बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ
नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला गोष्ट वाचून दाखवण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. ‘बाबाच्या मिश्या’ – लेखन व चित्रे माधुरी पुरंदरे असं वाचलं. त्यावर माझ्या लेकाने ‘म्हणजे मुलगीने काढलंय ना?’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली. मला हसू आलं. यापूर्वी गोष्टी वाचून दाखवताना जरी लेखक, चित्रं याबाबत नावं सांगितली जायची तरी अशी प्रतिक्रिया आली नव्हती, त्यामुळे त्याच्या चिमुकल्या निरीक्षण विश्वातून टिपलेली ही बारीकशी गोष्ट कौतुकास्पद वाटली.
बाबाच्या मिश्या’ आणि ‘काकूचं बाळ’ ही माधुरी पुरंदरे लिखित दोन पुस्तकं नुकतीच लहानग्या बालचमूसाठी उपलब्ध झालीयेत. या दोन्ही पुस्तकांतील आशयानुसार येणारे प्रसंग हे आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत. ‘मिशी’ – म्हटलं तर सहजगत्या निरीक्षण करता येण्याजोगी बाब. आपल्या मोठ्यांच्या दृष्टीने जरा दुर्लक्षित पण चिमुकल्यांच्या दृष्टीने म्हटले तर मिशीनुसार लढवलेले वेगवेगळे कल्पनांचे आविष्कार. वळवलेल्या मिश्या, जाड मिश्या, बारीक मिश्या, ढग मिश्या असे प्रकार, त्याला अनुसरून कात्रीचा येणारा चुक् चुक् आवाज, तर पोशाखांच्या बाबतीत लालचुटुक पगडी, तुरेदार फेटा, मोठ्ठी काळी हॅट, झकास अंगरखा, मोठ्ठा काळा कोट हे सगळं लेखिकेनं नेमकेपणानं पकडलंय. परिचयातील या व्यक्ती मिशीनुसार पोशाख करून काय काय भूमिका – जसे की चष्मिस मावळा, गब्रु पैलवान, गुप्त पोलीस – वठवू शकतील हेही सहजगत्या मांडलंय. आता माझ्याबाबतीत असं झालंय की मुलाला दोन – तीन वेळा गोष्ट वाचून दाखवली खरी पण आता मीही येताजाता मिश्यांचं निरीक्षण करून वेगवेगळ्या शकला लढवायचा प्रयत्न करत आहे.
‘काकूचं बाळ’ या पुस्तकात बाळ आणि लहानगी ताई आहे. घरी आलेल्या बाळामुळे बदललेलं वातावरण, बाळाभोवती मोठ्यांचं केंद्रित झालेलं लक्ष, त्यामुळे थोडीशी खट्टू झालेली छोटी मंडळी, मोठ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. छोट्या बाळानं काहीही केलं तरी त्याचं मोठ्यांकडून होणारं कौतुक आणि आपल्याला मात्र सूचना ! त्यामुळे एकीकडे रागही व्यक्त होतोय, पण ताईपणाची जबाबदारीही आवडतेय. अगदी याच मानसिकतेचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला गेलाय. त्यामुळे माझा लेकच काय पण मीही या दोन्ही पुस्तकांच्या प्रेमात पडले आहे, हेही तितकंच खरं !