कविता जगताना…
वाचणं म्हणजे समजणं. पण खरंच या समजण्यापाशी पूर्ण होते का वाचनाची प्रक्रिया? समजतं, आनंद होतो, पटतं, पुनःप्रत्यय येतो पण पटलेलं असूनही उतरतं का ते आपल्या जगण्यावागण्यात? समजलेला आशय अनुभवाशी जोडणं – ताडून पाहाणं –
हे घडत असेल तरच तो आशय संवेदनेत उतरेल. आपल्याच आत झोपलेलं – बधिरलेलं काही जागं करेल – हळूहळू का होईना कृतीत उतरेल – मगच खर्या अर्थानं वाचन झालं असं म्हणता येईल ना?
वाचनावर लिहिण्यासाठी म्हणून विचार करायला लागले आणि डोक्यात प्रश्नांचे नुसते गुंतेच व्हायला लागले. शेवटी ‘उद्धरेत् आत्मनात्मानम्’ म्हणून स्वतःपाशीच आले. वाटलं की स्वतःचाच शोध घ्यावा. पहावं की किती आणि कसं उतरतंय ते जगण्यात. पण वाचलेलं तर इतकं वेगवेगळ्या प्रकारचं आणि बरंच काही…. त्यातलं खूपसं तर आठवतही नाही आता – म्हणून ठरवलं नमुनानिवड करायची… अगदी संशोधनात करतात तशी नाही पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तशी. आठवतात म्हणून, आवडतात म्हणून आणि प्रत्यक्ष जगण्यावर सर्वाधिक प्रभाव पडलाय म्हणून ‘कविता’ हा प्रकार निवडला – त्यातही ऐकलेल्या वजा करून ‘वाचलेल्या’ अशी मर्यादा निश्चित केली आणि तो गुंता सोडवायचं एक टोक घट्ट पकडून ठेवलं.
सातवी आठवीपर्यंत शिकलेल्या पाठ्यपुस्तकातल्या खूपशा कविता आठवताहेत. काही पूर्ण, काहींचं एखादं कडवं तर काहींचे नुसतेच चरण. रंगरंगुल्या सानसानुल्या, रुणुझुणत्या पाखरा, नको नको रे पावसा, उठ मुला, घाल घाल पिंगा वार्या, अरुणोदय, औदुंबर, प्रेमस्वरूप आई – आणि सदैव सैनिका सारखी एखादी. यातल्या बहुतांशी कविता एकतर निसर्गाचं वर्णन करणार्या किंवा बाईच्या माहेराचं / दुःखाचं वर्णन किंवा कौतुक करणार्या आहेत.
‘उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात’
या ओळींमधे ‘नासिक’ म्हणजे नाक आणि ‘काश्मिर’ म्हणजे गाल – ही त्या रडणार्या छोट्या मुलीच्या वर्णनातली गंमत कळाली होती तेव्हा झालेला आनंद आजही ताजा आहे. याचा शोध या कवितांना आठवताना लागला पण असे एकदोन अपवाद वगळले तर तेव्हा केवळ दमदार चालींमुळे तोंडपाठ झालेले शब्द बहुतांशी फक्त रूढार्थाच्या पातळीवरच समजलेले. नंतर कॉलेजात गेल्यावर बालकवी, कुसुमाग्रज, भा. रा. तांबे, इंदिरा संत यांना वाचता वाचता केव्हातरी कवितेतून घेतलेल्या वर्णनाच्या आनंदाला स्वतःच्या अनुभवाशी जोडून पाहता यायला लागलं. उदा. एकदा भर दुपारी समुद्रावरच्या तापलेल्या वाळूतून चालत गेल्यावर पहिली लाट पायाखाली आली तेव्हा – ‘पावलात झुळझुळ गारवा भरतो.’ या इंदिराबाईंच्या ओळींमधली गंमत खर्या अर्थानं अनुभवली. तसं तर त्या ओळी मी वाचल्याच नसत्या किंवा मला त्या आठवल्याच नसत्या तरी तो क्षण मी तसाच नि तेवढ्याच असोशीनं भोगलाच असता. पण आपण घेतलेला एखादा आनंद इतक्या नेमकेपणानं, कसल्यातरी विलक्षण क्षमतेनं इतरांसाठी शब्दात मांडणं – त्याचा वाचक म्हणून पुनःप्रत्यय घेणं… हा अनुभव, शब्दाच्या सामर्थ्याकडं विस्मयचकित होऊन पाहू लागलेल्या माझ्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढं घेऊन जाणारा असतो.
