सल
शक्य नाही. माझी मुलगी चोरी करणं शक्य नाही. रबर, पेन्सिल, पेनं असल्या क्षुद्र गोष्टींची चोरी तर मुळीच नाही. तिला लागणार्या सगळ्या वस्तू-पुस्तकं, वह्या, कंपासपेटी, पेन-पेन्सिल – सगळं आम्ही शाळा सुरू होण्यापूर्वीच आणून देतो. अहो, आम्ही दोघंही कमावतो आहोत – तिला लागेल ते सगळं देण्यासाठीच ना?’’ मुलीची आई ठामपणे शाळेच्या मुख्याध्यापिकेसमोर सांगत होती.
‘‘कदाचित तिच्याकडून काही वस्तू हरवत असतील. शाळेत येताजाताना, घरी इकडे-तिकडे ठेवताना वस्तू हरवतात. काही मुलींमध्ये वेंधळेपणा असतो, कधी थोडा निष्काळजीपणाही असू शकतो.’’ मी वर्गशिक्षक या नात्याने तिला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती आणखीनच उसळून बोलू लागली –
‘‘मुळीच नाही. माझं माझ्या मुलीवर बारीक लक्ष असतं. अधूनमधून मी तिचं दप्तर तपासत असते. वह्यापुस्तकं पाहते. आम्ही सर्व चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वापरतो. मुलीचे कपडेसुद्धा इस्त्रीचे असतात.’’ तिनं आपल्या साडीच्या पदरावरून हात फिरवीत मुलीकडे अंगुलिनिर्देश केला. ‘‘अगदी हेअरपिन-रिबिनसकट सर्व व्यवस्थित करूनच मी तिला शाळेत पाठवते. खाण्याच्या डब्यातही रोज नवनवा पदार्थ असतो. नुसती भाजी-पोळी नाही ! तिला आणखी भूक लागली तर चांगलं खाणं घेण्यासाठी पैसेही दिलेले असतात. चोरी कशासाठी करील ती?’’ माझ्याकडे आणि मुख्याध्यापिकाबाईंकडे आळीपाळीने पाहात ती तावातावाने बोलत होती.
‘‘तुम्ही माझ्या समक्षच मुलीला विचारा ना’’ – तिनं अखेरचा बिनतोड सवाल टाकला. पण १२-१३ वर्षांची ती मुलगी गीता मान खाली घालून थरथरत उभी होती. विचारल्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नव्हती.
‘‘वर्गाच्या मॉनिटर मुलीनं तर तिला इतरांच्या दप्तरांतून वस्तू काढताना प्रत्यक्ष पाहिलं आहे-पकडलं आहे’’ मी खुलासा केला.
तेव्हा ती आणखीच क्षुब्ध होऊन म्हणाली, ‘‘कुभांड आहे सारं. मुलींना तिच्याबद्दल मत्सर वाटत असावा. शाळेतल्या सामान्य मुलींहून अधिक चांगल्या क्वालिटीचे कपडे-वस्तू तिच्यापाशी असतात म्हणून.’’ आणि किंचित् थांबून माझ्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकीत मुख्यबाईंना ती म्हणाली, ‘‘या कुभांडात वर्गशिक्षकाचाही इतर मुलींना पाठिंबा असावा. त्यामागे काही हेतू असावा !’’
हल्ला थेट माझ्यावर होता. मी मुख्यबाईंकडे अपेक्षेनं पाहिलं. त्यांनी चटकन् उत्तर दिलं, ‘‘हे पहा मुलीच्या आई, माझा माझ्या शिक्षकवर्गावर पूर्ण विश्वास आहे. मी मुलींकडेही आधी नीट चौकशी करून पूर्ण खात्री करून घेतली आणि नंतरच तुम्हाला बोलावणं पाठवलं. अनेक मुलींच्या तक्रारी महिनाभर चालू होत्या.’’
