सांगड, कृती आणि विचारांची

प्राथमिक स्तरावरील विषय शिक्षणात प्रयोगशील राहण्यावर आम्ही सातत्याने भर दिला. द्वैमासिक बैठकीत प्रत्येक शिक्षकाने कोणकोणत्या नवनव्या गोष्टी, उपक्रम राबविले, त्यात कसकसे अनुभव आले? मुले, ग्रामस्थ या सर्वांचा त्यात पुढाकार होता का? ही सारी चर्चा होत असते. एकमेकांचे अनुभव तपासले जातात. त्यावर सखोल चर्चा होते. शिक्षकाने स्थितीवादी राहू नये, प्रत्येक विषय नव्याने हाताळावा, मुलांसमोर तो विषय खुलेपणाने मांडावा व मुलांनी तो विषय फुलवित जावे या पद्धतीने पुढे जाण्यावर भर देण्यात येतो. प्रयोगशीलता ही काही तांत्रिक स्वरूपाची किंवा प्रदर्शन मांडावयाची बाब नाही. उलट जे समाज स्वतःबद्दल कमालीचा न्यूनगंड बाळगून आहेत, वर्षानुवर्षे शोषण होत राहिल्याने हे शोषण म्हणजे आपल्या वाट्यास आलेले प्राक्तन आहे, असे त्यांना वाटत राहते. ते संपवायची इच्छाशक्तीच त्यांच्यापाशी राहिलेली नाही. आपली मुले शिकली सवरली तर या जगण्यापासून, घरापासून त्यांनी दूर पळून जावे असेच त्यांना वाटते. आपल्याजवळ काही सामर्थ्यच नाही असे त्यांना वाटत राहते. अशा वंचित समाजातील स्फुल्लिंगे जागी करून त्यातून निर्माण होणारी ऊर्जा मुलांच्या शिक्षणात उपयोगास आणणे, अशा अंगाने ही प्रयोगशीलता पुढे नेण्यावर आम्ही भर दिला. आणि या प्रकारे काम केल्याने बर्याच गोष्टी हाताशी लागतात, हाताशी लागल्या आहेत हे गेल्या चौदा वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे.

शिक्षण ही एका समाजातील सत्ता आहे.
ती उलथून वंचितांचे भवितव्य घडविणारे असे ते एक हत्यार म्हणून हाताळण्यासाठी सकारात्मक पुढाकार शिक्षक घेईल, अशी व्यूहरचनाही आमच्या डोळ्यांसमोर होती. या व्यूहरचनेत आम्ही यशस्वी होत आहोत असे आता जाणवत आहे. शिक्षणाचे हत्यार वंचित घटकांनी जाणीवपूर्वक व संघटितपणे आत्मसात केले नाही तर त्यांचे वंचितपण दीर्घकाल तसेच राहण्याची शक्यता असते. याची जाणीव मनात आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या चिकित्सेतून, वंचित समाज घटकांच्या अनुभवांच्या चिकित्सेतून निर्माण केली जाते. या जाणिवेमुळे कामाविषयीचे वेगळेपण व बांधिलकी वाढीस लागावी अशी अपेक्षा आहे. शिक्षकांच्या निवडीनंतर प्रारंभीच्या प्रशिक्षणात त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक अनुभवांच्या विश्लेषणावर भर दिला जातो. ज्या वंचित समाज घटकातून तो शिक्षक आला असेल त्या वंचित घटकांचेही सामाजिक विश्लेषण करून एकूण वंचित समाज घटकांची स्थिती अशी का आहे, याचे परिशीलन केले जाते. हे विश्लेषण करीत असताना व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तवाचा परिचय करून घेतला जातो. शिक्षणाच्या संदर्भात वंचितांची स्थिती उपेक्षणीय का आहे, याचीही चर्चा केली जाते.

