‘श्रमिक सहयोग’ – एक अनुभव

‘श्रमिक सहयोग’ या संस्थेबद्दल काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं. चिपळूणजवळच्या सह्याद्रीच्या दर्याखोर्यातल्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीचा हा प्रयास आहे. इतर अनेक सामाजिक संस्थांप्रमाणेच हे एखादं रचनात्मक काम असावं असं वाटलं होतं. त्यावेळी या कामाविषयी विशेष उत्सुकता जाणवली नव्हती. पण नुकतीच त्यांची एक पुस्तिका (वंचितांचे शिक्षण : एक प्रयोगशील उपक्रम) वाचनात आली. त्यातून त्यांच्या कामाची आणि त्यामागच्या भूमिकेची ओळख झाली.
हे काम म्हणजे कुणीतरी सामाजिक कामाच्या ‘नुसत्या ऊर्मीतून’ चालू केलेलं नाही, तर त्यामागे ठोस भूमिका आहे. जिथल्या लोकांसाठी काम करायचं, त्यांच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास आहे, मुलांच्या खर्या शैक्षणिक गरजांविषयी कळकळ आहे. हे नक्की काही तरी ‘वेगळं’ आहे असं वाचताना जाणवलं.
मग ‘त्यांचं काम पाहून येऊ, एक-दोन दिवस त्यांच्यात राहून, शाळेचं काम समजून घेऊ’ असं ठरवून
मी, शुभदा व सुषमा चिपळूणजवळील ‘प्रयोगभूमी’त गेलो. आमच्या दीड दिवसांच्या मुक्कामात जे अनुभवलं, जे भावलं ते मांडावंसं वाटतं –

चारी बाजूंनी डोंगर, वळणदार घाटरस्ता पार करून आल्यावर दिसणारी शाळेची एकमजली टुमदार इमारत, जवळच कोयनेच्या चौथ्या टप्प्याचं कोळकेवाडीचं धरणाचं पाणी दिसतंय – अगदी स्वप्नवत असणारी ही ‘प्रयोगभूमी’, चित्रात दिसावं तसं सगळं…. प्रथमदर्शनी अगदी हरखून गेलो मनात. शाळेच्या एका हॉलमधे सूर्यास्ताचं वर्णन असणारी कविता शिकवली जात होती. हॉलखालच्या छोट्या खोलीमधे आमची उतरायची सोय केली होती. मुलांचा तास संपेपर्यंत

आम्ही फ्रेश झालो. आणि गप्पा मारताना आधीच्या चित्रवर्णनाला दोन छेद मिळाले –

पहिला म्हणजे धरणाचं पाणी इतकं जवळ आहे पण शाळेत सरकारी नळ नाही. पंप बसवून टाकीमधे पाणी भरून ठेवायची सोय केली आहे. पण उन्हाळ्यात पाण्याचे हालच!

दुसरा धक्का असा की शाळेच्या चारही खोल्यांमधे वीज नाही आणि शाळेवरून बाराशे मेगावॅटच्या सहा-सात तारा घोंघावत आपल्या सारख्या शहरांसाठी वीज पाठवताहेत.

सगळ्यांना समान संधी, समान हक्क, शिक्षण, प्रगतीच्या वाटा वगैरे लिहिणारे – बोलणारे आपण – आणि अगदी मूलभूत सोयी सुविधांपासूनही वंचित असणारी ही मुले. सगळा विरोधाभास. पाच-दहा कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, गावांमधे वीज आहे. मग तिकडे जाऊन शिकण्यापेक्षा ही मुलं इथं का राहतात? कोणत्या पंखांची ऊब त्यांना इथं मिळतेय? कोणत्या प्रेरणेनं इथले शिक्षक शहराच्या झगमगटात न ओढले जाता चाळीस-पन्नास मुलांचे मायबाप बनून राहिलेत? कोण आहेत हे सगळे? मनात प्रश्नांची वावटळ उठली – आमच्या खोलीबाहेरून मधेच येऊन बघणारी, कुणी आत येऊन ऐकणारी ती मुलं, गुरुजी, (मोहिते बंधू, पवार सर) आणि या कामाचे संस्थापक आणि मार्गदर्शक राजन इंदुलकर यांच्याशी गप्पा मारायची उत्सुकता वाढली.

दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आपापली ताटं घेऊन मुलं गोलाकार बसली. मुलांपैकीच तीन-चार जणांच्या गटाने चुलीवर स्वयंपाक केला होता. (दररोज हा स्वैपाकी गट बदलतो आणि चक्राकार पद्धतीनं सगळेच स्वैपाकाची कामं शिकतात.) भात-उसळीचं ते साधंसं जेवण सगळे भुकेनं, आनंदानं जेवत होते. माझ्या शहरी मुलांचे जेवणाचे ‘नखरे’ आठवल्याशिवाय राहिले नाहीत… जेवताना मधेच ‘आमचं काय चाललंय’ बघत होते (कारण आम्हीही निघताना जेवणाचे डबे नेले होते.)

जेवणानंतर दुपारची वेळ आरामाची. काही बैठे खेळ, थोडा अभ्यास. गुरुजींनी खेळायला पाठवले, म्हणून छोटी मंडळी आंब्याच्या गार सावलीत गेली. तिथंच दोघी-चौघींनी आपली चूल-बोळकी मांडली. एक जण झाडावर चढून जाडसर फांदीवर मस्त आडवा झाला. एकाने पानांच्या खळग्यात चीक घेतला आणि सेफ्टीपिन बुडवून झकास फुगे काढले. आंब्याच्या पारावर छान बालमेळा भरला.

संध्याकाळी ‘पाय मोकळे’ करायला टेकडीवर जायचं ठरलं. मला बूट घालताना दोघींनी विचारलं – ‘हे कशाला घालता? पाय घसरंल, तसंच चढा’. सगळी पोरं गलका करत धावत सुटली. (आम्हाला जाडसर काठ्या हातात देऊन!)
दगड-माती, चढणं-घसरणं कशाची भीती नाही की पर्वा ! दम नाही, उसंत नाही – थेट पठारापर्यंत पळत गेली. एक-दोन जण ‘आम्ही कसे लवकर येत नाही’ बघत पुन्हा अर्धी टेकडी उतरून खाली आले – वर गेले! पठारावर करवंदाच्या

पांढर्याशुभ्र जाळ्या फुललेल्या. भुंग्यांसारखी सगळी झेपावली आणि ती फुलं खाऊ लागली. आम्हालाही मुठी भरून ती आंबट-गोड चव चाखायला लावली. पुढची अवघड चढण चढतानाही पोरं भराभर चालली होती – मोकळी, स्वच्छंदी!
‘हा निसर्ग’ आणि ‘ही मुलं’ अशी विभागणी इथं नाहीच. त्यांच्या तना-मनात माती भरलीय. मोकळी हवा, डोंगरातली झाडं-पक्षी हे त्यांच्यापासून वेगळे नाहीतच.

हास्यास्पद गोष्ट अशी की या निसर्ग पुत्र-पुत्रींनी आपले शाळेचे पाठ्यपुस्तकातले ‘डोंगरावरची सहल’ सारखे धडे गिरवावे असं अपेक्षित आहे. ज्यांचा डोंगर सखा, शेतं-झाडं-फुलं मित्र, त्यांना आपण घोकायला लावणार – ‘‘आमची सहल एका डोंगरावर गेली. तिथून झुळूझुळू वाहणारा झरा, हिरवीगार डुलणारी शेते असे विहंगम दृश्य…..’’ वगैरे!