मुख्यबाईंच्या उत्तरानं मला थोडा दिलासा मिळाला. पण तरीही मूळ प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. गीता अतिशय गांगरून मान फिरवून उभी होती. तेवढ्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. मी सावधपणे बाईंना म्हटलं, ‘माझा अकरावीवर तास आहे, तो चुकवून चालणार नाही. आपण ३-४ दिवसांनी पुन्हा यांना बोलवू. तोपर्यंत अधिक चौकशीही करू’’ बाईंनी मान हलवून रूकार दिला. मी वर्गावर शिकवायला सुरुवात केली, पण आतून अस्वस्थच होतो…
मी त्या शाळेत नव्यानंच शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. खरं तर महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी सोईच्या वेळेत जवळपास मिळालेली नोकरी, म्हणून हे काम स्वीकारलं होतं. शाळेत बहुतांश मुली कनिष्ठ मध्यम वर्गातल्या आणि काही कामगार वर्गातल्या होत्या. काळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दोन वर्षांचा. मुलींना शिकवणं समाजाच्या सर्व थरांत तेव्हा पोचलेलं नव्हतं. सेवादलाचा सैनिक म्हणून काम करताना मी सामाजिक सर्वेक्षण केलं होतं. शिक्षणाच्या समस्येकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यामुळे मला लाभली होती. सातवीनंतर अनेक मुलींना शालेय शिक्षण सोडावं लागत होतं, याची जाणीव झाली होती.
शाळेत मला वर्गशिक्षक म्हणून सातवीचाच वर्ग योगायोगानं मिळाला होता. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होताना, आरंभीचे एक-दोन दिवस थोडे मोकळ्या वातावरणाचे असत. तेव्हा मी एक नवी पद्धत माझ्यापुरती सुरू केली. वर्गासाठी माझी एक स्वतंत्र नोंदवही तयार केली. त्यात प्रत्येक विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र पान ठेवून, त्यावर विद्यार्थिनीचे पालक (आईवडील) त्यांचा व्यवसाय, घरातील माणसं/भावंडं – त्यांचं वय, शिक्षण, उद्योग, इ. नोंदी मी संक्षिप्तपणे केल्या. तसंच मुलीच्या आवडी-निवडी, छंद, इत्यादीची नोंद करून ठेवली. वर्षभरातल्या प्रत्येकीच्या सर्वांगीण प्रगतीची वा अन्य निरीक्षणे एकत्र लिहून तिच्या व्यक्तित्वविकासाचा वर्षअखेर अंदाज घ्यायचा, असा माझा हेतू होता. शाळेत उद्भवणार्या लहानमोठ्या समस्या सोडवताना ही वही मला वाटाड्या म्हणून नेहमी उपयोगी पडे.
शाळेच्या मधल्या सुट्टीत डबे खाण्यासाठी बहुतेक मुली बाहेर जात. त्या काळात दप्तरांतून वस्तू चोरीला जात असल्याची तक्रार माझ्याकडे आली, तेव्हा मी माझी नोंदवही चाळून पाहिली. गरीब कुटुंबातल्या मुली तर खूप आस्थेवाईक आणि नम्रपणे वागणार्या होत्या. वर्गातलं वातावरण मी खेळीमेळीचं ठेवीत असे. प्रतिकूल परिस्थितीत शिकण्यासाठी धडपडणार्या मुलींबद्दल तर मला विशेष सहानुभूती वाटे. त्यामुळे कुणाहीबद्दल शंका घेऊन वर्गात जाहीर चौकशी करणं मला उचित वाटेना. आपुलकीच्या आवाहनाचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा विश्वासू मॉनिटरला सावधपणे पाळत ठेवायला सांगितलं आणि तिनं गीताला प्रत्यक्ष चोरी करताना पकडलं. विषय स्वाभाविकपणे मुख्याध्यापिकेकडे गेला.
