वेदी – सप्टेंबर २००७
एकदा जेवणाच्या टेबलाशी असताना मी रासमोहन काकूंचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. घरी करायचो तसंच मी जोरात ओरडून सांगितलं ‘‘मला बटाट्याची भाजी हवीय.’’
‘‘तुला कळतंय ना मी काकांशी बोलतेय, तू मध्येच बोलतो आहेस.’’
‘‘पण मला अजून बटाट्याची भाजी हवी आहे.’’ मी पुन्हा ओरडलो.
‘‘तू बोलायची रीत शिकत नाहीस तोवर मिळणार नाही.’’ त्या म्हणाल्या.
मी टेबलावर चमच्यानं बडवायला सुरवात केली. मी त्यांच्या पाठीत गुद्दे मारले, त्यांचे केस ममाजींसारखेच जाड आणि लांब होते. ते ओढले. मी टेबलावर चढून भाजीचं भांडं शोधायचा प्रयत्न केला. पण काकूंनी मला घट्ट धरून माझ्या जागेला बसवलं आणि म्हणाल्या, ‘‘जंगली मुलांसारखं वागू नकोस.’’
‘‘मी माझ्या उमी दिदीला तुमचं नाव सांगीन. ती येऊन तुम्हाला चांगला मार देईल.’’
रासमोहन काकूंना हसू आलं. पण त्या ठामपणे म्हणाल्या, ‘‘कधीही टेबल बडवायचं नाही. कुणाचेही केस ओढायचे नाहीत. टेबलावर चढायचं नाही. तू फक्त हात वर करायचा आणि करंगळी आणि शेजारचं बोट अशी दोन बोटं वर करायची आणि माझं लक्ष जाईपर्यंत थांबायचं. मी काकांशी बोलत असेन किंवा हियाकडे लक्ष देत असेन तर तसाच हात वर ठेवून वाट बघायची.’’
‘‘मला आता भाजी नकोच आहे. मला पाणी हवंय.’’ मी म्हणालो.
‘‘जेव्हा तुला पाणी हवं असेल तेव्हा हात वर करून फक्त करंगळी वर करायची. आता करून दाखव बरं.’’
मी टेबल बडवलं, ओरडलो पण मग शांत होऊन हात वर करून करंगळीची खूण करेपर्यंत मला पाणी मिळालं नाही. त्यानंतर माझ्या लक्षात राहिलं तर मी हात वर करायचो. पण कधी तरी हात वर ठेवून ठेवून मी दमायचो किंवा कंटाळायचो. काकू आपल्या जेवतच राहायच्या किंवा बोलत राहायच्या. मग मात्र मी चमच्यानं टेबल बडवायचो किंवा रूसून बसायचो. काहीही खाणार पिणार नाही म्हणायचो.
‘‘तुला काय वाटतं ! घटकेत तू जंगली मुलगा असणार आणि घटकेत तू शहाणा मुलगा
असणार ! ते काही चालणार नाही. तू तुझ्यातल्या जंगली मुलाला वळण लावायला हवंस.’’
मला आठवतं त्यांनी माझी हातानं जेवायची सवयही मोडली. चमच्यानं खायला शिकवलं. पण मला ते जमायचं नाही. घास चमच्यात यायच्या ऐवजी घसरून टेबलक्लॉथवर पडायचा. चमचा जरा कुठे तोंडापर्यंत येतोय तोवर पदार्थ सांडायचा आणि माझ्या अंगावर, टेबलक्लॉथवर किंवा रासमोहनकाकूंच्या अंगावर रस उडायचा. एका संध्याकाळी मी जेवायला गेलो तर काकाकाकू आणि हिया त्यांच्या नेहमीच्या टेबलाशी होते पण माझ्यासाठी छोटंसं स्वतंत्र टेबल लावलेलं होतं. त्यानंतर मी नेहमीच त्या टेबलाशी बसून जेवलो. मला काही हवं असलं तर हात वर करून खूण करायला शिकलो आणि चमच्यानं खायलाही शिकलो.
