स्पष्टतेच्या दिशेने
घरात ‘मतिमंद’ मूल जन्माला आल्यानंतर पालकांनी त्याला सहजपणे, आनंदानं स्वीकारणं नि त्याच्या क्षमता-मर्यादांना जाणून घेऊन त्याच्या विकासासाठी, एवढंच नव्हे तर आनंदासाठीही होता होईल तेवढे सर्व प्रयत्न करणं, त्यासाठी स्वतः शिकायची, बदलायची तयारी ठेवणं हे ‘आदर्श’ आहे, परंतु सोपं मात्र नक्कीच नाही.
श्रीमती शारदा बर्वे या मानसतज्ज्ञ आहेत. विविध प्रकारच्या मानसिक समस्यांची मुळे शोधून त्यावर उपाय शोधण्यासाठी मुलांना आणि मोठ्यांना त्या गेली वीस वर्षे मदत करत आहेत. मतिमंद, गतिमंद, डाऊन्स सिंड्रोम असणारी कितीतरी मुलं व पालकांना केलेल्या समुपदेशनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अशा पालकांना अनेक प्रश्नांना-आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांच्या या वाटचालीत निश्चित उपयोगी पडेल अशी ही मुलाखत.
मतिमंद मुलाचा पालकांनी ‘स्वीकार’ करायचा म्हणजे नेमकं काय? त्यांच्या मर्यादा ओळखणं-त्यांना समजून घेणं याचबरोबर त्यांच्यात असलेल्या क्षमतांचा विकास किती मर्यादेपर्यंत होऊ शकतो हेही जाणून घेणं… असा होतो का?
आपल्या मुलाबद्दलची किंवा कोणतीही वास्तविकता समजून घेणं म्हणजे ‘स्वीकार’ असं आपण स्वीकाराबद्दल अगदी साध्या शब्दात म्हणू शकतो. इतर कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार करणं आणि मुलाच्या मतिमंदत्वाची कल्पना दिली गेल्यानंतर त्या मुलाचा आणि अनुषंगानं येणार्या अनेक गोष्टींचा स्वीकार करणं याची खरं तर तुलना करता येण्यासारखी नाही. सर्वसामान्य आणि कुठल्याही प्रकारे विशेष असणार्या मुलांना वाढवणं, योग्य पद्धतीनं वाढवणं, हे जोखमीचंच काम असतं. ‘आपल्या घरात मतिमंद मूल जन्माला आलं आहे’, याचा धक्का पचवणं किती कठीण असतं हे फक्त त्या परिस्थितीतल्या पालकांनाच माहीत असतं. हा धक्का पचवता येण्याचा प्रत्येकाचा काळ वेगवेगळा असलेला दिसतो. कारण आयुष्यात उभ्या राहणार्या बर्याच प्रश्नांना, समस्यांना बिनतोड उत्तर मिळू शकतं आणि प्रश्न सुटू शकतात परंतु मतिमंदत्वामुळे उभ्या राहणार्या प्रश्नांना सर्वतोपरी समाधानकारक उत्तरं मिळून पुढचा संपूर्ण मार्ग सुकर झाला असं होऊ शकत नाही. पुढे येणार्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, योग्य त्या गोष्टींच्या निवडीतूनच होऊ शकते.
प्रथम बसलेल्या धक्क्यातून सावरताना परिस्थितीचा स्वीकार करत करतच जावं लागतं. कारण कित्येक बाबतीत अपेक्षांची पूर्ती न होणं हे विशेष मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडतं. ‘या मुलाच्या बाबत जे जे घडेल ते मी स्वीकारेन’ असा विचार जरी झालेला असला तरी सतत वाट्याला येऊ शकणार्या अपेक्षाभंगामुळे मनातल्या स्वीकाराच्या भावनेवर पुन्हा फुंकर घालून ती जागी ठेवावी लागते. जरी ही भावना जागी राहिली तरी निराशेचा अनुभव येणारच नाही असं कसं होईल? तो अनुभव येणं सर्वसाधारण माणसांच्या बाबतीत केवळ नैसर्गिक आहे. शिवाय मतिमंदत्वाच्या रूपानं नव्यानं समोर आलेली एकच गोष्ट हाताळली की संपलं असं नसून आपल्या आयुष्यातल्या इतर अनेक डगरींवर पाय ठेवून तोल साधत जगायचं आव्हान स्वीकारावं लागतं. मुलाची जबाबदारी घेणार्या एखाद्याच व्यक्तीपुरतं ते मर्यादित नसतं तर त्याच्या भोवतीची माणसं, घटना, व्यवसाय, पूरक गोष्टी या सर्वांचे संदर्भ असतातच.
