वास्तव :बालसाहित्याविषयीच

आजचं मूल उद्याचा सुजाण नागरिक व चांगला माणूस बनण्यासाठी चांगलं साहित्य वाचायची सवय केवढी मोठी भूमिका बजावू शकते हे आपण सारे जाणतो. पण मुलांसाठी चांगले साहित्य कोणते?

माझ्या मते, जे लिखाण/वाङ्मय मुलांना आपलं, आजचं वाटेल, जे रंजक असेल, पण उपदेशपर नसेल, जे वाचकाला जगण्यातल्या आनंदाची व संघर्षाची, निसर्गातल्या विविधतेची अनुभूती देईल, जे श्रेष्ठ जीवन-मूल्यांची थेट ओळख घडवेल, मग ते कल्पना-रम्य असो वा वास्तव; ते चांगलं बालसाहित्य.

तसंच पुस्तकातील प्रत्येक दृश्य घटकाचा (मुखपृष्ठ, वापरलेली जागा, मुद्रिताचा प्रकार) वाचकावर परिणाम घडत असतोच, बाल-कुमार वाचकांवर तर विशेषच. या वयातच वाचनाची सवय लागते. त्यासाठी पुस्तकाची मांडणी, त्यातील चित्रे, विचारपूर्वक वापरायला हवीत. ती नाविन्यपूर्ण, प्रभावी हवीत. त्याने आशय खुलायला हवा, ती लिखाणाच्या शैलीशी सुसंगत हवीत. वाङ्मयाद्वारे आपले भाषेशी व त्याद्वारे संस्कृतीशी नाते जुळते. तसेच चित्रांमुळे वाचकाच्या दृश्य जाणिवा संपन्न व्हायला हव्यात.

पाच सहा वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या मुलासाठी अशी पुस्तके शोधू लागलो. बहुतांशी माझ्याच लहानपणची पुस्तके जवळजवळ तशाच स्वरूपात बघून चांगल्या बालसाहित्याची उणीव फार प्रकर्षानं जाणवली. व्यवसायाचा पूर्वानुभव होताच तर आपल्या परीनं चांगली पुस्तकं द्यायची असं ठरवून ऊर्जा प्रकाशन सुरू केले.

पहिली अडचण आली (आणि आजही आहे) चांगल्या लेखकांची. मराठीत मुलांसाठी एका बांधिलकीनं लिहिणारे (गंभीर या अर्थी) चांगले लेखक जवळजवळ नाहीतच. (मुलांसाठी लिहून नाव, प्रतिष्ठा, पैसा काहीच मिळत नाही हे त्याचे एक कारण. वृत्तपत्र पुरवण्यांमध्ये लिहू ते छापले जात असल्याने उत्तम लिहायची, लिखाणाचे परिष्करण/परीक्षण करायची गरज वाटत नाही हे दुसरे कारण.) त्यामुळे आजवर फक्त पाच स्वतंत्र पुस्तके प्रकाशित केली. चांगले साहित्य बालवाचकांना मिळावे यासाठी आठ भाषांतरे व चार पुस्तके पुनःप्रकाशित केली. मराठी बालवाचकांना चांगले जागतिक वाङ्मयही मिळावे या हेतूने (व व्यावसायिक हेतूनेही) इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन सुरू केले. तसेच चांगल्या मराठी पुस्तकांच्या इंग्रजी भाषांतराचेही काम चालू आहे.
यातील दोन पुस्तकांबद्दल थोडे सविस्तर –

डॉ. गेंडे व मित्रमंडळी
अँड्र्यू डेविस या अमेरिकन लेखकाचं ‘फॅन्टॅस्टिक फीटस् ऑफ बुक्स’ हे मूळ पुस्तक. डॉ. बुक्स हा पशुवैद्य जिराफ, कांगारू, ड्रॅगन, देवमासा अशा निरनिराळ्या प्राण्यांना अडचणीतून कसं सोडवतो, ते छोट्या-छोट्या गोष्टींतून सांगणारं. त्यातली अकल्पितता, सूक्ष्म विनोदबुद्धी, फँटसीचं अंग मला खूप आवडलं.

