माझा वाचनप्रवास
मला वाचनाची गोडी कशी लागली? मला एवढं आठवतंय की लहानपणी आई कौतुकाने कधीतरी कुणाला तरी सांगायची की याला वाचनाची फार आवड आहे. पण प्रत्यक्ष वाचन आणि तेही आवडीने कधी सुरू झालं ते मात्र लक्षात नाही. एका गोष्टीचा परिणाम नक्की झाला असणार. मी अकरावीत जाईपर्यंत म्हणजे वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत आमच्याकडे साधे वर्तमानपत्रसुद्धा येत नसे. मी रोज अगदी साडेआठ वाजायची वाट बघत असे. कारण तोपर्यंत समोरच्या मेहेंदळ्यांचा पेपर वाचून झालेला असायचा. अगदी भुकेला असल्यासारखा मी तो पेपर आणून वाचायचो. पण त्यामुळे कदाचित जे दिसेल ते वाचण्याची सवय आणि त्यातून गोडी लागली. सुरुवातीला मी कहाण्यांचं पुस्तक, नवनाथांचं चरित्र वगैरे पुस्तकंसुद्धा वाचली. नवनाथांच्या चरित्रातली अद्भुतता त्यावेळी फार आवडायची. त्यांनी केलेले वेगवेगळे चमत्कार मनाला लुभावून जायचे. आपल्यालासुद्धा असे जादूचे प्रयोग, चमत्कार करता यावेत असे फार वाटायचे.
त्याच सुमारास श्रीमान योगी आणि त्याचे खंड शेजार्यांकडे दिसले. आणि अक्षरश: झपाटल्याप्रमाणे ते सर्व वाचून काढले. श्रीमान योगी नंतर मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची महा-कादंबरी वर राहणार्यांकडे गवसली. त्यात बुडून गेलो आणि कर्णमय झालो. त्या वेळेपर्यंत मला सर्वात आवडलेलं पुस्तक जर विचारलं असतं तर निःसंशय मृत्युंजयचे नाव सर्व प्रथम आलं असतं.
मृत्युंजयचं सर्वच विलक्षण होतं. प्रभावी भाषा, वर्णनशैली यातून प्रत्यक्ष अनुभव येत असल्याप्रमाणे ते पुस्तक मी जगलो. तोपर्यंत – पांडवांनी श्रीकृष्णाच्या मदतीने दुर्योधनाचे कुटिल डाव उधळून लावले – या समजुतीशी मी ठाम होतो. पण मृत्युंजय वाचल्यानंतर कर्णावर झालेल्या अन्यायाने त्याच्याविषयी एक अपार सहानुभूती निर्माण झाली. आणि कुठंतरी पांडव आणि श्रीकृष्ण रडीचा डाव खेळत असल्याची जाणीव होत गेली. त्याला पुष्टी मिळाली कॉलेजमधे असताना. आनंद साधले यांचे ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ हे पुस्तक वाचले आणि मग खात्रीच झाली की महाभारतामधे पांडवांकडून तेवढाच अन्याय कौरवांवर झाला आहे. त्यानंतर महाभारतावर इरावती कर्वे यांचं युगान्त वाचलं.
पण पूर्वीइतकी मजा काही परत आली नाही. खरं खोटं काय हा विचार पूर्वी अजिबात यायचा नाही. पण कौरव म्हणजे वाईट आणि पांडव म्हणजे सद्गुणांचे पुतळे ही भावना मात्र हळूहळू लोप होत गेली.