त्यानंतर जेथे शिक्षणाचे काम ते करणार आहेत, त्या वास्तवाचा परिचय करून घेण्यास मदत केली जाते. ज्या वंचित समाज घटकांत ते काम करणार आहेत त्यांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिचय करून दिला जातो. कातकरी, धनगर, दलित, कुणबी स्त्रिया यांच्या प्रश्नांची, त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची जाण करून घेण्यास मदत केली जाते. त्याबरोबरीनेच विषयज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्यासाठीच्या नव्या पद्धतींचा परिचय करून दिला जातो. शासनाने वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे व त्या पाठ्यपुस्तकांच्या साहाय्याने मुलांना विषयाची ओळख करून द्यावयाची आहे. या पाठ्यपुस्तकांच्या आधाराने मुलांना विषयज्ञानाबरोबरीने आपल्या समस्यांचा, वैशिष्ट्यांचा परिचय करून देण्यावर भर दिला जातो. अशा रीतीने शिक्षकांचे प्रशिक्षण नियमितपणाने केले जाते.

या प्रशिक्षणातून शिक्षकांना आलेल्या अनुभवांचे सामाजिक विश्लेषण, विषयज्ञान व शिक्षणाच्या पद्धतीविषयक समज अधिक सखोल होईल, असे पाहिले जाते. नियमित द्वैमासिक प्रशिक्षणाबरोबर जेथे शाळा चालते त्या वस्तीत जाऊन पालकांबरोबर रात्रीच्या वेळी बसून शाळेच्या, समाजाच्या प्रश्नांविषयी सखोल चर्चा केली जाते. या शैक्षणिक उपक्रमात सुरुवातीपासूनच श्री. दत्ता सावळे हे सहभागी झाले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण करणे, शिक्षणातील पद्धती ठरविणे, तपासणे, एकूणच कामाचे धोरण ठरविणे या सर्व पातळ्यांवर त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. शिक्षक, कार्यकर्ते या सर्वांचे ते मार्गदर्शक आणि ज्येष्ठ मित्र आहेत. कार्यकर्त्यांमधील विविध क्षमतांचा विकास व्हावा याकडे ते अधिक लक्ष देतात. कामात येणार्या अनुभवांचे विश्लेषण कसे करावे? आपल्या दृष्टीसमोर कशी मूल्यव्यवस्था असावी, कृतिशीलतेला वैचारिक आशयाची जोड कशा प्रकारे द्यावी, या सर्व पातळ्यांवर श्री. दत्ता सावळे हे नियमितपणे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. कामाचे नियोजन, मूल्यमापन, प्रशिक्षण या स्तरांवर कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी ‘अभ्यास गट’ महत्त्वाची भूमिका बजावतो. या अभ्यासगटाच्या दर दोन महिन्यांनी नियमित बैठका होतात. या अभ्यास गटात या उपक्रमातील शिक्षक व कार्यकर्त्यांबरोबरच संस्थेच्या व्यवस्थापनातील काही व्यक्ती, परिसरातील शिक्षण क्षेत्रातील मित्र-मंडळी अशा आठ ते दहाजणांचा सहभाग असतो.

या सर्व शिक्षकांनी आपली शाळा चालवितानाच स्वतःचे औपचारिक शिक्षणदेखील पूर्ण करावे यासाठी त्यांना मदत केली जाते. जवळजवळ सर्वच शिक्षक आपले पुढील शिक्षण घेत आहेत. त्यापैकी काहीजण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षांना बसले आहेत. काहीजण पुढील बी.एड्. शिक्षणाची तयारी करीत आहेत. या शाळा अधिकृत मान्यताप्राप्त नसल्या तरी प्रयोगशील शाळा असल्याने या शिक्षकांचा प्रशिक्षणासाठी (बी.एड्.) प्राधान्याने विचार व्हावा, असा प्रयत्न संस्थेतर्फे केला जात आहे. असे प्रशिक्षण त्यांना मिळाल्यास या कामाच्या पुढील टप्प्यांवरदेखील हे शिक्षक काम करू शकतील, असा विचार आम्ही केला आहे. शिक्षकांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात अधिक संपन्न व्हावे, सामर्थ्यवान व्हावे या भूमिकेतून परस्पर वैयक्तिक संबंधांना प्राधान्य दिले जाते. शिक्षकांनी आपल्या लेखन व वक्तृत्व कौशल्यात प्रगती केली आहे. आपले अनुभव त्यांनी साधना, मिळून सार्याजणी, आंदोलन या अंकांमध्ये व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये लिहिले आहेत. या संपूर्ण गटाचे सकारात्मक नेतृत्व करण्यासाठी जुने, अनुभवी शिक्षक-कार्यकर्ते तयार होत आहेत हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. प्रत्येकाकडे स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. ती अधिक विकसित व्हावीत व त्यातून प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी आणि गटाचे सामर्थ्य वाढावे, या दोन्ही अंगाने सतत विचार केला जात आहे.