यातल्या वैद्याचं नाव गोष्टींमधल्या अद्भुत वातावरणाला जुळेलसं, पूर्ण वेगळं असणं आवश्यक वाटलं. त्या दृष्टीनं व प्राण्याचं
नाव म्हणून ‘डॉ. गेंडे’ हे नाव योग्य वाटलं. या कथांमधली अतार्किकता, वास्तवाच्या पलीकडे जाणे, सूक्ष्म विनोदबुद्धी व फक्त कृतीमधूनच दिसणारे डॉ. गेंड्यांचे प्राण्यांवरील प्रेम हे भाषेतून यावे असा प्रयत्न केला.
तसेच कथांचे वातावरण, परिसर परिचित असावा यासाठी काही बदल केले. उदा. मूळ पुस्तकात एका पाळीव, भल्यामोठ्या डुकराची गोष्ट आहे. भटकी, घाणेरडी डुकरे बघणार्यास आपल्या मुलांना डुकराविषयी प्रेम, आनंद वाटणे शक्य नाही. त्यामुळे भाषांतरात डुकराऐवजी म्हशीची योजना केली.

याची चित्रे चित्रकार श्री. राजू देशपांडे यांनी काढली आहेत. कथांमधली वास्तव-अद्भुताची सरमिसळ फॅन्टसी ठसवण्यासाठी त्यांनी प्राण्यांची चित्रे कॉम्प्युटरच्या फोटोशॉपीमधील व बाकी चित्रे हाताने काढलेली असा प्रयोग केला आहे.

याविषयी चित्रकाराची भूमिका अशी : जे साहित्य (उदा. प्राण्यांचे फोटो) सहजपणे उपलब्ध आहे, ते चित्रकाराने का वापरू नये? या साहित्याचा अपेक्षित परिणाम मिळतो की नाही? हे फोटो व हाताने काढलेली चित्रे एकजीव होतात ना? हेच चित्रकाराचे खरे काम आहे.

अनेक बाल-प्रौढ वाचक, साहित्यिक, शिक्षक यांनी हे पुस्तक आवडल्याचे आवर्जून सांगितले. पुण्याच्या अक्षरनंदन शाळेतील बालवाडी ते चौथी या वयोगटाचे गेली चार वर्षे ते अतिशय आवडते पुस्तक आहे.

हरिण बालक
मूळ पुस्तक द ईअरलिंग : लेखिका : मार्जोरी किनन रॉलींग्ज,
भाषांतर : भा. रा. भागवत.

या पुस्तकाचे श्री. राम पटवर्धन यांनी केलेले ‘पाडस’ हे भाषांतर मराठीत क्लासिक समजले जाते. त्याच पुस्तकाचा त्याच सुमारास (१९५५ मध्ये) केलेला हरिण बालक हा संक्षिप्त अनुवाद. भा. रा. भागवतांनी जागतिक उत्तम वाङ्मयाचा खजिना मराठीमध्ये आणला. तोही रसाळ,
प्रवाही भाषेत, याही पुस्तकात सुमारे एक तृतियांश पानांमध्ये मूळ कादंबरीतील वातावरण, महत्त्वाचे प्रसंग, व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केल्या आहेत.

प्रसिद्ध चित्रकार श्री. चंद्रमोहन कुलकर्णींनी याचे मुखपृष्ठ व आतील चित्रे काढली आहेत. कादंबरीचा नायक ज्योडी याचा कोवळेपणा, निसर्गाकडे बघण्याची त्याची नवलाई व ममत्वाची दृष्टी, अमेरिकेतील निसर्ग, चित्रकाराने अतिशय मोजक्या रेघांमध्ये साक्षात उभा केला आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद, त्याची मांडणी, छपाई अशा प्रत्येक गोष्टीत श्री. चंद्रमोहन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