गीताचं घर चौकोनी कुटुंबाचं. आईवडील दोघंही सुशिक्षित, धाकटा भाऊ नुकता प्राथमिक शाळेत जाऊ लागलेला. स्वतः गीता इतर मुलींपेक्षा उंचनिंच आणि रुबाबदार. तिच्या वागण्यातही सुखी कुटुंबातली संतुष्टता दिसे. अन्य कुठलीही वाईट सवय असल्याची शंका तिच्याबाबत कुणालाही नव्हती. वर्गात तिच्याही काही मैत्रिणी होत्या; पण त्यांनाही तिच्या या सवयीची काही कल्पना नव्हती. सर्वांच्या नकळत ती हे करीत असे, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे गूढता आणखी वाढली.
त्या दिवशी आईसमोर झालेल्या चर्चेतही ती काहीच बोलली नाही. नंतर आईबरोबर तीही घरी निघून गेली, आणि दोन दिवस शाळेत आली नाही. आईनं कदाचित तिला कायमचं या शाळेतून काढून दुसरीकडे पाठविण्याचा विचार केला असावा, असे तर्कवितर्क सुरू झाले. तिच्या वर्गमैत्रिणी, नव्हे सर्व वर्गच तिच्याबाबत थोडा हळवा झाला. मलाही थोडं अपराधी वाटू लागलं. हे चोरी प्रकरण मीच नीट चौकशी करून संपवायला हवं होतं, अशी चुटपुट मनाला वाटत राहिली. ‘सर्व उलगडा होईपर्यंत या गोष्टीची सर्वत्र चर्चा करू नका, घरी दारी कुणाला सांगू नका’, असं मी वर्गातल्या मुलींना सांगून ठेवलं.
वर्गशिक्षक म्हणून माझा त्या वर्गावर नेहमी पहिला तास असे. तिसर्या दिवशी मी पाठ्यपुस्तकातले तुकारामाचे अभंग शिकवायला सुरुवात केली होती. ‘‘जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा…. मृदु सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त….’’ इत्यादी अभंग चरणांचं स्पष्टीकरण सुरू झालं होतं. आणि अनपेक्षितपणे ‘मे आय् कम् इन् सर?’ असा वर्गाच्या दारातून प्रश्न आला. गीताच दारात उभी होती. खाली मान घालून अपराधी स्वरात नम्र प्रश्न तिनं विचारला होता. ‘येस्, कम् इन्’ एवढंच उत्तर देऊन मी अभंगाचा भावार्थ सांगणं सुरू ठेवलं. मुलींना आकलनात्मक प्रश्नही विचारले. गीताच्या उशिरा येण्याचं कारण वगैरे काही तिला विचारलं नाही. पुढल्या अभंगातल्या ‘जेथे दया क्षमा शांती | तेथे देवाची वसती’ या चरणाचं स्पष्टीकरण करताना मी दैवी गुणांची महती सांगितली. निरनिराळ्या संतमहंतांच्या जीवनातली उदाहरणं दिली. साने गुरुजी, म. गांधींपासून येशू ख्रिस्तापर्यंत अनेकांचे दाखले दिले. सर्व वर्ग ह्या विवेचनात रंगून गेला. मीही रंगलो… गीता शांतपणे शेवटच्या बाकावर जाऊन बसली होती. तल्लीन होऊन ऐकत होती. तास संपताना तिला जवळ बोलावून, मधल्या सुट्टीत भेटून जायला सांगितलं.
मधल्या सुट्टीत भेटायला आली, तेव्हा खूप घाबरलेली होती. शिक्षकांच्या विश्रामकक्षाला लागून, निवांत वाचनासाठी वापरावयाची एक छोटी खोली होती. तिथे तिला मी घेऊन गेलो. बोलायला कशी सुरुवात करावी, याबद्दल मी काही ठरवलेलं नव्हतं. ती आत येऊन समोर उभी राहिली, तेव्हा तिच्या मुद्रेवर मनातल्या प्रचंड कोलाहलाचं दडपण स्पष्ट दिसत होतं. मला वहीतल्या नोंदीमधील एक गोष्ट आठवली. गीता आईवडिलांचं पहिलं अपत्य होती. धाकटा भाऊ तिच्यापेक्षा बराच लहान. तिला मोठं भावंड नव्हतं….
