एअरबोर्न टू चेअरबोर्न

Magazine Cover

अनिलकुमारांशी घडलेली भेट आपल्या काळजाचा ठाव घेते. एखाद्या चित्रपट कथेत बसेल अशी ही कहाणी आपल्या डोळ्यांपुढून हलत नाही. त्यांच्या इंडियन एक्स्प्रेसमधल्या लेखांमधून त्यांची जागृत संवेदनशीलता दिसत राहते. आणि बोलतानाची जीवनाविषयीची तटस्थता, परिस्थितीचा स्वीकार, कमालीची वस्तुनिष्ठता चकित करत जाते. संवेदनक्षम मन, प्रखर बुद्धी, विश्लेषण आणि मांडणी, आपल्या भावनांविषयीची स्पष्ट जाणीव आणि विचारांची सुस्पष्टता असे अतुलनीय मिश्रण घेऊन आलेली ही व्यक्ती आपल्या पुढच्या घडणीसाठी एक नवा दृष्टिकोन देऊन जाते.

पुर्वावलोकन Attachment Size
Airborne to chairborne.pdf 157.41 KB

वयाच्या नवव्या वर्षी मी सैनिक स्कूल (काझुकुट्टम, केरळ) मधे प्रवेश घेतला. चार भावंडांमधला मी एकटाच बोर्डिंग स्कूलमधे जाऊ लागलो. बोर्डिंग स्कूल म्हणजे दंगा, कुणी अभ्यासाची कटकट करणार नाही – असा काही तरी माझा समज होता. सैनिक स्कूलच्या त्या कडक शिस्तीच्या व अभ्यासाच्या ओझ्याने माझा गैरसमज लवकरच दूर झाला. शाळेचा अभ्यासक्रम व खेळ अशा दोन्ही डगरींवर आम्हाला आमचे शिक्षक चांगले दमवून घेत. मुख्य म्हणजे ते शिक्षक नुसते पाठ्यपुस्तकी ज्ञान देत नसत, तर चांगला माणूस घडवण्यासाठी आवश्यक नीतिमूल्ये ठसवत. त्यामुळेच ते आमचे आई-बाप, आदर्श होते. भारतीय सैन्य/वायुदलातील अनेक उच्चविद्याविभूषित, धैर्यशील शिक्षकांच्या तालमीत आम्ही तयार होत गेलो.

सैनिक स्कूलमधील शिक्षणाने पाया भक्कम झाल्यावर १९८१ मध्ये एनडीएला (खडकवासला) प्रशिक्षणासाठी आलो. इथेच मला ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ (Best Air Force Cadet of 65th Course) हे पारितोषिक मिळालं. पुढील शिक्षण मी Air Force Academy, सिकंदराबादमधे घेतलं. तिथेही पासिंग आऊट परेडचं ‘Best in Aerobatics for 134th Course’ बक्षिस मिळालं. डिसेंबर १९८४मधे मी इंडियन एअरफोर्समधे ‘लढाऊ वैमानिक’ (Fighter pilot) म्हणून रूजू झालो. एअरफोर्समधले MIG जातीच्या विमानांचे प्रशिक्षण घेऊन पठाणकोट, पंजाबमधे १९८६ च्या जानेवारीत ‘मिग-२१’ दलात आलो. वायुदलातले ते सगळेच दिवस प्रचंड कामाचे, सततच्या धावपळीचे होते.

