आव्हान शिक्षणाचे !
मुलांच्या विकासामधे शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण, त्यांच्या भविष्याला आकार मिळेल अशा क्षमतांचा विकास हा बहुतांशी त्यांना दिल्या गेलेल्या शिक्षणावर अवलंबून असतो (अर्थातच त्यांनी त्यातून काय घेतलेय ह्यावरही).
सामान्य मुलांच्या बाबतीतही हे ‘शिक्षण’ देणं आणि मुलांनी ते ‘घेणं’ आव्हानात्मक काम ! तर मग जिथे त्या मुलांच्या शिकण्याच्या वाटेवर अनेकानेक अडथळे उभे आहेत त्या मतिमंद मुलांसाठी तर त्यातलं आव्हान शतपटीनं वाढतं. मतिमंदत्वाच्या तीव्रतेनुसार प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. तीव्र मतिमंदत्व असलेल्या व किमान नैसर्गिक क्रियांवर नियंत्रण नसलेल्या मुलांसाठी विशेष शाळा हाच पर्याय असतो. मात्र मध्यम स्वरूपाचे अथवा सीमारेषेवरील मतिमंदत्व असलेल्या मुलांना प्राथमिक (किमान चौथी पर्यंत) सामान्य शाळेतही घालता येतं. या दोन्ही प्रकारच्या शाळांमधून होत असलेल्या त्यांच्या शिक्षणासंबधी, शाळांच्या आणि शिक्षकांच्या त्याबद्दलच्या दृष्टिकोनासंबधी जाणून घेण्यासाठी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात काही शाळा निवडल्या. तिथल्या शिक्षकांशी, व्यवस्थापक मंडळींशी बोललो, त्यामधून समोर आलेलं या मुलांच्या शिक्षणाचं रूप पालकनीतीच्या वाचकांसाठी मांडतो आहोत. त्यातून आपल्या
आजूबाजूला, शेजारीपाजारी, क्वचित घरातही असलेल्या अशा मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्या पालकांना, शिक्षणसंस्थांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची कल्पना आपणास येईल.
‘लार्क स्कूल’ ही प्रिझम फाऊंडेशनची मतिमंद मुलांसाठी असलेली शाळा (प्रभात रोड, पुणे). लोखंडी पत्र्याच्या मेन गेटवर रंगवलेले प्राणी, पक्षी, पानं, फुलं, फुलपाखरं ओलांडून आम्ही आत गेलो. शाळा सुटायला अजून १५ मिनिटे वेळ होता. निरनिराळ्या वयाची १५/१६ मुलंमुली ग्राऊंडवर बागडत होती. दोन किंवा चार-पाचांच्या गटात मुक्तपणे खेळणं चाललं होतं. एक दोन मोठ्या माणसांचं लांबून लक्ष होतं पण हस्तक्षेप नव्हता. त्यांच्या चेहेर्यावरचा निर्भर आनंद – शाळेविषयी प्रथमदर्शनी कौतुकाची आणि आदराची भावना उमटवून गेला. कार्यालयाबाहेरच्या भिंतीवर काही सूचना/सुविचार वजा वाक्ये लिहिलेल्या पाट्या होत्या. त्यातलं ‘हसतमुख सदासुख’ हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं हे नंतर समजलं.
शिक्षणाच्या संदर्भात विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी सौ. पद्मजा गोडबोले यांच्या पुढाकाराने १९९० साली प्रिझम फाऊंडेशनची स्थापना झाली. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी ‘फिनिक्स’ व मतिमंदत्वाबरोबरच संमिश्र अपंगत्व असलेल्या मुलांसाठी ‘लार्क’ या दोन शाळा सुरवातीच्या काळात सुरू झाल्या. सर्वसामान्य शाळांमधे शिकताना आलेल्या अपयशामुळे मुलांचा गेलेला आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे हा मुख्य हेतू समोर ठेवून या शाळांची स्थापना झाली.