तसा तर शब्दांचा वापर आपण सगळेच करतो. पण ही कवी मंडळी साध्यासाध्याच शब्दांच्या मांडणीतून अर्थाचे इतके पदर आणि जितक्या वाचणार्या व्यक्ती तितक्या शक्यता ही जादू कशी काय करत असतील? कसं असेल शब्दाचं नि त्यांचं नातं? हे प्रश्न मनात घोळायचे, त्याच काळात अरुणा ढेरे यांचा ‘मंत्राक्षर’ हा संग्रह हातात पडला.
‘किती तर्हांनी आजवर कलावंताला शब्द भेटला आहे. किती परींनी त्यांनी शब्दाला भोगले आहे आणि खेळवले आहे त्यांना शब्दांनीही…’ या प्रस्तावनेचं बोट धरून तिच्या कवितेनं उभ्या केलेल्या चक्रव्यूहात जी शिरले…. अजून बाहेर पडायचा रस्ता भेटत नाहीय. याच संग्रहात कलावंत आणि शब्द यांच्या नात्याची कितीतरी रूपं समोर उभी ठाकली –
‘तिला हवा होता शब्द राजपुत्रासारखा उमदा,
धीट आणि तेजस्वी’
‘शब्दाला मनवून जवळ आणते मी त्याच्यावर मनातले सजल निळेभोर आभाळ पसरून देते’
‘आज हा ओलसर गाढ वेदनेचा स्पर्श माखून मी शब्दांमधल्या अंधारात पोचले आहे.’
‘सवाष्णीनं कुंकू टेकवावं तितक्या खात्रीनं टेकवताच येत नाही शब्दांची चिमूट कित्येक दुःखांवर’
संवेदनेचे हजार दरवाजे उघडूनही पहिल्या भेटीत यांचा आशय कवेत आल्यासारखं वाटलंच नाही. हळूहळू अनेक लेखक कवींच्या निरनिराळ्या तर्हा निरखत गेले तेव्हा त्या आशयाचे काही पदर उलगडताहेत असं वाटलं…
या सार्याचा परिणाम माझ्या पुढच्या सगळ्याच वाचनावर झालेला असावा. तशी अनोळखी पण आतून आपली वाटणारी वाट असते एखादी. तिच्यावरून चालताना अधूनमधून ओळखीचे खुणांचे दगड भेटावे तसे तिथले खाचखळगे, दर्या नि डोंगर…. त्यातली अपरिहार्यता आणि आनंद दोन्ही एकाच वेळी पाहू शकले पुढच्या वाचनातून !
‘माझे शब्द नेसवीन मी माझ्या दुःखाला’
(यशवंत मनोहर)
हा दिलाशाचा स्वर तर कित्येकदा भेटला इथे.
‘शब्द पाहुणे म्हणून आले होते,
आज त्यांना पोहोचवून आलो’ (नारायण सुर्वे)
किंवा
‘ही दुनिया पाषाणांची
बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे
नुसतेच उधळले होते’
(सुरेश भट)
अशा ओळींमधून बसणारे डंख समजुतीनं सोसता आले तरीही जे ‘वाचता’ आलं आजवर त्यामुळे,
‘उतराई व्हावे असे पुष्कळच प्रसवले आहे भूतकाळाने. इथल्या अंधारावर दिसते आहे ते पसरलेले’
यातला आशय संवेदनेतून श्रद्धेतही उतरलाय आज माझ्या. शब्दांशी असलेलं माझं नातं – त्यातल्या मैत्रभावाच्या शक्यतांचा पैस रुंदावला तो याच भूतकाळानं प्रसवलेल्या आणि वाचनानं समजुतीच्या कवेत आणलेल्या शब्दांमुळंच !