या कामाला आता चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. या टप्प्यात ज्या शिक्षणपद्धती अनुसरण्यात आल्या त्यातून या वंचित समाजातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होते, याची खात्री पटली आहे. या टप्प्यातील लेखन, वाचन, मापन, निरीक्षण इ. शैक्षणिक क्षमतांची बांधणी सर्वच मुलांमध्ये योग्य रीतीने झाल्याचे आम्हाला जाणवते. मुलांमधील क्षमता एकाच पातळीवर नसतात हे खरे असले तरीसुद्धा प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यात किमान शैक्षणिक क्षमतांचे ग्रहण करण्यात कोणतीही अडचण येत नाही. उलट जी मुले शारीरिक व मानसिकदृष्ट्या मंद गतीची असतात त्यांना इतर मुलांबरोबर स्वतःच्या गतीने वाढण्याची मोकळीक ठेवल्याने आणि अशा मुलांना संपूर्ण शाळेने समजून घेण्याने त्यांची प्रगतीही चांगल्या प्रकारे होऊ शकते. अशा मुलांच्या कमजोर्या, व्यंगे दूषित वातावरणामुळे अधिक गडद बनतात. उलट हे वातावरण चांगले, आश्वासक असेल तर अशी मुले आपल्यातील कमजोरीवर आणि व्यंगावर मात करू शकतात, हेही या शाळांतून अनुभवावयास मिळाले. अशा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढण्याची गरज नसते. एकत्र शाळेतही त्यांचा विकास घडू शकतो असे या अनुभवावरून जाणवते.

या पहिल्या टप्प्यात प्राथमिक शिक्षणावर अधिक भर देण्यात आला. या अनौपचारिक शाळांत शिकल्यानंतर बहुतेक सर्व मुले पुढे गावातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांना जोडली गेली. मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्यातील बर्याच मुलांनी दहावीपर्यंत पोहोचण्याअगोदरच शिक्षण सोडले. या शाळांतून पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या मुलांपैकी केवळ सहा मुले दहावीला पोहोचली आहेत. त्या मुलांची तेथील प्रगती फारशी आशादायक नाही असेही जाणवले आहे. मुख्यतः गावातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांचे धनगर वस्त्यांपासूनचे अंतर मोठे असते. मुले दररोज चार-पाच तास पायपीट करतात. रात्री ७-८ वाजता घरी पोहोचतात. तेव्हा ती थकून गेलेली असतात. या स्थितीत हा अभ्यास पेलणे या मुलांना कठीण होते. बहुतेक मुलांची घरची स्थिती दारिद्य्राची आहे. त्यामुळे वह्या, पुस्तके, कपडे, चप्पल इतर सामुग्री इ. वस्तूंची चणचण असते. मुलांना घरच्या वेळेत आणि विशेषतः सुट्यांमध्ये घरातील कामांना जुंपावे, अशी पालकांची अपेक्षा असते. सरकारी शाळांतील वातावरण, अध्यापनपद्धती, इ. मध्ये होणारा फरकही महत्त्वाचा ठरतो. तेथे हुशार मुलांवर अधिक लक्ष दिले जाते. त्यांचे लाड पुरविले जातात. एकेका वर्गात ५०-६० मुले असतात. त्यामुळे वैयक्तिक लक्ष पुरविण्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते. मूल एखाद्या विषयात कमकुवत राहिले की तो कमकुवतपणा वाढत जातो. शिवाय परीक्षापद्धती, त्यातील घोकंपट्टी आणि स्मरणशक्तीवर देण्यात येणारा अनावश्यक भर या सार्या बाबी मुलांना त्रासदायक वाटतात. या सार्या अडचणींमुळे या मुलांचे माध्यमिक शिक्षण नीटपणाने होत नाही, असे आम्हाला जाणवू लागले.
संकलन – प्रिया बारभाई