घरात हसरे तारे
बिनशर्त प्रेमाच्या आविष्काराबरोबर उच्च त्यागाची भावना नेमकी काय असते हे गूढ माझं मूल मला रोज नव्यानं उलगडून दाखवत असतं. प्रत्येक दिवशी, अखंडपणे.
खरं म्हणजे मूल होणं हा प्रसंग कुठल्याही आईच्या आयुष्याचा म्हटला तर कळसाध्याय आणि म्हटलं तर रोजच्या जगण्यातील एक सामान्य घटना ! आयुष्यातल्या या सर्वात महत्त्वाच्या घटनेला सर्व आयांना कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय सामोरं जावं लागतं. मी त्यातली एक आई होते.
मी जेव्हा वयाच्या तिसाव्या वर्षी आई झाले, त्यावेळी माझं या विषयावर असलेलं सगळं समकालीन साहित्य वाचून झालेलं होतं आणि वडिलधार्यांमचे ‘मूल’ या संकल्पनेवरचे वेगळे (अनाहूत) सल्लेही कोळून प्यायले होते.
त्यावेळेच्या काही ठाम समजुती मी मनाशी पक्क्या केल्या होत्या, त्या अशा :
१. माझं माझ्या मुलाशी मैत्रीच नातं असेल.
२. मी माझ्या आईपेक्षा वेगळी ‘आई’ होईन.
३. मी माझ्या मुलाशी वागताना त्यात पूर्ण पारदर्शकपणा असेल.
४. माझ्या मुलाला काय हवं आहे आणि काय हवं असेल अशी प्रत्येक गोष्ट मला सहजपणे कळेल.
५. आमच्यात ‘जनरेशन गॅप’ कधीच नसेल !
गेली पंचवीस वर्षं माझ्या मुलाची आई म्हणून वावरत असताना मात्र या सर्व समजुती कोलमडल्या. खलील जिब्राननं म्हटलं आहे की, ‘Your children are not your children; they are the sons and daughters of Life’s longing for itself.’ अगदी प्रत्येक दिवशी हे सत्य मला नव्या ताकदीनं येऊन भिडत गेलं.
माझ्या मुलाचं भाग्य आहे की त्याला दोन्हीकडच्या आजी-आजोबांचा सहवास लाभला. त्यांनी त्याला संपूर्ण वेळ दिला. त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित केलं आणि अर्थातच भरपूर पर्याय दिले. त्याच्या आयुष्यात काही गोष्टी सरळ आल्या. उदा. आयुष्य हे वेगवेगळ्या वयोगटातल्या, भिन्न स्वभावाच्या, भिन्न प्रवृत्तीच्या, वेगवेगळ्या व्याधी, विविध गरजा आणि कल्पना असणार्याक व्यक्तींसह जगायचं असतं. त्यामुळे ज्येष्ठांचा आदर करण्याचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं. पण सतत मोठ्या लोकांच्या अवतीभवती वावरल्यामुळे तो थोडासा अकाली प्रौढ झाला. एकुलतं एक नातवंड असल्यामुळे तो आपोआपच घरातला अनभिषिक्त सम्राट झाला आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीवरचा पहिला हक्क देखील त्यालाच मिळाला. त्यामुळे एखादी गोष्ट न मिळणं, वाटून घेणं, देऊन टाकणं यांची ओळख जरा उशिरा झाली. स्पर्धात्मकता, स्वतःची जागा निर्माण करणं, मी वरचढ आहे हे दाखविण्याची ऊर्मी, विशेषतः मुलांना, शाळेच्या वातावरणात सहजपणे कळायला लागते पण इतर मूल्ये झिरपायला मात्र वेळ जावा लागला.
लहान असताना आयुष्याबद्दलची मोठी मोठी, दणदणीत विधानं तो उत्स्फूर्तपणे करायचा की आयुष्य ही एक शर्यत आहे, धावायला हवं; आयुष्य हे एक कोडं आहे, ते सोडवायला हवं; आयुष्य हा खेळ आहे त्यात आनंद घ्यायला हवा आणि असंच काही बाही बोलायचा. विशेषतः जेव्हा मी असाहाय्य मनस्थितीत असायचे किंवा माझं माझ्यावरचं नियंत्रण सुटलेलं असायचं तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वातल्या उणिवा तो मला ठळकपणे जाणवून द्यायचा. जेव्हा तो लहान होता तेव्हा मला कळलंच नाही की मुलं ही आपली प्रतिबिंबं असतात, extension नसतात.
