinesthetic): बेब रूथ या बेसबॉल खेळाडूचे उदाहरण दिले आहे. १४-१५ वर्षांची मुले खेळत होती. बेब दुसर्या मुलाला ‘ए, नीट खेळ ना’ म्हणाला. त्यावर त्यांच्या शिक्षकाने ‘‘बेब, तुला येते ना नीट खेळता… मग दाखव त्याच्या जागी खेळून’’ असे म्हटले आणि बेब जे खेळला ते असामान्यच!
आपल्याला सचिनचे उदाहरण सुचेल. संधी, योग्य मार्गदर्शन, सराव, मनापासून प्रयत्न एवढ्या शिदोरीवर जगातली कुठलीही गोष्ट जमणे शक्य आहे, हे खरेच, पण तरीही सचिनच्या रोखाने बॉल येतो आणि तो बॅटच्या फटकार्याने षट्कार मारतो, इथे त्या बॉलची गती, दिशा, फटकार्याने त्यात होणारा बदल, आणि षटकाराचा परिणाम यात केवळ योगायोग नाही, तर एक विचार आहे, क्षणार्धात केलेला कृतिपूर्ण विचार. समान संधी, मार्गदर्शन इत्यादी मिळणार्या सर्वांनाच तो इतका दर्जेदारपणे साधत नाही. हे खेळातच नव्हे तर नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प इत्यादीमध्येही दिसते. यहुदी मेनुहिनला सांगीतिक प्रज्ञा हवीच, पण शारीरिक कौशल्य प्रज्ञाही हवी, नाहीतर मनात उमटणारे संगीत प्रत्यक्षात येणार कसे?
३. तार्किक गणिती प्रज्ञा (Logical, Mathematical) : बार्बरा मॅक्लिन्टॉक या शास्त्रज्ञ मक्याच्या दाण्यावर संशोधन करत होत्या. तोपर्यंतच्या त्यांच्या गटाच्या अभ्यासानुसार ५०% मक्याचे दाणे पुननिर्मितीसाठी अकार्यक्षम असतात; असा अंदाज होता. प्रत्यक्षात फक्त २५ ते ३०%च दाणे अकार्यक्षम निघाले, असे का झाले असावे, असा प्रश्न अवचित समोर आला. विचारात गढून बार्बराबाई त्यांच्या कार्यालयात जाऊन बसल्या. त्यानंतर वीस मिनिटांत त्या या प्रश्नाचे उत्तर घेऊन बाहेर आल्या. याआधी हा प्रश्न जाणवला नव्हता, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नाला त्यांनी तर्कपूर्ण गणिताने उत्तर काढले.
तार्किक गणिती प्रज्ञेत विशेष गती असलेले असल्या समस्या सोडवण्याचे काम अतिशय जलद करू शकतात, आणि एकाच वेळी अनेक संदर्भाचा विचार करून सर्वांत सुयोग्य अशा उत्तराचा मार्ग काढतात. प्रज्ञेचा हा प्रकार सर्वांत अधिक ओळखीचा आहे. शिक्षण-क्रमात या प्रकाराला महत्त्व दिलेले आहे. भूमितीतले रायडर्स सोडवणे हे आपल्याला परिचित असलेले एक उदाहरण. पियाजे आणि अनेक मानसशास्त्रज्ञांनी या प्रज्ञाप्रकारावर विशेष लक्ष केंद्रित केलेले होते.
४. भाषिक प्रज्ञा (Linguistic) : टी. एस. इलियट या प्रसिद्ध कवीने वयाच्या दहाव्या वर्षी ‘फायरसाईड’ (Fireside) नावाचे अंक तयार केले. त्यात फक्त त्यानेच लिहिलेले साहित्य होते. असे आठ अंक त्याने तयार केले होते. त्यांतील काही साहित्य आजही उपलब्ध आहे आणि ते कवीची भाषिक प्रज्ञा स्पष्ट करते. भाषिक प्रज्ञेलाही गणिती प्रज्ञेप्रमाणेच प्रसिद्धी आणि सर्वमान्यता आहे. चपखल शब्दयोजना, अभिव्यक्ती आणि कविता समजून घेणे यासारख्या कृतींमधून आपल्याला व्यक्तीमधल्या भाषिक प्रज्ञेची जाणीव होते.
