‘श्रमिक सहयोग’ – परिसरातून शिकताना…
गेल्या दोन लेखांकांमधून आपल्याला ‘श्रमिक सहयोग’च्या कामाची, शिक्षणपद्धतीची ओळख झाली आहे. चिपळूण परिसरातील आदिवासी-कातकरी व गवळी-धनगर ह्या समाज-समूहांचे सांस्कृतिक जीवन अतिशय समृद्ध आहे. निसर्गाशी त्यांची असणारी जवळीक गुरा-ढोरांवरचं प्रेम मनाला भावणारं आहे. ‘श्रमिक’च्या शिक्षकांनी त्यांची ही सामर्थ्य स्थळं जाणली. परिसर अभ्यास, इतिहास यासारखे विषय शिकवताना मुलांना चार भिंतीत न कोंडता भटकू दिले, मुक्त निरीक्षण करू दिले. शिक्षकांना आलेल्या अनुभवांच्या निवडक गोष्टी त्यांच्या शब्दांत लेखात शेवटी आहेत.
सर्व विषय समजून घेण्यासाठी शाळांतून सतत वेगवेगळे उपक्रम, सहली, अनुभव, भेटी आयोजित करण्यात येतात. गावातील दुकानदाराकडे जाऊन पैसे देऊन वस्तू विकत घेणे, त्याचा हिशोब करणे, यातून मुलांना व्यवहारज्ञान मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुले पोस्टकार्ड विकत घेऊन त्यावर स्वतःच्या किंवा मित्रांच्या नावे मजकूर लिहून त्यावर पत्ता लिहितात. काही दिवसांनी पत्र घरी आल्यावर ते वाचताना मुलांना आनंद होतो. बँकेत जाऊन मुले तेथील कामकाजाचे निरीक्षण करतात. तेथील कर्मचार्यांना प्रश्न विचारतात. गावातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात जाऊन मुले या संस्थांचा परिचय करून घेतात. बस, रेल्वे यातून प्रवास करणे, तेथील लोकांशी बोलणे. या सार्या प्रत्यक्षानुभवातून मुलांत आत्मविश्वास, धीटपणा तर येतोच शिवाय या सार्या व्यवस्था, व्यवहार समजून घेता येतात. परिसरात जाऊन एकत्रितपणे हिंडणे हा तर मुलांचा आवडता छंद. आपल्या वाडीभोवतालचे सारे डोंगर ती पालथे घालतात. त्यांच्यासोबत फिरताना गुरुजी त्यांचा शिष्य असतो. भोवतालचा परिसर, तेथील ठिकाणे याची संपूर्ण माहिती मुले एकमेकांना आणि गुरुजींना सांगतात. धनगर मुले डोंगर माथ्यावर राहातात. भूगोल विषयात जलस्त्रोताविषयी माहिती आहे. मुलांना आपल्या भोवतालचे पर्हे, नाले माहिती असतात, पण त्याचे पुढे काय होते याविषयी माहिती नसते. म्हणून आम्ही चौथीच्या मुलांची एक अशी सहल आयोजित करतो ज्या सहलीत मुले आपल्या वाडीपासून पाण्याच्या प्रवाहाचे निरीक्षण करीत पर्ह्या, नाला, उपनदी, नदी, खाडी, समुद्र असा प्रवास करतात. या सहलीमुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्यांच्या सभोवताली बदलत जाणारे वातावरण, समाजजीवन यांविषयीचे ज्ञानही मुलांना होते.
मुले सातत्याने भोवतालच्या निरीक्षणातून स्वतःची समज निर्माण करीत असतात, तथ्ये मांडीत असतात. प्रत्येक शाळेत असे अनुभव घेण्यावर भर असतो.