मला एक प्रसंग खास लक्षात राहिलाय. आम्ही आमच्या एका स्नेह्यांकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला दिलेला चहा जरा जास्तच लाल होता. दूध जरा कमी घातलेलं असावं. त्यांनी विचारलं की माझा मुलगा चहा घेईल का, तर मी नको असं सांगितलं. यावर माझ्या मुलानं सरळ सांगितलं ‘‘मी घेतो चहा, पण हा नको, कारण हा खूप काळा चहा आहे.’’ या प्रसंगाची पंचाईत टळावी, त्यानं अजून जास्त काही बोलू नये, म्हणून मी त्याला हळूच चिमटा काढला तर हा म्हणतो, ‘‘आई मला चिमटा काय काढतेस, मी खरं सांगतोय.’’ या प्रसंगानंतर सत्य बोलण्याच्या काही नेमक्या जागा असतात आणि काही नसतात हे सांगणं भाग पडलं, म्हणून दुसरा मार्ग शोधला की पांढरं सत्य आणि काळं सत्य. या नव्या खेळात आयुष्यातील प्रश्न सोपे आणि साधे सरळ असताना हा मार्ग राबवणं सोपं होतं. पण प्रश्न जसे क्लिष्ट आणि कठीण व्हायला लागले तसा हा खेळ गहन होत गेला आणि मग गांधीजी आणि हरिश्चंद्राचा दाखला देणंही अवघड होत गेलं.
जशी वर्षं जाताहेत तशा दोन गोष्टी जाणवायला लागल्या आहेत, एक म्हणजे माझ्या मुलाचं बोलणं, त्याची भाषा, मांडण्याची पद्धत, दृष्टिकोन, हावभाव या सगळ्यात मला माझीच झाक दिसते आणि जेव्हा तो माझ्याशी बोलतो तेव्हा त्याला काही सांगत असताना मला माझ्यात माझ्या आईचा भास होतो. तो माझ्यापेक्षा कितीतरी बाबतीत वेगळा आहे आणि तरीसुद्धा माझ्यासारखाच आहे, हे मला नव्यानं जाणवतं.
माझ्या स्वतःच्या कामाकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन माझ्यासारखाच आहे. हवामान बदलांमुळे हिरवाई, स्वच्छ हवा आणि पाणी, यावर परिणाम होत आहेत, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा भागणं अवघड बनतं आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित अशा या विषयांवरच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी, काही उपाययोजना अमलात आणण्यासाठी आमची कौटुंबिक कंपनी काम करत आहे. त्या कंपनीच्या कामात माझ्या मुलाचं सहकार्य लाभत आहे.
जे काम मी करत आहे तेच जणू काही माझं एक अपत्य आहे, त्याच्याकडे मला सतत लक्ष द्यावं लागतं आणि ते इतकं हट्टी आहे की मला सतत क्षमाशील बनवत असतं. यामुळे माझ्या आयुष्याला नवीन परिमाण लाभलं आहे सतत दक्ष असण्याचं. त्यातच भर म्हणजे माझा मुलगा माझ्या या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमांवर दररोज एक नवीन सूचना किंवा एक चिकित्सक भाष्य करत असतो. खरं म्हणजे माझी ही दोन्ही मुलं मला एक चांगली व्यक्ती होण्याचाच मार्ग दाखवत असतात.
अजून एक गोष्ट घडतीये. ती म्हणजे मी काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि निश्चित अशा जीवनमूल्यांकडे वळते आहे. अशा वेळी भगवद्गीतेपेक्षा उत्तम ग्रंथ कोणता? भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातील काही श्लोक अशाच चिरंतन मूल्यांचा पुरस्कार करतात. मुलाच्या उणिवा आणि दोष दिसत असतानाही त्याच्यावर मनापासून प्रेम करता येणं, त्याच्या अंगभूत गुणांचं कौतुक करता येणं, आणि तरीही त्याचवेळी शांत चित्तानं आणि तरीही उत्कटपणानं या प्रेमस्वरूप वस्तूला त्रयस्थपणे बघता येणं हेही महत्त्वाचंच.
शेवटी असं उमजतं की सर्वात सोपं काय आहे तर आपल्या मुलावर निःस्वार्थ आणि हक्कानं प्रेम करणं. ‘बिनाअट प्रेम करावं’ हे सांगायला जेवढं सोपं तेवढं कृतीत आणायला अवघड. त्याहीपेक्षा कठीण काय असेल तर आसक्तिविरहित प्रेम करणं.
(असक्तिरनभिष्वङः पुत्रदारगृहादिषु |)
बिनशर्त प्रेमाच्या आविष्काराबरोबर उच्च त्यागाची भावना नेमकी काय असते हे गूढ माझं मूल मला रोज नव्यानं उलगडून दाखवत असतं. प्रत्येक दिवशी, अखंडपणे.
लेखिका ‘प्राज फाउंडेशन’च्या संस्थापक संचालक आहेत.