महाभारताइतके रामायणावर फारसं वाचन झालं नाही त्यामुळे त्याचं फारसं आकर्षण कधी निर्माण झालं नाही आणि टिकलंही नाही. महाभारताचा जेवढा त्यावेळी परिणाम झाला तेवढा मग श्रीमान योगीनेसुद्धा झाला नाही. श्रीमान योगी वाचताना आकंठ बुडून वाचलं पण नंतर परत परत फार वेळा वाचलं नाही. श्रीमान योगीपेक्षा भुरळ पाडली ती रमा-माधवांच्या स्वामीने. पुस्तक वाचल्यानंतर चटका लागणे, हुरहुर लागणे म्हणजे काय ते या पुस्तकाने जाणवून दिले. माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनाने जी कारुण्याची झालर मिळाली आहे त्यानं खूप वेळ अस्वस्थ वाटायचं. या ऐतिहासिक पुस्तकांमधेच रामदासांचं चरित्र ठळकपणे आठवतं. या पुस्तकाची मी खूप वेळा पारायणं केल्याचं आठवतंय. रामदासांचे त्यांच्या शिष्यांबरोबरचे प्रसंग वाचताना आपल्यालासुद्धा रामदासांसारखे गुरू भेटावेत असं फार वाटायचं. पण त्यामागेसुद्धा त्यांनी केलेले, दाखवलेले चमत्कारच होते. चमत्कार विश्वामधे रमलो असतानाच मला रहस्यकथा वाचनाचा नाद लागला. माझे नाना आजोबा किर्लोस्कर मासिकाचे सहसंपादक होते. त्यांच्याकडे किर्लोस्कर/स्त्री ही मासिके नियमित असायची. शिवाय त्यांच्याकडे बाबूराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, वगैरेंच्या गोष्टी मी मुबलक वाचल्या, नव्हे फस्त केल्या. त्यावेळी नवल, धनंजय, हेर वगैरे मासिकं फक्त रहस्यकथांना वाहून घेतलेली असायची. अधाशासारखी मी ती पुस्तके वाचून संपवायचो. बाबुराव अर्नाळकरांच्या झुंझार कथांपेक्षा गुरूनाथ नाईकांच्या कथा खूप आवडायच्या. त्यांच्या गुप्तहेर कथा वाचून आपण पण गुप्तहेर व्हावे असे फार वाटायचे.
नवल, हेर, धनंजय बरोबरच एक दिवस मी सत्यकथा मासिक वाचले आणि त्यातील जी. ए. कुलकर्णी यांची कथा वाचून मी अगदी भारावून गेलो. त्यांची वर्णन करण्याची शैली मोठी विलक्षण होती. ती मनाला व्यापून राहायची. एका वेगळ्या विश्वात गेल्याप्रमाणे वाटायचे. त्यावेळी त्यांच्या गोष्टी फार क्वचित यायच्या. त्यांचे कथासंग्रह मी नंतर वाचले. पिंगळावेळ, काजळमाया, सांजशकुन, निळासावळा, हिरवे रावे ही पुस्तके मला विलक्षण आवडली. इतकी आवडली की मला ताबडतोब धारवाडला जाऊन त्या भागात फिरावंसं वाटलं. अजूनही मला एकदा तरी धारवाड, हुबळीला जाऊन जी. ए. कुलकर्ण्यांचे घर पाहून यायचे आहे. आता गंमत वाटते की रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांच्या पुस्तकांवर मी अलोट प्रेम केले, खूप वेळा पारायणं केली पण कधीही असं वाटलं नाही की ते राहतात तिथे जाऊन यावं, त्यांना भेटावं. पण का कोण जाणे जी. ए. कुलकर्णींची गूढ, भावस्पर्शी काहीशी निराशजनक अनुभव सांगणारी पुस्तकं वाचून मला कायम वाटत राहिलं की तिथल्या वातावरणाचा तर हा परिणाम नसेल?
या गूढ गोष्टींचा मग मला नादच लागला. मी रत्नाकर मतकरी, नारायण धारप यांची पुस्तके आवर्जून वाचली. त्याला साथ मिळाली अकरावीनंतरच्या सुट्टीची. त्या सुट्टीत मी एक महिनाभर गोव्याला होतो. तिथे आमच्या घरमालकांकडे असलेली पुस्तके पाहून मला मनस्वी आनंद झाला. ते होते गोवेकर. त्यामुळे त्यांच्याकडे मराठीपेक्षा इंग्रजी व हिंदी पुस्तके जास्त होती. हिंदी रहस्यकथांमुळे सबंध सुट्टी मस्त गेली. एक दिवस हिंदी बरोबर मी जेम्स हॅडली चेसचं इंग्रजी पुस्तक आणलं आणि नेटानं वाचून पूर्ण केले.
माझ्या आयुष्यातला तो एक महत्त्वाचा क्षण ठरला. इंग्रजी पुस्तकांचे प्रचंड विश्व माझ्यासमोर खुले झाले.
