वेदी – लेखांक – ११
त्या रविवारी आम्ही खूपच आनंदात होतो. आम्हाला फास्ट आणि बिन धुराच्या इलेक्ट्रिक ट्रेनमधून प्राणी संग्रहालयात नेलं होतं. आम्ही पिंजर्याच्या पुढून दोघं किंवा तिघं हात धरून चालत होतो. एका हातानं रेलिंगला धरलं होतं. सगळ्यात पुढे रासमोहन सर होते. ते आम्हाला पिंजर्यातल्या प्राण्यांची माहिती सांगत होते. रासमोहनकाकू हियाला आणि थोडंसं दिसणार्या मुलामुलींना बोट दाखवून सांगत होत्या.
‘‘इथे सिंह आहे. त्याला मोठ्ठी आयाळ आहे.’’ काका म्हणाले.
‘‘मला हात लावता येईल का?’’ मी त्यांच्याकडे पळत जाऊन म्हणालो. मी प्राण्या पक्ष्यांच्या तासाला सिंहाच्या आकाराबद्दल शिकलो होतो. पण तो केवढा मोठा असतो ते कुठे कळलं होतं मला. आमच्या वर्गात दाखवलेल्या खेळण्यातल्या सिंहापेक्षा हा सिंह दसपट का वीसपट का शंभरपट मोठा होता कुणास ठाऊक, मी विचार करत होतो.
‘‘कशाला हात लावायचाय? सिंहाला?
तू हात लावलास तर तो तुझे हातच जेवणाच्या ऐवजी गट्टम करून टाकेल. मग तुला कधीच ब्रेल वाचता येणार नाही.’’ रासमोहनकाका म्हणाले.
मी एक पाऊल पुढे टाकलं तेवढ्यात पायाखाली गडगडाट झाला. मी उडी मारून मागे झालो. ‘‘जमिनीत पाऊस पडणार आहे.’’
मी म्हणालो.
रासमोहनसर खूप हसले आणि म्हणाले ‘‘अरे ती सिंहाची डरकाळी आहे. ही त्याची बोलायची पद्धत आहे.’’
‘‘सिंह आवाज करतो ते मला माहीतच नव्हतं. त्याचा आवाज तर आपल्या शाळेएवढा मोठ्ठा आहे.’’ मी म्हणालो.
तोपर्यंत रासमोहनसर लांब गेले होते… अब्दुल मला म्हणाला ‘‘तो सिंह काय म्हणतोय ते कळलं तुला?’’
‘‘नाही बुवा.’’
‘‘तो म्हणतोय ‘मला भूक लागली आहे. मला जेवण हवंय.’ सिंह माझ्यासारखाच आहे. मी माझ्या दादरमधल्या पिंजर्यात असतो तेव्हा मलासुद्धा खाण्याशिवाय काही सुचत नाही.’’
पुढे गेलेले काका म्हणत होते ‘‘हे अस्वल आहे. त्याचं गुरगुरणं ऐकू येतंय का? सिंहाच्या डरकाळीपेक्षा हे वेगळं आहे ते लक्षात घ्या. आता तो घुमणारा आवाज ऐकू येतोय? ते घुबड आहे. आणि इकडे थोडी माकडं आहेत.’’
रासमोहनकाका थांबले आणि त्यांनी फेरीवाल्याकडून शेंगदाणे विकत घेतले. आमच्या हातात माकडांना खायला घालण्यासाठी थोडे थोडे दाणे दिले. मी हातात थोडे दाणे धरले आणि पिंजर्यात हात घातला. झटक्यात माझ्या हाताला छोटासा चिमटा बसला आणि दाणे गायब झाले.
‘‘अरे वेदी आता माकड दाणे खातंय. मी निदान माकडाला तरी हात लावला असं आता तुला म्हणता येईल.’’ रासमोहनकाका म्हणाले.
रासमोहनकाका काकूंनी मला आणि हियाला इतर मुलामुलींपासून थोडं दूर नेलं. आम्ही खूप उंच शाळेतल्या घसरगुंडीपेक्षा उंच शिडीवरून चढलो. आणि हत्तीवर बसलो. वर वेताचे बाक होते. पाठीला पाठ लावलेले. टांग्यातल्यासारखं आम्ही बसलो.
‘‘याचं नाव काय आहे?’’ मी मागे वळून माहुताला विचारलं.
