पुन्हा नमस्कार
मार्च २००८ च्या पालकनीतीमधला ‘नमस्कार’ हा शुभा सोहोनी यांचा लेख आज खास वेळ काढून वाचला. कारण मी लहानपणी शुभंकरोती म्हणून झाल्यावर आनंदानं घरातल्या वयानं मोठ्या माणसांना नमस्कार करायची. पण मला आठवतं त्याप्रमाणे मला जरा-जरा कळायला लागल्यापासून नमस्कार करण्यातली मजाच निघून गेली होती. कारण संध्याकाळी ज्यांना नमस्कार करावा लागायचा, त्यांच्याकडून दिवसभरात काहीना काही कारणाने मी दुखावलेली असायची. मग कदाचित कुणीतरी माझ्यावर विनाकारणच रागावलेलं, ओरडलेलं, मी मोठी म्हणून प्रत्येक वेळी मला पडतं घे, समजून घे म्हणून सांगितलेलं किंवा एखादी चापटही मारलेली असायची.
मी अवघी एकोणीस वर्षांची आणि सगळ्यात छोटा भाऊ साडेचार वर्षांचा असताना माझे अवघ्या सत्तेचाळीस वर्षांचे बाबा-आई सोळा सोमवाराचं कडक व्रत करत असताना आणि मी माझे बाबा मरू नयेत म्हणून भक्तिभावानं शनीमाहात्म्य वाचत असता-किडनी फेल्युअरने वारले तेव्हापासून देवापुढेही नतमस्तक व्हावंसं वाटेना. पुढेपुढे नंतर पुढ्यात पाया पडून पाठीमागून त्याच लोकांवर टीका करताना, रागावताना बघून, आदर आणि नमस्कार यांचा काहीच संबंध नसतो अशी जणू खात्रीच पटली. त्यावेळच्या प्रागतिक विचारांच्या माणसाशी ओळख होऊन नंतर त्याच्याशीच लग्न करण्याचं ठरवल्यामुळे नमस्कार चमत्काराशिवाय ते पार पडले. नंतर मात्र जवळ जवळ सहा वर्ष माझा आणि नमस्काराचा संबंध आला नाही.
मी आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर आईच्या घरी गेलेच नव्हते. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी आईनं मला घरी बोलावलं. तिथे गेल्यावर दुसर्याच दिवशी संध्याकाळी ‘शुभंकरोती’ म्हणून झाल्यावर माझ्या पाठचा भाऊ माझ्या पुढ्यात हात जोडून उभा राहिला आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाला ‘‘ताई नमस्कार करतो’’ एवढ्या वर्षांनी या परिस्थितीला सामोरं जाताना मला अवघडायला झालं. पाठोपाठ मागचे दोन भाऊ आणि बहिणीनंही मला नमस्कार केला. मी कसाबसा त्यांना आशीर्वाद दिला पण मनात अपराधी वाटत होतं. मी आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे खरं म्हणजे त्यांना खूप त्रास झाला होता. दोन तीन दिवसातच मी आशीर्वाद देणं सोडून शुभेच्छा व्यक्त करायला लागले. आणि बहिणीला सांगितलं की तू पण दादा, भाई, सिद्धूसारखा उभ्यानेच नमस्कार कर, खाली वाकायची गरज नाही.
त्यानंतर चतुर्थीच्या वेळी परत घरी आईकडे गेले. ज्या देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने मी आईकडे पोचले आणि सहा वर्षात न अनुभवलेलं सुख आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद मी लुटणार आहे त्यालाच गंधफूल वाहून साधा नमस्कारही न करणं मला बेईमानी वाटली. म्हणून खूप वर्षांनी देवाला गंधफूल वाहून नमस्कार केला. मनात मात्र मी काहीतरी मनाला न पटणारी गोष्ट करते आहे म्हणून वाईट वाटत होतं. आरत्या म्हणताना त्यातले सूर, नाद, ताल, लय, संगीत आवडत होतं पण डोकं शब्दांचा अर्थ नव्यानं लावण्याचा प्रयत्न करत होतं. हळूहळू आईच्या घराकडून निघताना तिच्या पाया न पडता मी तिच्या कुशीत शिरून हमसाहमशी रडून माझ्या भावना मोकळेपणी व्यक्त करू लागले. मोठ्या दोन भावांशी हस्तांदोलन करून ‘‘बरा मरे?’’ किंवा ‘बरं रे येते मी’’ असं म्हणू लागले आणि छोट्या भावाला आणि बहिणीला प्रेमभराने हृदयाशी कवटाळू लागले आणि हळूहळू त्यांना ‘मला नमस्कार करायचा नाही’ म्हणून सांगितलं.
दोन भावांची लग्न झाल्यावरही त्यांना माझ्या पाया पडू न देता थोडंसं जवळ घेऊन आपलं हे नव्या नात्याचं रूपांतर जमेल तसं मैत्रीत बदलता येत असेल तर प्रयत्न करू या-असं सांगितलं. माझ्या दोन मुलींनाही मी कुणाला नमस्कार करण्याची, हॅलो म्हणण्याची, थँक यू, सॉरी, म्हणण्याची सक्ती केली नाही. पण त्यामानानं त्या मोठ्यांचा बरा मान राखतात. फोनवर व्यवस्थित बोलतात. त्यांना म्हणावंसं वाटेल तेव्हा थंँक यू म्हणतात. पत्र मासिकं घेऊन येणार्या पोस्टमनकाकाला तिसर्या मजल्यावर येईपर्यंत दमला असेल म्हणून बस म्हणतात. फॅन बंद असेल तर चालू करतात आणि साखरपाणी देतात.
गोव्यातली एक कुटुंब समुपदेशक माधुरी राव ! तिचा मला वेळोवेळी खूपच आधार झाला. मी नेहमीच तिची ऋणी राहीन. कुणी भेटलं, फोन उचलला की तिला ‘नमस्कार!’ म्हणण्याची सवय आहे पण मला ते विचित्रच वाटायचं. मी तिला गुड मॉर्निंग म्हटलं तरी ती मला नमस्कार म्हणायची. तिच्या माझ्यातल्या नात्यामुळे कधीकधी मी तिला स्पष्टच सांगायची की तिचं ते ‘नमस्कार’ प्रकरण मला मुळीच आवडत नाही. ती हसून म्हणायची, तू म्हणतेस आणि समजतेस तसा नमस्कार नाहीच आहे हा. हा नमस्कार आहे माणसामधल्या चैतन्याला. चैतन्यानं चैतन्याला जागत, विचार करत, हाताने कार्य घडत राहण्यासाठी मारलेली हाक आणि ओ (प्रतिसाद) आहे. मला ती, तिचा आधार, काही विचार खूप आवडायचे पण तिचं ते अध्यात्म बिलकूल आवडायचं नाही. नंतर नंतर सहज म्हणून मीही तिला ‘नमस्कार’ म्हणायला लागले पण हात मात्र जोडत नव्हते. याच दरम्यानच्या काळात गोव्यातील आंबेडकर चळवळीचं कार्य सुरू करून तळमळीनं पुढे नेणारा आणि अंधश्रद्धांवर घणाघाती हल्ले करणारा एक प्रमुख कार्यकर्ता
श्री दादू मांद्रेकर मला भेटला की दोन्ही हात जोडून उभा राहून ‘जयभीम !’ म्हणायचा तेव्हा खूप अवघडल्यासारखं व्हायचं. मी त्याला प्रत्युत्तर म्हणून हस्तांदाेलन करून ‘जयभीम !’ म्हणायची. एकदा त्यानं मला ‘जयभीम’ म्हणजे काय? याचं पत्रकच आणून दिलं ते वाचल्यानंतर मात्र हळहळू आनंदानं हात जोडून तो भेटला की ‘जयभीम !’ म्हणून त्याचं स्वागत करू लागले.
आयुष्यात वेगवेगळ्या घटना, प्रसंग यांना मला सामोरं जावं लागलं, मुलांच्या, माझ्या आजारपणात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या प्रकारे मला मदत झाली. दुःखाचे डोंगर कोसळत असताना त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला, अर्धी वेडी होण्याच्या मार्गावर असताना माधुरीने मला मिठीत घेऊन, जवळ बसवून, प्रसंगी आपले पैसे खर्च करून दीड-दोन तास फोन करून किती तरी वेळा जीवनाचा अर्थ समजावून सांगितला, रविंद्र केळेकरांचं कोकणीतलं साहित्य वाचलं आणि मला जाणीव झाली की स्वातंत्र्याच्या नावाखाली मी सहअस्तित्वाची किंमत विसरत चालले होते. माणूस स्वतंत्र एकटा जगू शकत नाही त्याला आधाराची, विश्वासाची, मायेची, आदराची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, कष्टांची, पैशाची जरूरी असते आणि उत्तमोत्तम जीवन माणसाला मिळावं म्हणून ज्ञात अज्ञात माणसांनी आपापल्या परीने खूप खूप प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत.
आधी नाही म्हटलं तरी जगात मानवता नांदावी म्हणून चळवळीचं काम करून साध्या सामान्य माणसांवर आपण जणू उपकार करीत आहोत अशी एक घमेंड घेऊन मी वावरत होते. वर उल्लेख केलेल्या किंवा माझ्या कुठल्याही स्नेह्यानी ही गोष्ट मला तशी स्पष्ट सांगितली नाही पण जीवन समजून घेता घेता ती गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणूनच आज मी ह्या लोकांचा आदर मनापासून करते. त्यांना डोकं जरा झुकवून दोन्ही हात जोडून नमस्कार करताना मला त्रास होत नाही. वयाने, आदराने, मानाने, हृदयाने, पैशाने मोठा म्हणून नव्हे पण मानवी समूहाच्या जीवनाचं हे चक्र चालत राहावं म्हणून चालत असलेल्या धडपडीमधे कुठल्याना कुठल्या प्रकारे त्या माणसाचं योगदान असतंच अशी जाणीव झाल्यामुळे-अनोळखी माणसालाही मी आता खुशीनं नमस्कार करते. मात्र गर्विष्ठ, ‘मला मोठा म्हणा’ या थाटात वावरणार्या माणसाला मला अजून अजिबात नमस्कार करावासा वाटत नाही.
तुमच्या नमस्काराच्या एका लेखानं केवढी जादू केली बघा. मी तीस वर्ष मागे जाऊन परत चालत इथे पोचले. खर्याखोट्या नमस्काराची ही कसरत चालूच राहणार असे वाटते. ज्याला जसे करण्यास बरे वाटेल तसे करू देणे आणि चांगल्या गोष्टीबद्दल परत परत बोलत राहणे ही अत्यंत जरूरीची गोष्ट आहे.