एकदा काय झाले….

स्वत: घेतलेल्या अनुभवांतून, स्वत: करून पाहिलेल्या वेगवेगळ्या कृतींतून मुलांचे अनुभव समृद्ध होत जातात.
या विचारांवर आमची गोरेगावची प्राथमिक शाळा आधारलेली आहे. भाषाविकासाचा विचार करता,
मुलांनी मुक्तपणे अभिव्यक्त होणे हा प्रमुख हेतू मनात ठेवून शाळेत बालवाडीपासूनच प्रयत्न करत आहोत.

वाचनाची मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेत बालवाडीपासून वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवतो. बडबडगीतांच्या तालावर रोज मुले डोलत असतात. पुढे प्राथमिकमध्येही दररोज एक गोष्ट वाचून दाखवतो. त्यातील शब्दांविषयी, वेगळ्या वाक्य रचनांविषयी वर्गात गप्पा होतात. तिसरी चौथीत काही गोष्टींबद्दल मुले आपली मते मांडतात. गोष्टीतील आवडलेला भाग व नावडता भाग किंवा एखाद्या प्रसंगाबाबतचे आपले विचार स्पष्टपणे मांडतात.

दररोज दोन तासिकांच्या मध्ये प्रत्येक इयत्तेत एकेक छोटेसे गाणे घेतो. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर कविता अनेकदा वाचून दाखवतो. जसे विंदा, मंगेश पाडगावकरांच्या कविता त्यातील आशय, ताल याबद्दल गप्पा करतो. कवितांमधील लयबद्ध-रचना, कल्पना, गमतीजमती मुलांच्या लक्षात येतील अशा प्रकारे वाचण्याचा प्रयत्न केला जातो. वाचनालयाची आठवड्यातून एक तासिका असते. त्यात पहिलीपासूनच मुलांच्या पुस्तकांच्या निवडीला वाव दिला जातो. त्यामुळे इयत्ता जसजशी वाढत जाते तसे मुले स्वत:च पुस्तकांच्या निवडीबाबत अधिकाधिक जागरूक होताना दिसत आहेत. आवडलेल्या गोष्टी, कवितांची पुस्तके, मासिके यांची पुन्हा पुन्हा मागणी असते. तिसरी, चौथीत N.B.T. ची पुस्तके वाचायला मुलांना खूप आवडतात असे दिसून आले आहे. वाचनालयाच्या खोलीत नियमित काही विनोद, गमतीशीर माहिती, काही वैज्ञानिक माहिती, कविता फलकांवर लावून ठेवतो. त्यामुळे वाचनालयातील या वाचनीय वातावरणात मुलांना नेहमीच जायला आवडते. चौथीची मुले तर वर्गातील कृती झाल्या की, वाचनालयात स्वत:हून जातात व आवडीच्या पुस्तकांचे वाचन करतात. वाचनालयाच्या तासाला मुलांसोबत ताईही एखादे पुस्तक वाचतात. त्यातील एखादी माहिती, प्रसंग, विनोद, कविता मुलांना तासिका संपण्यापूर्वी सांगतात. वाचनालयाच्या तासाला काही मुले एखादा शब्द वाचता आला नाही किंवा अर्थ समजला नाही तर शेजारच्या मुलाला किंवा ताईंना विचारतात. त्यामुळे केवळ वाचन न होता मुले समजून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजते. तसेच दर आठवड्याला मुलांना आपल्याला हवे ते एक पुस्तक आठवडाभर घरी वाचायला नेता येते. केवळ मुलांसाठीच नव्हे तर पालकांकरिताही वाचनालय आहे. दर्जेदार लेखकांच्या कथा, कविता, मासिके, विज्ञानावर आधारित माहितीपर पुस्तके, मुलांच्या शारीरिक व भावनिक वाढीचे टप्पे सांगणारी पुस्तके, मुलांना वाचून दाखवता येतील अशा गोष्टींची पुस्तकेही त्यात ठेवली आहेत. त्यामुळे पालकांचा व मुलांचा एकमेकांशी संवाद साधण्यास मदत होताना दिसत आहे. पालकांनी आपलं मूल समजून घ्यावं हा त्यामागचा हेतू. ‘मला बाबांनी काल बिम्मची गोष्ट वाचून दाखवली’ हे जेव्हा मुले दुसर्या दिवशी सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसून येते.

कला-कार्यानुभवाच्या काही कृती करताना टेपरेकॉर्डरवर काही कविता, गाणी ऐकवतो तर कधी कधी काही गोष्टी, कविता वाचून दाखवतो. कानावर पडणारी गाणी, गोष्टींमुळे कृती करताना मनोरंजन तर होतेच त्याचबरोबर कामातील एकाग्रताही वाढलेली दिसून येत आहे. मंगेश पाडगावकरांची कवितावाचनाची कॅसेट लावण्याची मुले बरेचदा फर्माईश करतात.