‘‘साहेब त्याचं नाव डंबो आहे.’’ त्यानं लाहोरमधल्या टांगेवाल्यासारखं जीभेनं च्यॅक च्यॅक आवाज केला. आणि हत्ती चालायला लागला. आता हत्ती टांग्याच्या घोड्यासारखा दुडक्या चालीनं चालेल असं मला वाटलं. पण तो तर डुलायला लागला आणि बसल्या बसल्या मी, रासमोहनकाका, काकू आणि हिया आम्ही सगळे एकमेकांच्या अंगावर आपटायलाच लागलो.
इतका उंच आणि सूर्याच्या इतका जवळ मी कधी गेलोच नव्हतो. माझ्या गालावर सूर्याचे किरण गरम गरम लागत होते. मला मजेची गुंगी आल्यासारखंच वाटलं.
खूप खालून मला देवजी, अब्दुल, तारकनाथ, परण, मिस मेरी यांचे आवाज ऐकू येत होते. त्यांच्यातलं जे कोण सगळ्यात उंच होतं त्याच्या पेक्षाही उंच बसून मी जात होतो.
‘‘काका काकू आपण त्यांना पण वर बोलावू या.’’ मी म्हणाला.
‘‘हत्तीच्या सवारीला पैसे पडतात. त्यांना तेवढे पैसे हातखर्चाला मिळत नाहीत. फक्त राजे लोक हत्तीवर बसतात.’’ रासमोहनकाकू म्हणाल्या.
मला आठवलं. काही मुलांचे मिशनरी आई बाबा त्यांना महिन्याच्या पहिल्या तारखेला एक-दोन रुपये पाठवतात. त्यांनी मुसलमानाच्या हॉटेलातून फक्त ‘आईचा पापा’ (बुढ्ढीके बाल) हा स्वस्तातला पदार्थ खायला घेतला तरी त्यांचे पैसे पटकन संपून जात असत. हातात पैसे आले की भास्कर म्हणत असे ‘आता मला हे पैसे महिनाभर पुरतील.’ पण थोड्या दिवसात ते संपून जायचे. आणि तो पहिल्या तारखेची वाट बघायचा. मग तो रोज देवजीला विचारायचा ‘अजून किती दिवस राहिले आहेत नवा महिना सुरू व्हायला?’ काही वेळा तो पहिल्या तारखेलाच विचारायचा ‘महिना कधी सुरू होणारे म्हणाला होतास तू?’
मला वाटलं आत्ता ममाजी आणि डॅडीजी असते तर त्यांनी सगळ्यांना डंबो हत्तीच्या सवारीचे पैसे दिले असते. मी ठरवलं आता खाली उतरताना सगळ्या पायर्या मोजायच्या. मग हत्ती किती उंच आहे ते खालच्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगता येईल.
-०-
‘‘आपण सगळे बॉंबे स्टुडिओमध्ये जाणार आहोत.’’ रासमोहनकाका लॉरी ड्रायव्हरच्या जवळ उभे राहून ओरडले. लॉरीच्या आत बसलेल्या आम्हा मुलांना ते सांगत होते. त्यांना ओरडावंच लागलं कारण ही लॉरी आम्हाला जुहू बीचला नेणार्या लॉरीपेक्षा जास्त आवाज करत होती. त्यांचा बारीक आवाज त्यामुळे फाटल्यासारखा झाला. ‘‘तुम्ही सगळे ‘अंधेरा’ नावाच्या सिनेमात नट नट्या म्हणून काम करणार आहात.’’
सिनेमा म्हणजे काय असणार ते मला माहीत नव्हतं पण प्रकाश भैय्या सिनेमाच्या ठिकाणी भेटेल असं मात्र वाटलं. ड्रायव्हरनं गिअर बदलला त्यामुळे रासमोहन काका काय म्हणताहेत ते नीट ऐकू आलं नाही. मग लॉरी जरा हळू चालायला लागली. त्यांचं बोलणं ऐकू यायला लागलं. ‘‘फारच थोड्या लोकांना दादर शाळेची माहिती आहे. लोकांना अंधांच्या शाळेबद्दल काहीही माहिती नसते. त्यांना अंधांबद्दलचं काही माहीत नसतं. पण या दोन्ही गोष्टींची माहिती होईल असा सिनेमा तयार होणार आहे. अशी संधी जीझसच्या कृपेनं आली आहे.’’
लोक म्हणजे काय ते मला माहीत नव्हतं. पण मला खूप उत्सुकता वाटत होती.