कवितेत भेटलेल्या सगळ्याच आनंदांना प्रत्यक्ष जगताना पूर्ण भिडता येतं असं मात्र होत नाही. बाईच्या अनेक रूपांची वेल्हाळ, रसपूर्ण, भाबडी, कधी कधी खरीखुरी आणि समंजसही कौतुकं करणार्या कवितांच्या संदर्भात हे विशेष जाणवतंय.
‘संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजून समजलेली नाही’
(विंदा करंदीकर)
किंवा
‘नसतेस घरी तू जेव्हा…’
(संदीप खरे)
अशा अनेक कविता, बाई म्हणून जगण्याच्या एका पातळीवर भावतात – त्यातल्या भावार्थाचा अनुभव तर रोजच येत असतो. पण इंदिराबाईंच्या, शांताबाई शेळक्यांच्या वाटेवरून पुढे गेलेली अरुणा म्हणते,
‘भर माध्यान्ही नदीवर खळबळून जातात
चुबकून निघतात बायका’
हेच अधिक पटतं. किंवा
आसावरी काकडेंनी केलेलं,
‘उध्वस्त होण्यासाठी लागणारे बळ
वापरले त्यांनी अंतर्बाह्य बहरून येण्यासाठी’
हेच अधिक खरं आणि समंजस कौतुक वाटतं.
‘बाईमधे असतं एक निरंतर आकाश
दुःखाला सामावून घेण्यासाठी,
ती सहज पेलू शकते.
कुंकवाशिवाय कुंकवाखालचं आभाळ’ (नीरजा)
अशाच ओळी माझ्यासाठी एका दुखर्या पण पुनःप्रत्ययी आनंदाच्या धनी होतात.
‘आग उठली मनात की वाट गावतेच रानात’
असं म्हणत पेटून उठणारी विजया जहागीरदारांची अडाणी सरपंचबाई अधिक आनंद देते.
शिक्षक प्रशिक्षक म्हणून गेल्या दहा वर्षात शिक्षकांशी बोलताना अनेक वेळा नेमकं म्हणणं मांडण्यासाठी या मनातल्या कवितांना उद्धृत केलं. त्यामुळं आपल्या बोलण्याची एक छाप पडते – प्रभाव पडतो – ते पोचलंसं वाटतं – कौतुकही होतं – नाही म्हटलं तरी त्यामुळं अहम् सुखावतोही. पण त्याचवेळी एक प्रश्नही पडतो. केवळ प्रभाव पडण्यासाठी करतो का आपण हे? प्रभाव आशयाचा पडतोय की सादरीकरणाचा? शैलीचा? आणि त्यापुढे काय?….. हळूहळू शिकतेय हे प्रश्न मनात जागते ठेवून या सार्याकडं पाहणं…. तशी सवयच लावू पाहतेय स्वतःला – त्यातून एक लक्षात येतंय – थेट भावविश्वाला भिडायचं असेल तर कवितेइतकं सतत हाताशी / मनाशी असलेलं इतकं मितव्ययी साधनच नाही माझ्यापाशी. भावपूर्ण अशा उत्तम सादरीकरणातून शिक्षक/मार्गदर्शकांपर्यंत पोचवलेल्या कवितांमधलं सगळं नुसत्याच तत्कालीन प्रभावापाशी थांबतं असं नाही. त्यातलं काही नक्कीच रुजतं – आणि वाढतंही. काहीजण आवर्जून ती पुस्तकं विकत घेतात – वाचल्याचं, आवडल्याचं मुद्दाम कळवतात. किमान पुढच्या स्तरावरच्या प्रशिक्षणात आपलं भाषण/मार्गदर्शन चांगलं व्हावं म्हणून का होईना त्या कविता वापरतात. शिवाय सुरुवातीचा असा प्रभाव असणं ही स्वाभाविकच गोष्ट आहे. निर्मलकुमार फडकुल्यांच्या भाषणांचा, दत्ता हलसगीकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, चंद्रभूषण कुलश्रेष्ठ यांच्या कविता वाचनाचा प्रभाव कॉलेजच्या वयात माझ्यावर पडला नसता तर कदाचित हे शब्दप्रभूंचं जग अनोळखीच राहिलं असतं माझ्यासाठी. या प्रभावाचं बोट धरूनच होतो पुढचा प्रवास – काही बोटं सुटतात मधेच, काही शेवटपर्यंत सोबत असतात एवढंच – प्रवास महत्त्वाचा.