२६ दिवसांसाठी मी तात्पुरत्या ड्यूटीवर HAL, ओझरला जाऊन आलो होतो. फ्लाईट लेफ्टनंट संजीव यादवने सगळ्या ‘अविवाहितांना’ रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते. २८ जून १९८८ ची रात्र. काम संपवून मी ऑफिसर्स मेसच्या दिशेने मोटरबाईकवर निघालो. त्या दिवशीच्या हवामान अंदाजानुसार ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. लवकर पोहोचण्यासाठी मी ‘टेक्निकल एरिया गेट’ मधून बाहेर पडलो. पावसाचे थेंब माझ्या हेल्मेटवर पडून थोडे अंधुक दिसू लागले. आणि अचानक बाईकच्या दिव्याच्या प्रकाशात मला एक लाकडी अडसर दिसला. सव्वीस दिवसांपूर्वी तो तिथं नव्हता. पाऊस पडत होता व मध्यरात्र होती. तिथे कुणी गार्ड असेल व तो जागा असेल असे न वाटल्याने मी त्या अडथळ्याखालून जाण्याचा विचार केला. मोटारबाईक व मी त्याच्याखालून जात होतो. पण तिथे गार्ड होता, त्याने मला पाहिले होते व मला जाणे सोपे व्हावे म्हणून त्याने तो लाकडी अडसर दूर करण्यासाठी केबिनमधे जाऊन त्याने लिव्हर उचलली.

तो लाकडी बार वर उचलण्याअगोदर तो ज्यात अडकवलेला असतो तिथून खाली खेचून थोडा बाजूला घेऊन वर उचलला जातो.

मी आडवा होऊन त्या बारखालून जायला व तो बार त्या अडथळ्यातून खाली येऊन बाजूला यायला एकच गाठ पडली व त्यामुळे तो बार माझ्या मानेवर येऊन आदळला व मी तिथेच खाली बेशुद्ध होऊन पडलो. हेल्मेट असून मानेवर मार लागला. मानेच्या मणक्यांना फ्रॅक्चर झाले त्यामुळे त्या पातळीवर मज्जारज्जूला इजा झाली – जबरदस्त. C4-C5 लेव्हलला मार लागला.

सैनिकी हॉस्पिटल, पठाणकोट नंतर मला मानेच्या surgery साठी आर्मी हॉस्पिटल, दिल्लीमधे पाठवले. या सर्व काळात मी मधून मधून शुद्धीवर येत असे. अशाच एका क्षणी मी माझ्या मानेच्या स्थितीविषयी डॉक्टरांना विचारले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून माझी खात्री पटली होती की माझे दोन्ही हात-पाय लुळेच राहणार कारण याविषयी आम्ही शिकलो होतो. १९८४ साली ‘स्क्वॉ. लीडर त्यागी’ यांनी आम्हाला आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे प्रशिक्षण दिले होते. विमानातून अचानक बाहेर पडताना महत्त्वाचे म्हणजे posture. त्यांच्या त्या लेक्चरने किती तरी वेळा ‘मानेच्या मणक्यांची’ काळजी घेण्याविषयी बजावले होते. त्यामुळे आता माझे दोन्ही पाय व दोन्ही हात कायमचे चेतनाशून्य झालेत पण श्वासोच्छवासाचे स्नायू वाचलेत. काही प्रमाणात अजून त्याचाही त्रास होतो. पण मी माझा श्वास घेऊ शकतो.

या प्रसंगानंतर गेटवरच्या गार्डपासून अनेकांना अनेक जण दोष देत राहिले. माझ्या दृष्टीने मात्र यात इतर कुणाचाच किंचितसुद्धा दोष नाही. आपल्यावरच्या परिस्थितीला, आपणच संपूर्ण जबाबदार असतो. ही शिकवण अजूनही माझ्या मनात घट्ट आहे. त्यातल्या त्यात मी माझ्या Reflexes (उत्स्फूर्त हालचाली) जास्त चांगल्या हव्या होत्या असे मानतो कारण फायटर पायलटच्या, क्षणाच्या उशीरानंही राष्ट्राचे केवढे नुकसान होऊ शकते !
अर्थात या अपघाताने माझी सर्व स्वप्ने धुळीला मिळवली. माझ्या आई-वडिलांवर, मित्र-आप्तेष्टांवर आभाळ कोसळले. उत्तमोत्तम वैद्यकीय सेवांची चाचपणी झाल्यावर अखेर मला एप्रिल ९० मधे नोकरीवरून कमी करण्यात आले. व खडकी, पुणे येथील Paraplegic home मधे हलवण्यात आले. माझ्या परावलंबी आयुष्याला सुरुवात झाली. कोणत्याही सक्षम, स्वाभिमानी माणसाला वाटेल तितके दुःख मला झाले. जेवणखाणापासून ते अगदी क्षुल्लक माश्या हाकलण्यासाठी सुद्धा मला साहाय्यकावर अवलंबून राहावे लागते. पण परिस्थितीचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही.

