संवादकीय २००८
वाचायचं कशाला – समजावं म्हणून.
मग ती एखादी परिस्थिती असो, अनोळखी प्रदेश असो, चित्र, संगीत,नृत्य, शिल्प असो, माणूस, वाद्य, रस्ता, रस्त्यावरच्या पाट्या, रडणं, चिडणं, हसणं, चालणं, बोलणं, न बोलणं. जे जे म्हणून काही समजून घेता येण्याजोगं असेल ते ते समजून घेणं म्हणजेच वाचणं. वाचनाची सवय असावी लागते, त्याकडे लक्ष पुरवावं लागतं, म्हणजे ते आकलन देतं. नाहीतर आपण वाचत जाऊ, पण कळणार मात्र काहीच नाही, किंवा अर्धवट, चुकीचं असं काहीतरी वाचलं जाईल. ते वाचन म्हणताच येणार नाही.
त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींच्या वाचनाची वेगवेगळी सवय असावी लागते. वाचन कळून सवरूनच होईल असं नाही, अनेकदा सवयीनं ते नकळतही होतं, पण त्यातही इच्छा असावीच लागते. इच्छा नसली की समोर असलेल्या गोष्टीही वाचता येत नाहीत. आवाज ऐकू येत नाहीत, दिसत नाही, हे आपण सर्व कधी ना कधी अनुभवतोही.
काही गोष्टी ‘मला वाचा, अहो, वाचता ना मला?’ असं कमीअधिक आग्रहीपणे म्हणत समोर येतात. काही वेळा (खरं म्हणजे अनेकदा) माणसंही ह्या ‘मला वाचा’ गटात हिरीरीनं असतात. ह्या जाहिरातखोर माणसांना वाचणं अवघड असतं असं काही नाही पण फसवणुकीच्या शक्यता इथं बर्याच असतात. अगदी गृहीतच धरावं की त्यात वाचणार्याच्या दिशाभुलीचा त्यांच्या त्यांच्या वकूबाप्रमाणे आटोकाट प्रयत्न असणारच. या जाहिरातींनी हलून जाऊन नाही पण आपल्याच इच्छेनं जर एखादा माणूस आपण खराखुरा वाचायचा ठरवलाच, तर ह्या नजरबंदीला पार करावं लागतं.
प्रत्यक्ष माणसांपेक्षा माणसांनीच तयार केलेली साहित्य, चित्र, नाट्य, गाणं, शिल्पं इ. फार सोपी आणि सुखकर. इथे वाचणार्याला वाचता यावं यासाठी सोईस्कर चिन्हं आणि रचना वापरलेल्या असतात. त्यांच्यामुळे कधी वाचणार्याला कधी सहकार्य होतं तर कधी सरसहा फसवणूक, अर्थात या फसवणुकीचं कारण नकळत किंवा मुद्दाम असं काहीही असतं. काहीवेळा ही जसं आपण मोठी माणसं लहान मुलांना ‘काऊनी नेलं’ म्हणतो तसं आधी थोडं चिडवत, शोधायला लावत, पण शेवटी अर्थाशी पोचवायच्या शाश्वतीनं दिलेली हुलकावणी असते. तर कधी एखादी कलाकृती आपल्याला कड्यावरून थेट खाली दरीत ढकलून देते, किंवा अर्थातच या दोन टोकांमध्ये कुठेही. अर्थात कलाकृतीच्या संदर्भात ही फसवणूक त्या वाचनाच्या आनंदात अडथळाच आणते असं मात्र मुळीच नाही. एखादी मस्त फिरकी बेछूट धमालही आणू शकते.
वाचनाचा संदर्भ असा बोधाच्या अक्षरश: कोणत्याही प्रकाराला लागत असला, तरी वाचन म्हटल्यावर अक्षरवाचन हाच अर्थ सामान्यपणे अनेकांच्या मनात उभा राहतो. दृश्य माध्यमाची वाचनक्षमता तर आपल्याकडे अभावानंच आढळते. ह्याचं कारण मला वाटतं, वाचन ही संकल्पना वाचताना एकदम जड ओझं पेलवत नाही म्हणून किंवा अक्षरवाचनाचं सांस्कृतिक स्थान उन्नत करण्याच्या अंतस्थ हेतूंनी केली गेलेली ती आपली सर्वांची दिशाभूल असते. अर्थातच ह्यात बौद्धिक क्षमतेची भूमिका फारशी नाही, तर इतर वाचनांसाठी लागणारे प्रयत्न,इच्छा आणि म्हणून सवय कमी पडते.