इतिहास विषय शिकताना शिक्षकांनी विविध वाटा शोधल्या. पाठ्यपुस्तकात जो इतिहास असतो, ज्या घटना व व्यक्तिरेखा असतात त्यांच्याशी आपला काय संबंध आहे? असा प्रश्न मुलांना पडे. इतिहास विषयात राजे-रजवाडे, सेनापती यांचेच वर्णन अधिक असते. त्यांच्याबाबत धनगर, कातकरी मुलांच्या मनात एक प्रकारचे दूरत्व जाणवे. इतिहास हा दुसर्या कोणा मोठमोठ्या व्यक्तींचा असतो, आपण तर असे दरिद्री – अशा प्रकारचा न्यूनगंड मनात निर्माण होतो. त्यामुळे ‘इतिहासाचा अभ्यास मुले मोकळेपणाने कसा करणार?’ हा प्रश्न आमच्यासमोर होता. आपल्या पाठ्यपुस्तकी इतिहासात गरीब, श्रमिक, वंचित घटकांना स्थान नसते. मोठ्यांचा, सधनांचा इतिहास पाठ्यपुस्तकांतून रंगविलेला असतो. त्यांचा आदर्श सर्वसामान्य पददलितांनी शिकावा, असा पुस्तकी इतिहासाचा गर्भितार्थ असतो. यातूनच या वंचित घटकांतील मुलांच्या मनात वाडवडिलांविषयी, आपल्या जीवनाविषयी तिरस्कार तयार होतो. स्वतःविषयी घृणा तयार होते.
आम्ही इतिहास शिक्षणाची ही चौकट मोडावयाचे ठरविले. कातकरी, धनगर यांच्या वस्त्या, त्यांच्या कुटुंबातील पूर्वज, नातेवाईक, त्यांच्या भोवतालचा परिसर या सार्यांत अशा अनेक प्रेरणादायी घटना, प्रसंग, व्यक्तिमत्त्व लपलेली आहेत. त्या शोधाव्यात, मोठ्या माणसांकडून ऐकून त्या लिहून काढाव्यात हे काम शिक्षकांनी पालक, मुले यांच्या सहभागाने सुरू केले. असे करता करता मुलांना अभिमान वाटावा अशा अनेक व्यक्तिरेखा, घटना त्यांच्याच भोवताली, घरात आणि समाजात आहेत हे उमजले. दूरच्या तळसर गावातून आपल्या पतीसमवेत एका म्हैशीनिशी कर्जावड्यात ५० वर्षांपूर्वी येऊन राहिलेली ‘बाबी आजी’ हे खरं तर एक कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्त्व आहे. तिने स्वतःच्या हिंमतीवर गाई-गुरं, जमीन-जुमला शून्यातून उभा केला. मग आपल्याजवळ राहायला सोयर्या पाहुण्यांना बोलावलं. त्यातूनच पुढे ‘कर्जावडा’ वस्ती आकाराला आली. ही थोर कर्तृत्त्वाची ‘बाबी आजी’ इतिहासाच्या पुस्तकातील अशा व्यक्तिरेखांना तुल्यबळ वाटावी, अशीच आहे. हे मुलांना शाळेत बाबी आजीच्या तोंडून तिची जीवन कहाणी ऐकताना प्रकर्षाने जाणवलं. कुंभार्लीचा घाट, त्यातील वळणे याची आखणी तज्ज्ञ इंजिनिअर्सना ज्याने सहजपणाने जमिनीवर काठीने रेघोट्या मारून करून दिली, त्या धनगर समाजातील सोनू शेळकेची गोष्ट ऐकून आपल्या धनगर समाजात अशा थोर व्यक्ती होत्या याची जाणीव झाली. आपल्या वाडीतील लंगोटी लावणार्या पांडू ढेब्याने वाघाच्या तावडीतून वासराला सोडविले, हे ऐकताना मुलांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान निर्माण झाले. अशा अनेक घटनांचा वेध शाळांमधून घेतला आणि शिक्षकांनी त्या घटना लिहून काढल्या.