-०-
जेवणाच्या वेळी रासमोहन काका काकू माझ्याशी मराठीत बोलायचे. मला काही समजलं नाही तर थोडे हिंदी शब्द त्यात मिसळायचे. पण ते एकमेकांशी मात्र कायम इंग्रजीत बोलायचे. घरी डॅडीजी रेडिओवर बातम्या ऐकायचे तेव्हाच काय ती इंग्रजी भाषा माझ्या कानावर पडायची. पण त्यामुळे काका काकू बोलत असताना काही शब्द मला कळायचे. एके दिवशी काकू मला इंग्रजी संभाषण शिकवू लागल्या. पहिले शब्द होते…. चिकन, किचन आणि थँक्यू. आणि मला ते सगळे अवघड वाटले.
मी जेव्हा जेव्हा मराठीत काही मागायचो तेव्हा तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘तू इंग्रजीतून मागितलंस तरच मिळेल.’’
‘‘मी इंग्रजीत का मागायचं?’’
‘‘तुझ्या वडिलांना वाटतंय तुला शिकायला इंग्लंड अमेरिकेला पाठवावं. ते जसे गेले होते तसंच.’’
‘‘इंग्लंड अमेरिका कुठे आहेत?’’ मी विचारलं.
‘‘खूप लांब आहेत. समुद्र आणि वाळवंट ओलांडून जावं लागतं.’’
त्यानंतर जेव्हा जेव्हा हिया मला बैठकीच्या आणि जेवणाच्या खोलीत भेटायची तेव्हा मी तिच्याशी इंग्रजीत बोलायचो. मी तर ठरवूनच टाकलं होतं कि मी हियाला माझ्याबरोबर इंग्लंड अमेरिकेला घेऊनच जाणार.
मला आठवतं मी एकदा रासमोहन काकूंना ‘स्टारब्रिज’ हव्या म्हणालो.
‘‘म्हणजे काय असतं?’’
‘‘तुम्हाला स्टारब्रिज माहीत नाही?’’
‘‘तो पंजाबी शब्द असेल, पण त्याला हिंदीत काय म्हणतात?’’
‘‘स्टारब्रिज.’’
‘‘ते फळ आहे का भाजी आहे?’’
‘‘स्टारब्रिज.’’
‘‘ते सोलून खावं लागतं का?’’
‘‘नाही.’’
‘‘कशासारखं लागतं ते’’
‘‘स्टारब्रिज सारखं.’’
‘‘तू मला नीट सांगितलं नाहीस तर मी तुला ते आणून कसं देणार? कदाचित ते काही तरी पंजाबात मिळत असेल पण मुंबईत मिळत नसेल.’’
काही दिवसांनी त्या म्हणाल्या ‘‘मी तुझ्या वडिलांना पत्र लिहिते आहे. तुला घरून काही हवं आहे का?’’
मी म्हणालो ‘‘स्टारब्रिज.’’
‘‘ते जाऊदे. दुसरं काही हवं आहे का?’’
‘‘हो, तंत्रा’’
‘‘अरेच्या पुन्हा तेच. ते न मागता एक दिवस सुद्धा जात नाही. तुला चांगलं माहीत आहे. तू काय म्हणतो आहेस ते आम्हाला कळत नाहिये. तंत्रा, स्टारब्रिज, तंत्रा, स्टारब्रिज. हे तुझं कधी संपणारच नाही. तुला घरच्या कुणाला काही प्रेमाच्या गोष्टी सांगायच्या आहेत का?’’
‘‘मला उमी दिदी आजिबात आवडत नाही.’’
‘‘पण नेहमी तर तू फक्त उमी बद्दलच
बोलतोस !’’
‘‘ती म्हणते तीच डॅडीजींची सगळ्यात लाडकी आहे. पण मीच त्यांचा सगळ्यात लाडका आहे.’’
