मी शिकले, त्यांच्याकडून
ह्या जगात जगायला येणार्या प्रत्येकाचं इथलं एक काम असतं, त्या अस्तित्वाचा आसपासच्यांच्या विकसनात काही तरी वाटा असतो, असं मला वाटतं. हे वाटणं श्रद्धा गटात येतं. माझा त्यावर विश्वास असतो, पण मी शास्त्रीय सत्य म्हणून सिद्ध करू शकत नसते.
काटेतोल शास्त्राची मोजपट्टी सर्व ठिकाणी वापरता येते असंही नाही, पण मन शोधत राहातं, जागोजागी विखुरलेली अनेक उदाहरणं.
मतिमंद जीवांबद्दल हा प्रश्न साहजिकच पडतो. ह्या जीवांचं इथलं नेमकं काम काय? कधी पालकांच्या गळ्यातलं लोढणं अशी त्यांची संभावना केली जाते. अशा बालकामुळे पालकांना क्षमता असूनही पुढे जाता येत नाही. जीवन त्याच एका खुंट्याशी बांधलं जातं असं अनेक ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे ह्या जीवांच नेमकं काय काम, किंवा इतरांच्या जाणीव विकसनात त्यांचा काय सहभाग असा प्रश्न मला पडत राहिला.
कधीकधी त्याची काही उत्तरंही मिळाली. त्यातलीच ही काही. ह्या उत्तरांनी त्या पालकांना काय मिळालं हे तर स्पष्टच आहे, पण मलाही फार मोठे आणि महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले.
मतिमंद बालकांकडून तुमच्याआमच्या सारख्या हुषार वगैरे लोकांना शिकण्यासारखं खूप आहे, हे उमजणं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा धडा.
मी काय शिकले, कशावरून, तेच थोडं सांगते.
वसुधाताई, त्यांचे पती आणि दीर, नणंदा सारेच अतिशय बुद्धिमंत म्हणून नावाजलेले.
पण त्यांची एक मुलगी मतिमंद. मी पहिल्या पहिल्यांदा तिच्याशी लहान बाळासारखं ‘गोड’ बोलत असे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घरातले सर्वजण तिच्याशी साधं सरळच बोलतात. तिला समजायला थोडा वेळ अधिक देतात, इतकंच. तिला टाळत नाहीत. सामावून घेतात.
तिच्यामुळे वसुधाताईंचं जीवन बदललं. त्यांना नोकरी करता आली नाही. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम होती. मनात इच्छा होती, त्यामुळे त्यांना वैषम्यही वाटत राही. यजमानांनी मात्र ‘करीयर’ करावी ह्याचंही दु:ख असे. म्हणून त्यांनी एकदा जाहिरात वाचून सरळ अर्ज केला. तर नेमणुकीचंच पत्र आलं. ते पाहिल्यावर यजमानांनी मात्र नकार दिला वसुधाताईना त्यांचा रागही आला, पण त्यातला मुद्दाही कळत होता. त्यांच्या डोळ्यातून पाणीच येऊ लागलं. ते पाहून ‘ती’ मुलगी जवळ येऊन म्हणाली, ‘‘आई, मी तुला व्हायलाच नको होते ना, माझ्यामुळं तू घरात अडकून पडतेस’.
वसुधाताई हा प्रसंग सांगून म्हणाल्या, ‘‘आमच्या घरातल्या इतक्या हुषार मानल्या गेलेल्या एकालाही जे दिसलं नाही, ते समजायला मला वाटतं, बुद्धी लागतच नसावी, मन लागतं, आणि माझ्या मुलीजवळ ते आहे. त्यानंतर मी तिच्या विकासासाठी मनापासून आणि पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. त्याकडेच माझं काम म्हणून मी पाहिलं. त्यात तिनं नवं शिकावं हा भाग जसा होता, तसा इतरांनी तिला सामावून घ्यावं असाही होता. माझी इतर दोघं मुलंही ते शिकली. ह्यात मला कमीपणा, दोषभावना वाटत नाही. तशी संधी हिच्यामुळे त्यांना मिळाली, ह्या शिक्षणाचा जीवनात अनेक परिस्थिती, व्यक्ती समजावून घेताना उपयोगच होईल अशी माझी खात्री आहे.’’
माणसानं माणसाला समजून घ्यावं ह्याहून मोठं काय? ते कळायला नुसती तैलबुद्धी पुरत नाही. त्यापलीकडे काहीतरी लागतं. हीच समजूत स्पष्ट करण्याचं काम वसुधाताईंच्या ‘लेकीनं नकळत करून दिलं.’
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला मी गणित शिकवण्याचा प्रयत्न करीत असे. हा मुलगा मतिमंद होता. त्याला शिकवण्यासाठी मी तर्हेतर्हेचे गणित-तर्कशास्त्राचे खेळ शोधून आणत असे, आणि त्याला काहीच जमत नाही हे पाहून निराश होत असे. एरवी मला शिकवायला बरं जमतं. इथं तर एरवीपेक्षाही मी खूप प्रयत्न करत होते. अखेर, ‘हा इतका बिनडोक आहे, की त्याला काहीच जमणार नाही, असं मला वाटू लागलं. ह्याच काळात मी गाणं शिकायला माझ्या एका दुसर्या मैत्रिणीकडे जात असे. मला गाणं जमत नसेच. एकदा मला माझा गणिताचा शिष्य गाणं शिकायला तिथेच येतो असं कळलं. मी थक्क झाले. ‘हा गाणं शिकतो?’ मी विचारलं. गाणारी मैत्रीण म्हणाली, ‘हो तर, ताल डोक्यात आहे त्याच्या’.
‘अग, पण तो मतिमंद मुलगा आहे.’
‘असेना, पण गाण्यात नाही. म्हणजे त्याला गाता येत नाही, पण गाणं उत्तम कळतं.’ ती इथंच थांबली असती तर… पण नाही. ती मैत्रीण, तशात सडेतोड. ‘मी तुलाही शिकवते आणि त्यालाही. ताल म्हणशील तर तुझ्या दसपट समजतो त्याला.’
मी आवंढा गिळला. ती मला दुखवायला असं म्हणण्याची शक्यताच नव्हती, हे मला माहीत होतं. ‘आपले निष्कर्ष किती तुटपुंजे असतात’, मला वाटलं.
व्यावसायिक कामानिमित्तानं एका बाईंना भेटले होते. त्यांची मुलगी मतिमंद होती. त्यामुळे त्यांनी घरी भेटणं सुचवलं होतं. त्यांना घर सोडता येत नसे. ह्या मुलीला मी तेव्हा पाहिलं. दुसर्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. आमची ओळख खरी तुटपुंजीच. पण ह्या प्रसंगानं, तिला वेगळं वळणच दिलं. त्यांनी ह्या मुलीवर लिहिलेला इंग्रजी लेख मी मराठीत भाषांतरीत केला. त्यांनी लेखात म्हटलं होतं, की हिच्यामुळे मला अनेक स्नेहीसोबती मिळाले. स्वार्थी, व्यवहारी जगातही, निरपेक्ष स्निग्ध मैत्री गवसली. माझी स्वत:ची जाणीव वाढली, विकसली हे तर वेगळंच.