या प्रवासातच उमगलं की शब्दांनी पेलता येतं आभाळ आणि पेटवताही. याला इतिहासपण साक्षी आहे आणि वर्तमानपण (सध्याच्या जाहिरातीतल्या शब्दव्यापाराचा विचार केला तरी पटेल हे) म्हणून माजलेल्या तणकटांची रानं पेटवायची असतील तर अशा शब्दातल्या ठिणग्या आपापल्या ताकदीनं पेटायलाच हव्यात तर नव्या उदयाची सशक्त निरोगी वाढ आपण पाहू शकू.
एकदा राज्यस्तरावरच्या एका प्रशिक्षण वर्गात पहिलीतल्या मुलांना त्यांचे गट करून शिकण्याची संधी देण्याबद्दल चर्चा चालू होती. राज्यभरातून आलेल्या तज्ज्ञ मंडळींनी, ‘‘लहान मुलं गोंधळ खूप करतात, भांडतात, शिक्षकांनी कोणत्या गटाकडे लक्ष द्यायचं?, बर्याच वर्गामधून तेवढी जागाच नाही बसायला, ६०-६० मुलं असलेल्या वर्गात हे कसं शक्य आहे?’’ असे अगदी वास्तवाधारित अडचणींचे डोंगर समोर उभे केले. अशावेळी नेहमी करते तसं सॉक्रेटिस आणि गाडगेबाबांचं मनातल्या मनात स्मरण केलं आणि एकेक साधेसाधे प्रश्न विचारत – त्यांनीच दिलेल्या उत्तराचं बोट धरून तो एकेक डोंगर पार करण्यासाठीचे अनेक रस्ते पुढे आणले. शेवटी जाणीवपूर्वक भिंतीवर लावलेल्या कवितांमधल्या सुरेश भटांच्या ओळीकडे सार्यांचं लक्ष वेधलं-
‘जगाची झोकुनी दुःखे
सुखाशी भांडतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणार्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’
त्यानंतर काही क्षण वर्गात अनुभवलेली ती बोलकी शांतता – विचारात पडलेले आधीचे खट्याळ प्रश्नकर्ते – अशा प्रसंगाचा नंतर विचार करताना मला इंदिराबाई हमखास आठवतातच –
‘अंधाराच्या संथ जळातून असता चालत
नसते अवतीभवती काही
शब्दांनी जे हो वलयांकित
असते एकच हट्टी जाणीव दंडापाशी पदरापाशी
मनामनाला जी संवेदित’
शब्दांनी वलयांकित न होणारी, ‘घडू शकतं चांगलं’ ही हट्टी जाणीव – आणि तिला संवादाच्या कक्षेत येणार्या मनामनाशी संवेदित करणं… वाचलेल्या कवितेमुळेच हे सगळं अजून जिवंत आहे. एरवी लाल फितीतल्या कागदांच्या तालावर चालणार्या या व्यवस्थेच्या एखाद्या फटक्यानंही ही जाणीव केव्हाच आडवी झाली असती, अनेकांची होते तशी कायमचीच !