अशा रीतीने इतिहास शिक्षण भोवतालच्या इतिहासातून सुरू झाले. मुलांच्या मनांतील या विषयाबाबतचा परकेपणा तर नाहीसा झालाच, शिवाय आपला समाज किती सामर्थ्यवान आहे, आपल्या समाजातही अभिमान वाटावा अशी व्यक्तिमत्त्व आहेत याची जाणीवही निर्माण झाली. या भोवतालच्या इतिहासातून पुढे व्यापक इतिहासाकडे जाणे मुलांना सोपे झाले. पुस्तकात लिहिलेल्या इतिहासाशी आपलाही संबंध आहे याची खात्री पटल्यावर मुलांच्या मनातील न्यूनगंड गळून पडला. स्वतःकडील, स्वतःच्या समाजातील सामर्थ्याचा उपयोग शिकण्यासाठी केला तर शिक्षणाविषयीची आसक्ती वाढीस लागते. वंचितांमध्ये आत्मभान येणे, स्वतःबद्दल, स्वतःच्या समाजाबद्दल मनात दडलेला हीनभाव नष्ट होणे, स्वतःच्या सामर्थ्याविषयीची जाणीव निर्माण होणे यातून शिक्षणासाठीची पार्श्वभूमी तयार होते. या पार्श्वभूमीच्या मजबूत पायावर पुढची वाटचाल अधिक सोपी होते.
तात्याची गाय
‘तात्याची गाय’ मधील अनुभव संक्षेपाने असा. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीच्या माथ्यावर ‘खराजवाडी’ ही धनगरांची वस्ती आहे. तेथे पंधरा ते वीस धनगर कुटुंबे राहतात. त्यातील बर्याच जणांना थोड्या जमिनी आहेत. काही थोडे दुधाचा व्यवसाय करतात. प्रत्येकाकडे जनावरे मात्र आहेत. त्यातील काही कुटुंबे मजुरीही करतात. जवळच अलोरे, शिरगाव अशा शहरी वसाहती आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसायाला अनुकूल पार्श्वभूमी लाभली आहे. काही घरांतून अगदी तुरळक माणसे नोकर्या करतात. येथे श्री. बाबाजी कोकरे यांचे घर आहे. पूर्वी ते सैन्यात होते. पाटबंधारे खात्यातही त्यांनी नोकरी केली. आज ते सेवानिवृत्त होऊन गावात राहतात. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने लहानसा दुग्धव्यवसाय नेटाने चालविला आहे. त्यांच्या जवळ एक गाय आहे. तिचे कौतुकाने नाव ठेवले आहे ‘लक्ष्मी’. ती घेतली तेव्हा ५०% जर्सी जातीचे मिश्रण तिच्यात होते. तिची एकूण अठरा वेते झाली आहेत. पहिल्या वेतापासून एका वेळेला सात ते आठ लिटर दूध ती सतत देत राहिली. म्हणजे दिवसाला ती पंधरा ते सोळा लिटर दूध देत आली. दरवेळेला ती वाफेवर आल्यावर ते इंजेक्शन देत होते असे नाही. स्थानिक वळूकडूनही गर्भधारणा होत असे.
तिला झालेल्या कालवडींना एवढे दूध नव्हते. पण ही गाय मात्र दर वेताला एवढे दूध देत राहिली. या गाईला तात्यांनी घरातील मुलासारखे सांभाळले. त्यामुळे तिच्या वागण्यात एक प्रकारची ऐट दिसून येते.
एकदा त्यांच्या मेहुण्याच्या घरी वाघाने दुभत्या म्हशी मारल्या. एकही दुभतं जनावर त्यांच्या घरी राहिले नाही. तेव्हा ते गृहस्थ तात्यांकडे आले आणि म्हणाले की, एखादी दुभती गाय किंवा म्हैस तुम्ही मला विकत दिली तर बरे होईल. तात्या म्हणाले, मी तुम्हाला जनावर विकणार नाही. तुमच्यावर वाईट प्रसंग आला आहे. माझी ही लक्ष्मी गाय तुम्ही घेऊन जा. तुमची गरज सरल्यावर वा मरण्यापुर्वी या गाईला माझ्याकडे परत पाठवा. तिने मला अकरा वेते दिली आहेत. किती वर्षे तिने माझ्या घरातल्या पोरांना व मला पोसले आहे. एक इच्छा आहे मरणापूर्वी तिची सेवा माझ्या हातून व्हावी.’ तात्यांचे मेहुणे लक्ष्मीला घेऊन आपल्या घरी गेले. त्यांच्याकडे लक्ष्मीची पाच वेते झाली. त्या काळात तिची दिवसातून तीन तीनदा धार काढत असत. हळूहळू मेहुण्यांकडे दुभती जनावरे वाढली. व्यवसायात जम बसला तेव्हा ही लक्ष्मी गाय घेऊन ते तात्यांकडे आले. तात्यांच्या दावणीला ती गाय बांधून पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी तिचा निरोप घेतला. तेव्हापासून लक्ष्मी पुन्हा तात्यांच्या घरी आली. त्यानंतरही तिची दोन वेते झाली आहेत. आज तिचे चोवीसावे वर्ष सुरू आहे. अठराव्या वेतानंतर ती माजावर आली होती. पण तात्यांनी ठरवले की आता गर्भधारणेचं ओझं लक्ष्मीवर लादायचं नाही. आठराव्या वेतापर्यंत दिवसाला तिने चौदा लिटर दूध दिले. सारे घर त्या लक्ष्मीने पोसले. आता म्हातारपणात निवांत बसून घरी राहावं. तात्या व त्यांच्या घरातल्यांनी तिची सेवा करावी असं त्यांना वाटतं. तात्या रोज तिला सकाळ संध्याकाळ चरायला घेऊन जातात. कधी कधी तात्यांबरोबर त्यांचा लहानगा नातूही असतो. म्हातारी झालेली लक्ष्मी गाय आजही टेचात चालत असते. तिला बघून वाडीतल्या हरएक व्यक्तीच्या डोळ्यात आदराचा, कृतज्ञतेचा भाव तरळून जातो. तात्यांनी तिचे फोटो काढून घेतलेत. दोघांच्याही चालीत कृतकृत्यतेचे समाधान झळकते.
‘तात्याची गाय’ हा पाठ वाचीत असताना, मुलांना प्रत्ययाचा अनुभव तर येतोच पण या पाठातील नायिका आपली कोणी लागते, याचा त्यांना अभिमानही वाटतो.
मंगेश मोहिते
वाघणीची शाळा
या मुलांचे जनावरांशी असलेले नाते अतिशय जवळिकीचे आहे. जनावरे ही त्यांच्या कुटुंबांतील सदस्यच आहेत. प्रत्येक जनावराला नावे ठेवलेली आहेत. प्रत्येकाच्या सवयी, आवडी, निवडी, खोड्या मुले पालकांपेक्षाही अधिक जाणतात. खुणा करणे, विशिष्ट आवाज काढणे, हुंकार देणे, अंगावरून हात फिरविणे अशा विविध संवाद-माध्यमांचा उपयोग गुरांसोबत केला जातो. एकेका कुटुंबाकडे २०-२५ जनावरे असतात. या जनावरांसाठी स्वतंत्र गोठे नाहीत. कौलारू छपराच्या ठेंगण्या लांबसडक घरात एका बाजूला जनावरे तर दुसर्या बाजूला माणसे राहातात. घरात शिरण्याचे दार एकच असते. त्याला दरवाजा नसतो. भाटी हे ठिकाण सह्याद्रीच्या अगदी माथ्यावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३००० मीटर इतकी आहे. त्यामुळे तेथे वर्षभर थंड वातावरण असते. जोडीला सुसाट वारादेखील असतो. अशा थंड वातावरणात ऊब राहावी म्हणून घरात रात्रं-दिवस चूल पेटत असते. या ऊबदार घरकुलात कुटुंबातील माणसं आणि जनावरं एकमेकांना सांभाळीत जगत असतात.
शाळा सुरू होऊन ४-५ महिने उलटल्यावर एक गंभीर समस्या निर्माण झाली. तोपर्यंत मुले शाळेशी अन् गुरुजींशी एकरूप झाली होती. रोज सकाळी मुले गुरुजींच्या वाटेकडे नजर लावून बसत नि संध्याकाळी वाडीतून गुरुजींचा पाय निघत नसे. अशा मजेशीर वातावरणात पालकांनी गुरुजींजवळ एक विषय काढला. पौष महिना संपत आला होता. या काळात भाटीत पाणी आणि गवताची चणचण भासू लागते. पुढील किमान तीन महिने सर्वांनाच भाटी सोडून दूर जंगलातील भैरवगडाजवळील ‘वाघणी’ परिसरात जाऊन राहावे लागणार होते. वाघणी परिसरात चारा-पाण्याची ददात नसते. पण दरवर्षापेक्षा यंदा परिस्थिती वेगळी होती. कधी नव्हे ती वाडीत शाळा सुरू झाली होती. मुलांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा फरक पडला होता. त्यांच्या कपाळावर कोरलेल्या मागासलेपणाच्या, भीतीच्या रेषा पुसट होऊ लागल्या होत्या. पालकांच्या मनांतील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अशा वेळी वाघणीत जायचं, मग शाळेचं काय? असा प्रश्न पालकांना सतावू लागला. मुलांना भाटीत ठेवावे तर कुणासोबत? वाघणीत घेऊन जावे तर तिकडे गुरुजी कसे येणार? कारण तेथून रोज आपल्या घरी जाणे गुरुजींना शक्य होणार नव्हते. तीन महिने शाळा बंद ठेवण्याची कल्पना सर्वांनाच अप्रिय होती.
