कविता कुणासाठी?
माझ्या ओळखीच्या एक शिक्षिका आहेत. काव्याविषयी त्यांना विशेष उत्साह आहे. त्या स्वतःही कविता लिहितात. त्यांनी एकदा मला एक प्रश्न विचारला. ‘‘तुम्ही मोठ्या माणसांसाठी कविता लिहिता आणि मुलांसाठीही लिहिता. या दोन्ही प्रकारच्या कवितांत कोणता फरक असतो?’’
खरे म्हणजे, मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे होते. पण मी उत्तर न देता, त्यांनाच प्रश्न केला. काही वेळा प्रश्नाला प्रश्न विचारणे ही चांगल्या उत्तराची सुरुवातच असते ! मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही स्वतः थोड्याफार कविता लिहिता, आणि विशेष म्हणजे शाळेत कविता शिकवताही. या दोन प्रकारच्या, म्हणजे, मोठ्यांसाठी लिहिलेल्या आणि छोट्यांसाठी लिहिलेल्या कवितांत फरक असतो असं तुम्ही मानता का?’’
त्या म्हणाल्या, ‘‘फरक आहेच की ! मोठ्यांसाठी लिहिल्या जाणार्या कवितांच्या तुलनेने मुलांसाठी लिहिल्या जाणार्या कविता कमी प्रतीच्या असतात. त्या कमी प्रतीच्या असतात, म्हणून, त्या मुलांसाठी, त्यांच्या दर्जासाठी योग्य ठरतात !’’
मी त्यांना म्हणालो, ‘‘म्हणजे, कविता वाचणार्या मोठ्या माणसापेक्षा कविता वाचणारं लहान मूल हे कमी प्रतीचं असा याचा अर्थ झाला !’’
त्या म्हणाल्या, ‘‘हे काय सांगायला पाहिजे? मुलांच्या बुद्धीचा, विचारांचा, मनाचा आणि एकूणच अनुभवांचा विकास मोठ्या माणसांप्रमाणे झालेला नसतो !’’
मी म्हणालो, ‘‘आता मी मला काय वाटतं, ते तुम्हांला सांगतो. कवितेचा अनुभव घेणारा मोठा माणूस आणि कवितेचा अनुभव – आनंद घेणारं लहान मूल यांत मूल हे कमी प्रतीचं आहे असं मी मानीत नाही. या दोघांनाही, मी कविता लिहीत असताना, एकाच भावनेने मानतो. आता एक गोष्ट खरी की, मोठ्या माणसांच्या कवितांतून व्यक्त होणारे काही अनुभव लहान मुलांच्यासाठी लिहिलेल्या कवितांत येऊच शकणार नाहीत. कारण, या अनुभवांचा स्पर्शही त्या वयात लहान मुलाला झालेला नसतो, आणि तो होणंही शक्य नसतं ! पण जे अनुभव लहान मुलाच्या कक्षेत येतात, ते व्यक्त करणार्या कविता ते लहान मूल मोठ्या माणसाइतक्याच उत्कटपणे वाचू शकतं. मोठ्या माणसाप्रमाणेच त्यांचा आनंद घेऊ शकतं. हा आनंद घेण्याची लहान मुलाची शक्ती ही मोठ्या माणसाहून अधिक असण्याची शक्यता असते !! याचं कारण असं की, लहान मुलांच्या मनाचा ताजेपणा, कल्पनांची नानाविध खेळणी करून त्यांत रमून जाण्याची त्यांची वृत्ती, चित्रविचित्र आकारांविषयी त्यांना वाटणारं निर्मळ कुतूहल, खुळखुळणार्या शब्दांच्या नादांशी जमू शकणारं त्यांचं निर्हेतुक नातं – या सगळ्या गोष्टी मुलं हरवून बसलेली नसतात. आणि कवितेचा अनुभव येणं, त्यांचा आनंद मिळणं हे याहून वेगळं थोडंच असतं? याउलट, आयुष्याच्या चाकोरीतून स्वतःला फरफटत नेणार्या बर्याच मोठ्या माणसांची मनं मद्दड झालेली असतात. मुलं आपल्या अंतःकरणाने कविता वाचतात. बरीचशी मोठी माणसं कविता वाचतात ती केवळ
आपल्या डोक्याने ! तुम्ही शिक्षिका आहात. तेव्हा तुम्ही हे पाहिलेलं असेलच की, डोक्याने कविता वाचणारी काही मोठी माणसं समीक्षा लिहितात !’’
त्या शिक्षिका म्हणाल्या, ‘‘म्हणजे तुम्ही लहान मुलांसाठी जेव्हा कविता लिहिता तेव्हा -’’
मी चटकन म्हणालो, ‘‘मी लहान मुलांसाठी कविता लिहायला खास खुर्ची आणि मोठ्या माणसांसाठी कविता लिहिताना बसायला वेगळी खुर्ची वापरतो असा जर तुमचा समज असेल तर, तो निखालस चुकीचा आहे. एकाच खुर्चीवर बसून मी या दोन्ही प्रकारच्या कविता लिहितो ! मोठ्या माणसांसाठी लिहिलेल्या कविता लहान मुलं अनुभवू शकणार नाहीत – कारण ते अनुभव आणि त्या अनुभवांची भाषा यांच्याशी त्यांचा परिचयच झालेला नाही. पण लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता मोठ्या माणसांना लहान मुलांइतक्याच उत्कट आनंदाने वाचता -अनुभवता आल्या पाहिजेत. तसं एखाद्या मोठ्या माणसाला जर जमत नसेल, तर त्याचा अर्थ, त्याची कवितेचा अनुभव घेण्याची शक्ती कमी दर्जाची आहे ! त्याच्यात काही तरी घोटाळा आहे ! कविता मोठ्या माणसासाठी असो किंवा लहान मुलासाठी असो, ती कविता आहे ही मुख्य गोष्ट ! म्हणूनच ती कोणासाठीही असो, कविता म्हणून ती चांगली असलीच पाहिजे !’’
मला जे सांगायचं होते, ते मी त्यांना सांगून टाकले होते ! आणि माझ्यापुरते ते अगदी खरे आहे. मोठ्यांसाठी असो किंवा लहानांसाठी असो, मी कविता एकाच समरसतेने लिहितो. कवी म्हणून मी एकच असतो, मुळीच फरक नसतो !
त्या शिक्षिकेला माझे म्हणणे पटले की नाही, कुणास ठाऊक? पण माझ्याविषयी आदर असल्यामुळे, त्या काही बोलल्या नाहीत ! आपल्याविषयी काही कारणाने एखाद्याला आदर वाटत असला की, काही वेळा त्याचा असा फायदा मिळतो ! या संग्रहातल्या कविता लहान मुलांसाठी आहेत. लहान मुलांना त्या आवडतील, त्यांना या कवितांचा आनंद मिळेल याचा मला विश्वास आहे. पण समजा, त्या शिक्षिकाबाईंनी या पुस्तकातल्या कविता वाचल्या आणि त्या वाचून मोठ्या माणसांच्या कविता वाचताना त्यांना मिळतो तसा आनंद त्यांना मिळाला तर?
तर काय, दुधात साखर !
(प्रस्तावना – सुट्टी एके सुट्टी, मौज प्रकाशन,
कविता संग्रहातून साभार)