संवादकीय – मे २०११
मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेक घटना फार वेगानं घडत आहेत. ह्या घटना तशा एकमेकांशी जोडलेल्या नव्हेत, पण त्यात आपल्या मानसिकतेतून येणारा एक आंतरसंबंध दिसतो आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन, सत्यसाईबाबांचं निधन आणि ओसामा बिन लादेनची हत्या. अण्णांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या आंदोलनाला असा प्रतिसाद मिळणं ही अनेक वर्षांनंतरची सुखद घटना. अर्थात त्यामध्ये आंदोलनाचा विषय, त्यासाठी निवडलेली समुचित वेळ, योग्य ठिकाण, दृकश्राव्य माध्यमांचा सक्रिय सहभाग अशी अनेक कारणं होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसांना दैनंदिन आयुष्यात भेडसावून अगतिक करणार्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात होतं.
तसं पाहिलं तर हे आंदोलन काहीसं भाबडं आहे. लोकपाल विधेयक हे सर्व प्रश्नांवरचा अक्सीर इलाज आहे असं दुबळं चित्र त्यातून निर्माण होतं. आपल्या समस्या फक्त कायद्यानं नाहीतर ज्या सामाजिक-आर्थिक-राजकीय रचनेमुळे मूळ प्रश्न निर्माण होतो त्या रचनेत मूलभूत बदल झाला तरच दूर होऊ शकणार आहेत. आंदोलनकर्त्यांच्या काही वक्तव्यांकडे पाहताना ते आत्ताच खूष होऊन गेले आहेत की काय अशी शंका यावी. याशिवाय त्या विधेयकाच्या मसुद्यात कोणत्या तृटी आहेत, आजवर चाळीस वर्ष अडगळीत पडलेल्या मुद्यांचं घोंगडं आता यानंतर भिजत पडणार का अशा अनेक शंका राहतातच. तरीही आपल्या समाजात प्रचंड प्रमाणात असलेल्या वंचित आणि अगतिक मानसिकतेला या आंदोलनामुळे एक आशेचा किरण दिसला. या निमित्तानं जनतेच्या मनातला असंतोष राज्यकर्त्यांपर्यंत पोचला, त्याची दखल घेणं त्यांना भाग पडलं ही दिशाही तुलनेनं बरीच म्हणायची.
एरवी हेच लाखो लोक, त्यात गरीब वंचितच नाही तर श्रीमंत – अतिश्रीमंत असूनही असुरक्षित असणारे येतात, सत्यसाईबाबा आणि तशा अनेकांच्या भजनी लागलेले असतात. हातचलाखीने हातातून उदी, रोलेक्सची घड्याळं आणि सोन्याच्या अंगठ्या काढणारी ही व्यक्ती लोकांना काही एक आधार देणारी वाटते म्हणूनच ते त्यांच्या प्रभावात गुंतलेले असतात. संकटसमयी सहन न होणारा भार कुणीतरी हलका करील का असं वाटत राहतं म्हणूनच लोक नवस-सायास करतात किंवा आपल्यात दैवी शक्ती आहे असं भासवणार्यांच्यावर विश्वास टाकतात. दुर्दैवानं त्यातून हतबलता आणि निष्क्रियताच वाढायची शक्यता असते. नाही तर अशी कुणात अपरंपार दैवी शक्ती वगैरे असली असती तर त्या व्यक्तीनं आपल्या शक्तीचा उपयोग माणसाच्या जीवाचा सामूहिक (वैयक्तिक नव्हे) दु:खभार हलका करण्यासाठी, दहशतवाद, भ्रष्टाचारासारखे प्रश्न सोडवण्यासाठी का केला नाही हा प्रश्न पडत राहतोच.
ओसामा बिन लादेनची हत्या अमेरिकी सैनिकांनी धाडसानं पाकिस्तानात जाऊन केली. ओसामा हा क्रूरकर्माच होता. सगळं जग स्वत:च्या हिंसक कारवायांसाठी उभारलेल्या संघटित जाळ्यामार्फत आपल्या मुठीत ठेवू बघणारा होता. तो कुणी सामान्य खुनी गुन्हेगार नाही. इतके वर्ष त्याला शोधून न काढता येणं हीही अमेरिकेसाठी नामुष्कीची गोष्ट झालेली होती. आधीच इराक, अफगाणिस्तान आणि काही प्रमाणात पाकिस्तानातही अडकून पडलेल्या अमेरिकेला ह्या कारवाईतून अतोनात दिलासा मिळाला असणार, लादेनच्या हत्येनंतर अमेरिकेत जो जल्लोष करण्यात आलेला दिसला त्यावरून हे नक्की जाणवतं. पण एका देशातल्या व्यक्तीला मारायला दुसर्या देशातले लोक येतात, त्याचा खून करतात. पाकिस्तानी सुरक्षाव्यवस्थेला गृहीतही धरलं जात नाही. त्यानंतरही त्यावेळचा एकही पुरावा जगासमोर येत नाही, आणून दिला जात नाही. जगातले इतर देश ह्याचा निषेधही करत नाहीत, हे भयंकर आहे. आपल्याकडच्या एका अर्थी दहशतवादी आणि अतिरेकी लोकांना तर या बातमीनं चेवच चढला. आता भारतानंही असंच करायला पाहिजे असं उन्मादी वातावरण तापवलं जाऊ बघत आहे.
यातून स्पष्ट होते ती एकच गोष्ट की एक दहशतवादी मारला गेला तरी त्यातून दहशतवाद कमी होत नाही उलट उफाळतो. मुळात स्वत: ओसामा हे रशियाविरुद्ध अफगाणिस्तान लढ्यासाठी अमेरिकेनंच तयार केलेलं एक भूत. बाटलीतून बाहेर पडल्यावर ते त्यांच्याच माथी बसू लागलं म्हणून त्यांना त्याला मारावं लागलं. दीर्घकालीन प्रश्नांना तात्पुरती उत्तरं काढण्याच्या प्रयत्नात अशी लांबलचक भुतावळ तयार झालेली आहे. ओसामाला मारून तिला आळा बसणार नाही. आपल्याकडेही पंजाबातल्या दडपशाहीमुळे भिंद्रानवाले तयार होतात, छत्तीसगडमध्ये सलवाजुडूम सारखे कायदे भुतावळीची जागा घेतात. त्यांच्या आणि या दहशतवादाच्या चेहर्यात फार साम्य आहे. ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर अमेरिकेतल्या एका मित्राला विचारलं, कसं आहे तिथलं वातावरण? त्यावर तो म्हणाला, आता कुठे-कधी-कसा पुढचा हल्ला होईल याच्या चिंतेत आणि असुरक्षिततेत!
आपण एका बाजूला मुलाबाळांना स्वच्छंदानं भयमुक्त जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न करू पाहतो आहोत आणि एका बाजूला हे जग असुरक्षिततेच्या कबजात अधिकाधिक जाताना दिसतं आहे.
तुमच्या मुलांशी तुम्ही या बातम्यांबद्दल बोललात का? जरूर बोला. कुठल्याही दडपणाशिवाय त्यांना जगता यायला हवं असेल तर परिस्थिती त्यांच्यापासून लपवून न ठेवता ती बदलण्याची इच्छा त्यांच्या मनात जागी व्हायला हवी.