५. अवकाशीय प्रज्ञा (Spatial) : महासागरातील प्रवासात आपण नेमके कुठे आहोत आणि कोणत्या दिशेने जायचे हे ठरवताना, आकाशातील तार्यांची स्थिती, वार्याची दिशा, पाण्याचा रंग, हे खुणेचे दगड असतात. पण आपल्या मनात नकाशा असावा लागतो. आपण हव्या त्याच मार्गाने जात आहोत हे तपासायला ह्या खुणा मदत करतात. पण खुणांवरून रस्ता आखता येत नाही. तो डोक्यात पक्का असावा लागतो. नकाशा-वाचन हे अवकाशीय प्रज्ञेचे एक व्यक्त रूप. एखादी वस्तू वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगळी दिसते. ती कशी दिसेल याचा अंदाज काढणे, किंवा बुद्धिबळाच्या चौसष्ठ चौकोनांत हवी ती वाट शोधणे हेही तसेच. एखाद्या चित्रकार-शिल्पकाराला, तसेच शल्यकुशल सर्जनला अवकाशीय प्रज्ञेची आवश्यकता असतेच.
६. मानवी नातेसंबंधातील प्रज्ञा (Interpersonal Intelligence) : ऍनी सुलिवान आणि हेलन केलर ही गुरु-शिष्येची जोडी प्रसिद्ध आहे. ऍनी-हेलनच्या नव्या ओळखीनंतर जेवणाच्या खोलीतला प्रसंग. ऍनी हेलनला तिच्या ताटलीत हात घालू देईना. हेलनला घरच्यांनी तसे नेहमीच करू दिले होते. मग दोन इच्छांची लढाईच सुरू झाली. ताटलीत हात जाणे, तो बाहेर ढकलला जाणे. घरातले लोक अस्वस्थ होऊन बाहेर निघून गेले. ऍनीने खोलीचे दार आतून लावून घेतले, आणि अर्ध्या तासाने ऍनी शांतपणे खात होती. जमिनीवर हेलन रडत ओरडत, लाथा झाडत होती. हेलनच्या लक्षात आले, रडण्याचा उपयोग होणार नाही. जेवणाच्या टेबलाभोवती फिरून तिने मदत मिळते का हे बघितले, पण घरातले कुणीच तिथे नव्हते. तिने खुर्चीवर बसून आपल्या ताटलीतून हाताने घास खायला सुरुवात केली. ऍनीने तिला चमचा दिला. हेलनने तो फेकून दिला, … पुन्हा एक नवी लढाई सुरू झाली.
ऍनीने हेलनची तडफ, हुषारी न बिघडू देता तिला सौम्यपणा शिकवला. पंधरा दिवसांत हे आश्चर्य घडले. हेलनला भाषेची ओळख झाली. हे कसे घडले याचे उत्तर ‘माणूस जाणण्याची’ ऍनीची विशेष ‘प्रज्ञा’ यामध्ये सापडते. विविध माणसांची मानसिक स्थिती, वागण्याची तर्हा, इच्छा, आवडी यांची जाणीव आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची क्षमता हे या प्रज्ञाप्रकाराचे मुख्य अंग आहे. धार्मिक गुरु, राजकीय पुढारी यांचे म्हणणे समाजाला एवढे का पटते, असा अनेकांना प्रश्न पडतो, त्याचे उत्तरही इथे सापडते. काही व्यक्तींचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव आहे असे आपण म्हणतो, त्याच व्यक्तीत इतरांहून काहीतरी वेगळे आपल्याला जाणवते, ते का, तर ही नातेसंबंधातील संवादाची विशेष प्रज्ञा त्यांच्याजवळ मुबलक असते, समोरच्याचे दृष्टिकोन, विचार नेमकेपणाने समजून त्यांना इच्छित दिशेने वळवणे त्यांना तुलनेने सहज जमते. शिक्षक, मार्गदर्शक, पालकांनी या प्रज्ञाप्रकारात प्रयत्नाने गुणवान बनायला हवे.
७. स्वतःला जाणण्याची प्रज्ञा (Intrapersonal) : व्हर्जिनिया वूल्फ तिच्या भूतकाळाबद्दल लिहिताना मांडते, ‘‘तीन प्रसंग मला विशेषतः आठवतात. त्यांच्याबद्दल मी अनेकदा बोललेय, ते मनाच्या तळातून केव्हाही वर येतात, अगदी अचानकपणे. आज प्रथमच मी ते लिहितेय, आणि मला वेगळंच, आजवर न जाणवलेलं दिसतंय. (हे प्रसंग – भावाशी झालेलं भांडण, बागेत दिसलेलं एक विशिष्ट फूल आणि कुणाच्या आत्महत्येची कहाणी ऐकणं असे आहेत. ते रोजच्या साध्यासुध्या जीवनातलेच आहेत.)
