मराठीचा तास
इयत्ता सहावीचा वर्ग
गप्पातून विषय निघाला देवावर विश्वास आहे का नाही?
कुठलाही नवा विषय निघाला की सगळे त्या शब्दाकडे बघायचे.
आत्ताचा शब्द होता ‘देव’. हा शब्द कसा तयार झाला?
आधीच्या तासाला झाड हा शब्द बघितला होता.
‘झाड’ म्हटल्यावर कोणाच्या डोळ्यासमोर काय काय येतं ते बोलत गेलो होतो. झाड म्हणजे डेरेदार, पानांनी भरलेलं-पासून ते कागद, पर्यावरणापर्यंत सगळं बोलत गेलो. प्रत्येक शब्द माहिती, विचार, भावना सांगत असतो.
मग ‘देव’ हा शब्द काय काय सांगतो? ‘देव’ या शब्दाची चर्चा देवावर विश्वास असणे किंवा नसणे याच्या पलीकडे गेली होती.
‘मी’ या शब्दावर अशाच गप्पा झाल्या होत्या.
मग मुलांनी स्वतःचे शब्द तयार केले. उदाहरणार्थ एक शब्द, मला ‘अगडम’ वाटतंय. अगडम म्हणजे काय? तर म्हणे दुपारी जेवल्यावर जी छान झोप येते, आणि शाळेतून पळून जाऊन घरी पांघरूण घेऊन झोपावसं वाटतं, ते.
प्रत्येक शब्द किती गमतीचा असतो. ‘प्रत्येक’ ‘शब्द’ ‘किती’ ‘गमतीचा’ ‘असतो.’
– श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची डोह ही गोष्ट मुलांना अतिशय आवडली. आरामात गच्चीवर किंवा कुठे मजेत बसून कथा ऐकायची. आणि ऐकताना सगळं डोळ्यासमोर आणायचं. ‘गवत, आकाश’ कुणाच्या डोळ्यासमोर कसं गवत आलं. कसं आकाश आलं? कुणाचं गवत उंच. कुणाचं मखमली. कुणाचं आकाश ढगांचं, कुणाचं निरभ्र.
अशी किती पुस्तकं वाचली. एकत्र.
एक पुस्तक, पण प्रत्येकानं ती गोष्ट वेगळी पाहिली, ऐकली.
पावसात युनिव्हर्सिटीच्या टेकडीवर सहलीला गेलो. दुसर्या दिवशी निबंध लिहिला ‘पावसाळ्यातला एक दिवस’. एकाच दिवसाविषयी सगळ्यांनी लिहिलं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा, शैली वेगळी, जे अनुभवलं त्याविषयी लिहिलं. काय लिहायचं असा प्रश्न पडला नाही. आणि ‘निबंध’ लिहायचा कंटाळा आला नाही. प्रत्येकाला खूप काही सांगायचं होतं.
– एक दिवस खिडकीतून पडणारा पाऊस बघत बसलो. दुसर्या दिवशी पावसाच्या कविता वाचल्या.
– वर्गामधे डबा खात खात, पु.लं.चं ‘माझे खाद्य जीवन’ ऐकलं.
इयत्ता पाचवीचा वर्ग
एकूण चार पाच दिवसात ‘पाठ्यपुस्तक’ वाचून टाकलं. सगळे धडे वाचले. ते पुस्तक बाजूला ठेवलं.
पहिल्यांदा कुठलं पुस्तक शिकायचं? आपल्या स्वतःच्या आवडीचं, आपण निवडलेलं पुस्तक शिकायचं. प्रत्येकानं आपल्या आवडीचं पुस्तक आणलं. कुणी फास्टरफेणे, कुणी बिरबल बादशहा, कुणी इसापनीती, कुणी बोक्या सातबंडे, कुणी रॉबिनहुड, आणि प्रत्येकानं आपलं पुस्तक शिकायचं कसं? आपण ते पुस्तक इतरांना समजावून सांगायचं. ते पुस्तक आपल्याला का आवडलं? ते पुस्तक कसं लिहिलं असेल? असे किती तरी प्रश्न त्या पुस्तकाला विचारायचे….. उत्तरं शोधायची.
आपली आवडीची गोष्ट शिकली की इतरही गोष्टी आवडायला लागतात. कारण मग गोष्टी हा प्रकारच आवडायला लागतो.