-०-
डॅडीजी आणि ममीजींना आठवतं त्याप्रमाणे, रासमोहन काका त्यांना सुरवातीला माझ्या प्रगतीबद्दल नियमित कळवायचे. त्या पत्रांवरून डॅडीजींचं त्यांच्याबद्दल चांगलं मत झालं होतं. पण ममीजींना मात्र शंका होती. विशेषतः त्या ‘तंत्रा’ पत्रा नंतर.
एकदा सकाळच्या नाश्त्याच्यावेळी डॅडीजींनी त्या दिवशी पोस्टानं आलेल्या पत्रातला मजकूर सांगितला. ‘‘सौ. रासमोहन म्हणतात, तो रोज तंत्रा मागतो आणि त्यांना ते कळत नाही. तो पंजाबी पक्वान्नाचा प्रकार असावा असं त्यांना वाटतं. त्याला स्ट्रॉबेरी सारखं काही तरी हवंय असंही वाटतं.’’
‘‘लहान मुलं संत्र्याला तंत्रा म्हणतात हे प्रत्येक आईला कळतं. तेवढंही त्यांना कळत नाही की काय?’’ ममाजी म्हणाल्या.
त्या संध्याकाळी, क्लबमध्ये जाण्याआधी डॅडीजींनी पत्र लिहिलं.
माननीय सौ. रासमोहन यांस,
सप्रेम नमस्कार,
पंजाब्यांची लहान मुलं संत्र्याला बरेचवेळा तंत्रा म्हणतात. तुम्हाला माहीतच आहे इथून देशातल्या अनेक भागात अन्नधान्य पाठवलं जातं म्हणून पंजाब प्रांताला भारताचा अन्नदाता म्हणतात. इथे विविध प्रकारची फळं मिळतात. वेदीला संत्र आणि स्ट्रॉबेरीज तर आवडतातच पण त्याला आंबे, लिची, डाळिंब, पेरू, केळी ही फळसुद्धा खूप आवडतात. मला कल्पना आहे. यातली काही फळं मुंबईत मिळत नाहीत. माझी तुम्हाला एक विनंती आहे. मुंबईत संत्री मिळत असतीलच. वेदीला मधून मधून जेवणानंतर एक संत्र दिलंत आणि कधी तरी सकाळी ताजा संत्र्याचा रस दिलात तर बरं होईल. मी आणि त्याची आई आपले ऋणी आहोत.
लिहून झाल्यावर ते वर मान करून आईला म्हणाले, ‘‘काही लिहायचंय का वेदीसाठी?’’
‘‘त्याला सांगा मी त्याला लाडानं खूप घट्ट जवळ घेतलंय.’’ ममीजी म्हणाल्या.
ते हसले आणि म्हणाले, ‘‘हे इंग्रजीत लिहिणं अवघड आहे.’’ मग त्यांनी लिहिलं, ‘‘टेल वेदी दॅट हिज मदर सेंड्स हर फॉंडेस्ट लव्ह (आईने वेदीला प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत
असं सांगा)’’
-०-
एक दिवस जेवणाच्या टेबलाशी रासमोहन काकू मला म्हणाल्या, ‘‘हे घे संत्रं, तुझ्यासाठी आणलंय.’’ मला एवढा आनंद झाला. मी संत्र हिसकावूनच घेतलं त्यांच्या हातातून.
मला तेव्हा संत्रं जे काय आठवत होतं ते हलकं गुळगुळीत पण फोड फोड आल्या सारखं होतं. त्याच्या एका बाजूला थोडा मोठा फोड असायचा आणि दुसर्या बाजूला बारीकशी खळी असायची. त्यामुळे ते मला बरोबर हातात धरता यायचं. मला ते सहज सोलताही यायचं. हे संत्रं तसं नव्हतंच मला खूप राग आला आणि मी ते फेकून दिलं.
‘‘हे संत्रं नाहीच आहे मुळी. काहीतरी घाणेरडं आहे.’’ मी म्हणालो.