शेवटी तोडगा निघाला. पालकांनी गुरा-वासरांना घेऊन वाघणीत राहावयास जावे. वाडीतील चार वयोवृद्ध माणसांनी भाटीतच राहावे. सर्व मुलांना त्यांच्या ताब्यात सोपवावे. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या मुलांसाठी आवश्यक धान्य इथे राहाणार्यांकडे द्यावे, असा हा तोडगा होता. शाळेविषयीच्या ओढीमुळे सर्व मुलांनी हा तोडगा मान्य केला. चारच दिवसांनी एके सकाळी मुलांचे आई-वडील, मोठी (कर्ती) भावंडं आणि जनावरं मुलांना निरोप देत जड पावलांनी वाघणीच्या वाटेला लागली. आम्ही खुशाल राहू अशी खात्री मुलांनी त्यांना दिली. कर्तीसरवती माणसं, जनावरं वाडीतून निघून गेल्यावर मात्र सर्वांना सुनं सुनं वाटू लागलं. आता मुलांना सांभाळण्याची गुरुजींवरील जबाबदारी वाढली. मुले वाडीत, शाळेत रुळावीत म्हणून गुरुजींनी वेगवेगळ्या उपायांचे नियोजन केले होते. खेळ, गाणी, गप्पा गोष्टी, खाणे, पिणे असा भरगच्च कार्यक्रम होता.
पण झाले भलतेच ! आपण ठीक आहोत असे वरवर जरी मुले भासवीत असली तरी त्यांच्या मनांत कुठे तरी एक निराशा खोलवर रुजलेली आहे हे गुरुजींच्या लक्षात आलेच. दुसरा दिवस उजाडला. गुरुजी वाडीत आले तेव्हा मुलांचा पूर्वीचा उत्साह मावळलेला होता. मुले मुकी झाली कुणी फारसे बोलेना, हसेना. गुरुजींना वाटले मुलांना आई-वडिलांपासून दूर राहायची सवय नाही ती होण्यास एक-दोन दिवस लागतील. मग गाडी आपसूक रुळावर येईल. पण जसजसे दिवसांची संख्या वाढू लागली तशी मुले अधिकच कोमेजू लागली. गुरुजींची खात्री पटली की, आता मुद्याला बगल देण्यात काही अर्थ नाही. त्यांनी मुलांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. ‘‘आई-बाबांची आठवण येणारच पण दोन दिवसांनी ती आपल्याला भेटायला येतीलच.’’ असे समजावले. पण मुले कोणताच प्रतिसाद देईनात. शेवटी एका मुलानं तोंड उघडलं. ‘‘गुरुजी जनावरांची लय आठव येते.’’ पुन्हा शांतता पसरली. आठव येते पण त्यावर तोडगा काय असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनांत घोंघावत होता. काही वेळानं दुसर्या एका मुलीनं बोलावयास सुरुवात केली. ‘‘गुरुजी आम्ही वाघणीत जातो, तू पन आमच्यासंगं चल, तिकडं आपण गंमत करू.’’ दुसरं मूल म्हणालं, ‘‘गुरुजी तिकडं नदी बी हाय, सारं रान हिरवंगार हाय.’’