समस्या असलेला विद्यार्थी सर्वप्रथम शाळेत येतो तेव्हा एक महिनाभर त्याचे निरनिराळ्या परिस्थितीत निरीक्षण केले जाते. मानसशास्त्रज्ञांचे सहकार्य घेतले जाते. त्याच्यातील क्षमता, आवड-कल, स्वभाव, गरजा लक्षात घेऊन, पालकांशी बोलून-गरजेनुसार त्यांचे counselling करून मुलाला कोणते शिक्षण द्यावयाचे ते निश्चित केले जाते. काही विशेष प्रयत्नाने शालेय अभ्यासक्रम (इ. दहावी पर्यंत) पूर्ण करू शकणार्या मुलांना शैक्षणिक गटात किंवा फिनिक्समधे प्रवेश दिला जातो. इतर मुलांना व्यवहारात आवश्यक लेखन, वाचन, गणित या बरोबरच एक वर्ष पूर्व-व्यावसायिक कौशल्यांचे शिक्षण दिले जाते. या काळात त्याची आवड, क्षमता लक्षात येते, कुठले काम तो जास्त चांगले करू शकेल हे समजते त्यानंतर त्याला त्या व्यवसायाचे शिक्षण दिले जाते.
दरम्यानच्या काळात अठरा वर्षापुढील मतिमंद-अपंग मुलांसाठी प्रिझम पूर्व व्यावसायिक शाळा सुरू केली. इथे बेकिंग, कॅनिंग, शिवण, फाईल्स बनवणे, स्क्रीन प्रिंटींग, मेणबत्या बनवणे, पाकिटे बनवणे, स्टॉलवर विक्री करणे, निरनिराळ्या ठिकाणी माल पोहोचवणे, हिशोब ठेवणे इ. चे प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही व्यावसायिक कौशल्यासाठी आवश्यक कौशल्ये लहानात लहानात टप्पे करून या मुलांना शिकवावी लागतात. उदा. बिस्किटे तयार करताना कच्चा माल आणणे, त्यांचे वजन करणे, चाळून, निवडून घेणे, भिजवणे, लाटणे, आकार देणे, ओव्हन सुरू करणे, त्यात बिस्किटे लावणे, झालेली बिस्किटे काढणे, पॅकिंग, सीलींग करणे, मोजणे, ऑर्डरनुसार पोहोचवणे, हिशोब करणे इ.- अशा एखाद्या तरी कौशल्यासाठी आवश्यक सर्व क्रिया मुलांना त्यांच्या कुवतीनुसार शिकवण्याचा प्रयत्न केला जातो.
कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की समाजातील संबंधित व्यक्तींशी संवाद-संपर्कासाठीचं किमान आवश्यक कौशल्य हवंच. त्याचाही अनुभव, प्रशिक्षण इथं टप्प्याटप्प्यानं दिलं जातं-या बाबतीत ओळखीच्या अनेक व्यावसायिकांनी शाळेला सहकार्यच दिलं आहे. कुणी मुद्दाम ह्या मुलांना फसवल्याचे प्रसंग जवळजवळ घडले नाहीत. काही मुलं इथलं प्रशिक्षण पूर्ण करून एखाद्या कारखान्यात कामही करायला लागली आहेत. पण सर्वांनाच हे सहज शक्य होत नाही. म्हणून शाळेनेच या बाबतीत काही निर्णय घेऊन ते अमलातही आणलेत. त्यातल्या काही मुलांना शाळेतच मदतनीस म्हणून काम दिले. सध्या आदिती दातार (२४ वर्षे) व पूजा मुनोत (२२ वर्षे)या Moderate mental retardation (I.Q.65-70) असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी लार्कमधे साहाय्यक शिक्षक म्हणून काम करताहेत. आदिती लहान गटाच्या मुलांना गाणी छान शिकवते. त्यांना भरवते. तो पूर्ण वर्ग अर्धाएक दिवसपर्यंत सांभाळण्याइतकी ती तयार झाली आहे. मुलांनी त्रास दिला तरी काही वेळपर्यंत त्यांना समजावते.
