वेगळे पाहुणे
अमेरिकेतील सरकारी शाळांतील वेगळ्या उपक्रमांविषयी
अमेरिकेतलं निसर्गसौंदर्य, सुबत्ता आणि मानवनिर्मित सुविधा ह्याविषयी छान छान गोष्टी आपण खूप ऐकतो, वाचतो. आणि हे सर्व आपण अशा लोकांकडून ऐकतो की जे अमेरिकेतल्या आपल्या, आर्थिक सुस्थिती असलेल्या नातेवाईकांकडे राहून आलेले असतात.
मात्र ‘तळागाळातील’ अमेरिका अनुभवायची असेल तर अमेरिकेतल्या कुठल्याही शहरातल्या पब्लिक स्कूल (सरकारी शाळा) मधले अनुभव घ्यायला हवेत.
असा अनुभव मी चारपाच वर्ष घेतला. किंडरगार्टनपासून बारावीपर्यंतच्या इयत्तांमधे सब्स्टिट्यूट टीचरचं काम करून मला वेगळीच अमेरिका बघायला मिळाली.
वेगळी म्हणजे कशी? विभक्त झालेल्या आईवडिलांमुळे केविलवाणी झालेली शाळांमधील लहान मुलं मी पाहिली, मुलांची पर्वा नसणारे पालक, दारिद्य्ररेषेखालील, कमी शिकलेले गरीब पालक पाहिले, शाळेत बेताल आणि वाईट वागणारी मुलेही पाहिली.
मी काम केलेल्या पंचवीस पब्लिक स्कूल्समधे मुलांच्या बाबतीतले जरी बरेवाईट अनुभव मला आले तरी ह्या शाळांमधले शिक्षक, त्यांची कामे, शाळातून असणार्याअ सोई बघून मी आश्चर्यचकित झाले. कारण आपल्या सरकारी शाळा, खेडेगावातल्या शाळा ह्यांची साधारण झलक मी बघितलेली होती. त्यामुळे सरकारी शाळांबद्दल मनात कल्पना वेगळीच होती.
मात्र ह्या होत्या जगातल्या श्रीमंत देशातल्या सरकारी आणि गरीब शाळा ! त्यामुळे आपल्याकडे खाजगी शाळातूनही दिसणार नाहीत अशा सुविधा, सोई आणि भरपूर काम करणारे शिक्षक ह्या शाळात होते. हे सर्व पाहून आपल्याकडे असं सर्व व्हावं असं फार वाटलं. आणि इथल्या मुलांचा जरा हेवाच वाटला.
दुर्दैवाने अमेरिकेत पब्लिक स्कूल्समधील बहुसंख्य मुलांना आणि पालकांना जगातली कित्येक मुले शिक्षणाच्या बाबतीत कायकाय गोष्टींना मुकत असतात ह्याची जराही कल्पना नसते. त्यामुळेच की काय, अमेरिकेत राहत असल्यामुळे आपल्याला जगातल्या इतर देशांमधल्या मुलांपेक्षा किती कायकाय मिळतंय ह्याची त्यांना जाणीव नसते, पर्वाही नसते. त्यामुळे ज्या मानाने ह्या शाळात शैक्षणिक गोष्टींची मुबलकता व शिक्षकांचे कष्ट असतात त्यामानाने फारच कमी मुले ह्या शाळात चांगली शिकतात.
मात्र आपल्याला सुखावणारी गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकेतल्या अशा अनेक सरकारी शाळात भारतीय वंशाची बहुसंख्य मुले छान शिकतात, पुढे उच्चशिक्षण घेतात आणि यशस्वी होतात. कदाचित त्यांचे पालक उच्चशिक्षित आणि जागरूक असतात हे त्याचे कारण असेल.
ह्या शाळांमधे काम करताना मुलांना शिकवण्यात आपण किती विविधता आणू शकतो हे मला दिसलं. उदाहरणार्थ, समाजातल्या विविध थरातल्या लोकांच्या भेटी शाळांमधे घडवून आणणे.
त्याबाबतीतले माझे दोन अनुभव इथे देत आहे.
एका पाचवीपर्यंतच्या एलिमेंटरी शाळेत एक भेट होती ‘नेटिव्ह अमेरिकन’ लोकांची. ह्या लोकांना पूर्वी रेड इंडियन्स असं म्हटलं जाई. हे लोक अमेरिकेच्या मुख्य प्रवाहात अजून तितकेसे आलेले नाहीत. हे लोक पूर्वीच्या काळी जंगलांमधून शिकार करून गुजराण करत. प्राण्यांची हाडे, कातडी ह्यांच्यापासून विविध वस्तू बनवण्यात ते निष्णात असतात. अमेरिकेत खूप ठिकाणी अजूनही ह्या लोकांच्या सरकारमान्य वसाहती आहेत.
अशा दोन नेटिव्ह अमेरिकन बायकांना शाळेत बोलावलं होतं. ह्या लोकांच्या विशिष्ट चेहरेपट्टीवरून ते ओळखता येतात. शाळेमधल्या अमेरिकेच्या इतिहासाच्या पुस्तकातून नेटिव्ह अमेरिकन लोकांची माहिती दिलेली असते. ह्या भेटीनिमित्त ती माहिती, त्यातली मोठाली चित्रे शिक्षकांनी वर्गातून आधीच मांडून वातावरण – निर्मिती करून ठेवली होती.