मी अंतःप्रेरणेनं बोलून गेलो, ‘‘गीता, तुला मोठा भाऊ नाही. मीच तुझा ‘दादा’ आहे – असं समज. आणि मला सर्वकाही विश्वासानं सांग – मोकळेपणानं सांग. तुला कसलीही शिक्षा होणार नाही, न घाबरता तुझ्या दादाजवळ मन मोकळं कर…’’
माझ्या या आपुलकीच्या आश्वासनामुळे असेल, पण माझं हे बोलणं ऐकताच, एखादं धरण फुटून पाण्याचा लोंढा धो धो उसळत बाहेर पडावा, तशी हुंदके देऊन ती रडली. तिला शांत करायला मला बरेच प्रयास पडले. पण नंतर तिनं डोळे पुसत सांगितलेली कहाणी विलक्षण होती….
तिची आई स्वभावानं अतिशय करारी आणि कडक शिस्तीची होती. नोकरीत बढती मिळवून मोठी ऑफिसर होण्याची तिची इच्छा होती. समाजात प्रतिष्ठा व मानाचं स्थान मिळविण्यासाठी ती सतत धडपडत होती. आपल्या मुलांवर प्रेम करण्यापेक्षा, त्यांना धाकात ठेवून आपल्या मर्जीप्रमाणेच त्यांना ती वागवीत असे. या बाबतीत गीताच्या वडिलांनाही ती जुमानत नसे. वडील त्यांच्या कंपनीत थोड्या मोठ्या हुद्यावर होते; पण स्वभावानं सौम्य होते. आईवडिलांचे पुष्कळदा मतभेद होत, पण आपलंच म्हणणं खरं करण्याची आईची वृत्ती होती. लहानपणापासून आईची प्रेमळ माया अशी गीताला कधी मिळालीच नव्हती. धाकट्या भावाच्या जन्मानंतर तिला त्याची अधिक जाणीव झाली. आपल्या मैत्रिणींच्या आणि शेजारपाजारच्या आया मुलांवर कसं जिव्हाळ्यानं प्रेम करतात, हे तिनं पाहिलं होतं आणि आपल्याला हे सुख कधीच मिळालं नाही. या जाणिवेनं ती अस्वस्थ झालेली होती. कसली तरी रिकामी जागा आपल्या मनात – जीवनात राहून गेली आहे, असं तिला वाटत होतं. आईच्या खर्या प्रेमाची-वात्सल्याची-ती भुकेली होती…. तिनं या शब्दांत नाही हे सांगितलं. माझ्या छोट्या मोठ्या प्रश्नांची तिनं जी उत्तरं दिली, त्यांचा भावार्थ मी इथे नमूद केला आहे.
‘‘तुझं दुःख मला समजलं. पण वर्गात चोरी करायला तू का लागलीस? आणि चोरलेल्या वस्तूंचं काय केलंस? तुझ्यासाठी आईनं तर सर्व वस्तू घेऊन दिल्या होत्या. मग इतरांच्या त्याच वस्तूंची चोरी कशासाठी केलीस?’’ या माझ्या प्रश्नांवर ती म्हणाली – ‘‘मला नाही सांगता येत मी हे का केलं ते. मधल्या सुट्टीत इतर मुली डबे खात बसल्या, की एकमेकींना घरच्या गोष्टी आनंदानं सांगतात – आईबद्दल, भावंडाबद्दल प्रेमानं बोलतात. मला तसं काही सांगता येत नाही. मग मी एकटीच बाजूला बसून माझा डबा खाते. तेव्हा मला कसंतरीच वाटतं. मग एकटीच लवकर वर्गात परत येते. सगळ्यांची दप्तरं मला भरलेली दिसतात आणि माझं एकटीचं रिकामं !… मग मी काय करते ते माझं मलाच कळत नाही.’’ ‘‘इतरांच्या दप्तरांतून काढून घेतलेल्या वस्तूंचं काय करतेस?’’