तशीच पूजा..ती मुलांकडून चित्र काढून घेते. मोत्यांच्या माळा ओवायला, दागिने करायला मुलांना व्यवस्थित समजून मदत करते-शिकवते. शुभांगी विसपुते ही शाळेच्या कॅन्टीन, बेकरी व शिवण विभागात मदतनीस म्हणून चांगली रुळली आहे.
मात्र या टप्प्यापर्यंत मुलांची प्रगती होण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांबरोबरच पालकांचा दृष्टिकोन आणि सहभागही महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे पालकांचा शालेय अभ्यासक्रमातील प्रगतीचाच खूप आग्रह असतो. त्यातल्यात्यात थोडेफार लिहिता, वाचता, मोजता येणार्या मुलांनी परीक्षा देऊन पुढच्या इयत्तांमधे जात राहण्यासाठी पालकांकडून जास्त आटापिटा केला जातो. त्यात निसर्गत:च असलेल्या मर्यादांमुळे प्रगती थांबली की पालकांना ते स्वीकारणं जड जातं. या मर्यादांचा स्वीकार करून मुलगा जे करू शकतो त्याचा शोध घेऊन प्रयत्नांची दिशा ठरवणं, त्यानुसार शाळेत चाललेल्या प्रयत्नांना घरीही हातभार लावणं, हे घडलं तर मुलं स्वत:च्या पायावर उभी राहायला लागतात. ध्येय गाठण्यासाठीचे टप्पे आणि कालावधी त्या त्या मुलाच्या मतिमंदत्वाच्या, अपंगत्वाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा असतो. त्यामुळेच एकही मिनिट एका जागी बसून एका गोष्टीवर लक्ष देऊ शकत नसलेली hiper active आणि severe retadation असलेली मोना पवार सारखी एखादी मुलगी साडेतीन वर्षांच्या प्रयत्नानंतर एकेदिवशी एकतास सलग बसून मण्यांची माळ बनवू शकते. आणि हा तिच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरतो.
शाळेत या मुलांसाठी चाललेल्या प्रयत्नाला अनुसरून गृहपाठ देण्यात येतात. कपड्यांच्या घड्या घालून ठेव. कपाट आवर. भाजी निवड. चहा करून दे. छोटी छोटी कामे पालकांनी लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक घरी करून घेतली तर मुलं शाळेत लवकर प्रगती करतात. पण बर्याच पालकांना प्रश्नोत्तरं लिहिणे, गणितं सोडवणे अशा गृहपाठांपेक्षा वेगळे असे हे गृहपाठ…गृहपाठ वाटतच नाहीत. त्यामुळे पालकांच्या सहकार्याची जोड शाळेच्या प्रयत्नांना मिळत नाही. घरातल्या छोट्या छोट्या कामांची जबाबदारी या मुलांवर पालकांनी विश्वासाने टाकली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपणही घरात कुणाच्या उपयोगी पडू शकतो ही भावना त्यासाठी महत्त्वाची ठरते म्हणून पालकांनी त्यासाठी सातत्य ठेवून, धीर धरून प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असं ह्या शाळेतील शिक्षकांना वाटते.