मुलांच्या मनानं एकमुखी कौल दिला. गुरुजींना मुलांचं मन मोडवेना. दोन दिवसांनी मुले, गुरुजी, वडिलधारी माणसं बाड-बिस्तर घेऊन वाघणीची वाट चालू लागली. वाटेतून चालताना ‘वाघणीत काय काय असतं, किती छान वाटतं अशा गप्पा रंगल्या. वाघणी जवळ आली तशी मुलांच्या आगमनाची बातमी वार्यासारखी जनावरांपाशी पोहोचली. मुलांची चाहुल लागल्यानं जनावरे हंबरू लागली, सैरावैरा नाचू लागली. जनावरांच्या, मुलांच्या किलकिलाटानं वाघणी परिसर दुमदुमला. मुले धावत जात जनावरांच्या गळ्यात पडली. गुरुजी, आई, बाबा, सारेजण अवाक् होऊन हे दृश्य पाहात राहिली…. भेटाभेटी झाल्या. आई-वडिलांना मनस्वी आनंद झाला. मग वाघणीतील दिनक्रम सुरू झाला. गुरुजींच्या जेवण-खाण्याची व्यवस्था सर्व कुटुंबांनी मिळून उचलली. मुलं, जनावरं, आई-बाबा, भांवडं, गुरुजी अशी सारीजणं चोवीस तास एकत्र राहू लागली. वाघणीतील शाळेचा दिनक्रम मुलांनीच ठरविला. सारेचजण एकमेकाला शिकवू लागले, एकमेकापासून शिकू लागले. अखेर सारं काही मुलांच्या मनासारखं झालं. वाघणीची शाळा मुलांना हवी तशी झाली.
राजन इंदुलकर
मोर, हा शेवटी मोरच !
त्या दिवशी सकाळी शाळेतील सारी मुले, गाणी म्हणत, बागडत भोवतीच्या जंगलाकडे निघाली. दंडाचा माळ, गावराईचं पाणी, वावलईचं रान ही आमच्या निरीक्षणासाठीची लक्ष्ये होती. गावराईच्या पाण्याच्या पुढे आम्ही गेलो. साचलेले पाणी जवळजवळ सुकून गेले होते. चिखल मात्र सर्वत्र होता. त्यात रात्री येऊन गेलेल्या डुकरांच्या पावलांचे ठसे मुलांनी ओळखले. या पावलांच्या ठशांना आम्ही इकडे ‘पायशेर’ म्हणतो. त्या चिखलात डुकरांचे केसही रूतलेले होते. तेव्हा डुकरे येथे विसाव्याला आली होती हे मुलांनी ओळखले. रस्त्यावरही उमटलेल्या ठशांवरून मुले प्राणी ओळखत होती. पक्ष्यांच्या आवाजावरून, पडलेल्या पिसांवरून पक्षी ओळखत होती. पिसे जमा करीत होती. एकमेकांना प्राणी, पक्षी यांच्या गोष्टी सांगत होती. अनुभव, आठवणी यांची उजळणी होत होती. गावराईच्या पाण्यातून आम्ही वर गेलो. विस्तीर्ण माळावर ती विसावली. सर्वांनी तेथे जेवण केले. शेजारच्या पर्ह्यावर पाणी प्यालो. कातळावर तिरड्याची फुले फुलली होती. त्या माळावर लेंढ्या पसरल्या होत्या. लेंढ्या घोरपडीच्या आहेत हे मुलांनी ओळखले. मुलांनी घोरपडीची बिळे शोधून काढली. ती जवळच्या दरडीत होती. सर्वांनी त्यांचे नीट निरीक्षण केले.