मुलात मतिमंदत्व आहे हे आढळल्यानंतर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं, योग्य त्या बाबतीत प्रश्न विचारून, चर्चा करून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं,वास्तवाला धरून असलेली आव्हानं पेलून अपेक्षांची पातळी योग्य तीच ठेवणं हे पालकांनी करायला हवं.
कुठल्याही परिस्थितीचा स्वीकार करण्याची तयारी अर्थातच स्वतःबद्दलच्या स्वीकृतीतून होत असते. शांतपणानं गोष्टी हाताळणं,
आत्मविश्वासपूर्वक काही कर्तव्यांची पूर्तता करणं,
स्वतःची ध्येयं पूर्णतः बाजूला ठेवली तर एक प्रकारची निराशा पदरी पडू शकते याचं भान ठेवणं,
मुलाच्या जन्माबद्दल स्वतःला दोषी धरून छोट्या छोट्या आनंदापासून स्वतःला वंचित न ठेवणं,
माझ्याच वाट्याला हे का आलं – हा अनुत्तरित राहणारा प्रश्न न विचारता आपला व आपल्यावर अवलंबून असणार्यांचा उत्कर्ष होण्यासाठी प्रयत्न करणं
ही लक्षणं स्वीकृतीच्या मार्गावरून चालणार्या व्यक्तींची आहेत असं मला वाटतं. अशा कुटुंबांमधल्या मुलांना – मग ती सामान्य असोत किंवा विशेष – स्वतःला स्वीकारणं तुलनेनं सोपं जातं.
विशेष गुण आणि मर्यादा प्रत्येकामध्येच असतात. गुणांचा आविष्कार दिसू लागला की इतरांकडून त्याबद्दल कौतुक होतं आणि त्यामुळेसुद्धा स्वतःची ओळख व्हायला मदत होते. आपल्याकडे मर्यादांचे उल्लेख अतिशय नकारात्मक पद्धतीनं केले जातात. त्यामुळे मर्यादा असणं चुकीचं असतं असंच लहानपणापासून आपल्याला वाटत असतं. गुणांचा स्वीकार जसा सहजगत्या होतो तितक्या सहजपणे मर्यादांचा स्वीकार होणार नसला तरी त्यांचा वर्तनावर किंवा दैनंदिन व्यवहारांवर होणारा परिणाम कमी करणं जरूर आपल्या हातात असतं. या सगळ्याचा तौलनिक विचार करू शकणारे पालक आसपास असतील, एकमेकांकडे ते आदरानं बघू शकणारे असतील तर मुलं निदान अनुकरणाच्या पातळीवर त्यांच्यासारखं वागू लागतात. यातूनच स्वीकाराचा अर्थ त्यांना हळूहळू समजू शकतो.
आपल्या मुलाच्या क्षमता व मर्यादा समजून घेण्यासाठी बुद्धिमापन चाचणीचा उपयोग होतो का? कसा? आणि त्याच्या काही मर्यादा आहेत का?
बुद्धिमापन चाचण्या या प्रातिनिधिक चाचण्या असतात. त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन ही मुलं काय करू शकतील आणि काय करू शकणार नाहीत हे समजून घेण्यासाठी त्यांचा आधार निश्चितपणे घेता येतो.
बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा काही प्रमाणात स्थलकालसापेक्ष असतात असं म्हणावं लागेल. कोणत्याही मुलाच्या विकासाची गती, त्याची होणारी प्रगती चाचण्यांच्या माध्यमातून कळू शकते. या चाचण्या हजारो व्यक्तींच्या परीक्षणातून-निरीक्षणातून निघालेल्या निष्कर्षांवरून तयार केलेल्या असतात. त्या वापरतेवेळची एकूण परिस्थिती, संवादातला मोकळेपणा, चाचण्या वापरण्यातला आत्मविश्वास आणि अनुभवातून आलेलं प्रभुत्व यावर निष्कर्ष अवलंबून असतात. या सर्व बाबी समाधानकारक असतील तर मुलांच्या क्षमतांचा अंदाज पुष्कळ अंशी बांधता येतो. अंगभूत क्षमता, प्रयत्नांमुळे झालेली त्यांची गुणात्मक वाढ, शालेय अभ्यासामुळे, पुनरावृत्तीमुळे स्मरणात राहिलेल्या गोष्टी, वयानुसार स्पष्ट होत गेलेल्या संकल्पना त्याचप्रमाणे भाषिक अभिव्यक्ती, कार्यकारण भाव उमजणं यांचा अंदाज बुद्धिमापन चाचण्यांमधल्या प्रश्नोत्तरांमधून निश्चितपणे येतो. आता उपलब्ध असलेल्या अनेकविध चाचण्यांच्या योग्य वापरातून मुलांच्या क्षमता आणि मर्यादाही समजून घेता येतात.
मुलाची सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं विधायक ठरू शकतील अशा गोष्टी विचारात घेता येतात; त्यासाठी आखणी करून इतर व्यवस्था करण्याची तयारी करता येते. बुद्धिमापन चाचणीच्या मर्यादा लक्षात घेण्यासाठी एक उदाहरण फार ठळकपणे देता येईल. काही दिवसांपूर्वी एका मुलाला त्याची आई तपासणीसाठी घेऊन आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारा, तीन भाषा उत्तम बोलणारा हा दहा वर्षांचा मुलगा अजिबात लिहीत नसे. लेखनाचा विषयही काढू देत नसे. साहजिकच त्याच्या बुद्धीच्या विकासाबद्दल शंका येऊ लागली. बुद्धिमापन चाचणीवर त्याचा बुध्यंक सर्व सामान्यांच्या किंचित वरचा निघाला. परंतु त्याचं ‘लेखनवय’ बुद्धिमापन चाचणीवर काढता आलं नाही. त्यासाठी काही दृक्-संवेदनाच्या विकासाची पातळी शोधू शकणार्या चाचण्या त्याला द्याव्या लागल्या आणि त्यातून त्याला लेखन अक्षमता (developmental dysgvaphia) असलेली दिसून आली. परंतु त्याच वेळी बुद्धिमापन केल्यामुळे लक्षात आलेली महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा बुध्यंक. तो समजल्यामुळेच या मुलाला समजावून सांगून त्याच्याकडून काही करवून घेता येईल हे ठरलं. लेखन अक्षमता ज्या बुद्धिमापन चाचणीतून तपासता आली नाही त्याच चाचणीचा उपयोग असा झाला. म्हणजेच योग्य वेळी योग्य चाचणीची निवड करून सर्वांगीण विचारानं निष्कर्षाप्रत येणं गरजेचं.
बुद्धिगुणांकाच्या साहाय्यानं एखादी मर्यादा निश्चित केल्यावर असंही घडत असेल ना की त्या मुलावर एक शिक्का मारून त्याबाबतीत प्रयत्न करणंच पालकांनी थांबवलंय किंवा कमी केलंय?
बुद्धिमापनाच्या साहाय्यानं काही मर्यादा निश्चित केल्या जातात यापेक्षा, त्या समजून येतात असं म्हणू. चाचणीवरून बुद्धिगुणांक मिळाल्यावर त्याला काही नाव देणं क्रमप्राप्त ठरतं. याला ‘शिक्का मारणं’ असं म्हणणं म्हणजे माझ्या मते आपल्या मर्यादा ओलांडता न येणं.