बागेसारख्या कसल्यातरी जागेत लॉरी थांबली. प्रकाशभैय्या काही तिथे नव्हता. पण खूप सारी नवखी माणसं आमच्याभोवती जमली. त्यांनी आम्हाला इथे तिथे उभं केलं. जागा बदलायला लावल्या. असं खूप वेळा केलं.
‘‘तू सगळ्यात लहान आहेस तू इथे पुढे उभा रहा.’’ रासमोहनसरांनी मला धरून पुढे उभं केलं.
एक अनोळखी माणूस माझ्याजवळ पळत पळत आला. त्याच्या खरबरीत हातानी माझे खांदे दाबले ‘‘खाली कर’’ तो म्हणाला आणि मी माझे खांदे खाली घेतले. तो जिथून आला तेथे पळत गेला आणि म्हणाला ‘‘बेटा इकडे बघ. नाही नाही…. माझ्या आवाजाच्या दिशेनं बघ. आता तोंड थोडं वर कर. अरे इतकं वर नाही.. हां आता ठीक आहे.’’ एक माशी माझ्याभोवती फिरू लागली. मी खांद्यानी तिला घालवायचा प्रयत्न केला. खरबरीत हाताचा तो माणूस ओरडला ‘‘स्टँड बाय…लाईट्स…ऍक्शन.’’
मला तोंडभरून जांभई येणार होती. त्याच वेळी माझ्या डाव्या पायाला मुंग्या यायला लागल्या. सूर्य तळपत होता आणि दिवे तर आगीसारखे मला भाजतच होते. पण मी मुळीच हललो नाही.
‘‘अंधाराच्या बाळांनो माझ्याकडे या. घाबरू नका.’’ एक बाई प्रेमळ आवाजात म्हणाली.
मी पुढे जायला पाऊल उचललं तेवढ्यात आवाज आला ‘‘कट’’.
‘‘मिस्टर रासमोहन त्याला सांगा. तो सेटवर आहे – अजिबात हलायचं नाही.’’ खरबरीत हातांचा अनोळखी माणूस ओरडला.
रासमोहनसर माझ्याजवळ आले आणि त्यांचा दंडा माझ्या हाताच्या उघड्या भागावर ठेवला. पहिल्यांदाच मला त्यांच्या दंडुक्याचा स्पर्श झाला. अब्दुल म्हणत होता तसाच होता तो. जड लांब-गोल आणि कडक. ‘‘तू अजिबात हलायचं नाही, एकदम अटेंशनमध्ये उभं रहायचं’’ ते म्हणाले.
‘‘पण इथे एक माशी आहे.’’
‘‘ती तुला काही करणार नाही, जाईल ती.’’
माझ्या लक्षात आलं. अटेंशनमध्ये उभं राहण्याचा एक्सरसाईज आम्ही पुन्हा पुन्हा करायचा आहे.
मला आठवतंय खूप वेळानं रासमोहन म्हणाले, ‘‘आता आरामात उभे रहा. मुलांनो आणि मुलींनो आता तुम्ही खेळायला जाऊ शकता. तुम्हाला हवी तेवढी भेळपुरी खाता येईल. स्टुडिओतला भेळवाला तुम्हाला ती फुकट देणार आहे.’’
मुसलमानाच्या हॉटेलातलं लपवून खायचं चटकदार खाणं रासमोहन सरांच्या नजरेखाली उघड्यावर खायचं म्हणजे.. जरा भीतीच वाटली. पण आम्ही सगळे भेळवाल्याच्या दिशेनं पळालो. तो ‘भेल पूरी भेल पूरी’ असं ओरडत होता. आम्ही त्याच्याभोवती गर्दी केली. त्यानं केळीच्या पानात भेळ दिली. आम्ही आमच्या हातांनी ती खाल्ली आणि बोटं अगदी चाटून पुसून स्वच्छ केली.
अब्दुल मला पकडायला धावला आणि मी पळालो. कशावर तरी आपटलोच. ते काय आहे ते कळावं म्हणून चाचपडून बघत होतो. चाकांवर ठेवलेली काही तरी अजब वस्तू होती ती. मी त्या गाडीवर चढायला लागलो.