‘माझ्याच बाबतीत हा प्रसंग का? माझे काय चुकले? माझ्या वाट्याचे भोग’, अशा पद्धतीचा विचार मी करत नाही. मला सैनिकी शाळेत ‘परिस्थितीचा स्वीकार’ करायला चांगले शिकवले आहे. माझे व्यक्तिमत्त्व माझी शाळा, एनडीए आणि विमानातली उड्डाणं या तीन ठिकाणच्या अनुभवांनी घडले आहे. या पद्धतीच्या शिक्षणामुळेच मला अन्न-वस्त्र-निवारानंतर व्यक्तीची अस्मिता (Dignity) आणि आदर (Respect) सर्वात महत्त्वाचा वाटतो. मी अपयशी ठरलो तरी हरकत नाही. पण या दोन कण्यांमधे वाकणार नाही, अशी माझी धारणा आहे.

आपल्यावर अवलंबून राहणार्या माणसाला मातीमोल ठरवणारी मंडळी मी पाहिलीयत. आणि दुसरीकडे माझ्यावर जीव टाकणारी, मदत करणारी माणसंही. १९९० मधे खडकीला आल्यावर काही दिवसांनी या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले. तोंडात पेन्सिल धरून कशाबशा रेघोट्या मारायला सुरुवात केली. तीन-चार आठवड्यांच्या अविश्रांत प्रयत्नानंतर मला किंचित आत्मविश्वास आला. आणि श्रीमती शीला जॉर्ज (ज्यांनी मला तोंडाने लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले) त्यांना मी काही ओळीचे पहिले-वहिले ‘मुखलिखित’ पत्र पाठवले. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आता मी माझ्या लोकांशी पत्राने संवाद साधू शकत होतो. माझ्या आयुष्यातली पोकळी भरून काढू शकत होतो.
१९९१, मे मधे मला हनुवटीने वापरता येणारी चाकाची खुर्ची देण्यात आली. त्यामुळे तर मी अधिकच स्वावलंबी होऊ लागलो.

१९९२ साली माझे पूर्वीचे फ्लाईट कमांडर मुरलीधरन यांनी मला संगणकाच्या वापरासाठी प्रोत्साहित केले. विंग कमांडर जोग आणि डॉ. ए. कुलकर्णी यांनी मला संगणकीय भाषांचे धडे दिले. त्याचबरोबर हार्डवेअर कंपन्यांनी विशिष्ट पद्धतीचा संगणक, की-बोर्ड तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले. की-बोर्ड बदलून हवा होता तोंडात काडी धरून role करून trackball फिरविता येईल तसेच control – shift / किंवा Alter – shift अशी double operations करता येतील अशी सोय असणारा. DSCN3930.JPG कारण मी एकावेळेस एकच ‘की’ दाबू शकतो. असा key-board करून मिळायला देखील मला एक-दीड वर्ष वाट पाहावी लागली. माणसं येत होती, काय हवं बघत होती, पण किती बनवू विचारत. एकच हवा आहे म्हटलं की त्यांचा रस कमी व्हायचा व काहीबाही कारण सांगून ती काढता पाय घेत. त्यामुळे कॉम्प्युटर येऊनही तो पूर्णपणे वापरता येण्यासाठी खूप अडथळे पार करावे लागले. त्या अडचणी सोडवण्यासाठी दुसर्यांवर अवलंबून राहावे लागले. तेव्हा निराश न होता ते होईपर्यंत प्रयत्न करत राहणे हेच माझ्या हातात होते. शेवटी इफ्तेकार सय्यद या पुण्यातील एका धडपड्या तरुणाने दोन वर्षे चिकाटीने काम करून मला हवा तसा की-बोर्ड बनवून दिला. माझ्या Squad मधे मी नेहमीच ‘Techie’ गणला जायचो. मुरलीधरन नेहमी मला विचारत, ‘‘IIT मधे जायचे सोडून तू इकडे एनडीएला कसा वाट चुकलास?’’ माझ्या संगणकीय शिक्षणात मला काहीच अडचण आली नाही. स्वकीयांशी संवादाची एक वाट आता क्षणाच्या अंतरावर आली !