आत्तापर्यंत वाचलं ते सगळंच समजुतीच्या संवेदनेच्या कक्षेत आलं असं नाही. ते तसं यावं असं वाटूनही येत नाही – अशा दुखर्या जागाही खूप आहेत. सूर्य लांबूनच पाहता आणि अनुभवता येतो ना, तसं काहीसं होतं या कवितांच्या बाबतीत. त्यातल्या रॉय किणीकरांच्या काही कविता तर पाठ्यपुस्तकातल्या कवितांसारख्या पाठही झाल्यात –
‘रसरूपगंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही आता त्यांचे झाले’
किंवा
‘हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण’
अशी कविता एका क्षणाला समजलीय असं वाटतं पण अनुभवाशी जोडताना – ताडून पाहायला गेलं त्यातलं कळलेलं इवलं काही की ध्यानात येतं – ही तर समजूत नव्हेच हा आहे केवळ समजुतीला बसलेला एक चटका-संवेदना बधिर करणारा. या माझ्या यादीत ग्रेस, आरती प्रभु आणि त्र्यं. वि. सरदेशमुखांचीही कविता आहे.
मात्र या कवितांचं अपेक्षित पातळीवरचं न कळणं आणि काही दुर्बोध नवकवितांचं न कळणं यात माझ्या बाबतीत मोठा फरक असतो. या कवितांसारखी नवकवितेची ओढ, आकर्षण नाही वाटत – (काही अपवाद वगळता) का ते कदाचित नाही सांगता यायचं पण ग्रेस म्हणतो ना,
‘माझ्या मना तुला दुखते कुठे कळू दे’ तसं हे ‘कळू दे’ असं वाटणंही महत्त्वाचं असतं ना ! मग या इच्छेच्या मागून काही कोवळे किरण येतातच समजुतीच्या कक्षेत. त्यावरून अख्ख्या सूर्याच्या त्या तेजाचे अंदाज बांधायचे. तेवढी उत्कटता आणि सांरच उधळून द्यायची तयारी असलेली फकिरी वृत्ती मुळात आपल्यातच नसेल तर कशी उतरणार ही कविता आपल्या मनाच्या अंगणात? म्हणून दरेक वाचनाला पकडीत येतात तेवढ्या किरणांनी हरखून जायचं एवढंच.
वाचलं-रुचलं-पटलं पण करायला नीटसं जमलं नाही असं तर खूऽप काही आहे अजून. तसा तर प्रवासच असतो हा अखंड चालणारा – कितीदा तरी जागेही नसतो आपण आपल्यात –
‘मीच मला कित्येक दिवस दिसले नाही’ असंही होतं,
‘वेगाने होणार्या पर्यायांच्या अमानुष तोडीत सामील होण्यासाठी’ हातांना पर्याय नसला तरीही ‘नव्या अनुभवावरून मनाचा पदर घट्ट लपेटून घेणं निरंतर चालूच आहे.’
‘हा कालचा विषाचा
दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या
फसण्यास अंत नाही’
हे कळतंच पण वळत नाही अजूनही. आणि तरीही या प्रवासात कायम मिळतंच मला, ‘वाहून जाण्यासाठी एखादं तरी श्रीमंत निमित्त.’ मग वाहता वाहताही लटकावलेल्या असतातच मनाच्या भिंतीवर पुन्हा अरुणाच्याच ओळी –
‘अटळच आहे तुला झंझावाती जगातल्या प्रलयंकर अनुभवाचा स्वीकार – पण तू नेहमी असावेस स्वतःशीच सहृदय.
मरणाच्या गळ्यात असतेच जन्माची तहान
असलाच संघर्ष अटळ तर लढावेस
सृजनाच्या बाजूने’
रोजच लढाव्या लागणार्या लढायात ‘दर एक क्षणाची नेक उठबस’ करण्याची कसरत हळूहळू जमत्येय असं वाटतंय. पण सगळ्याच अनुभवांचा सहज स्वीकार प्रत्येक वेळी नाही करता येत अजून.
स्वतःशी सहृदय कसं राहायचं या सगळ्या परिस्थितीत तेही कधीकधी कळत नाही – सृजनाच्या बाजूनं लढायचं हे मात्र पक्कं ठरलेलं आहे – अगदी पक्कं !