प्रेमळ आवाजाची ती बाई म्हणाली ‘‘त्या घाणेरड्या कॅमेर्याशी कशाला खेळतोस, मी तुला दुसरा मजेदार खेळ दाखवते.’’ मी माझा हात तिच्या हातात दिला आणि आम्ही चालायला लागलो. ती रासमोहनसरांपेक्षा वेगळीच होती. मी मला हवं तसं, फताडे पाय करून आजूबाजूला उड्या मारत, थोडं मागे रेंगाळत परत तिच्या बरोबरीला येत असं चाललो तरी ती काही म्हणाली नाही.
‘‘तुम्ही काय करता?’’ मी विचारलं.
‘‘मी सिनेमातल्या अनाथाश्रमातली संचालिका आहे. तुम्ही सगळी माझी अंधाराची बाळं आहात. मी तुमची काळजी घेणार.’’ ती म्हणाली.
‘तुम्हाला सौ. थॉमस माहीत आहेत का?’’ मी उड्या मारता मारता विचारलं.
‘‘त्या आमच्या मिशनरी बाई आहेत. त्या इस्टरच्या सणाला आमच्या शाळेत आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना भेट वस्तू दिल्या.’’
ती हसली आणि म्हणाली ‘‘हं, मला वाटतं मी त्यांच्यासारखी आहे पण सिनेमात मी अनाथाश्रमातच रहाते.’’
‘‘तुमचा नवा खेळ कसला आहे?’’
‘‘इकडे आहे.’’ त्या म्हणाल्या आणि मला एका शिडीजवळ नेऊन चढवलं. ती हत्तीपेक्षा उंच होती. तिथे उंचावर मला बसवून त्यांनी मला ढकललं. मी आनंदानं आरोळी ठोकली. कारण मी घसरगुंडीवर होतो. ती कधीही संपणार नाही असं वाटत होत. आता थांबणार असं वाटत असतानाच पुढचा उतार सुरू होत होता. शाळेतल्या घसरगुंडीला एकच उतार होता या घसरगुंडीला खूप उतार होते.
‘‘पुन्हा जायचंय.’’ खाली पोचल्यावर मी ओरडलो. मला इतकं हलकं फुलकं वाटत होतं की मला नीट उभंच राहता येईना.
‘‘आज येवढंच पुरे. उद्या परत घसरता येईल तुला.’’ त्या म्हणाल्या.
पुढे महिना दोन महिने रोज ती लॉरी आम्हाला न्यायला येत असे आणि आम्हाला त्या सिनेमाच्या जागेला नेत असे. आम्हाला रोज उन्हात आणि दिव्यांच्या धगीसमोर उभं राहायला लागत असे. रोज भरपूर भेळपुरी मिळत असे आणि भरपूर घसरगुंडीवर खेळायला मिळत असे. का कुणास ठाऊक या अनुभवाबद्दल मला येवढंच आठवतंय. बाकी या ‘अंधेरा’ बद्दल मला काही आठवत नाही.
(नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडियाच्या माहितीप्रमाणे प्रत्यक्षात तयार झालेली ती फिल्म फारच वेगळी होती. ज्योती नावाच्या मुलीची आणि तिच्या अंध प्रियकराची दु:खद कहाणी होती.)
जाक् प्रेव्हेर (१९०३-१९७७) विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या फ्रेंच कवींपैकी एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती. त्याने १९५० च्या सुमारास लिहिलेली ही कविता ‘तारे जमीं पर’ पाहिल्यावर पुन्हा एकदा आठवली.
कॉंक्र
नकार तो मानेनं देतो
त्याचा होकार मात्र हृदयातून येतो
जे रूचतं त्यालाच तो ‘हो’ म्हणतो
मास्तरांना ठाम ‘नाही’ म्हणतो
तो उभा राहतो
त्याला प्रश्न विचारले जातात
सारी कूट कोडी त्याच्यापुढे उभी ठाकतात
अचानक त्याला हसण्याच्या उकळ्या फुटतात
आकडे आणि शब्द
सनावळी नि वंशावळी
वाक्यरचना, सारे सापळे
सगळं सगळं पुसून टाकतो तो
मास्तरांच्या धाकाला धुडकावून
शहाण्या मुलांच्या टिंगलटवाळीला डावलून
दुर्दैवाच्या काळ्याकुट्ट फळ्यावर
रंगीबेरंगी खडूंनी
सुखानंदाचा सुंदर चेहेरा
सुस्पष्ट रेखतो तो.
कवि – जाक् प्रेव्हेर
अनुवाद – नीलिमा रड्डी