सूर्यास्त झाल्यावर अंधार पडला. दोन सोलर ट्यूब घेऊन वरच्या मोठ्या हॉलमधे सर्वजण जमले. तबला, ढोलकी, पेटी गोळा झाली. आणि आपल्या गांधर्व विद्यालयाला लाजवील असे संगीताचे धडे गिरवले जाऊ लागले. शाळेतली चार-पाच मुलं आठवड्यातून एकदा चिपळूणला जाऊन शास्त्रीय संगीत शिकून येतात आणि उरलेले सर्वजण त्यांच्याबरोबर दररोज (हो, दररोज) गातात. कुणीही कंटाळलेले नाही, तक्रार नाही, ‘सिनेमा’ वगैरेची गाणी नाहीत, वाद्यांसाठी झटापट नाही. सगळे मनापासून, डोलत गाताहेत. शास्त्रीय संगीताच्या धड्यांनंतर त्यांची पारंपरिक गाणी सुरू झाली. संथ, शांत अभंगांसारख्या गाण्यांपासून ठेकेदार लोकनृत्याची गाणी झाली – एकाहून एक बहारदार! पुन्हा एकदा तीच तन्मयता –

‘संगीत’ आणि ‘मुलं’ वेगळी नाहीतच मुळी!!

पाऊण-एक तासाच्या गायनानंतरचा अनुभव तर अंगावर रोमांच उभा करणारा! एक मधे ढोलकी घेऊन वाजवतोय आणि त्या वेगवेगळ्या तालांवर सगळेजण बाजूनं नाचताहेत – सहज-सुंदर हालचाली, अंगात ताल भिनलेला. ना संकोच, ना ‘स्टेप्स’ शिकवायची गरज! नाचण्यासाठी गाणी नाहीत, शब्द नाहीत – केवळ ताल ! आदिवासींचा डबा डान्स हा विशेष प्रकारही पाहिला. जसजसा ढोलकीचा वेग वाढतोय तशा हालचाली बदलून ढोलकीला मागे टाकू बघताहेत. लहान-थोर, गुरुजी, इंदुलकर सगळे नाचताहेत, थिरकताहेत – उत्साहाचा जल्लोष! बाहेरचा अंधार, त्याच्या बाजूचे डोंगर, सगळे मुलांच्या या नृत्याविष्काराची रोज नक्की वाट बघत असणार!!

प्रयोगभूमीच्या निवासी शाळेतलं हे मुलांचं वाढणं खूप नैसर्गिक आहे. त्यांच्या आई-वडिलांपासून, घरापासून थोडी दूर असली तरी तुटलेली नाहीत. गुरुजींची मायेची पाखर आहे – त्यांना हवं-नको बघणारी पण त्यांचं मोकळेपण जपणारी!

‘गोरगरिबांसाठीच्या’ सरकारी योजना, ‘सोशल वर्क’ साठी अहमहमिकेनं पुढं सरसावणारी कॉर्पोरेटस्, अमुक कल्याण; तमुक welfare – यांच्यातला फोलपणा आपल्याला आधीच माहीत असतो. मात्र श्रमिक सहयोगाचं हे गेली दहा वर्षे, निमूटपणे, सातत्याने चाललेलं काम पाहिल्यावर बाकी योजनांचं दैन्यच समोर येतं. श्रमिक सहयोगाने शाळा मुलांपर्यंत नेली, त्यांची भाषा शिकून घेऊन नंतर त्यांना प्रमाणभाषेकडे अलगद नेलं. शाळेच्या भिंती बांधून वाट बघत बसले नाहीत. मुलांमधला निसर्ग जपला, शिकणारा-शिकवणारा अशी दरी निर्माण न करता सगळ्यांनी ‘शिकायची’ जागा ठेवली. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळा-शिक्षकांची संख्या, वाढ अशा ‘संख्यात्मक’ मूल्यमापनात हे काम अडकलेले नाही. गवळी-धनगर व आदिवासी-कातकर्यांच्या सामर्थ्यसंपन्न सांस्कृतिक जीवनात पठडीबद्ध, पुस्तकी शिक्षणाची ढवळाढवळ न होऊ देता खर्या अर्थानं ‘वंचितांच्या विकासासाठी’ शैक्षणिक पाऊल उचलले आहे. या उपक्रमाची सफलता मुलांच्या गुणात्मक वाढीमधे आहे. उपक्रमाची उद्दिष्टे, भूमिका, मुलांच्या जवळ जाऊन केलेले प्रयोग हे अनेक संस्था-व्यक्तींना मार्गदर्शक ठरतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या कामाविषयी सविस्तर ओळख आपल्याला पुढील चार-पाच महिने त्यांच्या लेखांमधून होईलच.