‘‘अरे हे संत्रच आहे.’’ रासमोहन काकू म्हणाल्या. त्यांनी ते उचललं आणि सुरीनं कापून माझ्या बशीत ठेवलं. मी कुरकुरतच एक चावा घेतला. ते संत्र्यासारखं लागत होतं पण रसाचा भाग होता त्यापासून साल पटकन सुटून येतच नव्हतं.
‘‘त्यातलं थोडं हियाला दे.’’ त्या म्हणाल्या.
‘‘तिला सगळंच देऊन टाका. मला नकोच आहे.’’ मी म्हणालो.
‘‘तुला ते खायलाच हवं. ते आणण्यासाठी मी काय काय प्रयत्न केलेत.’’ त्या म्हणाल्या.
मी अजून थोडं खाल्लं. मला ते आवडायला लागलं आणि मला खूप आनंद झाला.
मी खात असताना हियानं हात लांब करून एक फोड घ्यायचा प्रयत्न केला. मी ती घट्ट धरून ठेवली. तिच्या तोंडातल्या थोड्याशा दातांनी ती मला चावली. मी तिच्या तोंडाला बोचकारलं.
रासमोहन काकूंनी मला खस्सकन खुर्चीवरून ओढलं आणि ढकलत त्यांच्या झोपायच्या खोलीत नेलं. मोठ्या नेलकटरनी माझी नखं कापली. मी सुटायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला दोन पायांच्या मध्ये घट्ट धरून ठेवलं होतं.
-०-
‘‘आज फक्त कारल्याची भाजी आणि पावच आहे जेवायला. बाजार बंद आहे. युद्ध सुरू झालंय. शिवाय सार्वत्रिक संपही सुरू झालाय.’’ रासमोहन काकू एक दिवस जेवताना म्हणाल्या आणि माझ्या बशीत कारल्याची भाजी वाढली. मी थोडीशी भाजी चमच्यानं तोंडात घातली. त्या फोडी पुटकुळ्या आल्यासारख्या आणि बुळबुळीत होत्या. शिवाय खूप तुरट आणि कडू होत्या. मी भाजी तशीच बशीत टाकून दिली.
‘‘चल खाऊन टाक. आज हेच मिळणार आहे फक्त. शिवाय तब्येतीला चांगली असते ती भाजी.’’ त्या म्हणाल्या.
त्यांनी हातात चमचा धरलाय आणि त्या भाजी माझ्या तोंडात घालणार आहेत हे मला कळलंच. मी तोंड घट्ट मिटून घेतलं.
‘‘तुला खावंच लागेल.’’
‘‘मी अजिबात खाणार नाही.’’ मी दातावर दात दाबूनच बोललो.
‘‘किती हट्टी आहे बघा.’’ त्या रासमोहन काकांना म्हणाल्या.
त्यांनी लक्षच दिलं नाही. ते हियाशी बोलत राहिले. मग रासमोहन काकू मला ओढत ओढत त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. बँडेजची पट्टी घेऊन माझ्या एकेका हाताला बांधून टाकली.
‘‘तू कारलं खायचं कबूल करेपर्यंत मी तुझे हात सोडणार नाही.’’ त्या म्हणाल्या.
‘‘मी देवजीला सांगीन मला भरव म्हणून.’’ मी रागाने म्हणालो.
‘‘उद्धटपणानं बोलू नकोस. झोप जा आता.’’ मी वेगानं त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो आणि पळतच अरुंद जिन्यावरून खाली आलो. माझ्या पलंगावर अंग टाकलं आणि मनात म्हणायला लागलो ‘मी अजिबात कारलं खाणार नाही.’’ मी माझे पाय गादीच्या कडेशी कठड्याजवळ अडकवले आणि पलंग धड धड हलवू लागलो. ही माझी लुटुपुटीची आगगाडी आहे आणि त्यात बसून मी शाळेपासून दूर दूर चाललो आहे अशी कल्पना करायला लागलो. मला झोप लागली.