त्यानंतर मी इंग्रजी पुस्तकांचा अगदी सपाटा लावला. मित्राकडली चेसची सर्व पुस्तके मी हातोहात संपवली. इंग्रजी पुस्तकं वाचताना सुरुवातीला कळलं नाही तरी वाचत गेलो. अंदाजानं अर्थ लावत गेलो आणि त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यासंबंधी लिहायला लागलो तर किती लिहू आणि किती नको असे होईल. जेम्स हॅडली चेस, ऍगाथा ख्रिस्ती याबरोबरच विलक्षण आवडलेले पुस्तक म्हणजे पॅपिलॉन. हे पुस्तक मी शासकीय वाचनालयातून माझ्या आत्याच्या कार्डवर मिळवले आणि वाचून काढले. पॅपिलॉनचे जेलमधून पळणे, पकडले जाणे आणि परत सुटणे विलक्षण परिणामकारक होते. या पुस्तकांनंतर रहस्य कथांकडून इतर फिक्शनकडे कधी वळलो ते लक्षातच आले नाही. कॉलेजच्या चार वर्षात हॅरॉल्ड रॉबिन्स, रॉबर्ट लुडलुम, आर्थर हॅली, आयर्विंग वॅलेस, जेफ्री आर्चर, सिडने शेल्डॉन, लिऑन उरी वगैरेंची जवळजवळ सर्व पुस्तके वाचून काढली. जेवढे पुस्तक जाड तेवढा मला आनंद होई कारण पुष्कळ वेळ ते पुरायचं. इंग्रजी पुस्तकांच्या झपाट्यात मराठी जाता येता वाचत होतोच. पण एस. वाय. ला असताना वि. स. खांडेकरांचे अमृतवेल वाचलं आणि परत एकदा इंग्रजीकडून मराठीकडे खेचला गेलो. अमृतवेल नंतर वि. स. खांडेकरांची जवळजवळ सर्व पुस्तके, लेख, कथासंग्रह वाचले. अमृतवेलमधलं त्यांचे जीवनविषयक भाष्य आजही माझ्या मनावर कोरलेलं आहे. अमृतवेलचा शेवट मात्र अपुरा वाटतो. जणू पुढची पानं फाटली आहेत की काय असे वाटावे. पण अमृतवेलमधे मिळालेलं अमृत आजही मी अडचणीच्या वेळी उपयोगात आणतो. पुस्तकाच्या सुरुवातीलाच भाऊंनी लिहिलेल्या ओळी अशा आहेत – एखादे स्वप्न पाहणे, फुलवणे, प्रत्यक्षात आणण्याकरता धडपड करणे यातच जीवनाचा खरा अर्थ आहे. दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्या स्वप्नांच्या मागे धावणे यालाच जीवन म्हणतात.
या वाक्याने कल्पनामय, अवास्तव जगापासून वेगळा होऊन मी वास्तव जगाकडे पाहू लागलो. मला अनेक प्रश्न पडू लागले. आपल्या जगण्याचा उद्देश काय? कशासाठी हे सर्व करायचं? एवढी विषमता का आहे? मी याच घरात का जन्माला आलो? झोपडपट्टीत जन्माला आलो असतो तर? सर्वांना झगडायला कोण लावतो? काही मुले हुषार तर काही बेताची तर काही मतिमंद का? त्यात या मुलांचा दोष कोणता? या सगळ्या प्रश्नांवर मी विचार करत होतो. वाटत होते की विषमता आहे म्हणून जगण्याची ईर्षा आहे. काहीतरी कमी आहे म्हणून जास्तीची ओढ आहे. मग विचार आला की सरकार सर्वांना श्रीमंत का करून टाकत नाही. म्हणजे सर्व प्रश्न सुटतील. पण मग कुणी कुठलं काम करायचं हे कोण ठरवणार? ज्या सरकारने सर्वांना पैसे दिले त्यांना तो हक्क मिळेल का? सरकारने जरी ठरवायचे तरी कुठल्या निकषावर? शेवटी अंगभूत गुण बघूनच कामे ठरवणार ना? सरकारला हे लोकशाहीत करणं शक्य आहे? का रशियन साम्यवाद हा त्याला योग्य ठरेल? इ.इ.