‘‘मला एक छोटं कपाट दिलं आहे आईनं. त्याच्या एका कप्प्यात मागल्या बाजूला त्या वस्तू लपवून ठेवल्या आहेत मी – आईला दिसणार नाहीत अशा. तुम्ही आईला सांगू नका. कुणालाच सांगू नका..’’ ती रडतच म्हणाली.
‘‘नाही सांगणार कुणाला – पण त्या एक दिवस माझ्याकडे आणून दे. तुला मुळीही शिक्षा होऊ देणार नाही, असं कबूल केलंय ना मी ! आता डोळे पूस आणि निर्धास्तपणे वर्गात जाऊन बस.’’
ती निघून गेल्यावर तिच्या हकीगतीने सुन्न होऊन मी विचार करीत बसलो. काहीशा अर्धसमजुतीच्या या वयात तिला आपल्या जीवनातली एक पोकळी नुकतीच जाणवू लागली होती. उमलत्या वयात आईचं प्रेम आणि आधार मुलीला अधिक उत्कटतेनं हवा असतो. तो मिळत नसल्यानं ती आतून बेचैन झाली होती. आणि स्वतःला नकळत, तिच्या दृष्टीनं भाग्यशाली असणार्या इतर मुलींच्या दप्तरातल्या वस्तू उचलून आणून आपल्या जीवनातली पोकळी-एक रिकामा कप्पा-भरून टाकत होती. आईच्या प्रेमाची भूक भागविण्याचा तिच्या अबोध मनाचा हा वेडा प्रयत्न होता.
मी लावलेला हा अर्थ गीताला समजण्यासारखा नव्हता. तिच्या आईला समजावून सांगण्याइतका अधिकार मला नव्हता. पण गीतानं एके दिवशी सर्व वस्तू गुपचूप माझ्याकडे आणून दिल्या. त्या मी मॉनिटरकरवी जिच्या तिला देण्याची परस्पर व्यवस्था केली. गीताला मुळीही न हिणवता, तिच्याशी प्रेमानं वागण्याचं सर्व मुलींनी ठरवलं. तिला वर्गाच्या खेळ-नाटुकलं, सहल, इ. उपक्रमांत आम्ही कटाक्षानं सामील करून घेतलं. मी वर्गशिक्षक म्हणून ह्या उपक्रमांचा संयोजक असे.
त्या काळात गीता आणि इतर मुली मला ‘सर’ ऐवजी ‘दादा’ म्हणून केव्हापासून संबोधायला लागल्या ते माझ्या लक्षातच आलं नाही… या सर्व मुली शालांत परीक्षा पास होऊन जाईपर्यंत ते नातं कायम राहिलं… त्यानंतरही गीता माझ्या कायमची लक्षात राहिली.
नंतरच्या काळात महाविद्यालयातील आमची एक वर्गभगिनी अशीच कुणाकुणाची पुस्तकं पळवीत असलेली इतरांच्या लक्षात आली. कुटुंबाचा एकमेव आधार असलेले तिचे वडील एकाएकी निवर्तल्यामुळे ती सैरभैर झाली होती. वर्षअखेर ती कॉलेज सोडून गेल्यावर हे आम्हा मित्रमंडळीना कळलं आणि आम्ही खूप हळहळलो. आम्हाला तिच्यासाठी काही करता आलं नाही.