हीच वेळ विशेष मुलांच्या पालकांच्या बाबतीत खूप जास्त आव्हानात्मक असते. निरनिराळ्या तज्ज्ञांची मतं घ्यावीशी वाटत असतात, औषधोपचाराचे निरनिराळे मार्ग अवलंबले तर कदाचित फायदा होईल असं वाटत असतं. अत्यंत महाग औषधं, महाग सल्लागार निवडला तर फायदा होईल म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे असं वाटत असतं. कारण प्रत्येक पालकाच्या बाबतीत निराशेचा किंवा अस्वीकाराचा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळेच काही काळ असा येतो की प्रयत्नच थांबवावेसं वाटू लागतं. ही गोष्ट कुणाच्याही बाबतीत नैसर्गिक आहे. कारण प्रयत्नाच्या प्रमाणात यश मिळणार असेल तर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे, फारसा वेळ न लागता समोर येत जातं. आणि जेव्हा हे घडताना दिसत नाही तेव्हा प्रयत्न करण्याचा सुरुवातीचा जोर कमी होत जाताना दिसतो. मुलाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं पूर्णपणे थांबलंय असं कधी तरी अगतिक झाल्यामुळे, आर्थिक अडचणींमुळे, पुढे काय करायचं याबाबत अनभिज्ञ असल्यामुळेच झालं तर होत असेल. एका अतिचंचल, मतिमंद मुलाला त्याची कुटुंबीय मंडळी घरात टेबलाच्या पायाला बांधून ठेवून शेतात कामाला जात असत. त्याच्या निरूपयोगी असण्यामुळे, काही क्षमता अंगात असूनही (ज्याला trainable म्हणता येईल) या मुलाच्या वाट्याला दावणीला बांधलेल्या गुरासारखं जिणं आलं होतं.
मतिमंद मुलांच्या बाबतीत प्रगती या शब्दाची व्याख्या थोड्या निराळ्या शब्दात करावी लागते. सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत ज्या गोष्टी मुलं कधी शिकली ते कळतसुद्धा नाही अशा गोष्टींचा प्रत्येक छोटा टप्पा पार करायलाही विशेष मुलांना खूप जास्त वेळ लागतो. या ठिकाणी वाट बघण्याची, सहनशक्तीची कमाल मर्यादा पालकांना गाठावी लागते.
प्रगतीच्या मार्गावरचे मैलाचे किती दगड पार केलेत आणि पुढचे टप्पे पार करण्यासाठी काय काय करता येईल यात मदत करणार्यांपैकी एकजण म्हणून मानसतज्ज्ञाकडे पाहता येतं. चाचण्यांचा, एक माध्यम म्हणून उपयोग करून घेऊन मुलांमध्ये असलेल्या जमेच्या बाजू लक्षात घेता येतात आणि काय नाहीये ते आकाराला आणण्यामध्ये त्यांची निश्चित मदत होऊ शकते.
मतिमंद मुला/मुलीने एखाद्या विशिष्ट बाबतीत अनपेक्षित प्रयत्नपूर्वक प्रगती केल्याची उदाहरणे आहेत का? त्यासाठी पालकांच्या प्रयत्नांची दिशा काय असावी?
मेंदूच्या निरनिराळ्या प्रभागांची कार्ये निरनिराळी असतात. सी.टी. स्कॅन अथवा एम.आर.आय. टेस्टमधून मेंदूचा कोणता भाग दुखावलाय किंवा कार्यरत नाहीये हे कळू शकतं. त्याचबरोबर मज्जामानसशास्त्रीय चाचण्याही उपलब्ध आहेत. मुलं किंवा मोठ्या व्यक्ती विशिष्ट प्रकारे वागतात, त्यामागे त्यांच्या मज्जासंस्थेची रचना असते. मेंदूचा विकास ज्या प्रकारे होत जातो त्यावर विशिष्ट गुणांचं (characteristics) अस्तित्व व विकास होणं अवलंबून असतं. मतिमंदत्व येण्यामागे फक्त जनुकीय किंवा रंगसूत्रीय कारणांपैकी एखादे कारण नसेल आणि जन्मवेळी श्वास न घेता आल्यानं मेंदूला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न झाल्यामुळे मेंदूचं नुकसान होण्यासारख्या घटना घडलेल्या असतील तर सार्वत्रिक (global) मतिमंदत्व येईलच असं नसतं. अशा वेळी मेंदूचे काही भाग पुढे विकसित होण्यामध्ये अडथळा येत नाही आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट बाबतीत अनपेक्षित प्रगती घडून येऊ शकते. माझ्या पाहण्यातल्या एका मुलीनं गणितासारख्या, बर्याच जणांना अवघड जाणार्या विषयात आश्चर्यकारक प्रगती केली. तिच्या वयाच्या पाचव्या वर्षीच तिला अबॅकसची संकल्पना समजलेली होती, तीही समजावून न देता. इतर बाबतीत मात्र ही मुलगी तुलनेनं पुष्कळ मागे पडत गेली.
असंच एक उदाहरण कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातल्या डाउन्स सिन्ड्रोम असलेल्या मुलीचं आहे. नृत्य शिकून घेऊन एकटीनं स्टेजवर कार्यक्रम करण्यापर्यंत तिनं प्रगती केली आहे. तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी निराश होऊन न जाता सातत्याने केलेले प्रयत्न आणि परिश्रम यामागे उभे आहेत हे लक्षात घ्यायला हवं.
काही वर्षांपूर्वी नेदरलँड्स्मधल्या मतिमंद व्यक्तींसाठी असलेल्या शाळा, वर्कशॉप्स आणि वसतिगृहांना भेट द्यायची संधी मला मिळाली. त्या व्यक्तींपैकी एकाचं व्यक्तिमत्त्व अगदी लक्षात राहण्यासारखं होतं. शिवाय त्यानं निर्माण केलेली एक कलाकृती भेटकार्डांच्या, वॉलपेपरच्या तसंच किल्लीला लावायच्या साखळ्यांच्या माध्यमातून देशभर पोचली होती. ‘ही कलाकृती माझी आहे’ याचा सार्थ अभिमानही त्याला होता.
लैंगिक आनंद देण्याघेण्याशी संबधित जबाबदारी घेणं या मुलांमुलींना शक्य नसतं पण म्हणून या आनंदापासून त्यांना वंचित ठेवणं हाच एकमेव मार्ग असावा किंवा आहे का?
माझं उत्तर निश्चितच ‘नाही’ असं आहे. केवळ आपण त्यांचे पालक आहोत… आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणून तर अजिबातच नाही. जर या मुलांमधे समयोचितता असेल, आपल्या समाजातले काही किमान मान्य संकेत पाळण्यासंबधीचं शिक्षण त्यांना देता येत असेल तर अशा मुलांच्या पालकांना जागरूक राहून काही गोष्टी करता येणं शक्य आहे. उदा. मतिमंद स्त्री आणि पुरुष घरात असलेल्या पालकांना या जोडप्याची सहासहा महिने आळीपाळीनं जबाबदारी घेता येईल.
हॉलंडमधे पाहिलेल्या मतिमंदांच्या होम्समधे मतिमंद जोडपी अत्यंत नीटनेटकेपणानं राहात असलेली मी पाहिली आहेत. या शिवाय लैंगिक गरजा भागवणार्या ठिकाणी इथले मतिमंद पुरुष जाऊ शकतात. अशा ठिकाणांची आणि सोयीची माहिती त्यांना दिली जाते कारण त्यांच्याकडे ही समाजमान्य बाब आहे. आपली कुटुंबव्यवस्था, समाजरचना आणि सामाजिक संकेत हे निराळे असल्यामुळे आपल्याकडे असं घडू शकत नसलं तरी प्रौढ मतिमंदांच्या पुनर्वसन केंद्रातून त्यातल्या काही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न निश्चितच झालेले असतील. अर्थात त्यासाठी योग्य ती काळजी घेणं हे ओघानंच येतं. इतर सर्व मूलभूत गरजांची पूर्तता जशी इतरांच्या देखरेखीखाली केली जाते त्याप्रमाणे याही गरजेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायला हवा.
या मुलांचे प्राथमिक शिक्षण सामान्य मुलांबरोबर होणं श्रेयस्कर वाटतं की विशेष शाळांमधे?
मानसशास्त्रीय दृष्ट्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सर्वसामान्य शाळेत करणं जास्त चांगलं. स्वीकार घराप्रमाणेच सभोवतालातून होत गेला तर तो विकासाला अधिक पोषक ठरतो. समजेची एक विशिष्ट पातळी येईपर्यंत किंवा लहानपणी, न्यूनगंडाची भावना जवळजवळ नसते. आपल्याकडे प्रत्येक सामान्य शाळेत विशेष प्रशिक्षित शिक्षक आणि आवश्यक अशी विशेष साधनसामुग्री उपलब्ध करणं शक्य होईलच असं नाही.