मोराची अंडी
दुपारी तीन नंतर परतीच्या वाटेला लागलो. करबंदीच्या जाळ्यांजवळून जात असता, ‘कॉट’ ‘कॉट’ असा आवाज सर्वांनी ऐकला. मुले बावरून भोवती बघू लागली. तेवढ्यात पाचोळ्यावर पावलं वाजली. मुलांनी जाताना एक लांडोर पाहिली. आम्ही सारे करवंदाच्या जाळीत घुसलो. तेथे एक वीतभर खोलीचा टोपल्यासारखा खड्डा दिसला. पाचोळ्याने झाकलेला. मुलांना त्या खड्ड्यात पाच अंडी मिळाली. मोराची एवढी अंडी पाहून मुले आनंदून गेली. ती अंडी तेथेच ठेवावीत की, घेऊन जावीत, यावर चर्चा झाली. शेवटी ती घरी घेऊन जायचे ठरले. ही अंडी उबवावीत व मोर कसे वाढतात ते पाहावे, असे ठरले. वाडीत येताच अंडी मिळाल्याचे वर्तमान सर्वांना कळले. एका दारुड्याने ती सारी अंडी विकत मागितली. फारच आग्रह केल्याने मुलांनी एक अंडे त्याला दिले. बाकीची चार अंडी प्रयोगासाठी ठेवली. शाळेतील दोन मुलांनी व त्यांच्या आजीने सारी जबाबदारी अंगावर घेतली. त्यांच्या कोंबडीखाली ती अंडी उबवण्यात आली. दोन अंडी वाया गेली. दोन अंड्यांतून मोराची पिल्ले बाहेर आली. कोंबडीच्या पिल्लांत ही दोन काळी, जाडी मोरांची पिल्ले सर्वत्र वावरू लागली. कोंबडी आपल्या पिल्लांप्रमाणे त्यांचेही पालन-पोषण करू लागली. कोंबडी त्यांनाही चोचीत अन्न भरवीत असे, इतर पिल्लांप्रमाणे ऊब देत असे. कावळा, शिकरा, घार, भाट्या यांच्यापासून मोरांच्या पिल्लांचे आजीने व मुलांनी संरक्षण केले. सावध राखण केली. पिल्ले मोठी होऊ लागली. शाळेतील सारी मुले रोज त्या पिल्लांभोवती गराडा घालून बसत. त्यांना चारा भरवत. पिल्लांत एक नर व एक मादी होती. आपण यांना वाढवावे. मोठी झाल्यानंतर ती अंडी देतील, मग मोर होतील. अशी स्वप्ने पाहात दिवस जात होते. काहींनी ती पिल्ले विकत मागितली. पण मुलांनी ती दिली नाहीत. ‘‘पिल्लं आमची नाहीत, शाळेची आहेत. आम्ही ती विकणार नाही.’’ असे मुलांनी त्यांना सांगितले. पिल्ले लहान होती, तोवर कोंबडीच्या पिल्लांच्या घोळक्यात वावरत असायची. त्यांचा आवाज वेगळा यायचा तेव्हा, सुरुवातीला तो ऐकून कोंबडीची पिल्ले चमकून थांबायची. पुढे त्यांना त्या आवाजाची सवय झाली. मोराची पिल्ले जसजशी मोठी व्हायला लागली, तसतशी फटकून वागू लागली. घराच्या छपरावर उडून बसायची. माशांचे खरकटे पाणी प्याली, तर मोरांचे डोळे जातात, असे मुलांनी ऐकले होते. तसे होऊ नये म्हणून मुलांनी खूप काळजी घेतली. तरीही एका मोराचा एक डोळा गेलाच. लहान होती तोवर ती पिल्ले शाळेच्या मुलांकडे बिनधास्त येत असत. बाहेरच्या अनोळखी माणसापासून मात्र दूर राहात. पँटशर्टवाल्यांना ती फार भीत.
कोंबडी नव्याने अंडी उबवायला लागली, तशी जवळ येऊ नये म्हणून आपल्या पिल्लांना व मोराच्या पिल्लांनाही ती बोचायला लागली. मोराची पिल्लेही फटकून वागू लागली.
जंगलातील मोर कधी कधी खांडव्यात येत. एकदा ती दोन पिल्लं मोरांच्या टोळीबरोबर जंगलात निघून गेली. शाळेतील सारी मुले व आजी सारेच उदास झाले. सार्यांना वाटत होते, ती पिल्ले परतून येतील. परंतु पिल्ले परत आली नाहीत. मुलांना ती पिल्ले झुंडीत दिसत, पण त्यांच्याजवळ ती कधी आली नाहीत. ‘‘आम्ही ती पिल्लं आज पाहिली.’’ असं ती मुलं आजीला सांगत.
मुलांनी एक निष्कर्ष त्यातून काढला, ‘‘आपण कोंबडीच्या साहाय्याने मोराची पिल्ले वाढवू शकतो, पण मोर बनण्यापासून त्यांना रोखू
शकत नाही.’’
संतोष खरात
(संकलन – प्रियंवदा बारभाई)