‘‘…माझी खासियत आहे ही, की मला अचानक धक्के घ्यायची सवयच आहे. हे धक्के सामान्य जीवनाच्या व्यवहारातूनच येतात. ते हवेसे असतात असं नाही पण पहिल्या दचकण्याच्या प्रतिक्रियेनंतर त्यांचं महत्त्व मला जाणवतं. पण त्यानंतर मी विचार करते, की या धक्का घेण्याच्या सवयीनंच मला लेखक बनवलंय. धक्का बसला की तो व्यक्त करण्याची ओढ त्यातूनच उगवते. धक्का म्हणजे रोजच्या साध्या व्यवहारामागे लपून बसलेल्या शत्रूचीच कृती. त्यामधूनच मला त्या न दिसणार्या गोष्टीचं अस्तित्व जाणवतं आणि मी शब्दांमधून त्याला प्रत्यक्षात आणते.’’
आपल्याला स्वतःला काय वाटते, काय जाणवते, ते कशामुळे, आपले वाटणे इतरांहून वेगळे आहे ते कसे, हे समजण्याची क्षमता असणे हे या प्रज्ञाप्रकाराचे मुख्य अंग. भाषा किंवा संगीत किंवा अभिव्यक्तीची इतर अंगे ज्यांना अवगत असतात, त्यांची ही क्षमता आपल्यासमोर येते.
स्वतःसह आपण अनेक वर्ष जगतो. स्वतःच्या क्षमता, मर्यादा, सुधारणेच्या जागा, मार्ग, स्वतःला प्रोत्साहन देण्याच्या क्षमता यांची उत्तम जाणीव असणार्या व्यक्ती स्वतःच्या सर्व प्रज्ञांचा पुरेपूर वापर करतात, वाढवतात. स्वतःला पुढे नेतात.
सप्त प्रज्ञांच्या या परिचयातून आपण मानवी क्षमतांची ओळख करून घेत आहोत. आपल्या सर्वांकडेच यातील काही क्षमता विशेष गुणवत्तेने असतात तर काहींमध्ये त्यांची वाढही झाल्याची दिसते. तर्कपूर्ण विचारांनी जीवनातले प्रश्न सर्वच सोडवत असतो. प्रश्नांचे स्वरूपही विविध असते. वेगवेगळ्या प्रज्ञांचे योगदानही प्रश्न सोडवण्यामध्ये आवश्यक असते.
तरीही, काही प्रमाणात या प्रत्येक प्रज्ञेचे स्वरूप स्वतंत्र असल्याचेही जाणवते. एखाद्या व्यक्तीकडे गणिती तार्किक प्रज्ञा विलक्षण आहे, याचा अर्थ त्याला सांगीतिक, भाषिक प्रज्ञाही वरचढ असावीच असा अंदाज काढता येत नाही किंवा उत्तम सांगीतिक प्रज्ञा असणार्याकडे तार्किक गणिती प्रज्ञा फारशी नसल्याचे उदाहरणही डोळ्यांसमोर दिसते.
प्रज्ञांचे हे स्वतंत्र रूप असले तरी जीवनाच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीत प्रज्ञांच्या मिश्रणाची आवश्यकता दिसते. त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध गायक, सतार वादकाला सांगीतिक प्रज्ञेसह शारीर कौशल्य प्रज्ञाही हवी, शिवाय श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी मानवी नातेसंबंधातील प्रज्ञाविशेषाची गरज आहे, आणि कदाचित आपले नाव प्रसिद्ध व्हावे, यादृष्टीने स्वतःची योग्यता वाढवताना स्वतःला जाणण्याची प्रज्ञाही हवी. नृत्यासाठी शारीर कौशल्य प्रज्ञा, अवकाशीय प्रज्ञा, आणि मानवी नाते-प्रज्ञाही लागते. राजकीय नेत्याला मानवी नाते-प्रज्ञेसह भाषिक, तार्किक गणिती, आणि स्वतःला जाणण्याची प्रज्ञाही लागते.
एक गंमत जाणवते, प्रत्येकातले हे मिश्रण सर्व प्रज्ञांच्या बेरजेहून अधिक असते. एखाद्याची प्रत्येक प्रज्ञा सामान्य दर्जाची असूनही त्यांचे योग्य मिश्रण झाल्याने व्यक्ती म्हणून त्याची योग्यता बरीच चांगली ठरते. जीवनव्यवहारातील स्वतःची नेमकी जागा त्याला गाठता येते. यासाठी व्यक्तीमधील प्रज्ञेची, गुणवत्तेची समज त्याला/तिला जीवनाच्या वाटेवर पुढे नेण्यास निश्चितपणे साहाय्य करू शकेल.