दिवाळी अंकात मिळणार्या रुंद अवकाशाचा विचार करताना अक्षरवाचनावरच जास्त जोर दिला आहे. तो इतर वाचनांचं महत्त्व कमी वाटतं म्हणून नाही. सामान्यपणे अक्षरवाचन वरवर जमण्यासारखं आणि सोपंही वाटतं. तसं ते प्रत्यक्षात नेहमीच असतं असं नाही, त्यातही मांडणीला भरपूर वाव असल्याचं जाणवलं म्हणून. शालेय शिक्षणाच्या खिडकीतून पहावं तर एकीकडे अगदी सोपी, केवळ अनुरूप वातावरण दिलं की अजिबात न शिकवतादेखील सहज साधणारी बाब असं अक्षरवाचनाचं वर्णन केलं गेलेलं आहे, पण वास्तवात पहावं तर कसं नि काय, प्रश्नांवरती प्रश्न. अर्थात हे प्रश्न निरुत्तर आहेत असं नाही. अनेक भाषा संशोधकांनी प्रत्यक्ष अनुभवावरूनच शोधलेली, आणि पडताळलेली उत्तरं उपलब्ध आहेत, वाचकपालकांपर्यंत ती पोचवणं महत्त्वाचं वाटलं. आणि त्यासाठी ह्या संधीचा वापर करावा असंही.
वाचन हे मुळात आपल्या समजून घेण्याच्या इच्छेचं साधन असतं. तेव्हा वाचायला शिकून काय वाचायचं असाही पुढचा विषय साहजिकपणे आला आणि त्याचा विद्रोही व्यत्यास, म्हणजे, ‘- पण का म्हणून प्रत्येकानं अक्षर-शब्दांचंच वाचन करावं?’ असा.
अक्षरवाचन हा वाचनाचा एक भाग आहे, हे तर खरंच. तरी तो इतर वाचनांना गती देतो, देऊ शकतो. त्याला मर्यादा आहेत, उदा. संगीत वाचनाची पूर्ण जबाबदारी अक्षरवाचन कधीच घेऊ शकत नाही, तरी संगीताची जाणीव समृद्ध करायला मदत नक्की करतं. चित्र, छायाचित्रांच्या सोबतीनं वाचकाला घेऊन जाता येतं अक्षरांना. आणि माणूस वाचण्याच्या प्रयत्नांना तर अतिशय विलक्षण सहकार्य अक्षरांमधून, साहित्यामधून मिळतं.
वाचनावरचा हा अंक तयार होतानासुद्धा आम्हा सगळ्यांना फार धमाल आली. संपादन गटानं ही अक्षरांची पूर्वदिवाळी मनापासून उपभोगली. अंक तयार करणं हे नेहमीच आनंदाचं असलं तरी दिवाळी – अंकाचं काम थकवणारंही असतं. पण आता गटाचा आकार आणि रचना इतकी मस्त झालीय की बस्स! एकमेकांच्या उणिवांना पेलून धरणारा गट पालकनीतीच्या संपादनासाठी उभा आहे, हे निश्चितच अतिशय आनंदाचं आणि खरं म्हणजे गरजेचंच आहे.
अक्षर, संगीत, दृश्य अशा सगळ्या वाचनांच्या मुळाशी असलेलं आणि सर्वात महत्त्वाचं वाचन असतं, आपण ज्या काळात वावरतो त्या काळाचं, त्या परिस्थितीचं वाचन.