या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणजे मुले एखाद्या पुस्तकाबद्दल, एखाद्या विषयाबद्दल आपली मते स्पष्टपणे मांडू लागली आहेत. स्वतंत्रलेखनात हा मुक्त विचार दिसू लागला आहे. पहिलीतील मुलगा कुत्र्याबद्दल लिहिताना म्हणतो की, कुत्रा आपल्या घराचा ‘हिस्सा’ आहे. ‘आमच्या ताई’ या विषयावर लेखन करायला दिले तेव्हा एका मुलाने लिहिले की, ‘ताई जेव्हा केस सोडून पुन्हा बो (bow) बांधतात तेव्हा छान दिसतात.’ यात मुलाने ताईंचे बारकाईने निरीक्षण केले व तेवढ्याच निरागसतेने ते मांडले. तर दुसर्याने ‘आता आम्ही तिसरीत आहोत तर आता ताईंनी फळ्यावर छोटे अक्षर काढले पाहिजे’ अशी विनंतीवजा सूचनाही केली. मुलांना मोकळे होण्याची वारंवार संधी दिली तर त्यांच्या भाषाविकासाला गती येते याचा एक छानसा अनुभव नुकताच आला. इयत्ता दुसरीत मुले ताईंच्या मदतीने अनुप्रासाची गमतीदार वाक्ये करू लागतात, त्याची मदत पुढे त्यांना इयत्ता तिसरी, चौथीत स्वत: कविता रचण्यास होते. इयत्ता तिसरीत पहिल्या सत्रात यमक जुळवून काही दोन दोन ओळींची छोटी छोटी कडवी मुले करतात.

मनात आले की इयत्ता तिसरीच्या मुलांना विंदा करंदीकरांच्या ‘एकदा काय झाले’ या कविता संग्रहातील ‘एकदा काय झाले’ ही कविता वाचून दाखवावी. कविता वाचल्यावर त्यातील गंमत (कल्पना) मुलांच्या लगेच लक्षात आली. ‘एकदा काय झाले’, ‘एकदा काय झाले’ या दोन ओळी फळ्यावर लिहिल्या. ‘आपण यापुढची कविता करूया का?’ असे विचारले त्याबरोबर प्रणय चटकन म्हणाला, ‘एकदा काय झाले, एकदा काय झाले, बाबांच्या खिशातून उंदीरमामा आले.’ पाठोपाठ अनेक मुलांनी उत्स्फूर्तपणे कडवी रचण्यास सुरू केली. त्यांना त्यांच्या वहीत स्वतःची कविता लिहायला सांगितली. चाळीसही मुले कविता लिहू लागली. मध्येच एक जण आपल्याला जमलेलं गमतीदार कडवं वाचून दाखवायचा व इतर त्यावर हसून आपला प्रतिसाद देत होते. मध्ये मध्ये फिरून मी बघत होते, प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करत होता. काही मुले मला विशेष खुललेली दिसली. वर्गात फारसे न बोलणार्या प्रणयने नऊ कडवी रचली. त्यात, एकदा काय झाले, एकदा काय झाले, सशाला पाहून सगळे वाघ भ्याले!! आणि एकदा काय झाले, एकदा काय झाले, पाण्यातले मासे झाडावर आले. या दोन कल्पना गमतीशीर वाटल्या. आरतीला पाठ्यपुस्तकातील पाठांमध्ये फारसा रस नसतो. परंतु पाठाव्यतिरिक्त काही घेतले तर ती नेहमीच खूश असते. तिने रचलेली कडवी पहा –

एकदा काय झाले
एकदा काय झाले
उंदीरमामाच्या स्वप्नात
चांदोमामा आले ॥
….. गौतम बुद्धांच्या
डोळ्यातून आसू आले ॥

तिच्या दुसर्या कडव्याविषयी मी विचारले की तुला असं का लिहावंसं वाटलं. तेव्हा ती म्हणाली की, बॉम्बस्फोट बघून त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आजूबाजूच्या परिस्थितीचा तिच्या मनावर झालेला परिणाम तिने कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. दिव्याच्या कवितेत तिने भोपळेराव, तारेसाहेब असे शब्द वापरले आहेत. कधीतरी ऐकलेले ‘राव’, ‘साहेब’ हे शब्द तिला कवितेत वापरावेसे वाटले. आशुतोषने केलेले एक कडवे विचार करायला लावणारे आहे. ‘‘एकदा काय झाले, एकदा काय झाले, ताजमहाल हॉटेलात बॉम्बस्फोट झाले’’. त्याला याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की, ‘ताई त्या ठिकाणी बॉम्बस्फोट होईल असं कधीच वाटलं नव्हतं.’ तर मयूरच्या एका कडव्याने एक मस्त अनुभव दिला. त्याने लिहिले आहे ‘‘एकदा काय झाले, एकदा काय झाले, बाबा सुदरुन घरी आले.’’ त्याला विचारले, ‘‘अरे म्हणजे काय?’’ तो म्हणाला, ‘‘ताई, माझे बाबा ना खूप शाईनिंग मारतात. पण आईसमोर त्यांचं कायपण चालत नाही. म्हणून ते घरी येताना शाईनिंग सोडून नीट येतात.’’ त्यांचं हे बोलणे ऐकल्यावर त्याने लिहिलेला ‘सुदरुन’ हा शब्द सुधारून लिहावा असं मला मुळीच वाटले नाही.
कविता करताना जवळपास ३५ जणांनी ५ ते ६ कडवी रचली आहेत. रोहनला कविता करताना अडचण येत होती. पण त्याला तोंडी विचारले. त्यातील शब्दांच्या जागा बदलून पाहूया का? असे विचारले. तो ‘हो’ म्हणाला. एकेक ओळीचे कडवे करण्याचा त्याने प्रयत्न केला. रोहन म्हणतो, ‘‘एकदा काय झाले, फुलपाखरु दिसले.’’

कविता लिहून झाल्यावर त्यांना विचारले, ‘‘आपण खाली आपले नाव लिहिण्यापूर्वी कवी किंवा कवयित्री लिहूया का?’’ कवितेच्या पुढे आपले स्वत:चे नाव लिहिताना सर्वांच्याच चेहर्यावर आनंद, मजा दोन्ही भाव दिसत होते. या कवितेचा परिणाम काही मुलांवर एवढा झाला की, त्यांचे कडवी लिहिणे थांबतच नव्हते. दुसर्या दिवशीही स्वत:हून सात मुले अशा प्रकारची कविता करून घेऊन आले. सर्व पालकांना व इतर वर्गातील मुलांना पाहता याव्यात म्हणून दुसर्या दिवशी सर्व मुलांच्या कविता मांडून ठेवल्या. तेव्हा चौथीच्या काही मुलांनी कविता वाचल्यावर तिसरीच्या वर्गात येऊन मुलांना शाबासकी दिली. आपल्यापेक्षा लहान मुलांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले हा किती सुंदर अनुभव आहे. असे अनुभव वारंवार येतात. मुलांनी केलेली काही निवडक कडवी खाली देत आहे.
एकदा काय झाले
एकदा काय झाले
राणीच्या मुकुटातले
मोती गळाले
साक्षी
….. हत्तीच्या सुळ्यांवरून
मोर घसरू लागले
प्रणव
…… माणसाला भेटायला
अश्मयुगीन माणूस आले
नंदिनी
…… झुरळाला पाहून
पैलवान धूम पळाले
प्रणव
…… माझ्या घरात माझेच
डुप्लिकेट आले
यज्ञेश
…… शेजारच्या घरात
तरुण आजोबा झाले
सौरभ
…… फुलाला हात लावताच
झाड लाजले
मृदुल
…… सर्कशीतले सर्व जोकरच
रडू लागले
दिव्या
…… इकडे तिकडे मला
पप्पा नजर आले
पूर्वा
…… झाडाने यज्ञेशला
मिठीत घेतले
मयूर
…… माझ्या कपड्यांचे
मोरपीस झाले
…… मोरांनी दारात
चित्र काढले
कांक्षा
…… कॉलेजचे प्रोफेसर
बालवाडीत शिकवू लागले
कीर्ती
…… चोरी होण्याआधीच
पोलीस तेथे आले
मिहिर
…… राजाने नोकरांचे
पाय धरले
यज्ञेश
…… राज ठाकरे आले पण
भाषण विसरून गेले
अनुष्का
…… चोरांच्या बाबतीत
चांगले झाले
श्रीधर
…… कुत्रे भुंकू लागले तेव्हा
वॉचमन जागे झाले
शार्दूल

कवितेचा हा पाठ झाल्यावर पुन्हा नवीन प्रयोग करण्याचा उत्साह आला आहे. प्रणय, कांक्षा, सौरभसारखी कमी बोलणारी मुले मला या कवितेच्या माध्यमातून खुललेली दिसली. या कवितांचे आम्ही कव्हर घालून पुस्तक तयार केले आहे. या पाठामुळे खरोखरच “fresh” झाल्यासारखे वाटले. मला पाठापूर्वी वाटत होते की, मुलांच्या कवितेत फक्त त्यांच्या कल्पना दिसून येतील. पण कविता पाहिल्यावर जाणवले की आजूबाजूच्या परिस्थितीचा, त्यांना आलेल्या अनुभवांचा मुलांवर खूप परिणाम होतो. पुन्हा एकदा जाणवले की, संधी दिल्यावर मुले मोकळी होतात.