पुस्तक विक्री व वितरण
महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या भारतात आघाडीवर आहे. उच्च मध्यमवर्ग व श्रीमंत वर्गाची संख्या लक्षणीय आहे. परंतु यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातच शिकावे असे वाटते. चांगली पुस्तकं, मग ती मराठी असोत वा इंग्रजी, मुलांनी वाचावीत असे त्यांना वाटत नाही. जगण्याचा संघर्ष, वाढलेली गती, मुलांची भावी करिअरसाठीची तयारी, यामुळे पालक-पाल्य यांना वाचनासाठी वेळच नाही. त्यात प्रसिद्धी माध्यमं देत असलेली स्वस्त, पलायनवादी, बटबटीत करमणूक त्यांना पुरेशी वाटते.

चांगली पुस्तकं मुलांपर्यंत पोचणं, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होणं ही आपली जबाबदारी आहे असं समजणार्याष शाळा, शिक्षण संस्था, शिक्षण तज्ज्ञ हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही नाहीत.
आजही मुलांच्या पुस्तकांची ५० टक्क्याहून जास्त खरेदी राज्य सरकारमार्फत होते. ती कशी होत असेल हे सांगण्याची गरज नसावी.
त्यामुळे दहा कोटी लोकसंख्या, काही हजार ग्रंथालयं, कित्येक हजार शाळा असलेल्या महाराष्ट्रात चांगल्या पुस्तकाच्या पाचशे प्रती वर्षाला खपल्या, तर जुने, प्रतिष्ठित प्रकाशकही स्वतःची पाठ थोपटून घेतात ही वस्तुस्थिती आहे.

बालसाहित्यात काय यायला हवे
ललित साहित्याचे वास्तववादी व अद्भुत असे दोन ढोबळ गट करता येतील. कल्पनेच्या भरार्यास मुलांना आवडतातच, तसे लेखनही मराठीत नाही, ते यायला हवेच आहे. परंतु वास्तववादी लिखाणातही आजच्या मुलांचे जगणे, त्यांची दुःखं, आनंद, सामाजिक, आर्थिक, तांत्रिक बदलांमुळे त्यांच्या आयुष्यात घडलेले बदल अद्याप आलेलेच नाहीत.

सहजपणे सुचणारे काही विषय असे
१) आपल्या जवळपास वावरणार्याह आर्थिक निम्नस्थितीतील माणसांचे (उदा. कामवाल्या बाई, रिक्षा काका) जगणे, त्यांची परिस्थिती.
२) मुलांची पौगंडावस्था, तारुण्याची चाहूल – त्यावेळी घडणारे बदल.
३) आपल्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील जगणे.
४) महापुरुषांना आपण देव्हार्यागत कोंडून ठेवले आहे. पण त्यांचे कोणते मोठेपण मुलांना जाणवते? मुलांची मनःस्थिती समजून मुलांचा व या माणसांच्या विचाराचा संबंध दाखवणारे लिखाण.
५) पर्यावरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण
६) नवे शास्त्रीय शोध, तांत्रिक प्रगती व आपले जगणे.
मी वर मांडलेले विचार बहुतांशी कुमार – किशोर गटासंबंधीच आहेत. शिशु व बाल गटासाठीही नाविन्यपूर्ण, आजच्या काळाशी सुसंगत पुस्तकांची खूप आवश्यकता आहे.
यातील बालसाहित्याचा दर्जा व विक्री याविषयीचे विचार अनेकांना एकांगी, निराशावादी वाटतील. पण पाच वर्षे या क्षेत्रात काम केल्यावर जे वास्तव मला दिसते, ते असेच आहे. ते नोंदवणे मला आवश्यक वाटते.
तुम्हा-आम्हा सर्वांच्या सहभागाने ही परिस्थिती बदलेल अशी आशा व्यक्त करून हा लेख संपवतो.

ऊर्जा प्रकाशनची काही पुस्तके
१) डॉ. गेंडे व मित्रमंडळी २) हरिण बालक
३) मुग्धाची रंगीत पार्टी ४) शूर गांडुळे आणि इतर कथा
५) बाहुलीचे घर ६) एकनाथांचे गाढव
७) माझी आफ्रिका