हे वाचन आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करत असतो. ते नुसत्या समजून घेण्यावर भागणारं नसतं. दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाची बातमी दूरचित्रवाणीवर बघताना लहान मुलं घाबरून जातात आणि घराबाहेर कशाहीसाठी जाताना किंवा कुणालाही जाताना पाहून ‘आता बॉम्ब फुटला तर मरणार का रे?’ विचारतात, तेव्हा वाटतं, हा काय भयगंड आपण ह्या कोवळ्या मनांमध्ये पेरून ठेवलाय. मुलांनाच काय, आपल्यालाही सतत भीतीच वाटत असते. रस्त्यावर पडलेली प्लॅस्टिकची पिशवी, नुसती कचरा म्हणून वाचता येतच नाही. त्यात बॉम्ब असेल का हाच प्रश्न. रात्री प्रवास करताना कुणी मदतीसाठी हाक मारली तर मदत करायची तयारी असली तरी, मनात शंकेची पाल चुकचुकते, कोण जाणे काय असेल खरं खोटं !
दोन ऑक्टोबरला अहिंसा, शांतता, नम्रता असं काहीही उच्चारायलासुद्धा नकोसं वाटतं. आपला कुणाचाच ह्या शब्दांशी आता काहीही संबंध राहिलेला नाही.
परवाच्या वर्तमानपत्रात एक बातमी होती. मानसिकताणानं खचून जाऊन एका माणसानं घरातल्यांचा खून करून आपणही आत्महत्या केल्याची. बातमीत त्या माणसाच्या धर्माचाही उल्लेख होता. ‘त्याची नेमकी काय गरज होती?’ असा प्रश्न अगदी साहजिक असूनही सवयीनं कुणी मनातही आणला नव्हता. वाचलाच नव्हता. पण एका लहान मुलानं हा मुद्दा काढून विचारलंच की इथे अगदी धर्माचा उल्लेख केलाय, पण एरवी केला जात नाही. असं का? अशा प्रश्नाचं खरं उत्तर माहीत असूनही आपण देत नाही. एकाच समाजाचे भाग असूनही जेव्हा अशी वेगळी वागणूक दिली जाते, तेव्हा त्या वागणुकीचंही वाचन व्हावं लागतं. सवयीनं आपण ‘निरक्षर’ तर होत नाहीना, इकडे लक्ष पुरवावं लागतं.
भाषा, प्रदेश, धर्म ह्यांचा संदर्भ तेढ उत्पन्न करण्यासाठी वापरण्याचं, आजचं आपल्याकडचं आणि जिथे जिथे असेल तिथलं तंत्र, मला तरी भयंकर त्रासाचं वाटतं. सत्ता काबीज करण्यापलीकडे त्यात भद्र हेतू कोणताही असूच शकत नाही.
आजवरही पालकनीतीतून नेहमीच हिंसा, सत्ता, बडेजावाच्या विरोधात मांडलं गेलं आहे, पण आता त्यात एक भयप्रद हताशा आपली आपल्यालाच दिसते आहे. एरवी वाईट परिस्थितीबद्दल बोलताना जाणीव जागृती, प्रबोधन, उपाय सुचवणं, नव्या प्रयोगांच्या प्रयत्नाचं कौतुक करणं ह्याला तरी जागा असायची, आता ती वाटत नाही. त्या उपायांनी हिंस्र परिस्थितीला आवर वगैरे घातला जाणार तर नाहीच, उगाच लक्ष विचलित करून तात्पर्यानं हिंसा अधिक बळावायचीच रचना त्यातून होऊ शकेल. नमस्कार करून गणपती पावत नाही, हे आता तरी आपल्याला समजून घ्यायलाच हवं.
परिस्थिती कधीची मला वाचा असं स्पष्ट सांगते आहे, परिस्थितीवर हिंसेनं, बळजबरीनं काबू जखडणारे आपली फसवणूक करायला धावत आहेत. आपल्याला वाचता येत असलं तर निदान समजेल तरी. त्यापुढं जे असेल ते.
दिवाळीच्या निमित्तानं दीपांच्या उजेडात आपणा सर्वांची वाचनं बहरोत, फसवणुकीला बाजूला सारून आपण आपली परिस्थिती, आपलं पर्यावरण, आणि शेवटी (खरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं) आपलं मन उत्तम वाचावं यासाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा !