पालकत्व ही निसर्गक्रमानं वाट्याला येणारी एक गोष्ट नसते तर ती एक वृत्ती आहे, आणि ती निभावताना काही विशेष विचार आणि कौशल्यांचीही गरज असते. आपण मूल नावाची मूर्ती घडवणारे नसून एक जिवंत व्यक्तिमत्व फुलायला हातभार लावणारे असतो. समाजात वावरताना प्रौढांनी फक्त आपल्या मुलांपुरतं पालकत्व सीमित न ठेवता इतर अनेक व्यक्तिमत्वांना विकसनाला हातभार लावून सामाजिक पालकत्व निभवायचं असतं.
हे पालकनीतीच्या मूलाधाराचे विचार पालक आणि शिक्षकांपर्यंत पोचवण्याचं, रुजवण्याचं काम करणार्या शांताबाई किर्लोस्कर आता आपल्यात नाहीत.
पालकनीती मासिक सुरू होण्याच्या आधी तीस एक वर्षांपासून सजग पालकपणाचा विचार शांताबाई मांडत होत्या. त्या अर्थानं त्या आपल्या सर्वांच्या आईच आहेत, आणि आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभं राहूनच नवी पिढी अधिक
व्यापक क्षितिजाचा अंदाज घेत असते. त्यामुळे पुढे जाताना शांताबाईंसारख्या द्रष्ट्या मातेची आठवण ठेवायलाच हवी.
पन्नास – साठच्या दशकांत शांताबाई किर्लोस्कर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या तेव्हा आणि स्वतः आई झाल्यावर पालकत्व आणि शिक्षण या विषयी जगात वेगळं काय काय चाललं आहे याचा शोध घेत होत्या. मादाम मॉंटेसरी, ताराबाई मोडक यांच्या विचारांनी आणि सहकारी शिक्षिका अनसूयाबाई शहा यांच्या प्रोत्साहनानं प्रेरित होऊन त्यांनी बालविकास मंदिर काढलं. शिक्षणाच्या मानसशास्त्रीय विचारांची नवी दृष्टी घेऊन काम सुरू केलं. स्त्री मासिकाच्या संपादनाशी संबंध असल्यानं या नव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी १९५१ मध्ये मुलं आणि शिक्षण या विषयावर विविध बाजूंनी प्रकाश टाकणारा स्त्री मासिकाचा विशेषांक काढण्यात पुढाकार घेतला. पुढे साठ साली स्त्री मासिकातून शिक्षक आणि शिक्षणपद्धती यावर उपहासात्मक लेख प्रसिद्ध झाला. या दोन्ही लेखांचा उपयोग करून अनेक विचारवंत, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांची चर्चा घडवून आणण्यात शांताबाईंनी पुढाकार घेतला.
त्यावेळी अमेरिकेच्या माहिती विभागातून तिथल्या पालक – शिक्षक संघाची माहिती, वाचनसाहित्यही मागवले, सर्वांनी वाचावे म्हणून बघायला ही ठेवले. पालक आणि शिक्षकांनी एकमेकांवर दोषारोप करून काही साध्य होणार नाही तर त्यांनी सहकार्यानं मुलांच्या विकासाचा विचार करायला हवा, हा आग्रह शांताबाईंनी सदैव धरला. शांताबाईंसारखी उत्साही आणि अष्टपैलू व्यक्ती नुसता विचार करून थांबणारी नसतेच. बा. ग. जगताप, व. द. देसाई यांच्या सहकार्यानं लगोलग ‘पुणे पालक शिक्षक संघाची’ स्थापना होऊन कामाला सुरुवात झाली.
पुढे १९६९ साली ‘महाराष्ट्र पालक शिक्षक संघाचीही’ स्थापना झाली. या दोन्ही संस्थांचा आधारस्तंभ म्हणजे शांताबाई.
या संस्थेच्या माध्यमातून ‘प्रभावी पालकत्व’ या विषयी कार्यशाळा घेणं, शाळांमधून पालक शिक्षक सहकार्य वाढवणं, आरोग्य तपासणी, आनंदमेळावे यांच्या आयोजनात मदत करणं, शाळांमध्ये समुपदेशन सेवा देणं, कुटुंबजीवन शिक्षणाचे तास घेणं असे अनेक उपक्रम पुण्यातल्या शाळांमधून सुरू झाले. कामाबरोबर नव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र पालकशिक्षक संघाच्या त्रैमासिकाचं संपादन त्या करू लागल्या. स्त्री, किर्लोस्कर, मनोहर, बालवाडी या मासिकांतूनही सकस विचारांचा खुराक मराठी वाचकांना शांताबाई आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या प्रयत्नांमधून मिळतच होता. त्याबरोबरच पालकत्व आणि शिक्षण याविषयीचे नवे विचार अधिक नेटकेपणानं पोचू लागले. शांताबाईंनी महाराष्ट्रातील अनेक उत्सुक व्यक्तींशी संपर्क ठेवला आणि या नव्या कामाचा प्रसार करत राहिल्या. अनेक कार्यकर्ते जोडले. अनेकांना आपापल्या ठिकाणी काम उभं करण्याचं प्रोत्साहन दिलं. ‘पालकनीती’ सुरू करण्यापूर्वी आम्ही त्यांना भेटलो होतो. नवीन मासिक सुरू करण्याला त्यांनी थोडा विरोधही दाखवला. सुरू असलेल्या कामातच हातभार लावायला सुचवलं.
त्याचं म्हणणं न जुमानता आम्ही पालकनीती सुरू केलं, पण शांताबाई रागवल्या नाहीत. बंडखोरी त्यांना प्रियच असावी. त्यांनी पालकनीतीलाही सहकार्य केलं. लेखनही केलं. माणसांमधली ऊर्जा ओळखून तिला कार्यप्रवण करण्याची आणि कार्यरत ठेवण्याची हातोटी शांताबाईंकडे होती. नुसती पोटतिडीक, कामाचं प्रेम उपयोगाचं नाही कामाची नीट व्यवस्था बांधली पाहिजे, ध्येय-उद्दिष्टं आणि कार्यपद्धती यांचा मेळ घातला पाहिजे याचं शिक्षण देणारं मुक्त विद्यापीठच होत्या त्या ! स्त्री मासिकाचं संपादन, युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशनचं क