निलय
निलयचा जन्म २१ डिसेंबर १९८९चा. तो जन्मतःच अपंग आहे. स्नायूंमधील जन्मतःच असलेल्या व्यंगामुळे तो चालू शकत नाही. आधाराविना उभाही राहू शकत नाही. त्याची बुद्धीही सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आहे हे लक्षात आल्यावर शाळेत घालण्याआधी आम्ही त्याचा आय.क्यू. काढला. तेव्हा तो बॉर्डरलाईन-वरचा मतिमंद मुलगा असल्याचे समजले. आम्हाला मात्र अजूनही तो ‘शार्प’ आहे असेच वाटते. नॉर्मल शाळेत प्रयत्न केला पण प्रवेश मिळाला नाही. मग लार्क स्कूलमधे घातले. तिथे त्याची अभ्यासात बर्यापैकी प्रगती होत होती.
१९९९ साली निलय १० वर्षाचा झाला. तेव्हा त्याच्यासाठी ‘व्हील चेअर’ आणली होती. कधी कधी रात्रीचं जेवण झाल्यानंतर निलयला व्हील चेअरवर बसवून आम्ही रास्ता पेठेत हिंडायला जायचो. एकदा असेच हिंडताना के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोर आइस्क्रीम घेत होतो. त्यावेळेस निलयला बघून २५-३० वर्षाचा एक तरुण आमच्याजवळ आला आणि निलयविषयी माहिती विचारली. नंतर त्यानं सांगितलं की निलयसारख्या मुलांना मी सोमवार पेठेत शाहू तलावावर पोहायला शिकवतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला घेऊन या. एवढे सांगून तो निघून गेला. त्या वेळेस निलयची अवस्था अशी होती की आम्हाला ते शक्य होईलसं वाटलं नाही. म्हणून त्यावेळी आम्ही मनावर घेतले नाही.
दरम्यान निलयच्या उपचारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चालू होते. असेच एकदा टिळक रोडवर योगेश हॉस्पिटलमध्ये निलयला दाखवायला गेलो. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की निलयला पोहायला शिकवा त्यामुळे त्याच्या मानसिक व शारीरिक क्षमतेमध्ये सुधारणा होईल. त्यावेळेस आम्हाला के.ई.एम.च्या समोर भेटलेल्या मुलाची आठवण झाली. लगेच दुसर्या दिवशी सकाळी आम्ही शाहू तलावावर गेलो. तेथे त्या मुलाला भेटलो. अशा तर्हेने निलयचा पोहण्याचा उपक्रम १९९९ डिसेंबर पासून शाहू तलावावर सुरू झाला.
रोज सकाळी मी निलयला शाहू तलावावर व्हील चेअरवर बसवून घेऊन जात होते. तेथे गणेश म्हणून कोच होते, ते त्याला मालीश करायचे आणि त्यानंतर निलयला घेऊन १० फूट खोल पाण्यात उतरायचे. आम्हाला वाटले निलय सुरुवातीला पाण्यात टाकताना घाबरेल व रडेल पण असे काहीच घडले नाही. निलय न रडता, न घाबरता पाण्यात उतरला आणि पोहणे शिकू लागला. तो फ्री स्टाईल २ महिन्यात शिकला आणि नंतर तो रोज तासभर सराव करू लागला.
शारीरिक व मानसिक अपंग असलेला निलय आता काहीच करू शकणार नाही असे आम्हाला वाटायचे पण तो अंदाज त्याने साफ खोटा ठरवला.
निलयच्या पोहण्यामुळे आम्हालाही एक आत्मविश्वास आला आणि निलयच्या भविष्याची काळजी कमी झाली. आम्ही घरचे सगळे लोक फार खूश होतो. २००२ मध्ये शाळेकडून एस.पी.कॉलेजवर पोहण्याच्या स्पर्धेत सहभागासाठी पत्र आले. ती स्पर्धा रविवारी होती. आम्ही फक्त निलयच्या हौसेसाठी त्या स्पर्धेत त्याला घेऊन गेलो. तेथे कसे/किती स्पर्धक असतील? निलय कसा पोहेल? निलयच्या आत्मविश्वासाला तडा तर जाणार नाही ना? असे फार प्रश्न मनात होते. तरीही निलयच्या हौसेखातर त्याच्यात सहभाग घेतला आणि त्या २५ मिटरच्या स्पर्धेत निलयला सुवर्णपदक मिळाले. आम्हाला अजून तो क्षण आठवतो. निलयला त्यावेळी झालेला आनंद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
मग निलयचा आणि आमचाही आत्मविश्वास वाढला आणि आम्हाला वाटले की निलय काही तरी चमत्कार घडवेल आणि खरंच निलयचा पोहण्याचा, पदके जिंकण्याचा प्रवास सुरू झाला. आजपर्यंत त्यानं जिल्हा पातळी, राज्य पातळी व राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमधे कधी सुवर्ण तर कधी रौप्य, कास्यपदकं मिळविली आहेत. एवढंच नाही तर क्वालालंपूर, मलेशिया अशा बाहेरच्या देशांमधील स्पर्धांमधेही यश संपादन केले आहे. जागेअभावी सर्व स्पर्धांची यादी देणं शक्य नाही.
निलयच्या खेळाच्या वाढत्या प्रगतीबरोबर हळूहळू त्याची अभ्यासातील प्रगतीसुद्धा वाढू लागली. निलयला शिकवलेलं लगेचच लक्षात येत असे. त्यामुळे त्याच्या लार्क शाळेतून त्याला चौथीच्या परीक्षेला बसविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे शाळेतून तसेच घरीही त्याचा आम्ही अभ्यास करून घेतला आणि आमच्या दोघांच्याही प्रयत्नांना यश आले. निलय सोळाव्या वर्षी २००५ एप्रिलमधे चौथीची परीक्षा डिस्टींक्शनमधे पास झाला. त्याच्या पास होण्याने आमचाही आत्मविश्वास वाढला आणि २००७ एप्रिल मधे त्याने पाचवीची परीक्षा ५८% गुणांनी पास केली. यंदा तो सहावीचा अभ्यास करत आहे.
निलयचे हे सगळे यश पाहून आम्ही फार खूश आहोत. जे काम सामान्य मुलेही करत नाहीत ते निलयने केले. आमचा निलय शरीराने व मनाने अपंग असूनसुद्धा त्याने पोहण्यात एवढे यश मिळवले. लोक मुलांना वडिलांच्या नावाने ओळखतात. पण आम्हाला निलयचे आई-वडील म्हणून ओळखतात याचा आम्हाला अभिमानच वाटतो.