पुढे आमचं कुटुंब राहात असलेल्या चाळीत अशीच एक घटना सर्वांच्या लक्षात आली. चाळीच्या मागल्या बाजूला एक लांबलचक गॅलरी होती. त्या गॅलरीतून कुणाच्याही स्वयंपाकखोलीत शिरता येत असे. दुपारच्या रिकाम्या वेळी चाळीतल्या गृहिणी पुढलं दार बंद करून मागल्या दारानं एकमेकींच्या घरात गप्पा मारायला जात. हळूहळू काहींच्या लक्षात आलं की, आपल्या स्वयंपाकघरातलं एकादं भाडं वा वस्तू गायब होऊ लागली आहे. आधी गड्या-मोलकरणींबाबत शंका आली. पण अधिक तपास केल्यावर आढळलं की, वस्तू लपवून नेणारी गृहिणी चाळीतली सर्वात श्रीमंत मध्यमवयीन गृहिणीच होती. कमलाबाई तिचं नाव. तिच्याकडे दोन डबलरूम होत्या. उत्तम फर्निचरने सजविलेल्या होत्या. तिचा नवरा एका कंपनीत मोठा अधिकारी झाला होता. त्याला कंपनीकडून स्पेशल गाडी मिळाली होती. चाळीतल्या ७०-८० बिर्हाडांपैकी दाराशी गाडी उभी असलेलं तेव्हाचं ते एकमेव भाग्यशाली कुटुंब होतं. पण काही दिवसांनी कंपनीतून परत येताना नवर्याबरोबर रोज एक तरुणी गाडीतून येत असल्याचं कमलाबाईंच्या लक्षात आलं आणि तिचा कोंडमारा सुरू झाला. घरात मुलगा-सून यांच्यापाशी वा बाहेर कुठे बोलणं अवघड झालं असावं. नवरा दुरावल्यासारखा झाल्यामुळे निर्माण झालेली ‘शून्यता’ भरून काढण्यासाठी, सुखी कुटुंबातून वस्तू पळवणं, ही कोंडी फोडण्याची कमलाबाईची अभावित धडपड होती.
गरज नसताना केलेली चोरी ही बहुतांश अबोध मनानं शोधलेला एक मार्ग असतो. त्यामागे त्या व्यक्तीच्या अंतर्मनाला झालेली जिव्हारी जखम असते – एक मोठा छुपा घाव असतो – जो सोसता येत नाही, आणि सांगता येत नाही. अजाण वयापासून प्रौढावस्थेपर्यंत कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीकडून असे कृत्य घडू शकते. ते वारंवार घडत राहिले म्हणजे तिचे पर्यवसान अनिष्ट सवयीत होते. समाज त्या व्यक्तीकडे ‘गुन्हेगार’ म्हणून पाहतो. पण वस्तुतः तो जाणीवपूर्वक केलेला गुन्हा नसतो. ‘आतून’ एक प्रकारची ‘सक्ती’ होते आणि व्यक्ती काहीशी असाहाय्य, हतबल होऊन त्या ‘तणावातून’ मुक्त होण्यासाठी ते आक्षेपार्ह कृत्य करून टाकते. म्हणजे अशी व्यक्ती वस्तुतः एका दुःखाची ‘बळी’ असते.
लहानपणी आई वा वडील यांचं अंतःकरणपूर्वक प्रेम न लाभलेली मुलं अशी छुप्या मार्गाकडे वळण्याची अधिक शक्यता असते. ‘उणिवे’ची जमेल तशी ‘भरपाई’ करणं हा मानवी अंतःप्रेरणेचा धर्म असतो. आजच्या काळात ‘व्यवसाय’ वा ‘करियर’चा महत्त्वाकांक्षी मार्ग चोखाळण्याची वृत्ती पालकवर्गात वाढते आहे. त्यातून उद्भवणार्या संभाव्य धोक्याचं हे एक ओझरतं दर्शन. मूल ज्यासाठी भुकेलेलं असतं ते निखळ प्रेम त्याला देणं, हाच त्यावरचा खरा आणि दीर्घकालीन उपाय आहे.