त्या बायका त्यांच्या रंगीबेरंगी पारंपरिक वेषात आल्या होत्या. त्यांनी प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली हत्यारे, सुया, विविधरंगी मणी, दोरे आणि कातडीपासून केलेल्या पिशव्या, बटवे, अंगरखे असं बरंच साहित्य आणलं होतं. वर्गावर्गात जाऊन त्यांनी ते दाखवलं. मुलांना त्या गोष्टी हाताळायला दिल्या. मुलं त्यांच्याशी बोलत होती. त्यांच्या सर्व वस्तू हातात घेऊन बघताना मुलांना फार मजा वाटत होती. मग त्या बायकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सामानातले दोरे व मणी देऊन माळा व ब्रेसलेट करायला शिकवली. स्वतः तयार केलेल्या माळा मुलांनी लगेच गळ्यात, हातात घातल्या.
ह्या नेटिव्ह अमेरिकन्सच्या भेटीमुळे मुलांना इतिहासाच्या पुस्तकात शिकत असलेली माहिती वेगळ्या प्रकारचा आनंद घेत प्रत्यक्ष जवळून बघता आली.
माझ्या मनात आलं की, आपल्याकडेही आपल्या समाजातल्या बारा बलुतेदारांना असं मुद्दाम सवड काढून शाळांमधून बोलवता येईल का आणि इतिहासातल्या आपल्या पूर्वीच्या समाजाचं प्रत्यक्ष भेटीतून ज्ञान देता येईल का?
एक दिवस एका मोठ्या हायस्कूलमधे वेगळाच कार्यक्रम होता.
‘पॉज फॉर ए कॉज’ अशा पाट्या शाळेत सगळीकडे ठेवलेल्या मला दिसल्या. त्या पाट्यांवर कुत्र्यांच्या पंजांचे ठसे होते. मला काही ह्या पाट्यांचा उलगडा होत नव्हता. नंतर मला कळलं की दुपारी शाळेत सभागृहात कुत्र्यांना ट्रेनिंग देणारी टीम येणार होती. कुत्री ट्रेनिंगप्रमाणे कशी वागतात आणि ह्या ट्रेनिंगचा उपयोग काय होतो हे ती टीम दाखवणार होती.
तरीही पाट्यांचा अर्थ मात्र मला लागत नव्हता.
सांगितलेल्या वेळेला एकेक करत शाळेतले सर्व वर्ग सभागृहात पोचले. मुलांच्या रांगांमधे बरेच शिक्षक मुलांच्या अधेमधे बसले असल्याने सभागृहात कुठेही गडबड नाही की गोंधळ नाही. आणि सगळ्यांची उत्सुकताही ताणलेली होतीच. ठरल्या वेळेला तीन छान, चपळ कुत्री घेऊन शर्टपॅन्ट युनिफॉर्मवाल्या अतिशय स्मार्ट अशा दोन बायका स्टेजवर आल्या.
त्यांना पाहताना मला आपल्याकडची पोलीस कुत्री व त्यांचे ट्रेनर ह्यांची आठवण झाली.
पण ह्या कुत्र्यांविषयी त्या जेव्हा माहिती सांगायला लागल्या तेव्हा लक्षात आलं की ही काही पोलिसातली कुत्री नव्हती. ही होती निराधार माणसांना मदत करणारी कुत्री ! अमेरिकन समाजात कित्येक वयस्क, अपंग, अंध, मूकबधिर व्यक्ती एकेकट्या राहत असतात. अशा लोकांच्या सोबतीसाठी ही कुत्री ‘पॉज फॉर ए कॉज’ ह्या सामाजिक संस्थेकडून देण्यात येतात.
ही कुत्री दारातला पेपर घरात आणणे, फोन आला तर फोन बसल्या जागेवर आणून देणे वगैरे कामं तर करतातच शिवाय घराजवळच्या बँक, पोस्ट, दुकान इत्यादि ठिकाणी मालकाच्या मोटराइज्ड व्हीलचेअर बरोबर जाणे, छोट्या सामानाची पिशवी तोंडात धरून आणणे वगैरे कामेही ती करतात. अर्थात अमेरिकेतील रस्त्यांवरून अशा व्हीलचेअरने जाण्याची, रस्ते क्रॉस करण्याची उत्तम सोय असल्यामुळे ह्या लोकांना बाहेर जाणे शक्य होते.
ह्या कुत्र्यांची सोबत ह्या लोकांना फार मोलाची वाटते. आणि त्यासाठी ‘पॉज फॉर ए कॉज’ ही सामाजिक संस्था हे कार्य करते.
कुत्र्यांच्या ट्रेनरनी सभागृहातल्या मुख्य कार्यक्रमानंतर ही कुत्री सर्व वर्गातून नेली. मुले कुत्र्यांचे लाड करू लागली, त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागली. मुलं फार खुश झालेली दिसत होती.
ह्या ट्रेनरनी मुलांना असं आवाहन केलं की, ‘ज्या मुलांना त्यांच्या खाऊच्या पैशातून आमच्या संस्थेला काही द्यायची इच्छा झाली असेल त्यांनी वर्गात ठेवलेल्या डब्यात ते टाकावेत.’
ज्या वर्गात सर्वात जास्त पैसे जमतील त्या वर्गाला शाळेनेही बक्षीस देण्याचं जाहीर केलं होतं.
मी असलेल्या वर्गात जेव्हा कुत्री आणली गेली तेव्हा मुलांनी ट्रेनरना विचारलं की कुत्र्यांना तुम्ही एवढं कसं शिकवता? त्यावर ट्रेनरने सांगितलं की, ‘आम्ही कुत्र्यांना एकच गोष्ट खूप वेळा, खूप कष्ट घेऊन शिकवतो आणि तरीही त्यांना जर करता आलं नाही तर मात्र काय करतो माहीत आहे का?’ मुलांनी मोठ्या उत्सुकतेनं विचारलं, ‘काय करता?’ त्यावर ट्रेनर म्हणाली, ‘परत शिकवतो !’