या शाळेत साधारण पाच ते पंचवीस या वयोगटातली मुलं-मुली एकत्र वावरतात. मतिमंदत्व असलं तरी वयानुसार वाढणार्या शरीराच्या गरजा-त्यातही लैंगिक गरजातून निर्माण होणारे प्रश्नही हाताळावे लागतात. त्यासाठीच्या प्रयत्नांची सुरुवात अगदी पहिल्यापासूनच केली जाते. मूल सात-आठ वर्षाचं झालं की त्यानं आपली अंघोळ, कपडे घालणं स्वत: करावं, हळूहळू निदान आतले कपडे घालून बाथरूम बाहेर यावं यासाठी आग्रह धरला जातो. त्यासाठी आवश्यक प्रयत्नांची दिशा पालकांनाही समजावून सांगितली जाते. शरीराच्या सर्व अवयवांची माहिती, त्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व मुलांना सांगितले जाते. वयात आलेल्या मुलींना, कुणाला छातीला, मांड्यांना उगीचच हात लावू द्यायचा नाही. कुणी मुद्दाम तसं केलं तर चिमटे काढायचे, ढकलून द्यायचं किंवा जोरात ओरडायचं-असंही सांगावं लागतं. स्पर्शास्पर्शातला फरक त्यांना ओळखता यावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात. नाट्यीकरण, प्रसंग सादरीकरण, गोष्टी, प्रसंगावर चर्चा या माध्यमातून मुलांच्या मनावर याबाबत योग्य त्या गोष्टी बिंबवल्या जातात.
वयात आलेली मुलं स्वत:च्या अवयवांशी चाळे करतात. अशावेळी त्याला टॉयलेटला पाठवायचं, आणि असं होऊ नये म्हणून अशा मुलांना जास्तीत जास्त कामात गुंतवून ठेवायचं त्यांची भरपूर दमणूक होईल अशा जास्तीत जास्त मैदानी खेळात त्यांना गुंतवायचं असे उपाय केले जातात. ही मुलं कोणत्याही आवडत्या कामात गुंतलेली असतात तेव्हा असे प्रश्न निर्माण होत नाहीत असा इथल्या शिक्षकांचा अनुभव आहे.
या मुलांमधे मुळातच असलेली लयतालाची आवड लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. नृत्य, नाटिका, भाषणे, कथाकथन, यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल असते. शाळेत सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाची तयारी, प्रॅक्टीस चालूच असते. यात मुलांच्या उत्साहाला पारावार नसतो आणि शिक्षकांच्याही. या सर्व दृष्टिकोनाचा आणि प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच इथला प्रत्येक जीव आपआपल्या मर्यादेसह जगतानाही आनंदी दिसतो.
खरं तर अशा पद्धतीनं विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक शाळा आहेत पण त्या बहुतांशी मोठ्या शहरात. खेड्यापाड्यातून दर शंभरामागे दोन या प्रमाणात असलेल्या या मुलांच्या शिक्षणाचं काय होतं – हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही शिक्षकांशी बोललो.
पिंपरी-चिंचवडसारख्या पुणे शहरालगत असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी आपले अनुभव सांगितले. कितीही प्रयत्न केला तरी एखादं मूल इतर मुलांप्रमाणे अभ्यासात प्रगती करू शकत नाही. त्याच्या आकलनाचीच ती मर्यादा आहे हे लक्षात येतं. पण पालक ते स्वीकारायला तयार नसतात. ‘काहीही करा पण त्याला ‘पास’ करा’ – अशी गळ घालतात. पुढच्या इयत्तांमधे जास्तच समस्या येतात. वर्गात शिकवताना ते कळत नसतं- लक्ष लागत नाही, खोड्या करणं इतरांना त्रास देणं सुरू होतं – ‘अप्रगत’चा शिक्का बसलेला असतो-त्यातून निराशा येते, कधी कधी गंभीर समस्या निर्माण होतात.
लातूर शहरालगतच्या एका शाळेत शिकवणार्या शिक्षकाच्या वर्गात एक मतिमंद मुलगा आहे. लातूरमधे विशेष शाळा असूनही पालक त्याला तिथे घालत नाहीत कारण त्या मुलाला शिक्षकाचा लळा लागला आहे. ‘तुम्ही आहात तोवर शिकेल दोन गोष्टी, राहूद्यात इथेच.’ पालक असं बोलतात. त्यांच्या समजून घेण्याच्या मर्यादा लक्षात आल्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोरचा ‘काय करावं?’ हा प्रश्न सुटतच नाही.