अशा गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच मला मित्राने आयन रँडचं ऍटलास श्रग्ड हे पुस्तक वाचायला दिलं आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे मला माझ्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे मिळाली. आयन रँड माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आली आणि कायमचीच होऊन राहिली. Atlas Shrugged, Fountain head, We the living, Night of Jan 16th ही पुस्तके मी अधाशासारखी वाचली. पण खोल ठसा उमटवला तो Atlas Shrugged या पुस्तकाने. या सबंध पुस्तकाचे सार या एका ओळीत आहे.
I will not live for the sake of another person, not I will cause other person to live for my sake.
या पुस्तकातील विचारांनी माझी जगण्याची दृष्टीच बदलली. मी स्वत:पुरतं कधी पाहिलं तरी पण दुसर्याला खड्ड्यात घालून नव्हे. मला श्रमाची, श्रमाच्या मूल्याची ओळख पटली. मी काम केलं तर मला मिळालेल्या पैशात आनंद आहे. काम न करता पैसे मिळवणं म्हणजे पाप आहे असंच वाटायला लागलं.
Ayn Rand च्या पुस्तकांचा आणखी एक मोठा परिणाम झाला. आपण जेवढे प्रयत्न करू तेवढेच आपल्याला यश मिळणार याची प्रचितीच आली. निमित्त होते CA Inter परीक्षेचे. परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच मी माझ्या मित्रांबरोबर त्यावेळी दर शनिवारी भिकारदास मारूतीला जायचो आणि नमस्कार करायचो. ज्या दिवशी Result होता त्याच्या आदल्या शनिवारी मी मित्रांबरोबर मारूतीला गेलो आणि मनोभावे प्रार्थना केली की उद्या माझा Result आहे. मला पास कर. मला खात्री होती की आपण नक्की पास होणार कारण आपण दर शनिवारी न चुकता मारूतीची प्रार्थना करतोय. Result लागला. मी नापास झालो आणि माझे डोळे उघडले. मी नापास झालो ते माझ्या अपुर्या प्रयत्नांमुळे हे मला कळून चुकले. आपण प्रयत्न नाही केले तर कोणताही देव आपल्याला पास करू शकणार नाही हे लक्षात आले.
आपल्याला मिळालेल्या अपयशाला आपणच जबाबदार आणि आपल्या यशालाही आपलेच प्रयत्न कारणीभूत हे उमगले आणि देव या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
भरपूर अभ्यास करून CA झालो व स्वत:चा व्यवसाय सुरू केला. Ayn Rand ची सोबत होतीच त्यात जोडीला Economic Times ची भर पडली. रोज मी ET वाचायचो. त्यामुळे आपोआप माझ्या लिखाणात फरक पडत गेला आणि Drafting, Pleading वगैरे आमच्या प्रांतामधे इतरांपेक्षा सरस काम करू शकतो हे लक्षात आले. व्यवसाय करत असताना मोहाचे क्षण खूप आले. सुरुवातीला पैशांची गरज होती तेव्हा मोहाला बळीसुद्धा पडलो. पण हळूहळू असं लक्षात आलं की असे पैसे टिकत नाहीत. पैसे जेव्हा मिळतात तेव्हा खूप बरे वाटते पण नंतर अशी काही परिस्थिती येते, अशा काही चुका होतात की असे कष्ट न करता मिळालेले पैसे हातातून जातातसुद्धा. मग Ayn Rand ची आठवण होते आणि गाडी परत रूळावर येते. मोहाचे क्षण टाळले जातात.
अशा मोहाच्या क्षणांबरोबरच आत्तापर्यंतचा सर्वात कठीण असा काळ एक वेगळंच रूप घेऊन आला. जे मी आत्तापर्यंत कादंबरीत, सिनेमात पाहिलं होतं ते मी प्रत्यक्ष अनुभवू लागलो आणि मी अक्षरशः हादरून गेलो. माझ्याच बाबतीत का? हा प्रश्न निर्माण झाला. त्या कसोटीच्या, अडचणीच्या प्रसंगी मला दिशा दिली, मार्ग दाखवला ‘तत्त्वज्ञान’ या पाक्षिकाने !