व्यक्तिगत लक्ष देता यावं इतका अवधी आणि त्या विशेष मुलामधे कोणत्या विशेष गोष्टी आहेत ज्याचा विधायक उपयोग करून घेतला जाईल हे माहीत असणं या ठिकाणी गरजेचं असतं.
किती काळपर्यंत या मुलांना सामान्य शाळेत ठेवायचं हे ठरवण्यासाठी त्या मुलाच्या बुद्धीची पातळी लक्षात घ्यावी लागेल. काही मुलं ही प्रशिक्षणक्षम असतात. दिनक्रमातल्या सर्वसाधारण आवश्यक गोष्टी जी मूल करू शकतात. अशी मुलं तिसरी चौथीच्या वयापर्यंत तरी सामान्य शाळेत शिकू शकतात.
बुद्धिमापन केल्यानं मुलाचं मानसिक वय वाढतं आहे की नाही. हे कळू शकतं तसं ते वाढत जात नसेल तर इतर मुलांचा विशेष मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो…त्याचे उलट परिणाम दिसायला लागतात. अशा वेळी या मुलाला विशेष शाळांमधे घालणं हितावह ठरतं.
एकाच घरात मतिमंद मुलाच्या बरोबर त्याच्या सामान्य भावंडांना वाढवताना बरेच प्रश्न निर्माण होतात. उदा. लहान भावंडांना आपल्या ‘वेगळ्या’ भावाबहिणीबाबतचं सत्य केव्हा नि कसं सांगावं? त्याबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावीत?
मुलं स्वत:हून प्रश्न विचारायला लागतात तो काळ त्यांना खरं सांगण्यासाठी सर्वात उत्तम असं मला वाटतं. पण ही उत्तरं काय प्रकारची असावीत हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ‘‘आजारी पडला ना म्हणून असं झालं.’’ असं सांगण्यापेक्षा प्रश्न विचारणार्याला आपण कधी उत्तर देऊन तर कधी प्रतिप्रश्न करून विचार करायला भाग पाडू शकतो. ‘तुला काय वाटतं? कशामुळं झालं असेल?, असं विचारलं तर त्यावर काहीतरी उत्तरं येऊ शकतात, कारण त्यासंदर्भात त्यांनी स्वत: काहीतरी विचार केलेला असतोच-आणि मग त्यांच्या उत्तरापासून सुरुवात करून त्यांना वस्तुस्थिती समजायला मदत करावी. या सगळ्याकडे वस्तुस्थिती म्हणून पाहायला पालक शिकले असतील, आणि प्रसंगी भावना बाजूला ठेवून वस्तुस्थितीकडे पाहिलं जात असेल तर भावंडंही ते आपोआपच शिकतील.
आपल्यानंतर या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं, सोडणं योग्य आहे का?
जबाबदारीबाबतचा भावंडांचा दृष्टिकोनही हळूहळू घडत जातो, प्रगल्भ होत जातो. त्यामुळे निर्णय त्यांच्यावर सोपवायला हवा, आणि हे स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
एखाद्यानं आपल्या विशेष भावंडाला परिस्थितीनुरूप एखाद्या संस्थेत किंवा वसतिगृहात ठेवायचा निर्णय घेतला तर त्याचा अर्थ त्याचं भावंडावर प्रेम नाही किंवा त्याला जबाबदारीची जाणीव नाही असा होत नाही. कितीतरी व्यावहारिक अडचणी यामध्ये असू शकतात. आणि त्यामुळे असे निर्णय घेणं पुष्कळदा भाग पडतं.
आपण पालक बनतो तेव्हा आपण कितीतरी मोठे असतो. पण त्या मुलाच्या बाबतीत असं पालक व्हायच्या आधीच ही जबाबदारी आलेली असते. म्हणजे घरात तिसरा पालक म्हणूनच तो वावरत असतो पण याचा अर्थ त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवायचं, असा होत नाही.
नॉर्मल भावंडं, कधी असं विचारतात – ‘तू त्याच्याकडेच अधिक लक्ष का देतेस?’