ही उदाहरणं प्रातिनिधीक स्वरूपाचीच आहेत. सामान्य शाळेतल्या विशेष मुलांच्या शिक्षणाचा हा प्रश्न विचारात घेऊन शासनाने काही पावलं उचलली आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एकेका प्रकारच्या एकेक विशेष शिक्षकाची नेमणूक सर्व शिक्षा-अभियानांतर्गत केली आहे. एक अंधांसाठी, एक मूकबधीरांसाठी, एक मतिमंदांसाठी इ. मात्र प्रत्येक शाळेतील दोन-पाच मुलांच्या वाट्याला हा विशेष प्रशिक्षित शिक्षक आठवड्यातून एखाद्या दिवसासाठीच येतो. नेहमीच्या वर्गशिक्षकाला त्याने आठवड्यातील पुढील प्रयत्नासाठी काही सूचना दिल्या तरी त्यासाठी आवश्यक असलेला स्वतंत्र वेगळा वेळ वर्गशिक्षकालाच काढता येत नाही.
महाराष्ट्रातील काही मोजक्या प्रयोगशील शाळांमधे सर्वसमावेशक शिक्षणाचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. पुण्यातली ‘अक्षरनंदन’ ही त्यातलीच एक शाळा. नैसर्गिक क्षमतेनुसार स्वत:च्या गतीनं शिकण्याची (तेही सर्वसामान्य मुलांच्या बरोबर राहून) संधी या मुलांना मिळायला हवी हा दृष्टिकोन ठेवून तसे प्रयत्नही केले जातात. यातूनच सामान्य मुलांचा अशा मुलांकडे पाहण्याचा योग्य मानवीय दृष्टिकोन विकसित होतो असा इथल्या शिक्षकांचा अनुभव आहे. म्हणूनच शाळेतील मुलं जेव्हा कामायनीसारख्या विशेष शाळेतील मुलांना भेटायला जातात तेव्हा तिथलं वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. गोंधळून जाणं किंवा नजरेत उपहास, तुच्छता किंवा कीव यासारख्या भावना उमटणं असं त्यांच्याकडून घडत नाही.
वयाच्या ज्या टप्प्यापर्यंत मुलाला या शाळेतील शिक्षणाचा, वातावरणाचा काही फायदा होतोय असं वाटतं तोपर्यंत अशा मुलांना शाळेत ठेवलं जातं – गरजेनुसार एका इयत्तेत दोन दोन वर्षेही. या मुलांकडं वर्गात विशेष लक्ष दिलं जातं. त्यांच्या मर्यादा समजून घेऊन त्यांना शिकण्यासाठी आवश्यक वेळ देण्याचं भान असलेला शिक्षकवर्गही इथे आहे. त्यामुळं निदान प्राथमिक शिक्षणाच्या मर्यादेपर्यंत तरी मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार इतर मुलांबरोबर शिकण्याची संधी काही थोड्या (म्हणजे एकूण इतर संख्येच्या तुलनेत अगदीच थोड्या) मुलांना तरी इथे मिळते. अर्थात पालकांच्या सहकार्याचा भाग इथे फार महत्त्वाचा असतो. कधी कधी मुलाबरोबर एखादी ताई किंवा आईही शाळेत थांबते. वर्गाच्या एकूण चौकटीत ही मुलं बसत नाहीत. एका जागी स्थिर बसणं अवघड असतं. त्यामुळे वर्ग डिस्टर्ब होऊ शकतो तरीही, ‘प्रत्येकाला आपापल्या गतीनं, पद्धतीनं शिकायचा संपूर्ण हक्क आहे.’ या शाळेच्या भूमिकेतून या मुलांना सामावून घेण्याची दृष्टी शिक्षकांमुळं, सर्व पालकांमधेही रुजते असे जाणवते.