दुसर्या दिवशी सकाळी मी उठलो तर मला आश्चर्यच वाटलं, माझ्या हातांना बँडेजं होती. रासमोहन काकूंनी माझ्या हट्टी वागण्याबद्दल काही मुलांना आधीच सांगितलं होतं त्याबद्दलची कुजबुज मुलांच्या वसतीगृहात पसरून सगळ्यांना बातमी कळलीच होती. सकाळी उठल्यावर माझ्याशी काहीही न बोलता सगळी मुलं न्याहारीसाठी निघून गेली.
मी अजिबात रडलो नाही. मी अंथरूणात पडून राहिलो. जयसिंगचा कानोसा घेत राहिलो. तो मुका, बहिरा आणि आंधळा मुलगा कण्हत ओरडत होता. मग रासमोहन काकू मला न्याहारीसाठी न्यायला आल्या.
मला खरं म्हणजे जायचं नव्हतं पण भूकही लागली होती.
रासमोहन काकूंनी माझ्या हाताची बँडेजं सोडली. त्यांची बोटं छान मऊ, साबणाच्या सुवासाची आणि हळुवार होती. मी ती खाऊनच टाकली असती.
एक दिवस दुपारी रासमोहन काकांनी मला खरेदी करायला बाहेर नेलं. रस्त्यात ते अचानक थांबले आणि म्हणाले, ‘‘तू कसा चालतोस ते मला बघू दे.’’
ते तसं का म्हणत होते. मला कळलं नाही.
मग म्हणाले, ‘‘मला वाटलंच होतं. तू नीट चालत नाहियेस. माझ्या बुटांना स्पर्श करून बघ म्हणजे मी कसा चालतो ते तुला कळेल.’’ म्हणजे काय, क्लिक क्लिक असे ते चालतात असं मी मनात म्हणालो. शिवाय मला वाटलं ममाजींसारख्या त्यांच्या बुटांना उंच टाचा असणार. पण मी खाली वाकून, सगळीकडून हात लावून पाहिलं तर ते साधे नाडी बांधायचे डॅडीजींसारखे बूट होते.
‘‘अरे असं नाही. फक्त पुढच्या टोकांना हात लाव.’’ ते खाली वाकून म्हणाले. ते चालू लागले आणि मी धडपडत खाली वाकून त्यांच्याबरोबर जाऊ लागलो. ‘‘बघ मी कसा ताठ आणि सरळ पावलं टाकत चालतो. आता तू तसं चालायचा प्रयत्न कर.’’
मी उभा राहिलो आणि त्यांचा हात घट्ट धरून कसा तरी चालत राहिलो.
‘‘अरे असं नाही.’’ ते म्हणाले आणि खाली वाकून त्यांनी माझे पाय पकडले. माझी फताडी पडणारी पावलं सरळ केली. म्हणजे चवडे थोडे आत वळवले.’’ अशी पावलं ठेव आणि आता सरळ वर उचल. मग तुझ्या टाचा आधी जमिनीला टेकव. मग चवडा असा खाली टेकव.’’
ते खाली वाकले आणि मी त्यांचे अखूड केस मुठीत धरले. त्यांनी सांगितल्यासारखी पावलं टाकू लागलो. माझ्या बुटांजवळून त्यांचा आवाज येऊ लागला.’’ डावं पाऊल आत ….डावा पाय वर ….डावी टाच खाली ….डावा चवडा पुढे ….उजवं पाऊल आत ….उजवा पाय वर ….उजवी टाच खाली ….उजवा चवडा पुढे.’’
मला वाटलं आता मी पडणार मी ओरडलो. ‘‘मला नाही येत.’’ पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. माझे बूट पकडून ते माझ्या बाजूने धडपडत चालत राहिले. मी मात्र विचार करत होतो यांचं डोकं किती छान आहे ….त्यावर आहेत मऊ कुरळे केस, तेल लावलेले आणि खोबर्याचा वास येणारे. मला चालता येईल की नाही माहीत नाही पण मी उद्या टाटाच्या खोबरेल तेलानं डोक्याला चांगलं मालिश मात्र करणार.