पांडुरंगशास्त्री आठवले व त्यांच्या स्वाध्याय परिवारतर्फे निघणारे हे पाक्षिक जरी धार्मिक असले तरी त्याने माझ्यावर विलक्षण परिणाम केला. मला तत्त्वज्ञानाची गोडी लागली. पांडुरंगशास्त्रींची मी बरीच पुस्तके वाचली. त्यातून मला दिशा मिळाली ती डोळस भक्तीची. देवाला शरण जाण्यापेक्षा देवत्व असलेल्या माणसाला नमस्कार करणं मला श्रेयस्कर वाटू लागलं. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव मी शोधू लागलो. दगडातल्या देवापुढे नाक घासण्यापेक्षा माणसातल्या देवाला सलाम करू लागलो. प्रत्येकात देव आहे. जे जे चांगले आहे ते देवासमान आहे. कोणीही लहान/मोठा नसून प्रत्येकजण प्रथम माणूस आहे याची प्रचिती आली. पांडुरंगशास्त्रींचे भगवत्गीतेवरचे कृष्णामृतम वाचले आणि उत्कंठा वाढून ज्ञानेश्वर माऊलीचे गीतेवरचे निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली. या दोन्ही वाचनातून मन देवाकडे जाण्यापेक्षा माणसातल्या देवाकडेच आकर्षित झाले. आहे/नाही, चांगले/वाईट, असणे/नसणे या गोष्टी – एक आहे म्हणून दुसरीची ओळख होते हे लक्षात आले. वाईट काय हे कळल्याशिवाय चांगल्याची किंमत कळत नाही हे रुजले. करू नये आणि करून ये हे कसे एकमेकांवर अवलंबून आहेत ते जाणले.
यातून नवा गोंधळ निर्माण झाला. चांगले/वाईट, योग्य/अयोग्य या कल्पना आपापल्या समजुतीनुसार ठरवल्या जातात हे लक्षात आले. मग हिंदू, मुस्लीम, असा भेदभाव का? हिंदूंचा देव आणि मुस्लिमांचा अल्ला युद्धाच्या वेळी आकाशात उभे आहेत आणि एकमेकांवर शस्त्रे फेकत आहेत या कल्पनेचे हसू यायला लागले. मग माणसाला देव/ईश्वर/अल्ला याची गरज का भासते? हा प्रश्न पडायला लागला.
माझ्या पार्टनरकडून मी ओशो रजनीश यांच्याबद्दल खूप ऐकले होते पण वाचायची काही इच्छा होत नव्हती. एकदा धीर करून ओशो रजनीश यांचे पातंजली योगावरचे तीन भाग वाचले आणि अचंबित झालो. कुठल्याही धर्माची कास न धरता, कुठल्याही धर्माची बाजू न घेता केलेले ते तात्त्विक विवेचन फारच आवडले. देव या संकल्पनेला पूर्णविराम मिळाला. माणसातल्या देवाची/देवत्वाची आपण बांधलेली अनुमाने चुकीची नाहीत याची खात्री पटली.
या सर्वांचा परिणाम असा झाला की आता काल्पनिक/fiction वाचावेसेच वाटत नाही. सत्य/वास्तव अनुभव, आत्मचरित्रपर लेखन याची मोहिनी पडली. यातून अनिल अवचट यांची वास्तवाशी अत्यंत जवळीक साधणारी पुस्तके वाचली. सुनिता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ खूपच आवडले. परंतु पुलंवरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. आजही जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, उदास वाटते, जीवन क्षणभंगुर वाटते, तेव्हा पुलं आपली साथ मनापासून देतात आणि आलेलं मळभ दूर होतं. लगेच खांडेकरांची भग्न स्वप्नावरून धावणारी रक्ताळलेली पावले खुणावतात. Ayn Rand Atlas shrugged मधून डोकावते आणि who is John Galt? असा गूढ प्रश्न समोर टाकते आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या नादात ‘नष्टो मोहं स्मृतिं लब्धा’ची आठवण होते, ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदानाचे सूर/शब्द आठवतात आणि एकच इच्छा करावीशी वाटते.
सर्वे सुखिनः संतु | सर्वे संतु निरामयः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु |
मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् |