तोंडात पेन धरून लिहायला लागल्यावर अनंत अडचणींचा सामना करावा लागला. headwriting.jpg प्रथम कागद आडवा, डोळ्यांच्या व तोंडाच्या समोर स्थिर ठेवणे. त्यासाठी मग लाकडी स्टँड बनवून घेतला (त्याला वरून खालून आधार देऊन ज्यावर कागद pin up केला जाईल). त्याचे माझ्यापासूनचे अंतर ठरविणे व ते मला आरामदायी होण्यासाठी पण खूप दिवस गेले. तोंडात पेन धरून पेन कागदाला चिकटवले तर अंतर खूपच कमी होऊन डोळे दमायचे. मग ते लांबवण्यासाठी पेन्सिल उपयोगी पडली. प्रथम पेन्सिलनेच सराव केला. कायम ती तोंडात घट्ट पकडून ठेवणे हे अवघड आहे, पण सरावाने आले. गाल/ओठ दमून जात. आपल्याला हवे ते हव्या त्या ठिकाणी येण्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागली. प्रथम खूप मोठं अक्षर यायचं. मग हळूहळू चिकाटी व मेहनतीने ते छोटं झालं. मग एका ओळीत काढणं. या सगळ्या म्हणजे प्रत्येकच गोष्ट कष्टसाध्य. त्यातून खूप वेळ एकाच जागी बसणं हेही मला माझ्या स्थितीमुळे अशक्य. दोन-तीन तासाच्या वर एका स्थितीमधे मी राहू शकत नाही. पोझिशन बदलावी लागते. हीसुद्धा एक अडचण होती.

ह्या सगळ्या अडचणींवर मात करत, एकेक अडचण आली की त्यावर तोडगा काढत, दोन वर्षात मी उत्तम प्रकारे लिहू लागलो. १९९३ मधे इंडियन एक्सप्रेसने Citizen साठी ‘Turning point in my life’ या विषयावर लेखांची स्पर्धा घेतली. या स्पर्धेमधे मी माझा ‘Airborne to chairborne’ लेख पाठवला – तो देखील तोंडात पेन धरून लिहून. अक्षर पाहून कुणाचाच विश्वास बसला नाही. त्यांचा एक गट येऊन मला भेटून गेला व खात्री पटल्यावर त्या लेखाला बक्षीस मिळाले. तसेच प्रसिद्धीसुद्धा. श्रीमती प्रतिभा कटीग यांच्या मनात आले की हा लेख ज्युनियर कॉलेजच्या पाठ्यपुस्तकात असावा. त्यांच्या ओळखीनेच, चर्चांनंतर असे ठरवण्यात आले की हा लेख इ. दहावीच्या कुमारभारतीमधे राहील. १९९५ नंतरच्या प्रत्येक वर्षी डिसेंबर-जानेवारी दरम्यान (कारण तेव्हाच तो पाठ वाचला जातो) शाळा-शाळांमधली मुले-मुली मला भेटायला येतात. भरभरून चित्रे, भेटकार्ड पाठवतात. पत्रं लिहितात. गप्पा मारतात – कधी गळ्यात पडून रडतात सुद्धा. या सर्वांच्या प्रेमाची आणि भावनांची मला कदर आहे. मी काही प्रशिक्षित समुपदेशक, शिक्षक नाही, तरी त्यांच्या प्रश्नांना मी जमेल तशी उत्तरे देतोय.