‘‘बरोबर अगदी असंच. डावा उजवा डावा उजवा. लेफ्ट राईट लेफ्ट राईट.’’
मला एकदम आठवलं हां ! रासमोहन काका अगदी असंच चालतात आणि माझे पाय पुन्हा फेंगडे झाले.
‘‘एकेक पाऊल टाकायचा प्रयत्न कर आणि मनाशी म्हण लेफ्ट राईट लेफ्ट राईट.’’ ते म्हणाले.
लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं मनात म्हणत राहिलं तर बरं जमतंय हे लक्षात आलं.
पुढे मला अचानक अनोळखी आणि जोराचा खडखडाट ऐकू आला. त्यांच्या हातांना जवळ जवळ लाथाडत मी एकदम उडी मारली.
‘‘ती ट्रॅम आहे.’’ ते म्हणाले आणि आम्ही पळत जाऊन त्यात चढलो.
मला ते ट्रॅमचं डुगडुगणं, ढुरढुरणं आवडलंच. त्या चाकांचा गडगडणारा आवाज आणि सतत वाजणारी घंटा. या सगळ्यामुळे आमचा प्रवास वेगवान आणि मजेदार झाला असं वाटलं मला.
‘‘ही घंटा कसली आहे? ती सारखी का वाजते आहे? कोण वाजवतंय? मला हात लावून बघायचं आहे.’’
‘‘ती घंटा वाजली की पुढे चालणार्या माणसांना सूचना मिळते. ते वाटेतून बाजूला होतात… पण तुला हात नाही लावता येणार.’’
मला डॅडीजींची आठवण झाली. त्यांनी मला एकदा टांगा दाखवला होता. त्यांनी मला घोड्याला हात लावू दिला होता. त्याच्या मानेवर जोखड कसं बसवलंय ते मला कळावं म्हणून. मग घोड्याच्या तोंडात हात घालून लगाम कसा दातांमध्ये बसवला होता ते मला दाखवलं होतं. नंतर लगामाचे पट्टे दाखवून घोड्याचं नियंत्रण कसं करतात तेही दाखवलं होतं. मग घोड्याची शेपटी कशी गाडी आणि घोड्याच्या मध्येच होती तेही हात लावून पाहिलं होतं. ते आठवलं आणि मला वाईट वाटलं.
पुढे मागे, डावे उजवे असे हलके झोके खात ट्रॅम चालली होती आणि इशारा देणारी घंटा सारखी खणखणत होती. एक माणूस खुर्च्यांच्या मधल्या वाटेवरून धडपडत पुढे मागे जात होता. कसलं तरी यंत्र घेऊन तो तिकिटं देत होता त्याचा खटखटणारा, खुपसल्यासारखा आवाज येत होता.
ट्रॅम एकदम गचका देऊन थांबली आणि मी जवळ जवळ माझ्या सीटवरून फेकलाच गेलो. तिकिटवाला ओरडला ‘दादर सेंटर.’ रासमोहन काकांनी माझा हात धरला आणि मी त्यांच्या पाठोपाठ खाली उतरलो.
दादर सेंटरमध्ये त्यांनी माझ्यासाठी नाडीनी बांधायचे बूट घेतले. माझे पाय आता मोठे झाले होते माझ्या जुन्या बक्कलवाल्या बुटात ते मावायचे नाहीत.
-०-
एकदा दुपारच्या खाण्याच्या वेळी मी त्यांच्या जेवणघरात पळत पळत गेलो. रासमोहन काका एकदम म्हणाले, ‘‘थांब, तू जेव्हा आत येतोस ना तेव्हा आधी म्हणायचं ‘गुड आफ्टरनून अंकल, गुड आफ्टरनून आंटी’, सकाळ असली तर म्हणायचं ‘गुड मॉर्निग अंकल. गुड मॉर्निंग आंटी.’’
मी खुर्चीत धपकन बसत म्हणालो, ‘‘गुड आफ्टरनून अंकल. गुड आफ्टरनून आंटी.’’