नॉर्मल भावंडानं असा प्रश्न विचारणं यातून असं सूचित होतं की आपलं भावंडं काही विशेष आहे म्हणजे नक्की काय याची पुरती जाण नॉर्मल भावंडाला अजून आलेली नाही. ती जाण आलेलं भावंड सहसा असा प्रश्न विचारत नाही. दुसरीही एक गोष्ट यातून सूचित होते की पालकांची तारेवरची कसरत होत असली तरी नॉर्मल मुलालाही शक्य तेवढा वेळ, सहवास पालकांनी देणं गरजेचं आहे.
संपर्कासाठी फोन नं. ०२०-२५४३२९३१, मोबाईल – ९८२२९९७७९५,
ई-मेल : antarang2000@hotmail.com
मतिमंद मुलांच्या बाबतीत लैंगिकतेचा प्रश्न सर्वात अवघड मानला जातो. या प्रश्नाला शास्त्रीय उत्तर नाही. तो प्रश्न खरं तर सामाजिक आहे. आपल्याला सामाजिक प्रश्नांचा अधिक बाऊ वाटतो. मतिमंदत्वाच्या स्तराप्रमाणे या प्रश्नाचा वेगवेगळा विचार करावा लागेल. इच्छापूर्तीपलीकडे सेक्सबद्दल काही जाणवत असेल तर ‘कन्सेप्शन’ आणि ‘इन्फेक्शन’ या दोन्हींचा धोका दूर करून त्यांना आनंद देता येईल का याचा विचार सामाजिक पातळीवर करावा लागेल.
या मुलांबाबत दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचं शिक्षण. या मुलांना समाजात सामावून घ्यायचं आहे तसंच काही गोष्टींपासून संरक्षण द्यायचं आहे. पण संरक्षण म्हणजे डांबून ठेवणं का, याचा विचारही व्हायला हवा. या मुलांनाही सर्वसामान्य मुलांसारखं गाणी, गोष्टी, खेळ, या माध्यमांतून रंजन शिक्षण द्यायला हवं. तसंच त्यांच्या कुवतीप्रमाणे या माध्यमांचा उपयोग त्यांना अभिव्यक्तीसाठी करता येतो का हे पाहायला हवं.
या मुलांचा प्रथम मनापासून स्वीकार व्हायला हवा, विशेषतः पालकांकडून असं आपण म्हणतो. स्वीकार करणं म्हणजे त्यांच्या मर्यादा ओळखणं, मर्यादांचा स्वीकार करणं असा घेतला जातो. मग असा स्वीकार केला म्हणजे मर्यादित प्रगती झाली की समाधान मानायचं, अल्पसंतुष्ट राहायचं असं होतंय का हे बघावं लागेल. खरं तर सर्वसामान्य मुलांच्या बाबतीतही सुजाण पालक एक गोष्ट करतात. मुलाची जी कुवत/कौशल्यं पालकांना जाणवतात त्याच्या थोडं पुढं जायला प्रोत्साहन देतात पण बळजबरी करत नाहीत, त्याचा ताण देत नाहीत. या मुलांच्या बाबतीतही ते योग्य ठरेल. फक्त ते अधिक शांतपणे, चिकाटीनं करावं लागेल.
याबाबत कल-चाचणी, बुद्ध्यंक काढणं याबद्दलही पालकांना प्रश्न पडतात. निम्न स्तरावरील मुलांसाठी कल-चाचणी किती उपयोगी पडेल याबद्दल शंका आहे. बुद्ध्यंक काढणं हेसुद्धा मतिमंदत्वाचा स्तर कळण्यापुरतंच आधारभूत धरावं. या मुलांबरोबर वावरताना, त्यांच्या वागण्यातून, कृतीतून ज्या आवडीनिवडी, कुवत-कौशल्यं समजत जातात ती जास्त महत्त्वाची. यासाठी पालक, इतर कुटुंबीय, शेजारी आणि सामाजिक पातळीवर संस्था असा सर्वांचा एकात्मिक प्रयत्न झाला तर ती एक आदर्श स्थिती म्हणता येईल.
शब्दांकन – सुषमा दातार