अपघातानंतर अनेक वर्षे चाचपडण्यात गेली. पण गेली सात-आठ वर्षे मी स्वतंत्रपणे संगणक वापरू शकतो, हनुवटीने wheelchair हलवू शकतो. ह्याचा मला आनंद आहे. पण माझ्यापेक्षा कित्येक पटीने सबल असलेली कित्येक माणसं आज फार ‘लाचारासारखे’ जिणे जगताना दिसतात. दोन पाय नसले तरी हात असणे म्हणजे माझ्या दृष्टीने कोणतेही काम करू शकले पाहिजेत. पण मला असे दिसते की अपंगांनाही ‘काम’ नको तर ‘दया’ जास्त हवी असते. माझ्यावर कीव/दया करणार्यांची तर मला मनापासून चीड आहे. एकदा असाच कॉलेजमधील मुला-मुलींचा गट आला होता. त्यापैकी एकाने शेकहँडसाठी हात पुढे केला. माझी हातांची परिस्थिती सांगितल्यावर ते पुढे गेले. मुलीपैकी एक जण जाता जाता उद्गारली, ‘‘बेचारा, अपने हात भी नही हिला सकता !’’ माझ्या डोक्यात सणक उठली. त्यांना परतपावली बोलावून चांगले खडसावले. बिचारा, परिस्थितीने गांजलेला असे शब्द माझ्या शब्दकोशात नाहीत. ‘कोणतीही गोष्ट परिश्रमानेच मिळवावी/मिळते’ यावर माझा दृढ विश्वास आहे. ‘अपंगांसाठी आरक्षणाला’ माझा विरोध आहे. पुरेशा सोयी, वैद्यकीय सेवा, Infrastructure मिळालेच पाहिजे. कंपन्यांनी पुढाकार घेऊन संधी उपलब्ध करून द्याव्या. पण ‘आयते/हक्काचे आरक्षण’ माणसाला आळशी बनवेल असे माझे मत आहे.

इंडियन एअरफोर्समधे असल्याने माझी PRC (Paraplegic Rehabilitation Centre) सारख्या ठिकाणी पुरेशी काळजी घेतली जाते. चोवीस तास साहाय्यक असतात. याबद्दल मी कृतज्ञ आहे. सर्वसामान्य माणसाला असा आजार खिशाला परवडणारा नाही. त्यांच्या तुलनेत, मला हे प्रश्न जाचतही नाहीत. एकच बोचणी आहे : ती म्हणजे समाजासाठी आपण काही contribute करू शकत नाही. माझ्या सर्व मर्यादांसकट मला कामावर कुणी घेणार असेल तर आजही मी काही करेन !

मी आनंदाने राहतोय. परिस्थिती सुधारण्याची आशा नाही, हे सत्य स्वीकारतोय. पण याचा अर्थ मी सगळं विसरलोय असं नाही. आजही जेव्हा मी पलंगावर आडवा होतो, तेव्हा सर्व गोष्टी डोळ्यापुढून तरळून जातात. त्यांच्यामधे गुंतून न पडण्याचा मात्र माझा प्रयत्न असतो. या बाबतीत नियतीच्या आहारी पण मी जात नाही. वडिलांच्या कम्युनिस्ट शिकवणुकीने असेल किंवा शाळेतील सर्वधर्म समावेशक शिक्षणाने असेल, पण या विषयी देवाला/नशिबाला बोल मी लावत नाही. स्वतःच्या बुद्धीला पटेल असे स्पष्टीकरण स्वीकारतो. कुणी म्हणेल की आता तुम्हाला मिळालेल्या प्रसिद्धीमधे आनंद/जीवनाचं सार्थक मानावं. पण नाही, मला पुस्तकातला धडा, वर्तमानपत्रात मी लिहीत असलेले लेख इ. गोष्टींपेक्षाही एक ‘निनावी, अनोळखी फ्लाईट लेफ्टनंट अनिलकुमारच’ व्हायला आवडलं असतं.

आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेले एक वाक्य आठवते –
”Don’t complain about darkness, light up the lamp if you can !”
अनिलकुमार इथे थांबतात – तात्पुरते. साहाय्यकाला त्यांना पाणी पाजायला बोलावतात. वागण्यात संकोच नाही – अत्यंत सहजता.
तिथून बाहेर पडताना आठवत राहतो. फक्त आत्मविश्वास ! कणखरपणे जगण्याचा, खर्या ‘फायटर पायलट’चा!