‘‘असं नाही म्हणायचं, जंगली मुलं असं बसतात. ऊठ उभा रहा.’’ रासमोहन काकू म्हणाल्या. मी उभा राहिलो.
‘‘आणखीन एक गोष्ट आहे. आम्ही जर तुला विचारलं ‘हाऊ आर यू?’ तर तू हलकंसं हसून म्हणायचंस, ‘आय ऍम वेल अँड हॅपी. थँक यू.’ असं म्हणून मग बसायचं.’’ काकू म्हणाल्या.
‘‘तू नशीबवान आहेस. तुझं हसू मुळातच गोड आहे.’’ रासमोहन म्हणाले.
‘‘पण मधूनच तो फार उदास दिसतो.’’ काकू म्हणाल्या.
‘‘तेही साहजिक आहे. त्याला पंजाबातल्या आठवणी येत असणार.’’ रासमोहन काका म्हणाले.
‘‘चल तू छानसं हसून, म्हणून दाखव बरं, ‘आय ऍम वेल अँड हॅपी, थँक यू.’’’ रासमोहन काकू म्हणाल्या. मी ते वाक्य जितकं भर्रकन् म्हणता येईल तितकं म्हटलं आणि चांगलं हसू कसं दिसतं याची नीटशी कल्पना नसूनही हसायचा प्रयत्न केला.
‘‘हसताना तू तुझं नाक इतकं मुरडू नकोस, प्रयत्न कर’’ रासमोहन काका म्हणाले.
मग ते माझ्या जवळ आले. मला वाटलं आता ते माझ्या नाकावरच्या चुण्या नीट करणार. पण ते खाली वाकले आणि माझे दोन्ही पाय थोडे दूर केले. माझी पावलं सरळ पुढे आली.
‘‘हां हे बरोबर आहे. आता आहेस तसा उभा रहा. आता तुझे हात मागे घेऊन पंजे एकात एक पकड. फक्त बोटं. हां बरोबर. हे ‘आराम’ या स्थितीत उभं राहणं झालं. तू जेव्हा माझ्या किंवा आंटीच्या उत्तराची वाट बघत असशील तेव्हा असं उभं राहायचं. खरं म्हणजे शाळेतसुद्धा तू आमच्याशी जेव्हा जेव्हा बोलत असशील तेव्हा असंच उभं राहायचं. पण तू जेव्हा मला शाळेच्या ऑफिसात भेटायला येशील तेव्हा अटेन्शनमध्ये उभं राहायचं.’’ असं म्हणून काकांनी माझे पाय पकडून जवळ आणले. मी जवळ जवळ पडणारच होतो. मी तोल सावरण्यासाठी त्यांचे बारके केस पकडण्याचा प्रयत्न केला.
‘‘असं नाही. हात दोन्ही बाजूला सरळ खाली सोड. जेव्हा अटेन्शनमध्ये उभा राहशील तेव्हा तुझे हात नेहमी खाली सोडलेले हवेत.’’ त्यांनी सांगितलं.
त्या नंतर मी जेव्हा जेव्हा त्यांच्या बैठकीच्या खोलीत, जेवण घरात जायचो तेव्हा तेव्हा दरवाज्यात थांबून मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे उभा राहात असे. हात मागे घेऊन. हसून मी काका काकूंशी शुभेच्छांची देवाणघेवाण करत असे. (यात बदल करायला मला अनेक वर्ष घालवावी लागली. मला जर कुणी विचारलं ‘तू कसा आहेस?’ आणि ‘मी बरा नाहिये’ असं मला सांगायचं असेल तर ते सांगण्याचं धारिष्ट्य यायला खूप काळ जावा लागला. माझ्यापेक्षा मोठ्यांशी बोलताना मी नेहमीच अटेन्शनमध्ये उभा राहात असे. फक्त कधी मला खाज सुटत असेल किंवा माशी त्रास देत असेल तरच मी हा रासमोहन काकांचा धडा विसरत असे.)